एक हवीहवीशी शाळा

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
10 Mar 2016 - 4:43 pm

शाळा सुटण्याचा आनंद जिथे शाळा भरण्याच्या आनंदापेक्षा छोटा असतो, अशा शाळा विरळाच. अशाच एका शाळेबद्दल नुकतंच वाचलं. वाचून मनात प्रचंड कौतुक, प्रचंड आदर, प्रचंड प्रेरणा असे अनेक भाव दाटून आले. शाळेबद्दल; परंतु त्याहून अधिक या शाळेचा ख-या अर्थाने कायापालट करणा-या त्या एका व्यक्तीबद्दल.

पुण्याजवळील शिक्रापूर नजीक वाबळेवाडी नावाचं गाव आहे. तिथल्या जिल्हापरिषदेच्या शाळेची ही गोष्ट आहे. २०१२ साली दत्तत्रय वरे यांनी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारली. शाळेतील प्रवेशांचं घटणारं प्रमाण, विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेबद्दलची कमी होत चाललेली ओढ, या गोष्टींची वरे सरांना कल्पना होती. त्या गोष्टी गांभीर्याने घ्यायचा त्यांनी निर्धार केला. सर्वप्रथम त्यांनी गावक-यांशी संवाद साधला आणि शाळेत शिक्षक, किंवा शिक्षण या बरोबरच वातावरण हे शिक्षणासाठी पूरक असायला हवं हे गावक-यांना पटवून दिलं. यासोबतच 'कुठलीही बाहेरची आर्थिक मदत न घेणे' या आणखी एका गोष्टीवर सरांचं, गावक-यांचं एकमत झालं.

इच्छाशक्ती असली की काहीही साध्य होतं या उक्तीला सार्थ ठरवत १७ लाख रुपये जमा झाले. वरे सरांवर गावकर्‍यांनी पूर्ण विश्वास टाकला. त्यांच्या देखरेखीखाली शाळेचा कायापालट झाला. निधी कमी असल्याने कंत्राटी कामगारही नेमले गेले नाहीत, वरे सर व आणखी दोन शिक्षकांनीच ही प्रचंड जबाबदारी उचलली व चोख पार पाडली.

वातानुकुलित वर्ग, सौर ऊर्जा, वायफाय, संगणक, विज्ञान, कार्यानुभव, भाषा, क्रीडा याकरिता स्वतंत्र व सुसज्ज कक्ष, आणि एक बोटॅनिकल गार्डन, या सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाल्या. इथे शिक्षक फक्त पुस्तकंच नव्हे तर प्रात्यक्षिकांद्वारे मुलांना शिकवतात. मुलं वाचनालय, इंटरनेट ही माध्यम मुक्तपणे वापरून माहिती घेऊ शकतात, यातून स्वशिक्षणाचीही ओळख त्यांना होते. आवडते विषय शिकण्याची मुभा इथल्या प्रत्येक मुलाला आहे, त्यामुळे आज खेळ शिकला, उद्या भाषा, हे स्वातंत्र्य आहे.

एके काळी ३० बळे बळे येणारी मुलं असणारी ही शाळा आज ९० मुलांना शिकवते व शाळा संपल्यावर या मुलांना अक्षरशः शाळेतून हाकलावं लागतं. सकाळी ८ ते संध्याकाळी ७-७ वाजेपर्यंत ही मुलं शाळेत रमतात. वरे सरांचं तत्वच हे आहे की शिक्षण ही आनंददायी प्रक्रिया असायला हवी आणि त्याचंच एक आदर्श उदाहरण त्यांनी वाबळेवाडीच्या शाळेमार्फत जगासमोर उभं केलं आहे.

एकीकडे मुंबई-ठाण्यातल्या मानाच्या शाळा इंग्रजी माध्यम, संक्रमण, स्पर्धेचा काळ, काळाची पावलं वगैरे कारणं देत पळवाटा शोधत आहेत, निधीच्या रकमा वाढल्या तरी शिक्षणाचा दर्जा वाढत नाहीये, आणि मुलांचा सोडून बाकी सगळ्यांचा विकास होतोय.असं असताना वरे सरांनी समर्थपणे उद्धार केलेलं हे विद्येचं मंदिर सगळ्या शाळांनी, शिक्षकांनी एकदा बघायला हवं.
करायचं असेल काही तर माध्यमं आड येत नाहीत, सरकारकडून मिळणारी अनुदानं कमी पडत नाहीत, आणि मुलांचं भलं होणार असेल तर पालक कसलीही मदत करायला तयार असतात, हे लोकांना कळलं तर वाबळेवाडीच्या शाळेचं अनुकरण राज्यातल्या अनेक शाळांना करता येईल आणि वरे सरांचं यश कितीतरी पटीने मोठं होईल.

खालील फोटो आंतरजालावरून साभार.
Sir
CL
a

एक दुवा:
http://www.thebetterindia.com/47989/wablewadi-zilla-parishad-school-air-...
इतर अनेक दुवे जालावर उपलब्ध होतील. गूगलावे.

समाजजीवनमानशिक्षणविचारअभिनंदनआस्वादबातमीमत

प्रतिक्रिया

निशांत_खाडे's picture

10 Mar 2016 - 4:48 pm | निशांत_खाडे

भारीच. एकदा भेट द्यायलाच पाहिजे. छान लिहालयत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Mar 2016 - 4:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्या बात है. मस्त ओऴख. वरे सरांचा मोबाईल नंबर द्या. कौतुक करु या.
सर पण मस्त प्रसन्न आणि खुश दिसताहेत. जिप शाळेतील शिक्षक फार कमी प्रसन्न दिसतात.

दिलीप बिरुटे

मोबाईल नंबर शोधावा लागेल. मला तर भेटायचीच इच्छा आहे.

अत्रन्गि पाउस's picture

16 Mar 2016 - 4:56 pm | अत्रन्गि पाउस

माझा नंबर आहेच तुमच्याकडे .....बोलूयात

आनन्दा's picture

10 Mar 2016 - 5:26 pm | आनन्दा

चांगली बातमी.

नाखु's picture

10 Mar 2016 - 6:34 pm | नाखु

आणि अनेकानेक शुभेच्छा !!!

वेल्ला धन्यवाद आणि इथे भेट द्यायलाच हवी असे ठिकाण !!!

बोका-ए-आझम's picture

10 Mar 2016 - 7:36 pm | बोका-ए-आझम

इच्छा तिथे मार्ग!

कौतुकास्पद! पालकांकडून खंडीभर पैसे उकळणार्‍या खासगी शाळांमध्येतरी असं होतं असेल का असा प्रश्न पडला.

शिक्रापूर बाजूला गेलो तर वाबळेवाडीला नक्कीच भेट देईन. तुमचे आभार या माहितीबद्दल.

वेल्लाभट's picture

10 Mar 2016 - 10:56 pm | वेल्लाभट

सगळ्यांना __/\__

मी फक्त हे शक्य तितकं पसरवतोय. मी प्रचंड प्रेरित झालोय.

अगम्य's picture

10 Mar 2016 - 10:57 pm | अगम्य

मिपावर कोणी असे लोक आहेत का ज्यांच्या टीव्ही चानेल वर ओळखी आहेत? ह्या शाळेवर खरे तर national TV वर छोटीशी story होऊ शकेल.

अगम्य's picture

10 Mar 2016 - 10:59 pm | अगम्य

ही माहिती इथे दिल्याबद्दल वेल्लभट ह्यांना धन्यवाद

श्रीरंग_जोशी's picture

10 Mar 2016 - 11:04 pm | श्रीरंग_जोशी

खूपच महत्वाचा विषय अन अत्यंत स्पृहणीय कार्य.

शिक्षण त्यातही शालेय शिक्षण हा खूपच महत्वाचा विषय आहे. वरे सर व त्यांचे शिक्षक सहकारी व त्यांना साथ देणारे वाबळेवाडीचे ग्रामस्थ यांना मनःपूर्वक धन्यवाद.

अशा उपक्रमांची संख्या वाढत राहो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2016 - 11:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

अत्यंत स्पृहणिय काम आहे हे !!! याला खूप प्रसिद्धी मिळायला हवी.

धन्यवाद वेल्लाभटसाहेब ही माहिती इथे प्रकाशित केल्याबद्दल !

मधुरा देशपांडे's picture

11 Mar 2016 - 3:46 pm | मधुरा देशपांडे

__/\__
धन्यवाद शेअर केल्याबद्दल.

इडली डोसा's picture

12 Mar 2016 - 9:20 am | इडली डोसा

__/\__
धन्यवाद शेअर केल्याबद्दल.

खूप छान माहिती .

स्वाती दिनेश's picture

12 Mar 2016 - 9:27 pm | स्वाती दिनेश

छान माहिती, शाळा आवडली.
स्वाती

किचेन's picture

16 Mar 2016 - 9:44 am | किचेन

तोत्तोचॅनची आठवण आली.

अजया's picture

16 Mar 2016 - 11:41 am | अजया

_/\_
प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.आमच्याही गावाच्या जवळ छोट्या छोट्या गावात शाळा आहेत.मदतीसकट ही बातमी तिथे नक्की पोचवु शकेन.

पिलीयन रायडर's picture

16 Mar 2016 - 11:53 am | पिलीयन रायडर

अत्यंत आवडला हा लेख! एक हाडाचा शिक्षक जेव्हा असे काम हाती घेतो तेव्हा अशी शाळा उभी रहाते.

सरांना भेटलात तर आमचाही नमस्कार सांगा!

बेकार तरुण's picture

16 Mar 2016 - 12:11 pm | बेकार तरुण

अत्यंत चांगला उपक्रम !!
वाचुन छान वाटल एकदम.

वेल्लाभट's picture

16 Mar 2016 - 2:23 pm | वेल्लाभट

तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादांबद्दल अनेक आभार. हे खरोखर एक उदाहरण आहे व मी वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे वरे सरांना भेटण्याची माझी इच्छा व प्रयत्न आहे. मी सगळ्या प्रतिसादकांच्या सदिच्छा त्यांच्यापर्यंत पोचवेन.

सद्ध्या मराठी शाळा, मातृभाषेतून शिक्षण या विषयासंदर्भात कार्य करणा-या व्यक्तींशी त्याच निमित्ताने संपर्कात असताना समोर आलेलं या शाळेचं उदाहरण म्हणजे फारच प्रेरणा देणारं आहे आमच्यासाठी.

पुनःश्च आभार.

प्रमोद देर्देकर's picture

16 Mar 2016 - 2:34 pm | प्रमोद देर्देकर

छान उपक्रम सरांना नमस्कार आणि शुभेच्छा!

कपिलमुनी's picture

16 Mar 2016 - 2:55 pm | कपिलमुनी

एका मराठी शाळेचा काया पालट पाहून आनंद झाला

चिगो's picture

16 Mar 2016 - 4:49 pm | चिगो

अत्यंत प्रेरक, स्तुत्य प्रयत्न.. वरे स, त्यांचे सहकारी आणि गावकर्‍यांचे कौतूक करावे तेवढे थोडे आहेत..

खूप साधी माणसं खरेच काहीतरी असे करुन जातात. भारी वाटतं.
जिपसारखे प्रशासन अशा गोष्टींकडे कसे पाहते ते रोचक ठरेल.

नाव आडनाव's picture

16 Mar 2016 - 4:54 pm | नाव आडनाव

__/\__

बॅटमॅन's picture

16 Mar 2016 - 5:21 pm | बॅटमॅन

अगोदर पाहिलेली ही न्यूज. सरांना एकदा भेटायची खूप इच्छा आहे. धिसिज रियल ग्रेट वर्क.

अभिजीत अवलिया's picture

26 Mar 2016 - 2:23 pm | अभिजीत अवलिया

अप्रतिम ... __/\__ ...

वाबळेवाडीस भेट देण्यात आलेली आहे. वृत्तांत आज उद्यात टाकेन.
तोपर्यंत पत्ता, संपर्क इत्यादी माहिती आता इतक्यातच सुरू झालेल्या या शाळेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
www.zpschoolwablewadi.org

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Apr 2016 - 6:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वृत्तांताची वाट पाहतोय.

-दिलीप बिरुटे
(उत्सुक)

नाखु's picture

12 Apr 2016 - 8:36 am | नाखु

(उत्सुक) क्र.२

उल्का's picture

13 Apr 2016 - 8:32 pm | उल्का

खूप चान्गली माहिती दिलीत. धन्यवाद!

सन्केत स्थळावरील फोटो मस्त आहे. पुन्हा शाळेत जावेसे वाटले. :)

स्रुजा's picture

12 Apr 2016 - 7:47 am | स्रुजा

आमच्या पर्यंत ही माहिती आणल्याबद्दल खुप आभार. त्या सरांचं व्यक्तिमत्व किती प्रसन्न आहे ! तुमच्या पुढच्या वृ च्या प्रतिक्षेत...

पद्मावति's picture

13 Apr 2016 - 4:29 pm | पद्मावति

असेच म्हणते.

अशीच एक जि. प. शाळा माझी बहिण चालवते, जवळपास या सर्या गोश्टी आहेत तिच्या शाळेत. सातारा जिल्हा, फलटण तालुका , शाळा- चाळशीमळा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Apr 2016 - 11:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

स्तुत्य उपक्रम. वरे सर हाडाचे शिक्षक असणार. शिक्षणाच्या बाजारामधे असे लोकं दुर्मिळ असतात. फक्तं आता हे घाणेरड्या व्यवस्थेचा बळी ठरु नयेत हि माफक अपेक्षा आणि देवाकडे प्रार्थना.