दोनेक वर्षांच्या संपर्कानंतर एकदा मी राजेंना म्हटलं, "मला हा व्यवहार प्रत्यक्ष कसा होतो हे पहायचं आहे."
लाच द्यायचं कसं ठरवतात, पैसे कसे दिले जातात, घेतले जातात हे पहायचं होतं मला. राजेंनी शब्द दिला आणि एकदा मुंबईला बोलावलं. मी गेलो. संध्याकाळी बैठक ठरली होती. दिवसभर इतर काही कार्यक्रम नव्हता. प्रकरण साधंच होतं.
कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात एकाला दारूचं दुकान काढायचं होतं. त्यासाठी आवश्यक एनओसीपैकी काही त्याच्या हाती नव्हत्या. तरीही नियमाला बगल देऊन परवाना देण्याचं मंत्र्यांनी मान्य केलं. सौदा ठरला होता साडेतीन लाखांचा. ठरवणारा होता मंत्र्यांचा पीए. परवान्यासाठी फाईल तयार करण्याचं कामही तोच करून घेणार होता. बोलणं सरळसोट होतं.
“दुकान सुरू करायचं आहे. पोलीस एनओसी आहे. जागामालकाची मिळणं मुश्कील आहे. पण त्याचं ऑब्जेक्शन असणार नाही अशी व्यवस्था आपण केली आहे.”
मला वाटलं होतं इतकं झाल्यानंतर काही संकेत वगैरे केले जातील. पण नाही. मंत्र्यांच्या पीएनं उघडपणे सांगितलं,
“साडेतीन लागतील.”
दुकानदारानं होकार भरला आणि व्यवहार ठरला. दुपारपर्यंत फाईल पुढं सरकवली जाणार होती.
संध्याकाळी पीए पैसे कलेक्ट करणार होता. मुंलुंडच्या एका प्रसिद्ध बारमध्ये ही बैठक ठरली. दुकानदार, राजे आणि मी संध्याकाळी सातच्या सुमारास त्याच्या कारनेच निघालो. बारपाशी पोचलो तेव्हा पीए हजर होता.
बारमध्ये ढणढणाटी संगीत सुरू होतं. कन्यकांचं नृत्य सुरू होतं. बीअरची ऑर्डर गेली. दुपारीच त्या पीएनं मंत्र्यांची सही घेऊन फाईल पुढं पाठवली होती. त्यामुळं दुकान मंजूर झाल्याबद्दल चिअर्स म्हणत बैठक सुरू झाली. दुपारीच माझी ओळख करून देताना राजेंनी नुसतंच "आमचे दोस्त आहेत, तुम्हाला धोका नाही," इतकंच सांगितलं होतं आणि ते पुरेसं ठरलंही होतं. मी त्याच भूमिकेतून तेथे बिअर न पिता बसून होतो.
पहिला राऊंड संपल्यानंतर पीएनं राजेंकडं प्रश्नार्थक पाहिलं. राजेंनी दुकानदाराला खूण केली आणि एक मोठी सूटकेस पुढं आली. पीएनं ती हळूच मांडीवर घेऊन किलकिली केली आणि मान डोलावली.
काही कळण्याच्या आतच कोपऱ्यातून एक जण पुढं आला आणि ती सुटकेस घेऊन बाहेर पडला. राजे निवांत होते, पण तो दुकानदार किंचित हादरला होता. मला त्यातलं काहीही कळत नसल्यानं मी शांत होतो.
"घाबरू नका. आपलाच माणूस आहे. पैसे सुरक्षित नेण्यासाठी." पीए.
दुकानदार थोडा स्थिरावला.
पीएनं परत राजेंकडं प्रश्नार्थक पाहिलं.
"च्यायला, साल्या तू सुधारणार नाहीस... इथं भेटलास ते पुरं, तिथं भेटू नकोस." राजेंचा फटका.
मला काहीही कळत नव्हतं. पण राजेंनी दुकानदाराला खूण केली. त्यानं सफारीच्या खिशातून दहा रुपयांच्या नोटांची दोन बंडलं काढून समोर ठेवली. ती घेऊन तो पीए उठला. नाचणाऱ्या मुलींकडं जाऊन त्याचं नोटा उडवणं सुरू झालं.
बास्स. बाकी काही नाही. थोड्या वेळानं आम्ही बाहेर पडलो. तो पीए एका अंबॅसॅडरमधून आला होता. मघा सूटकेस नेणारा त्या गाडीच्या सुकाणूवर बसला होता.
त्या दुकानदारानं आम्हाला आमदार निवासापाशी सोडलं आणि तो निघून गेलादेखील.
"भिक्कारचोट आहे साला. साडेतीन लाखात त्याचा वाटा आहेच पन्नास हजाराचा. तरी वर उडवण्याचे दोन हजार त्यानं मागून घेतले." खोलीवर आल्या-आल्या बाटली काढून राजे बसले होते. शिव्या त्या पीएला. मला धक्का बसला. मुळात बेकायदा व्यवहार, त्यात या माणसाला प्रोफेशनलिझ्म अपेक्षित होता. बेईमानीका धंदा इमानीसे करना वगैरे. मी बोलून दाखवलं तसं. तर त्यांचं उत्तर होतं, "छ्या. इमानदारी वगैरे नाही. एका मंत्र्याच्या पीएनं असं फुटकळ वागावं याचं वाईट वाटतं. त्यानं साडेतीन लाखाऐवजी तीन लाख ५२ हजार मागून घ्यायचे. हे वर दोन हजार टिप मागितल्यासारखे मागतो तो. मुळात त्यानं पन्नासात ते भागवायला पाहिजे." आता हद्द होती.
"राजे, कुठं जिरवेल तो हा पैसा आणि हा दुकानदार कुठून कमवेल?"
"कुठं जिरवणार साला. असेच उडवेल, थोडी फार प्रॉपर्टी करेल आणि मग काही रोग लावून घेऊन मरेल. हा दुकानदार उद्या काय करणार आहे हे उघड आहे. त्याच्या गावी कधी जाण्याची वेळ आलीच तर त्याच्या दुकानात माल खरेदी करायचा नाही हे ठरवून टाक आत्ताच."
"अच्छा. अशी तर तुम्हाला राज्यातील सगळ्या दुकानांची यादी ठाऊक असेल..." माझा खवचटपणा.
"हाहाहाहाहा. सरकार, प्या तुम्ही. ही ओरिजिनल आहे."
“त्या मंत्र्याची कमाई किती असेल महिन्याकाठी?”
“खरं सांगू का, हे असे हिशेब चुकतात. तुम्ही मंडळी या व्यवहारांचा नीट अभ्यास करत नाही. हा जो व्यवहार आहे तो नेहमीच कॅशमध्ये होत नसतो. अनेक राजकारणी आपला रिसोर्स बेस वाढवतात अशा व्यवहारांतून. हे पैसे शब्दाच्या स्वरूपातच अनेकदा असतात. आणि त्यांचा वापर गरजेनुसार वेळोवेळी होत जातो. त्यामुळे प्रत्यक्ष मंत्र्याच्या हाती सगळे पैसे असतात असं नसतं. त्याची गरज कधी असते, तर निवडणुकीत. त्यावेळी तो मंत्री अशा मंडळींना निरोप पाठवतो आणि ठरलेले पैसे निवडणुकीत जिथं गरज आहे तिथं पाठवून देण्याची व्यवस्था करतो. पैशांचा व्यवहार असा होतो. राजकारण्यांच्या स्तरावर बहुदा हे असंच असतं. ते थेट पैसे घेत नाहीत. थेट पैसे घेणारी जमात म्हणजे ही मधली मंडळी. कारण त्यांचा इंटरेस्ट तेवढाच असतो फक्त. संपत्ती. बास्स. अर्थात, राजकारणी पैसा घेतात याचं मी समर्थन करत नाहीये. मी फक्त त्यांची कार्यपद्धती सांगतोय...”
"व्हॉट डू यू गेट फ्रॉम ऑल धिस?"
"कोण म्हणतं मला काही मिळतं? मला काहीही मिळत नसतं. माझ्या जगण्याचा एक स्रोत आहे तो, बास्स. त्यापलीकडे त्यातून समाधान वगैरे मी शोधत बसत नाही. काम झालं, विषय संपला."
त्यानंतर पुढच्या दोन दिवसात अशा आणखी दोन सेटिंग्ज त्यांनी मला अनुभवून दिल्या. एकात खुद्द एका आमदारांना पैशांची बॅग घेताना पाहण्याची शिक्षा मी भोगली. शिक्षा अधिक गंभीर अशासाठी की, ती बॅग देणारा होता एक पोलीस निरिक्षक. त्याच्या बदलीसाठी. दुसरी बैठक होती ती कक्ष अधिकाऱ्याच्या स्तरावर आणि त्याला लाच देणारे होते एक साखर कारखानदार. कारखान्याच्या चौकशीचा विषय 'हाताळण्यासाठी'. कक्ष अधिकारी स्तरावरच फक्त. मंत्री वगैरे नाही. दोन्ही रकमा लाखांमध्ये.
याही दोन्ही बैठका बारमध्येच. पैकी एक दक्षिण मुंबईतील एका प्रसिद्ध डान्सबारमध्येच. पण गंमत म्हणजे, त्यादिवशी पैशांची बॅग तिथं दिली गेली नाही. तिथं नुसतंच पिणं. तिथून बाहेर पडल्यावर दादरला कुठल्याशा एका प्रसिद्ध मांसाहारी हॉटेलात आम्ही गेलो. तिथं जेवण झालं आणि मग बाहेर आल्यावर बॅग दिली गेली.
हे असं का, हे काही मला कळलं नव्हतं. राजेंनी ज्ञानात भर टाकली.
"त्या आमदाराकडून बदलीसाठी पत्र हवं होतं. बदली खास ‘कमावत्या’ पोलीस स्टेशनला होती. तो पीआयही तेवढाच खमका होता. आपण जेवण करेपर्यंत तसं पत्र आल्याचं त्याला गृह मंत्रालयातील त्याच्या सोर्सकडून समजलेलं नव्हतं. ते कन्फर्म झाल्यानंतरच पैसे दिले जातील अशी बोली होती. दुसरा एखादा आमदार असता तर त्यानं नाही म्हटलं असतं, पण हा आमदार पैसा म्हटलं की कसाही स्वीकारायला तयार असतो."
प्रश्न विचारण्यासाठीची लाचखोरी वगैरे अलीकडची. हे असलं सेटिंग मी त्यावेळी पाहिलं होतं. हा आमदार म्हणे विशिष्ट किंमतीला काहीही पत्र द्यायला तयार असायचा.
सगळे व्यवहार राजे म्हणतात तसेच होत असतील का? नाही. राजेंनी दाखवलेले व्यवहार हा एक भाग झाला. पण राजेंची एक खासीयत होती. त्यांनी नंतरच्या काळात इतरही अनुभवांची गाठोडी माझ्यासमोर उघडली. आणि त्यातून हा माणूस केवळ फिक्सर नाही हे उलगडत गेलं. अधिकाऱ्यांमध्ये त्यांची उठबस असण्याचं कारण या माणसाची बुद्धिमत्ता असावी हा अंदाज आला आणि पुढं एका प्रसंगात तो खराही ठरला.
(क्रमशः)
राजे - १
राजे - २
राजे - ३
राजे - ४
राजे - ६
प्रतिक्रिया
5 Jan 2009 - 10:31 pm | प्राजु
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Jan 2009 - 10:34 pm | सुनील
मागे माझ्या एका मित्राकडून, लेबर कोर्टातील न्यायाधीश कसे पैसे खातात, त्याच्या सुरस कथा ऐकल्या होत्या. तुम्ही थेट मंत्री/आमदारांच्याच कथा सांगितल्यात. रोचक पण विषण्ण करणार्या!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
5 Jan 2009 - 10:43 pm | रेवती
हा भागही झकास जमलाय.
एकात खुद्द एका आमदारांना पैशांची बॅग घेताना पाहण्याची शिक्षा मी भोगली. शिक्षा अधिक गंभीर अशासाठी की, ती बॅग देणारा होता एक पोलीस निरिक्षक.
खरच शिक्षाच आहे ही.
ह्या व्यवहाराला बिझीनेस तरी म्हणतात का असा प्रश्न पडलाय.
रेवती
6 Jan 2009 - 2:27 am | घाटावरचे भट
मस्तच जमलेत सगळे भाग....कडक!!!
6 Jan 2009 - 5:31 am | लयभारी
हे वाचून हसावे की रडावे कळत नाही.
फारच जबरदस्त लेख...
6 Jan 2009 - 7:40 am | अनिल हटेला
अगदी नेमकं वर्णन...
पू भा प्र....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
6 Jan 2009 - 9:54 am | यशोधरा
लेखमालिका एकदम सही चालली आहे! पुढचे भागही लवकर येऊ देत..
6 Jan 2009 - 11:13 am | विसुनाना
जबरदस्त व्यक्तीचित्रण तर होतच आहे. पण त्याबरोबरच मोठ्या रकमांची 'लाचलुचपत' कशी होते तेही उघड करून दाखवणारी लेखमाला असेही म्हणता येईल.
वाचत आहे.
अवांतर : मोडकसाहेब, (जर हे अनुभव सत्य असतील तर...) ज्यावेळी हे होत होते त्यावेळी ते तुम्ही नावांनिशी प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला का? केला असेल तर तुम्हाला त्याबाबतीत काय अनुभव आले?- तेही वाचायला आवडेल.