आम्ही आमचं सामान घेऊन राजेंची खोली गाठली. आणि पुन्हा एकदा उडण्याची वेळ आली. भारंभार पसरलेली पुस्तकं आणि कॅसेट्स. पुस्तकांचे विषयदेखील अफाटच. 'द ताओ ऑफ फिजिक्स'पासून ते 'मी माझा'पर्यंत. काही पुस्तके चक्क झेरॉक्सच्या स्वरूपात होती. पण नीट बांधलेली. कॅसेट्स शास्त्रीय संगीत आणि गझलांच्या. एका कोपऱ्यात हारीने बाटल्या लावून ठेवलेल्या होत्या. सगळ्या रिकाम्या. ही बाहेरची खोली. आतल्या खोलीत सारं ठीकठाक. तिथं माणसाची हालचालही कदाचित नसावी.
तिथल्या कपाटातून रॉयल चॅलेंजची एक बाटली राजेंनी बाहेर काढली. कपाटातूनच तीन ग्लास काढले. स्वतः बाहेर जाऊन जगमध्ये पाणी घेऊन आले. टेपमध्ये कॅसेट टाकली. मैफिलीचा दुसरा डाव सुरू झाला होता.
टेपवरून गझलांचे सूर सुरू होते. बाहेर प्रश्न आणि उत्तरं. कसलाही सूर नसणारी.
"स्टेज का सोडलंस?" दादाचा प्रश्न.
"फर्स्ट आय लॉस्ट द इंटरेस्ट आणि मग मला समजलं की, माझा इंटरेस्ट, स्टेजमधला, जेन्युईन नव्हता." पुन्हा एकदा कोडंच. दादा हसला.
"हाहाहाहाहा. कुठं 'फसला' होतास?"
"हाहाहाहा..." राजेंनी तो प्रश्न हसण्यावारी नेलं. "तसं काही नाही. आपण एकपात्री करायचो, नाटकंही करायचो. पथनाट्यंही केली. त्या सगळ्यात इश्यूबेस्ड काही तरी करतोय हा नशा होता नशा. नशा उतरला. बीए झाल्यावर. मास्तरकीची नोकरी हेच तेव्हाचं ध्येय ना! इश्यूबेस्ड काम करायचं तर नोकरी हवी म्हणून मास्तरकी बरी वाटत होती. तिथंच पहिल्यांदा जेव्हा पंचवीस हजाराची मागणी माझ्याकडं झाली तेव्हा डोळ्यांपुढं काजवे चमकले. नशा उतरला. कुणी मागावेत पैसे? भैय्यासाहेब पुरोहितांनी. ज्यांच्या संस्थेसाठी झालेल्या आंदोलनात आपण मार खाल्ला होता पोलिसांचा. औरंगाबादेत मंत्रीमंडळ बैठकीवेळी. भरतीच्या यादीत पहिल्या नंबरावर होतो. तरीही पंचवीस हजारांची मागणी. पैसे होते. तो प्रश्न नव्हता. पण अंगात भिनलेली सामाजिक कामाची नशा आणि समोर भैय्यासाहेब. काही टोटलच लागेना मला, आपण काय करतोय याची. पैसे द्यायला आणि पर्यायाने त्या नोकरीलाच नकार दिला. शेती होती मजबूत, शेवटी आम्ही देशमुखच. नोकरी करण्याची गरजही नव्हती. पण... कटी रात सारी मेरी मैकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे, अशी अवस्था झाली..."
शेर कोणाचा होता कोणास ठाऊक, पण त्यांना तो आठवला. हा सारा परिणाम मघाची बिअर आणि आत्ताची आरसी यांचा? की हा माझ्यावरचाच परिणाम? म्हणजे हा माणूस जेन्युइनली असा असेलदेखील. त्याला या किकची गरजही नसावी. असो...
"या शेराचा मूळ अर्थ खूप गंभीर आणि वेगळा आहे, पण मी तो उपरोधानं वापरतोय..." हा खुलासादेखील झाला.
"...मग प्रश्न उरला नाही. स्टेज भलतंच दिसू लागलं. आणि 'ते' स्टेज सुटलं. मग लक्षात आलं की, त्यातला इंटरेस्ट जेन्युईन नव्हता. त्यातून स्टेजच्या बाहेरचं काही साध्य करायचं होतं. ते इश्यूबेस्ड वगैरे. काय साध्य करायचं होतं ते नेमकं सांगता येत नव्हतं आणि सापडतही नव्हतं. म्हणजे इंटरेस्टविषयी माझाच मला प्रश्न. स्टेज सुटलं एकदाचं."
मध्ये केव्हा तरी दादानं घरच्यांविषयी विचारलं होतं. तेव्हाही कुठंही भावनिक वगैरे न होता या गृहस्थानं आपण मालमत्तेबाबत डिस्क्लेमर दिला आहे हे सांगून टाकलं. धाकटा भाऊ अभिनेता म्हणूनच रंगभूमीवर धडपडत होता, त्याहून धाकटा वकील झाला होता, कारकीर्दीची सुरवात होती दोघांच्याही. शेती अद्याप टिकून आहे वगैरे माहिती शुष्कपणे देऊन राजेंनी घरगुती स्टोरी संपवली होती. एकूण माणूस घरापासून तुटला होता हे निश्चित. त्यामागचं कारण बहुदा त्याच्या महाविद्यालयीन आयुष्यातील इश्यूबेस्ड, थिएटर, भ्रमनिरास यातच दडलेलं असावं आणि पुढं त्याला गर्द वगैरेची जोड मिळाली असावी असा निष्कर्ष काढून मीही गप्प बसलो.
त्यापुढचं मला दुसऱ्या दिवशी सकाळी फारसं आठवत नव्हतं. सकाळी खोली आवरताना काही कागद मिळाले, माझ्याच हस्ताक्षरातले. त्यावर, रात्री राजेंनी बोलण्याच्या ओघात टाकलेले काही शेर टिपलेले होते. आज हे लिहिताना त्यातले दोनच आठवतात,
जाने किसकिसकी मौत आई है,
आज रुखपे कोई नकाब नही
आणि
वो करम उंगलीयोंपे गिनते है,
जिनके गुनाहोंका हिसाब नही
शायर ठाऊक नाहीत. संदर्भ आठवत नाहीत, कारण ते त्या कागदांवरही नव्हते.
राजेंची ती 'ओव्हरनाईट' पहिली भेट त्या दिवशी सकाळी नाश्ता होताच संपली. आम्ही आमच्या मार्गावर, राजे त्यांच्या कामात. निघण्याआधी दादाचं काम करून देण्याचं आश्वासन पुन्हा देण्यास ते विसरले नाहीत.
---
दुपारी दीडनंतरचा वेळ ऑफिसात तसा निवांतच असायचा. त्या दिवशी जेवण झालं होतं. सिगरेट झाली होती. मुंबईची वृत्तपत्रं येण्याची वाट पहात होतो, तेवढ्यात फोन वाजला. माझ्यासाठीच मुंबईहून आलेल्या पीपी कॉलचे सोपस्कार झाले आणि आवाज आला,
"सरकार, कसे आहात?" राजेच. दुसरं कोण असणार?
"बोला राजे, निवांत आहे. तुम्ही सुनवा."
"काही नाही. सहज आठवण आली, फोन केला. काय म्हणतोय जिल्हा?"
"काय म्हणणार? नेहमीसारखाच. पाण्याची किती बोंब होणार आहे याचा अंदाज घेत बसलोय आम्ही मंडळी."
"भरती घोटाळ्याचं काय झालं?"
"काय व्हायचं? देसाई गुंतला आहे हे साऱ्यांना ठाऊक आहे. त्यामुळं कधी तरी दाबला जाणारच आहे. आज ना उद्या." जिल्ह्यात शिक्षकांच्या भरतीत झालेल्या घोटाळ्यानं राज्यात वादळ उठवलं होतं. त्याविषयी ही विचारपूस होती. देसाई म्हणजे पालकमंत्री.
"तुमच्यासाठी टिप देतोय. तीनेक दिवसांत प्रकरण जातंय सीआयडीकडं..."
"म्हणजेच सारवासारव..." मी.
"अर्थातच. त्यासाठीच. निर्णय झाला आहे. ऑर्डरवर सीएमची सही बाकी आहे."
"बातमी आहे."
"म्हणूनच तुम्हाला सांगितली." एव्हाना राजेंसमवेत माझा संपर्क बऱ्यापैकी झाला होता, तरीही या बातमीची टिप त्यांच्याकडून यावी याचं आश्चर्य वाटून मी क्षणभराचा पॉझ घेतला.
"काळजी करू नका सरकार, तुम्हालाच टिप दिली आहे. दुसऱ्या कोणालाही नाही. आणि बातमी पेरण्याचा हेतू आहे, हेही उघड आहे. बातमी आधी फुटली तर बरं होईल. तो निर्णय हाणून पाडता येऊ शकतो. कारण पोलीस आत्ता ठीक काम करताहेत ना? म्हणूनच..."
मी पुन्हा काही न बोलण्याच्या मनस्थितीतच.
"सरकार, अजून आमच्यावर भरवसा नाही वाटतं. राहू द्या. एवढं लक्षात ठेवा की आम्ही तुमचा वापर कुठंही करणार नाही. हे प्रकरण असं आहे की, इथं काही करण्यासाठी तुमची मदत होईल असं वाटलं इतकंच..."
"तसं नाही राजे. पण ही बातमी एकाच ठिकाणी देऊ नका. चार ठिकाणी येईल असं पहा, म्हणजे तुमच्या हेतूला अधिक पुष्टी मिळेल, असं मला सुचवायचं होतं." मी मधला मार्ग काढत होतो.
"हाहाहाहाहा. वा सरकार!!! म्हटलं तर तुम्ही हुशार, पण म्हटलं तर बिनकामाचे. कारण हा सल्ला तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी देताय हे कळतं मला. पण समजू शकतो मी. तुम्ही म्हणता तसं करूया. बाळ भोसलेला करतो फोन, आणि वालकरलाही कळवतो..." हे दोघं इतर दोन वृत्तपत्रांचे बातमीदार. या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे. पण त्यांच्याशी संपर्क साधतो म्हणतानादेखील राजेंनी माझ्या डोक्यातील मूळ व्यूहरचना फाडकन माझ्याच तोंडावर सांगून मला उघडं पाडलं होतं. ती बातमी माझ्याकडे एक्स्क्ल्यूझीव्ह ठरली असती हे खरं, पण त्याचे राजकीय संदर्भ ध्यानी घेता, मी काही भूमिका घेतोय असंही दिसलं असतं आणि ते मला नको होतं. म्हणूनच मी ती बातमी चार ठिकाणी यावी असं सुचवलं होतं.
हा माणूस कुणाचाही मुलाहिजा ठेवत नसे, माझा काय ठेवणार? माझ्या सूचनेत तो आरपार पाहू शकत होता.
दुसऱ्या दिवशी माझ्या वृत्तपत्रासह इतर चार ठिकाणी त्या बातम्या होत्या आणि पाहता-पाहता या प्रकरणाने भलताच पेट घेतला. प्रकरणाचा तपास करणाऱ्या कडक आणि उजळ प्रतिमेच्या उप अधीक्षकाच्या मागं एकदम जनमत संघटित झालं. विरोधी पक्ष सरसावून उठले आणि असा काही निर्णय झालेलाच नाही, असा खुलासा सरकारला करावा लागला.
ठीक आठवड्यानं पुन्हा राजेंचा फोन.
"सरकार, आता फॅक्स पाठवतोय नीट पाहून घ्या... नंतर पुन्हा फोन करतो."
पाचच मिनिटांत फॅक्स आला. गृह मंत्रालयानं हे प्रकरण सीआयडीकडं देण्यासाठी तयार केलेली टिप्पणी. सरकारचा खुलासा होता की असा काही निर्णय झालेला नाही आणि इथं तर सरळसरळ टिप्पणी होती.
"काय म्हणता आता?" राजेंचा पुन्हा फोन.
माझ्या हाती बॉम्बच होता. "वाजवू या, मस्तपैकी." मी.
"सालं तुम्ही कागद पाहिल्याशिवाय विश्वास ठेवणारच नाही कधीही... असो. पण वाजवा जोरदार..."
"राजे, बातमी वाजवू. पण तुम्हाला विचारतो, तुम्ही इतके हात धुवून का मागं लागला आहात? तुमचा या जिल्ह्याशी काहीही संबंध नाही. देसाई तुम्हाला कुठं आडवं गेलेले नाहीत..."
"भरती कुणाची आहे हे पहा. तेवढं एक कारण मला पुरेसं आहे."
आणि हे शब्दशः खरं होतं. आत्तापर्यंतच्या संपर्कात एक गोष्ट माझ्यासमोर हळुहळू स्पष्ट होत आली होती. शिक्षण खात्यातलं काहीही असलं तरी हा गृहस्थ तिथं असायचा. दादाच्याच एका समर्थकाच्या संस्थेकरीता त्यानं शाळेची मान्यता मिळवून दिली, एकही पैसा खर्च करावा न लागता. म्युच्युअल बदली हा तर त्याचा खास प्रांत. जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या अशा बदल्यांसाठी दोन्ही जिल्हा परिषदांच्या मुख्य किंवा उप-मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तो सारं काही जमवायचा. अगदी सोस असल्यासारखा तो शिक्षण खात्याशी संबंधित मंत्रालयातील त्याच्याकडं आलेली कामं बिनबोभाट आणि पैसे द्यावे न लागता पार करून द्यायचा. ते खातं हा त्याचा वीकपॉईंट होता. त्यामुळं भरतीच्या या घोटाळ्यातही तो मुंबईतून हात धुवून मागे लागलेला होता. कागद काढणं, ते संबंधितांपर्यंत पोचवून गदारोळ उठवणं आणि त्यातून सरकारवर दबाव आणणं असा एककलमी कार्यक्रम त्याच्या पातळीवर सुरू झाला होता. त्यातच ही टिप्पणी त्यानं फोडली होती. त्याची बातमी आल्यानंतर व्हायचं ते झालं. मुख्यमंत्र्यांनाच हस्तक्षेप करीत दिलगिरी व्यक्त करावी लागली. टिप्पणी तयार कशी झाली आणि ती फुटली कशी याची खात्यांतर्गत चौकशी सुरू झाली. देसाईंना राजीनामा देतो, असं म्हणावं लागलं वगैरे. या सगळ्यात राजे कुठंही आनंदी, उत्साही वगैरे नव्हते. तटस्थपणे त्या घडामोडी मला कळवायच्या, चर्चा करायची, जिल्हा स्तरावरच्या घडामोडी समजून घ्यायच्या आणि पुढचे डावपेच आखायचे. एखाद्या मुद्यावर झपाटलेली व्यक्ती एरवी अशी तटस्थ राहू शकत नसते. तिच्या भाव-भावना त्यात गुंतत जातात. राजेंचं वेगळं होतं. एकदम कोरडेपणानं हा गृहस्थ सारं काही करत असायचा.
भैय्यासाहेब पुरोहितांनी दिलेल्या धक्क्याची ही अशी प्रतिक्रिया तर नसावी? मानसशास्त्रज्ञालाच विचारावं का?
(क्रमशः)
राजे - १
राजे - २
राजे - ३
राजे - ५
राजे - ६
प्रतिक्रिया
5 Jan 2009 - 11:17 am | सुनील
मजा येतेय वाचताना. येउद्या अजून भराभर!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
5 Jan 2009 - 11:32 am | विनायक पाचलग
अहो लय भारी
आता एक काम करा ते क्रमशः चे घोंगडे बाजुला करा .
या खुर्ची ओढा आणि सगळे टायओउन काढा
उगाच एखाद्या वाचकाला तिष्ठत ठेवणे योग्य नव्हे हो
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
5 Jan 2009 - 11:37 am | श्रावण मोडक
स. न. एक भलतीच गडबड झाली आहे. हे लेखन कृपया जे न देखे रवी मधून काढून जनातलं, मनातलं मध्ये टाकावं. आता ही कॅटेगरी बदलता येत नाहीये मला.
5 Jan 2009 - 11:39 am | विनायक पाचलग
संपादन मधुन होत नाही आहे क
असो ते सोडा नवीन टाका
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
5 Jan 2009 - 11:44 am | विसुनाना
'सीस्टिम'चा बळी ठरल्यावर तिच्याशी न झुंजता तिच्यात सामिल होऊन तिच्यावरच कुरघोडी करू पहाणार्या एका 'हरहुन्नरी' व्यक्तीमत्त्वाचे मानसिक विश्लेषण करणारे क्रमशः व्यक्तीचित्रण.
किंवा कदाचित सिस्टिमचा भाग झाल्यावर पश्चात्तापाच्या भावनेने केलेले वर्तन असावे.
उच्च पातळीचे लेखन. खूप आवडले.
वाचत आहे.
अवांतर : सर्व भागांचे एकत्र दुवे का दिलेले नाहीत?
5 Jan 2009 - 12:08 pm | अनिल हटेला
मजा येतीये वाचायला.....
येउ द्यात अशाच वेगाने पूढील भाग....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
5 Jan 2009 - 3:57 pm | मॅन्ड्रेक
अफाट..मझा आला.
5 Jan 2009 - 9:27 pm | लिखाळ
चारही भाग वाचले. मजा आली. वेगवान कथा आहे.
पुढचे भाव वाचण्यास उत्सुक आहे. लवकर येऊ द्या पुढचे भाग.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
5 Jan 2009 - 9:38 pm | प्राजु
उत्कृष्ठ...!
आणि पाठोपाठ येताहेत भाग त्यामुळे त्यातला इंटरेस्ट टिकून राहतो आहे.
असेच येऊदे लवकर.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Jan 2009 - 9:44 pm | रेवती
आत्तापर्यंत आपल्या लिखाणाने वाचकांना चांगलेच गुंतवून ठेवले आहे.
पुढच्या भागाची वाट पहात आहोत.
आपण ज्यास्त वेळ वाट पहायला लावत नाही आहात त्याबद्दल धन्यवाद.
रेवती