राजे - ७

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जनातलं, मनातलं
7 Jan 2009 - 8:03 pm

वर्षापूर्वी काही कामानिमित्त नाशीकला निघालो होतो. रात्री अकराला स्टॅंडवर पोचलो. बाराची गाडी होती. बाथरूमला गेलो, तिथं दारातून बाहेर येणारा एक चेहरा थोडा ओळखीचा वाटला. केस मानेपर्यंत वाढले होते. दाढी चेहरा भरून. चेहरा राकट वाटावा अशी. अंगात विटलेली जीन पँट, निळ्या रंगाची. पांढरा शर्ट. डोळे खोल गेलेले. तो गृहस्थ माझ्या अंगावरून नाशीकच्या फलाटाकडे गेला. मी विचारातच आत शिरलो.
बाहेर आलो तेव्हा डोक्यात प्रकाश पडला होता, हे तर राजे. खोल गेलेल्या डोळ्यांतून व्यक्त होणारा बोलका भाव मला त्यांची ओळख सांगून गेला. मी धावतच नाशीक फलाटाच्या दिशेने गेलो. बसच्या आजूबाजूला पाहू लागलो. कुठंही काही चाहूल नव्हती. भिरभिरणारी नजर डाव्या हाताला फलाटाच्या कोपऱ्याकडं गेली. तिथं एका बाकड्यावर राजे बसले होते. सिगरेट शिलगावलेली होती. बस सुटण्यास वेळ असल्यानं मी त्यांच्याकडं मोर्चा वळवला.
"राजे?"
चेहऱ्यावर कसलेही भाव नाहीत. तो गृहस्थ एकटक माझ्याकडं पहात होता. आपण चुकलो की काय असं मला उगाच वाटून गेलं. पण धीर करून मी पुन्हा "राजे?" असं विचारलं.
"सरकार?"
हुश्श. दरवाजा किलकिला झाला होता. "इथं कुठं?"
"असंच. फिरत-फिरत..."
"कुठं निघाला आहात?"
"कुठंच नाही ठरवलेलं अजून." मी उडालो. कोड्यात बोलण्याची सवय म्हणावं की नेहमीप्रमाणं ठाम, ठोस विधान हे कळेना.
पण बोलणं तरी सुरू झालं होतं. विचारपूस करता-करता ध्यानी आलं की राजेंनी मुंबई केव्हाच सोडली होती. मंत्रालयातील भरभराट देणारं 'करियर'ही बंद होतं. उपजीविकेसाठी हल्ली काय करता या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांनी दिलं नाही.
गप्पा सुरू झाल्यानं मी बाराची गाडी सोडून द्यायचं ठरवलं.
दोन दिवसांआधीच राजे आले होते. बंगळूरहून. गोवामार्गे. हा संकेत पुरेसा होता. गृहस्थ पुन्हा एकदा भटक्या झाला होता हे निश्चित. घरच्यांनी नाद सोडून कित्येक वर्षं झाली होती. नियमित जगण्याची काही इर्षा, उमेदच राहिली नव्हती. पण भरकटताना जे जगणं झालं होतं ते मात्र भयंकर होतं. सत्तेच्या सर्वोच्च वर्तुळापासून ते मुंबईतल्या झोपडपट्टीतलं जीणं, भटक्यांच्या नशाबाजीपासून ते स्टेजच्या सोसापर्यंत, रसीकतेचा कळस गाठणारं जगणं ते अगदी कोठा... सगळी टोकंच. बोलता-बोलता राजे सांगत गेले होते मधल्या काळातली कहाणी.
ठीक एक वर्ष मंत्रालयातील करियर गुंडाळण्यात गेलं. गुंडाळलं म्हणजे त्यांनी एकही पैसे न घेता काही कामं करून दिली. बहुतेक कामं शिक्षण खात्यातली, काही कामं अपंग-बालकल्याण अनुदानाशी संबंधित. मी म्हटलं हे म्हणजे आधीच्या पापातून उतराई होण्याचा प्रकार तर नाही? त्यावर थेट उत्तर, "मी काहीही पाप केलं नाही. त्या व्यवस्थेत मी तेच केलं जे तिथं होणार होतं. त्या व्यवस्थेला मोडून काढत मी काही गोष्टी केल्या. अखेरच्या वर्षांत फक्त तशाच गोष्टी केल्या. ते माझं कर्तव्य होतं. त्यामुळं त्यात माझी काहीही कर्तबगारी नाही."
मंत्रालयातील करियर सोडल्यानंतर आमदार निवासातून थेट धारावी झोपडपट्टी. का तर, तिथलं जगणं कसं असतं हे अनुभवण्यासाठी. कशासाठी हा अनुभव घ्यायचा, तर केवळ घ्यायचा म्हणून. राजे जे सांगत ते विश्वासार्ह असे म्हणून लिहितो इथं, त्यांनी त्या झोपडपट्टीत घाण साफ करायचं काम केलं होतं. शंभरावर एकर शेतजमीन असलेल्या घरातला हा गृहस्थ. धारावीच्या झोपडपट्टीत घाण साफ करायचं काम करून जगत होता. त्यानंतर थेट बंगळूर. कशासाठी? काही नाही. रेल्वेत बसलो आणि तिथं पोचलो. तिथं एकदम पांढरपेशी काम. एका बांधकाम कंपनीत साईट ऑफिसवर सुपरव्हायजरी काम. मी म्हटलं, सर्टिफिकेट्स वगैरे नसताना नोकरी कशी मिळाली? उत्तर एकच. “आपली कनेक्टिव्हिटी सर्टिफिकेट्सपेक्षाही डीप आहे.” बंगळूरला काही काळ काढल्यानंतर गोवा. किनाऱ्यावरच्या एका हॉटेलात वेटर. त्या जोडीनं पुन्हा हिप्पी (राजेंच्या भाषेत भटक्या) समुहांशी संपर्क, त्यातून अंमली पदार्थांच्या जाळ्यात पुन्हा एकदा. त्याच तारेत बहुदा आता इथं.
"आता ठरवलंय, एखादं खेडं गाठून दिवस काढायचे. पैसे आहेत अजून बँकेत. किमान साडेतीन लाख तरी. ते टिकले कारण बँकींग व्यवहारांपासूनही लांबच फेकले गेलो होतो. आता सही तरी नीट करता येईल की नाही ठाऊक नाही. पण एकदा मुंबईत जाऊन तो क्लेम करायचा आहे... मला वाटतं की राक्या मदत करेल त्यासाठी..." या राक्याला झोपडीतून उचलून आणून पुढं शिकवत बँकेत चिकटवून दिला होता राजेंनी. त्याची कहाणी हा तर स्वतंत्र विषय.
माझ्या अंगावर काटा आला. एक क्षणभर वाटलं की या गृहस्थाला घरी न्यावं. काही दिवस राहू द्यावं. पण माझ्या मध्यमवर्गीय मानसीकतेनं त्या इच्छेवर मात केली. त्याचं ते विलक्षण जगणं माझ्या चौकटी उध्वस्त करून जाणारं होतं. त्या चौकटीतीलं माझं जगणं असुरक्षीत होत गेलं असतं...
मी ते टाळलं. म्हणालो, "राजे, पुण्यात राहता आहात कुठं?"
बहुदा हाच प्रश्न त्यांना नकोसा असावा. मी त्याचं जगणं पाहिलं होतं ते शानदार. आत्ताचं तसं नव्हतं.
"वेल, सरकार, यू नो, बर्ड्स लाईक मी नेव्हर नीड अ नेस्ट. दे आर सोलली डिपेण्डण्ट ऑन देअर इन्स्टिंक्ट्स. आयम वेल प्लेस्ड व्हेअर आयम..."
इंग्रजीवरची मूळ मांड कायम होती तर. मी उगाच मनाशी चाळा केला, शेर आणि हिंदीही पूर्वीसारखं असेल का?
"पुढं काय करणार आहात?"
"सांगितलं ना, की एखादं खेडं गाठायचं आहे. खूप पूर्वी नर्मदेच्या किनाऱ्यावर मध्य प्रदेशात एकदा भटकत गेलो होतो. एका खेड्यातील एका देवळात एक पुजारी भेटला. मी तिथं आठवडाभर मुक्काम केला होता. त्याच्याशी बोलताना कळलं की तो जुना इंजिनिअर आहे. अस्खलीत भाषा, संस्कृतवर जबर कमांड. टाटांच्या कुठल्याशा कंपनीत होता, तिथल्या स्पर्धेत टिकला नाही. गुणवत्ता असून काही हाती येत नाही याचं फ्रस्ट्रेशन आलं, एकदा हार्ट अटॅक. पुढं थेट अध्यात्मात शिरला, सारं काही सोडून त्या देवळात जाऊन बसला होता. चीज थी, सहनेलायक. क्यूंकी, वो सिस्टमका व्हिक्टिम था. वोही सिस्टम, जिसका मै एक पार्ट हुवा करता था..."
"तो अब क्या उसका व्हिक्टिम हो?"
"नो. नॉट अॅट ऑल. आयम स्टील द पार्ट ऑफ द सिस्टम. दॅट्स व्हाय आयम व्हेरी अनलाईक यू. आय कॅन स्टिल थिंक ऑफ बीईंग सिस्टमीक अगेन. व्हिच आयम नॉट डुईंग. कारण, यू नो वन थिंग अबाऊट द सिस्टम? जे सिस्टमचा पार्ट असतात ना, ते त्या सिस्टम नामक ब्लॅकहोलमध्ये कधी गुडूप होऊन जातात ते कळत नसतं. त्यामुळं सिस्टमच्या बाहेर असणं किंवा तिचा व्हिक्टिम असणं हे अनेकदा फायद्याचं असतं. आय कान्ट मेक अ चॉईस बीटवीन द थ्री. अँड धिस इज द सिंपल ट्रुथ."
---
विषय न वाढवता मी निरोप घेतला. नाशीक गाठलं. काम उरकून तीन दिवसांनी परतलो. आल्यावर आधीच्या तीन दिवसातले पेपर समोर घेऊन बसलो होतो. एका पेपरमध्ये आतल्या पानात बातमी होती, "बसस्थानकात बेवारस मृतदेह". सोबत अर्धा कॉलम फोटो. फक्त चेहऱ्याचा.
चेहऱ्यावर दाढी. खोल गेलेले डोळे. वेशभूषेचं वर्णन. सारं काही राजेंशी जुळणारं.
दुपारपर्यंत कन्फर्म झालंदेखील. जागीच हृदयविकाराचा झटका. आमची भेट झाली त्याच रात्रीची घटना. एकदा वाटलं आपण पुढं होऊन काही करावं, पण पुन्हा त्यांनी त्यांच्याच शब्दांत सांगितलेल्या सत्याची आठवण झाली आणि मी शांत बसणं पसंत केलं.
“सिस्टमचा पार्ट त्या सिस्टम नामक ब्लॅकहोलमध्ये कधी गुडूप होऊन होऊन जातो ते कळत नसतं...”
(पूर्ण)
राजे - १
राजे - २
राजे - ३
राजे - ४
राजे - ५
राजे - ६

वाङ्मयसमाजजीवनमानराजकारणअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

विनायक पाचलग's picture

7 Jan 2009 - 8:19 pm | विनायक पाचलग

एकच शब्द
जबरदस्त फिरवुन फिरवुन मुळ पदावर
लय भारी
मानले आपल्याला
काहितरी वेगळा शेवट असणार हे माहित होतेच पण इतका वेगळा असेल असे वाटले नव्हते.
च्यामारी धरुन फट्याक्......(गाववाल्याकडून चोरलेला टोला)

विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले

अनंत छंदी's picture

7 Jan 2009 - 8:23 pm | अनंत छंदी

श्रावणजी
झकास! फर्मास!!मस्त!!! थोडक्यात या कथेचा कळसाध्याय लिहिताना आपण ज्या पद्धतीने लिहिलाय तो वेग, आवेग खरंच छान आहे!
हॅट्स ऑफ टू यू!!

संदीप चित्रे's picture

7 Jan 2009 - 8:47 pm | संदीप चित्रे

ही कथा आहे की सत्यघटना ??

खूपच अप्रतिम लिहिलं आहे श्रावणजी. लिहिण्याची स्टाईल, वेग कमी - जास्त करण्याची पद्धत सगळंच आवडलं

पुलेखूशु :)

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

धनंजय's picture

7 Jan 2009 - 9:22 pm | धनंजय

पहिले काही भाग वाचताना व्यक्तिरेखेबद्दल कुतूहल, पुढील काही भाग वाचताना भ्रष्ट यंत्रणेबद्दल आचंभायुक्त राग/हळहळ, या भागात व्यक्ती/समाज तत्त्वज्ञानाबद्दल चिंतन... वाचताना भाव सारखे बदलत होते. तरी सुद्धा कथा ओघवती, एकसंध वाटली.

राजेंची ओळख इतक्या सहज-कुशल शैलीने करून दिल्याबद्दल श्रावण मोडक यांचे आभार.

रेवती's picture

7 Jan 2009 - 9:49 pm | रेवती

सगळे भाग आवडले. कथेचा वेग चांगला ठेवला आहे.
'राजे' ह्या व्यक्तीचं शेवटपर्यंत कायकाय होतं हे सांगितल्यामुळे गोष्ट पूर्ण झाल्यासारखी वाटली.

रेवती

सुनील's picture

7 Jan 2009 - 9:51 pm | सुनील

काहीसा वेगळा पण अपेक्षित शेवट. कथेची एकंदर मांडणी सुंदर.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

लिखाळ's picture

7 Jan 2009 - 9:57 pm | लिखाळ

छान. सर्व भाग आवडले. कथा सात भागात असूनही आपण भराभर भाग लिहिल्याने वाचताना सलगता राहिली.

कथालेखक म्हणून तुमचा सहभाग चित्रकारासारखा वाटला. तुम्ही कथेतले पात्र बनुन फार ढवळाढवळ केली नाहीत. त्यामुळे राज्यांच्या स्वभाव-व्यक्तिमत्त्वावरचा झोत टिकून राहिला.
पु ले शु
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

यशोधरा's picture

7 Jan 2009 - 9:57 pm | यशोधरा

जबरदस्त!

प्राजु's picture

7 Jan 2009 - 10:19 pm | प्राजु

खरंच ही सत्य घटना आहे का?
कथा अशी वळण घेईल वाटलं नव्हतं.
मस्तच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

भाग्यश्री's picture

7 Jan 2009 - 11:13 pm | भाग्यश्री

राजे ही व्यक्तीरेखा, खरी असो वा खोटी आम्हाला पूर्ण कळेल असं तुम्ही लिहीलंत! हॅट्स ऑफ!

http://bhagyashreee.blogspot.com/

भिंगरि's picture

8 Jan 2009 - 12:07 am | भिंगरि

खुप आवडल!

घाटावरचे भट's picture

8 Jan 2009 - 1:39 am | घाटावरचे भट

झकास!!!

चंबा मुतनाळ's picture

8 Jan 2009 - 2:11 am | चंबा मुतनाळ

सगळे भाग सॉल्लीड झाले आहेत. खिळवून ठेवणारी ओघवती भाषा.
श्रावण साहेब, तुम्ही ही दीर्घकथा बाहेर मासिकात वगैरे प्रसिद्ध करायला हवीत, म्हणजे उर्वरीत मराठी प्रेमी पण त्याचा आनंद घेऊ शकतील.

ऍडीजोशी's picture

8 Jan 2009 - 2:56 am | ऍडीजोशी (not verified)

लैच्च भारी राव

वेदनयन's picture

8 Jan 2009 - 4:13 am | वेदनयन

शेवट हृदय पिळवटुन टाकणारा.

पण तुमच्या लेखन शैलिला पुर्ण मार्क्स. विशेष म्हणजे "क्रमशः" खुप दिवस तुंबले नाही (रोशनी लिहिणारे बोध घेतिल ही अपे़क्षा).

सहज's picture

8 Jan 2009 - 6:01 am | सहज

आवडली. एकतर जास्त तटकळत ठेवले नाहीत त्याबद्दल मनःपुर्वक आभार. :-)

कथेची एकंदर मांडणी सुंदर.

असेच म्हणतो.

जृंभणश्वान's picture

8 Jan 2009 - 6:04 am | जृंभणश्वान

गोष्ट खूप आवडली

केवळ_विशेष's picture

8 Jan 2009 - 10:53 am | केवळ_विशेष

लिहिलं आहे तुम्ही सर!

नंदन's picture

8 Jan 2009 - 12:20 pm | नंदन

भाग आवडले, सारेच ओघवत्या शैलीत आले आहेत.'तो'ची (आंतरजालीय नव्हे :).) प्रसंगी आठवण करून देणार्‍या या वल्लीचे चित्र अगदी नेटकेपणे उतरले आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

श्रावण मोडक's picture

8 Jan 2009 - 12:47 pm | श्रावण मोडक

सर्वांचे मनःपूर्वक आभार.
ही घटना सत्य आहे का?
अनेकांनी हा प्रश्न विचारला आहे. कोणी प्रतिसादात, कोणी व्य. नि.ने. एकाने खरडवहीत. माझे उत्तर - "हा सारा प्रवास असा सत्य किंवा कल्पित असा कृष्ण-धवल सांगता येत नसतो. अनेकदा लेखक त्या सीमेवरून इकडे किंवा तिकडे जात असतो."
यापलीकडे, राजे हे वास्तविक व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे हे कथन एका अर्थी वास्तववादी म्हणता येईल. पूर्ण वास्तविक नव्हे. त्याची कारणेही स्वाभाविक आहेत. काही घटना-प्रसंग, मूळ आशय तोच ठेवून, संदर्भचौकट बदलत येथे उतरली आहेत.
विसुनानांनी विचारले आहे की, या घटना अनुभवल्या तेव्हा मी त्या प्रकाशात आणल्या का, त्याही नावानिशी? नाही. वैयक्तिक श्रावण मोडक यांनी घेतलेला अनुभव यापलीकडे, कोणत्याही मार्गाने त्या प्रकाशात आणण्यासाठी, कायद्याच्या कसोटीवर उतरणारा पुरावा नाही. त्यामुळे वृत्तपत्रीय लेखनाच्या किंवा तत्सम स्वरूपात हा भाग प्रकाशात आणता आलेला नाही. जेव्हा हे अनुभव घेतले तेव्हा स्टिंग ऑपरेशन हा प्रकार आपल्या येथे इतका आलेला नव्हता. त्यासाठी आवश्यक साधनस्रोतही माझ्याकडे नव्हते. एक पत्रकार म्हणून मी बघ्याची भूमिका घेतली इतके सत्य. मात्र, अशा काही प्रकरणात लाचखोरीच्या पलीकडे जाऊन प्रश्न उपस्थित करीत हे मुद्दे तडीला लावण्याचे प्रयत्न पत्रकार या भूमिकेतून केले होते. तेथे संमीश्र यशच पदरी पडले. आपल्या अ-क्षमतेची टोचणी लावून घेण्याच्या अनेक अनुभवातील हे काही अनुभव आहेत.
सिस्टमवर कुरघोडी करण्याच्या (हे शब्द विसूनानांचे, अगदी नेमके) आपल्या सोसामुळे या माणसाने मला आकृष्ट करून घेतले होते. तो तसा का झपाटला गेला, यामागे सूडभावना होती का हे मला शेवटपर्यंत पूर्ण उमगले नाही. त्याच्या स्वप्नांचा विरस झाल्यामुळे तसे घडले का हा एकच प्रश्न मला छळतो आहे. या माणसाचा अंत मात्र खोलवर हादरवून गेला. अशा संवेदनशील माणसांना समाजात स्पेस असतच नाही का, आणि ती न मिळाल्याने ही माणसं असं काही करतात का हेही असेच छळणारे प्रश्न.

वेताळ's picture

8 Jan 2009 - 12:48 pm | वेताळ

सर्व लेखन अगदी वेळेत पुर्ण केलेत. राजे खरोखर राज्यासारखे जगले.
वेताळ

विसुनाना's picture

8 Jan 2009 - 1:14 pm | विसुनाना

व्यक्तीचित्रण, मानसिक विश्लेषण आणि यंत्रणेला आधारभूत बनलेल्या भ्रष्टाचाराचा परामर्श या सर्वच बाबी अत्युत्कृष्ट उतरल्या आहेत.
या कसदार 'व्यक्तीचित्र-लेख-कथा' लेखनाबद्दल लेखकाचे अभिनंदन आणि आभार.

मॅन्ड्रेक's picture

8 Jan 2009 - 1:18 pm | मॅन्ड्रेक

सगळे भाग सॉल्लीड झाले आहेत. खिळवून ठेवणारी ओघवती भाषा.
श्रावण साहेब, तुम्ही ही दीर्घकथा बाहेर मासिकात वगैरे प्रसिद्ध करायला हवीत, म्हणजे उर्वरीत मराठी प्रेमी पण त्याचा आनंद घेऊ शकतील.

आपलि परवानगी मिळू शकेल ? .

अभिरत भिरभि-या's picture

8 Jan 2009 - 5:37 pm | अभिरत भिरभि-या

जबराट !!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Jan 2009 - 6:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चाबूक!

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

प्रस्थापित व्यवस्था, त्यातला भ्रष्टाचार, तो करणारे अधिकार पदावरचे लोक ह्या बाबी कितीही माहीत असल्या तरी प्रत्यक्ष आपल्या समोर अशा घटना घडणे आणि आपण त्याचे मूक साक्षीदार असणे हाच एक खचवून टाकणारा अनुभव आहे, तुमच्या बाबतीत तर जास्तीच तसा कारण एक पत्रकार म्हणूनही तुमचे काम आहे.
तुम्ही म्हणता तसे स्टिंग ऑपरेशन त्या वेळी नसल्याने आणि मुळात तो तुमचा उद्देश नसल्याने तुम्हाला ह्या घटना वृत्तपत्रात पुराव्याने देणे शक्य नव्हते, त्याने तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला लागलेली टोचणी ह्यालेखनातून काही अंशी तरी कमी झाली असावी असे मला वाटते.
'राजे' ही एक व्यक्ती नसून संपूर्ण सिस्टिममधली एक छोटी बांडगुळासारखी उपव्यवस्था आहे असे वाटते. काही व्यक्तिगत कार्यात असफलता मिळाल्याने व्यवस्थेविरुद्ध काही अंशी सूड उगवायला टपलेल्या माणसाने व्यवस्थेत राहूनच व्यवस्थेशी एकप्रकारे बंड केल्यासारखे काही. राजेंच्या ह्या कामाच्या उर्जेचा स्त्रोत म्हणजे डीसीपी विपिनसारखी त्या व्यवस्थेतली काही चाके की जी त्या व्यवस्थेत आहेत पण शक्य तिथे योग्य गोष्टींची कदर करतात आणि तुमच्यासारखे पत्रकार मित्रही, जे हे सगळे अनुभवून केव्हातरी, कुठेतरी त्याला वाचा फोडण्यात महत्त्वाचा वाटा उचलू शकतात!
राजेंच्या एकूण व्यक्तिमत्त्वाकडे पहाता एक अतिशय बुद्धिमान, संवेदनक्षम, तीव्र इच्छाशक्ती असलेला माणूस जो म्हटले तर संपूर्णपणे भ्रष्टाचाराच्या चिखलात स्वतःला रोवून एक मोठे धेंड स्वतःच होऊ शकला असता पण त्याचे सच्चेपण आणि मनातली सूडाची आग ह्यांच्या द्वंद्वात तो सतत होरपळत आणि हेलकावे खात असलेला दिसला!
ह्या सगळ्या राड्यात घरापासून त्यांनी स्वतःला तोडून घेतले आहे हे हेतुपुर:सर आहे. कारण आपल्या रोजच्या जळण्याचा त्रास त्यांना घरच्यांना द्यायचा नाहीये! एकप्रकारे त्यांचा शेवट होण्याची दुसरी कोणती रीत माझ्यातरी नजरेत आली नाही कारण एकेककरुन व्यवस्थेतले ऊर्जा स्त्रोत विझल्यानंतर किंवा बाजूला टाकले जाऊन दूरस्थ झाल्यानंतर व्यवस्थेशी 'सामना' करताना त्यांची शोकांतिका स्वाभाविक आहे!
अतिशय कसदार आणि जिवंत अनुभव देणार्‍या लेखनाबद्दल अभिनंदन!

चतुरंग

पिवळा डांबिस's picture

8 Jan 2009 - 11:31 pm | पिवळा डांबिस

श्रावणजी,
लिखाणाचे सातही भाग सलग वाचले. कथा मस्त उतरली आहे..
तुमचे हार्दिक अभिनंदन!
राजेंची कॅरेक्टर सुरेख रंगवली आहे..
तसेच लेखकाने पत्रकाराच्या त्रयस्थ भूमिकेतून केलेले निरिक्षणही झकास आहे. विशेषतः राजेंचं जीवनविषयक/ समाजविषयक तत्वज्ञान आणि त्या विचारांचं एका मध्यमवर्गीय (हा माझा आपला अंदाज!) पत्रकाराच्या विचारधारेबरोबर चाललेलं मंथन तुम्ही मस्त मांडलं आहे.
जियो! असेच लिहीत रहा ही प्रार्थना!!
आपला,
पिवळा डांबिस

श्रावण मोडक's picture

9 Jan 2009 - 12:27 am | श्रावण मोडक

नव्या मंडळींचे आभार.
अदिती, चाबूक उगारलेला नाही ना?:)
चतुरंग, टोचणी कमी झाली असे म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की बरेच हलके वाटले लिहून झाल्यानंतर. मोकळे वाटले. टोचणी म्हणाल तर तिचा संदर्भ राजेंशी कमी, व्यवस्थेशी अधिक. त्यामुळे ती कायम राहणार. तिच्यात मी तीव्र आणि कमी तीव्र असे करू शकत नाही.
पिवळा डांबिस, तुमचा अंदाज बरोबर आहे. मध्यमवर्गीयच!!! बहुतेक पत्रकार याच कॅटगरीत मो़डतात. अलीकडे त्यात भारतीय मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्ग (आता तर यात श्रीमंतही येतात) असे दोन प्रकारही अनेकदा केले जातात, तो भाग वेगळा. तो प्रामुख्याने आर्थिक स्थितीशी संबंधित. बाकी सामाजिक स्तरावर मानसीकतेचा उगम भारतीय मध्यमवर्गातूनच. काही बाबींमध्ये 'डी-क्लास' होणं अवघडच दिसतंय थोडं. पण मी आपला मार्क्सवर विश्वास ठेवतो याबाबतीत. त्यानं म्हटलं होतं की, डी-क्लास होण्याची पहिली पायरी म्हणजे क्लास उमजून घेणं. मी ती पायरी गाठतोय असं म्हणूया.:)

अनिल हटेला's picture

9 Jan 2009 - 4:54 pm | अनिल हटेला

क्रमशः लेखन सुद्धा अगदी झटपट लिहीण्याची तुमची पद्धत आवडेच...
पुर्ण लेखमाला अतीशय आवडली...राजे अगदी समोर उभे केलेत ...
अजुनही उत्तमोत्तम लेखाची तुमच्या कडुन अपेक्षा आहे...

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सुवर्णमयी's picture

9 Jan 2009 - 7:14 pm | सुवर्णमयी

व्यक्तिचित्र आवडले. बाकी जे सांगायचे आहे ते इतर अनेक प्रतिसादात आले आहेच..
सोनाली

मोहन's picture

12 Jan 2009 - 11:32 am | मोहन

जबरदस्त!
आणखी येवू द्या.

मोहन

प्रकाश घाटपांडे's picture

14 Mar 2009 - 6:08 pm | प्रकाश घाटपांडे

अस ठरवल होत कि राजे निवांत वाचायच. वाचलं त बधिर होण्यासाठीच. श्रावण अत्यंत भावपुर्ण चित्रण .
(घुसमटलेला)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

कपिलमुनी's picture

10 Mar 2016 - 12:32 am | कपिलमुनी

श्रामो ग्रेट माणूस !!

Rahul D's picture

10 Mar 2016 - 1:20 am | Rahul D

_^_

मोहनराव's picture

31 May 2017 - 6:29 pm | मोहनराव

लेखमाला खुप आवडली. _/\_

धनावडे's picture

22 Sep 2021 - 11:56 pm | धनावडे

जबरदस्त!

श्रीरंग_जोशी's picture

23 Sep 2021 - 12:27 am | श्रीरंग_जोशी

वास्तवदर्शी व्यक्तिचित्रण. __/\__.
यानिमित्ताने स्व. श्रावण मोडक यांना आदरांजली. त्यांना जाऊन आठ वर्षे होऊन गेली :-(.

स्व. श्रावण मोडक यांना भावपुर्वक आदरांजली.