राजे – २

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जनातलं, मनातलं
4 Jan 2009 - 11:14 am

संध्याकाळी साडेसात. आमदार निवासाच्या गेटमधून बाहेर पडून उजवीकडे वळलो. राजे समोरच उभे होते. बरोबर कोणी दोघं - तिघं होते. त्यांच्याशी काही वाटाघाटी सुरू असाव्यात. अगदी हळू आवाजात कुजबुज. आम्ही दोनेक पावलं अलीकडंच होतो, त्यामुळं तिथंच थांबलो. काही क्षणांतच त्यांचं आमच्याकडं लक्ष गेलं आणि "अरे यार, या की इकडं," अशी साद आली. खणखणीत आवाजात. मला वाटतं, रस्त्यावरच्या इकडच्या-तिकडच्या आठ-दहा जणांनी तरी वळून आपल्याला कोण बोलावत नाही ना हे पाहून घेतलं असावं नक्की.
बरोबर असलेल्या मंडळींना निरोप देऊन आम्हाला सोबत घेऊन राजे निघाले. 'सम्राट'च्या अलीकडं आम्ही रेंगाळलो.
"क्या ख्वाईश है?" राजे.
दादाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.
"क्या पिना है?"
दादानं खांदे उडवले आणि मग डावा हात डावीकडे तर उजवा उजवीकडे नेला. अर्थ एकच, काहीही चालेल, फक्त देशी वगैरे नको.
"चलो, मूड है बिअर पिनेका. चर्चगेट स्टोअरमध्ये बसू,"
हा बोनस होता. एकतर हे कॅरॅक्टर समजून घ्यायचं होतं. त्यामुळे व्हिस्की वगैरे पिण्याची इच्छा नव्हती. बिअरच बरी अशा वेळेस.
चर्चगेट स्टोअरमध्ये पोचलो. पाच जणांनी बसावं असं टेबल नव्हतंच. पण, राजे पुढं झाले आणि समोरच्या मागच्या रांगेतली दोन टेबलं जोडली गेली. एकूण त्यांचा तेथे बऱ्यापैकी राबता दिसत होता.
ऑर्डर गेली आणि राजेंचा पहिला प्रश्न आला, "बोल, इथं कसा काय?" दादाला उद्देशूनच.
दादानं कामाची माहिती दिली. राजेंची ‘गुरूकिल्ली’ची भूमिका ठाऊक असल्यानं ती माहिती देताना थोडं हातचं राखून ठेवलं होतं.
काम साधंच होतं. दादाच्या गटात (म्हणजे जिल्हा परिषदेचा मतदार संघ) एक नालाबंडिंगचं काम होतं. त्यावर मंत्रालयातून काही आक्षेप आला होता. त्यामागची कारणं आम्हाला पक्की ठाऊक होती. हा राजकीय ‘आडवा आणि जिरवा’ प्रयत्न होता आणि त्यावरचे तोडगेदेखील दादाला ठाऊक होते. त्यानुसार एक निवेदन त्या दिवशी त्यानं दिलं होतं.
"काय म्हणाला रोकडे?" राजेंचा पुढचा प्रश्न. दादा अवाक्. चेहरा प्रश्नार्थक. रोकडे सिंचन खात्याचा उपसचिव. त्याच्याकडेच दादाचं काम होतं आणि हा तपशील राजेंना ठाऊक असावा हे आश्चर्य होतं.
"वो बात छोड. लिसन, आय नो एव्हरीथिंग अबाऊट यू. आय कॅन टेल यू द नेम ऑफ युवर गट, द व्होटिंग पॅटर्न, अँड इफ यू बी ट्रुथफुल, द अमाऊंट यू स्पेंट इन द लास्ट इलेक्शन, इन्क्लुड़िंग द 'अदर' एक्स्पेन्सेस." अदर शब्दावर जोर.
दादाला पुन्हा एक धक्का. म्हणजे हा माणूस कुंडली ठेवून असतो तर, माझा मनातल्या मनात निष्कर्ष. तो 'गुरूकिल्ली' का असतो हे समजून येणं आता मुश्कील नव्हतं.
एकाचवेळी हिंदी, मराठी, इंग्रजी... हे प्रकरण थोडं और होतं. तिन्ही भाषांवर आपली मांड आहे हे दाखवण्याचा त्याचा हेतू नाही हे बोलण्याच्या सहजतेतून दिसून यायचं. अनेकदा तर तो एक वाक्य एका भाषेत आणि एका भावातदेखील पूर्ण करायचा नाही.
एव्हाना दादानं शरणागती पत्करत सारं काही सांगून टाकलं, त्या एकाच कामापुरतं अर्थातच.
"उद्या तुझं काम होऊन जाईल. निवांत जा परत."
दादा सावध होता, "काय करणार आहेस?"
"काही नाही. रोकडे दोस्त आहे आपला. त्याला विनंती करतो. तो माझी विनंती अव्हेरणार नाही याची खात्री आहे." विनंती, अव्हेरणे वगैरे शब्द अगदी शुद्ध तुपातले.
"रोकडेच्या हाती काही नाही. घोडं अडलंय वर. मोहित्यांकडं. त्यामुळं..." इति दादा. मोहिते म्हणजे पाटबंघारे मंत्री.
"डोण्च्यू वरी. काम होईल. ही देवाणघेवाणच असते शेवटी. मोहिते असो वा सीएम. तुला काहीही प्रॉब्लेम होणार नाही, पॉलिटिकली. मग तर झालं?"
"तुझा इतका काय रस रे साल्या?" दादाचा सवाल.
"बिकॉज आय नो यू सिन्स नाशीक कॅम्प. पीपल लाईक यू शुड बी हिअर. दॅट्स ऑल."
"विथ पिपल लाईक यू?" दादाच्या तोंडून प्रश्न निघून गेला आणि क्षणात राजेंचा चेहरा दुखावल्यासारखा झाला.
"अ फिक्सर, यू वॉण्ट टू से..." सूरही दुखावलेलाच.
"अं...अं..." दादा.
"छोड दे वो बात. तुझं काम होईल. तुझ्या कोणत्याही तत्वांना मुरड घालावी न लागता."
बिअरसोबत मागवलेली चिकन चिली आली होती. पहिला संपून दुसरा पिचर आला होता. राजेंनी मोर्चा माझ्याकडं वळवला.
"बोला सरकार. तुम्ही बोला. याच्याकडं फारसं लक्ष देऊ नका. तेव्हापासून पाहतो मी याला, माणसं ओळखण्यात थोडा कमी पडतोच."
ओह. ठाम शब्दांत राजेंनी निष्कर्ष मांडला. या दोघांची भेट अवघी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच, त्यातही मध्ये मोठा खंड आणि तरीही हा पक्का निष्कर्ष, तोही अचूक!
मी संभावित पवित्रा घेतला, "मी फारसं बोलत नाही. ऐकणं हा माझा छंद आहे."
"मला राजेच म्हणा. आवडतं ते. असो. तुम्ही ऐकतदेखील नाही. कुंडल्या मांडत बसता. तुमचा धंदा तोच नाही तरी..."
पहिलीच भेट होती, बीअर असली तरी इतक्यात इतकी मोकळीक यावी असं नव्हतं, पण हा गृहस्थ ऐकायला तयारच नसतो, हे माझ्या ध्यानी आलं.
"समजतंय ना ते तुम्हाला. मग बोला तुम्ही. मी ऐकतो."
बहुदा माझा सूर थोडा चढा लागला असावा. दादा मध्ये आला,
"तुला माझं बोलणं लागलेलं दिसतंय. पण त्यात शंकास्पद सूर असण्याचं कारण आहे..."
"मी अमूक ऐकलं आहे वगैरे?" राजे तयारीतच असायचे. दादानं मान डोलावली.
"मग ठीक आहे ना, स्टिक टू व्हॉट यू हॅव हर्ड..."
"दॅट आयम डुईंग. आय वॉण्ट टू नो व्हॉट आय शुड नॉट डू. फ्रॉम द हॉर्सेस माऊथ." किती नाही म्हटलं तरी दादा त्याच्यापेक्षा वयानं मोठा होताच.
"हाऊ डझ दॅट मॅटर? त्याची काहीही गरज नाही," इति राजे.
"तुम्ही याच्यावर अन्याय करताय. ऐकीव माहितीवरून तुमच्याविषयी काही बोललं तर तुम्ही दुखावले जाणार आणि समजून घेण्यासाठी विचारलं काही, तर गरज नाही असं म्हणणार," मी तोंड उघडलं.
"सरकार, बास्स! हे असं काही तरी का होईना बोला की. एरवी तुम्हाला सांगतो, दादानं हे ताणलं नसतं. मी गरज नाही म्हटल्यावर तो गप्प झाला असता. बिअर संपली असती, आम्ही उठलो असतो. पुन्हा भेट झाली तर झाली..."
पुन्हा एकदा अचूक विश्लेषण. दादा राजकारणात पडलाच कशाला असला स्वभाव घेऊन हे माझ्यापुढचं कायमचंच कोडं होतं. तेच कोडं इथं राजेंना सुटल्यासारखं दिसत होतं. जाताजाता त्यांनी मला 'सरकार' करून टाकलेलं दिसत होतं. मी पत्रकार असल्यामुळं असावं. मला ते सूक्ष्मपणे खटकलं. पण मी लगेच काही बोललो नाही. माणूस खुला झाला तर ते आधी हवं होतं मला. त्यात पुन्हा “तुम्ही केलेलं लेखनही मी वाचलं आहे,” अशी पुस्ती त्यांनी जोडली होती हे उगाच सुखावून जाणारंही होतं.
राजेंचा ग्लास संपला होता. मी तो भरून दिला. उरलेली थोडी बिअर माझ्या ग्लासात ओतून घेतली आणि वेटरला खूण केली.
काही क्षण तशाच शांततेत गेले. राजेंनी सिगरेट मागवल्या. त्या येताच एक शिलगावली आणि समोर पहात सुरवात केली.
(क्रमशः)
राजे - १
राजे - ३
राजे - ४
राजे - ५
राजे - ६

वाङ्मयसमाजजीवनमानराजकारणअनुभवप्रतिभा