परवा बायको आमच्या छोट्या बाळाला घेऊन शेजारच्या घरी काही कामानिमित्त गेली होती. त्यावेळी तिथल्या आजींनी हिला सहज विचारले, "अगं याची दृष्ट वैगेरे काढतेस की नाही? मला वाटतंय ह्याला जबरी दृष्ट लागली आहे." तेव्हा बायकोनी त्यांना उत्तर दिले की आम्हाला यातलं काही कळत नाही, त्यामुळे आम्ही हे दृष्ट उतरवणे वैगेरे प्रकार करत नाही. तेव्हा त्या आजींनी एक अनुभव सांगितला, तो अक्षरशः चकरावणारा होता....
ते सगळं कुटुंब अंदाजे पंधरा सोळा जण त्यांच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला गेले होते, तिथे त्या निसर्गरम्य ठिकाणी काही माकडेही होती. एका उंचशा झाडावर एक माकडीण आपलं पिल्लू सांभाळत बसली होती. ते पिल्लू अगदी हाताच्या पंजाएवढं, नाजुक, चिमुकलं, त्याला ती कसंबसं धरून छोट्याशा फांदीवर तोलून बसली होती. ह्या लोकांनी तिला पाहिले, ते पिल्लू पाहिले. सगळे त्या दृष्याकडे पाहू लागले. ते एवढूसं पिल्लू, एवढ्या उंचीवर ती कशी हाताळत होती याबद्दल सगळ्यांना काळजी वाटू लागली. कुणाच्या तरी तोंडून हे शब्द निघालेच, "अरे ते किती लहानसं पिल्लू आहे. इतक्या वरून पडलं बिडलं तर मरेल..."
झालं. हे शब्द तोंडातून बाहेर पडताक्षणीच, त्या माकडीणीने जे केले ते तिथल्या सर्व लोकांना हादरवून गेले. तीने झटकन तिथल्या फांदीची एक काटकी मोडली, त्यावर ती थुंकली, आपल्या पिल्लाभोवती दृष्ट काढल्यासारखी फिरवली आणि ह्या लोकांच्या अंगावर सरळ फेकून मारली...! तिच्या ह्या कृत्याने ही सगळी मंडळी टरकलीच.
तेव्हा आजी म्हणाल्या, अगं ते प्राणी असून एवढी काळजी घेतात मुलांची, आपण नको का घ्यायला....?
वर घडलेली घटना अजिबात काल्पनिक नाही. आम्ही त्या आजींना आणि सगळ्या घरच्यांना गेले तीन वर्षे ओळखतो. गोष्टी रचून सांगणे, काही तरी पुड्या सोडणे असले प्रकार ते लोक कधीच करत नाहीत. चांगले सुसंस्कृत आणि प्रांजळ स्वभावाची माणसे आहेत. त्यांनी खोटं सांगून त्यांना आमच्यापासून काही फायदा नाही. वाचकांपैकी कुणाला अशा घटनांबद्दल काही माहिती असेल तर नक्की सांगावी.
आता अजून एक चमत्कारिक घटना. ही माझ्या घरात घडली असून प्रत्यक्ष अनुभव असल्याने काय खरे काय खोटे मानावे असे झाले आहे. माझा हाच छोटा मुलगा (वय १.५ वर्ष) ऑगस्ट महिन्यापर्यंत चांगला खेळायला, माफक बोलायला लागला होता. त्याचा सतत बाबा, बाबा घोष चालू असे. वेगवेगळ्या आलापीत, लयीत बाबा, दादा, आई असे म्हणणे चालू असे. कोणत्याही वस्तूचे पहिले अक्षर उच्चारायचा, जसे मोबाइल चे मो, पोळीचे पो, इत्यादी. कामवाली मावशी जायला लागली की छान बाय करायचा, ती गेली की "गेयी... गेयी" असे उच्चारायचा. तो प्रीमॅच्युअर असल्याने त्याची वाढ स्लो आहे. म्हणजे नॉर्मल वयाच्या मुलांपेक्षा तो किमान चार महिने मागे आहे. पण सुदृढ आणि स्टेडी ग्रोथ होती. अचानक ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात एकेदिवशी तो बोलायचा बंद झाला. फक्त "ऊं..ऊं..ऊं... " करायचा. फक्त रडायचा. जवळ घेतले की घट्ट चिकटून बसायचा. जरा दूर म्हणज अगदी १०-१२ इंच जरी दूर ठेवले तरी त्याचे डोळे भयानक भीतीने भरून जायचे आणि तो प्रचंड भेसूर, अभद्र आवाजात ओरडायचा. त्या आवाजात रडतांना त्याला आम्ही कधीही ऐकले बघितले नाही. त्याच्या आईजवळ, माझ्याजवळ शांत असायचा. पण घट्ट चिकटून असेल तरच. अन्यथा त्याला जरा म्हणजे अगदी एक सेकंदासाठीही अंगापासून दूर केले की तो तेच अभद्र किंचाळणे, भीतीने थरथरून जाणे, प्रचंड घाबरून जाणे असेच करायचा. आम्ही सुरुवातीचे दोन-तीन दिवस हे सगळे त्या अँगलने बघितलेच नव्हते. त्याचे पोट दुखत नव्हते, इतर काही शारिरिक त्रास नव्हता. कारण तसे असते तर तो शांतच बसला नसता. पण तो शांत बसायचा, तेही घट्ट चिकटून. नेहमी बायको रोज सकाळी साडेसहाला उठते, तेव्हा हे साहेब आईशिवाय सकाळी ११-१२ पर्यंत निवांत झोपायचे. पण त्या नऊ दिवसांत ज्याक्षणी आई त्याच्यापासून फूटभराच्या रेंजमधून बाहेर गेली की त्याक्षणी हा भोकांड पसरत उठून बसायचा. नंतर झोपायचाच नाही. रात्रीही शांत झोपत नव्हता. सतत भीतीचे सावट त्याच्या डोळ्यात दिसायचे. आम्ही दोघेही नुसते गुंतून बसलो होतो. तो एक क्षणही आम्हाला सोडतच नव्हता. सहाव्या सातव्या दिवशी तर अगदी टॉर्चरस झाले होते. ना मी काम करू शकत नव्हतो ना ती. आम्ही आलटून पालटून त्याला घेऊन आपली कामे करत होतो. त्याला मी घेऊन बसायचो जोवर तिचे काम संपत नव्हते. पण त्याला आई दिसली की तो तिच्याकडेच जाण्यासाठी आरडाओरडा करायचा. हे मी इथे लिहितो आहे तेवढे सोपे अजिबात नव्हते. त्या नऊ दिवसांमधे जे भयानक वातावरण आमच्या घरात होते की आम्ही दोघेही वेडे होण्याचा मार्गावर आलो होतो. दिवसभर नुसता चिडचिड, संताप-संताप व्हायचा. त्याचे वजन झपाट्याने कमी झाले. त्याला नेमक्या कोणत्या डॉक्टरकडे न्यावे ह्यावर विचार करत होतो. कामवाली मावशी बोलली, इकडे ह्या मंदीरात घेऊन जा, तिकडे जा वैगेरे. आम्हाला असलं काही पटत नाही. आमच्या शेजारची आजी (ह्या दुसर्या) त्यांचे आमचे घर चिकटून आहे. मुलाचे रडणे त्याही ऐकत होत्या. त्यांनाही ते विचित्र वाटत होते. त्यांनी बायकोला जबरदस्तीने एक मंत्र दिला लिहून आणि म्हटले की हा मंत्र म्हण. बहुधा दत्ताचा काहीतरी मंत्र होता. हाच नववा दिवस. त्या दिवशी रात्री साडे-आठ वाजता बायकोने तो कागद हाती घेतला आणि चांगला वीस-पंचवीस ओळींचा मंत्र, म्हणायला सुरुवात केली. फक्त चौथ्या ओळीच्या समाप्तीवरच..... बाळ शांत झाले. त्याने मला मोठ्याने 'बाबा...बाबा' अशी हाक मारली. मी वरच्या बेडरूममधे होतो. गेल्या आठ दिवसांच्या चोविस तासांमधे त्याने एकही शब्द तोंडातून काढला नव्हता. आठ दिवसांनी तो स्पष्ट बाबा बोलला. मी धावत खाली आलो. तुम्ही समजू शकाल की नाही माहित नाही. पण सतत बाबा बाबा जप करणारं बाळ अचानक अबोल होतं आणि जे शब्द ऐकायला तुमचे कान आतुर झालेले असतात. ते शब्द इतक्या भयंकर परिस्थितीतून गेल्यावर कानी पडतात. तेव्हा माझे डोळे निरंतर वाहत होते. आताही आहेत... तो त्याच्या आईपासून चार-पाच फुटांवर एकटा मजेत खेळत होता, बाबा बाबा करत होता. जणू काही कधी घडलेच नाही.
माझ्या मुलामधे त्या क्षणी मोड स्वीच केल्यासारखा तो झटक्यातला बदल मी रेकॉर्ड करू शकलो असतो तर तुम्हाला खरंच दाखवू शकलो असतो आम्ही काय चमत्कार पाहिला. इथे तर्क थांबतात. बोलणारे काही बोलू देत. त्यांना तो अनुभव नाही जो मी आठ दिवस गुणिले चोविस तास घेतला आणि मूल असं एका मिनिटात नॉर्मल झालेलं बघितलं. त्याचे डोळ्यातले बदललेले भाव आधीचे मी कधीच विसरू शकणार नाही. जणू त्याला वाटायचं की कुणीतरी त्याला आमच्यापासून दूर नेणार आहे, काहीतरी भयंकर जे मी शब्दात सांगू शकत नाहीये. अजूनही तो पूर्ण नॉर्मल नाही पण ८०-९० टक्के तरी उत्तम आहे. त्याचे शब्द उच्चारणे मात्र फार कमी झाले आहे.
ह्या सगळ्या प्रकाराला नजर लागणे, दृष्ट लागणे म्हणतात काय? आम्ही आमच्या ह्या दुसर्या मुलाचे कुठलेही संस्कार आजवर केलेले नाहीत. पाचवी पुजली नाही, जावळं काढली नाहीत, कान टोचले नाहीत, कुलदैवतेच्या दर्शनास नेले नाही. अजून बारसं म्हणजे नामकरणही केले नाही. त्याचे नाव असेच घेतो. रूढ अर्थाने बाळासाठी म्हणून जे धार्मिक संस्कार आहेत ते कुठलेही केलेले नाहीत. ह्याबद्दल आम्हाला बर्याच जणांनी बरे-वाईट सांगितले आहे. आम्ही मनावर घेत नाही. पण खरंच ह्यामुळे मुलांवर काही परिणाम होतात का? आमच्या जवळच्या नातेवाईकांपैकी एकाशी आमचे विडीओ कॉलिंग झाले, त्यात त्यांनी घर, मुले बघितली. नंतर २४ तासांतच हा प्रकार सुरु झाला. बघा... मन एका वाटेने जायचे ठरवते तर कशाचाही संबंध कशासही जोडू पाहते.
हा काय प्रकार आहे राव....? आधुनिक वैद्यकशास्त्रात अशी काही प्रकरणे हाताळली गेली आहेत का? समजा अशा प्रकरणात नेमके कोण्या डॉक्टरकडे जावे, त्यांना नक्की काय सांगावे व ते काय उपचार देऊ शकतात?
(वाचकांना विनंती: वरील सर्व घटना शंभर टक्के सत्य आहेत. त्याबद्दल आपण काही मौल्यवान माहिती, सल्ला, अनुभवजन्य ज्ञान देऊ शकत असाल तर आपले स्वागत आहे, निरर्थक वाद टाळल्यास कृपा होईल.)
प्रतिक्रिया
1 Nov 2015 - 2:10 am | पद्मावति
हम्म... चक्रावून टाकणारा अनुभव आहे. खरोखरंच काही गोष्टी, अनुभव लॉजिक/ तर्काच्या पलीकडच्या असतात.
1 Nov 2015 - 3:15 am | रातराणी
+१
काळजी घ्या! मुलांच्या बाबतीत मन कुठलीही रिस्क नाही घेऊ शकत.
1 Nov 2015 - 4:03 am | नेत्रेश
दृष्ट लागणे / काढणे, विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत खुप पाहीले आहे.
1 Nov 2015 - 4:39 am | स्रुजा
डॉक्ट रांकडे घेऊन जा, एक खात्री करुन घ्या की कोणती शारीरीक अडचण नाहीये ना ज्यामुळे बोलणं कमी झालं. डॉ> म्हणतील असं काही नाही मग हे डोक्यातुन काढुन टाका, रात्री झोपताना चांगलं शास्त्रीय संगीत लावा, तुमच्या घरचं< वातावरण पॉझिटिव असणार प, आता ते तसं ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करा. काही होत नाही आणि काही कुणाची नजर लागत नाही. नेहमीप्क्षा थोडा जास्त खेळायला पाठवा त्याला, थोडे दिवस तुम्ही लांबुन लक्ष द्या, आणि मुलाच्या आत्मविश्वासाला विशेष जोपासा थोडे दिवस, स्वतः च्या ही जोपासा. झटकुन टाका आणि हे विचार. आपण परवानगी दिल्या शिवाय कुठलीही तथाकथित वाईट नजर आपलं काही वाकडं करु शकत नाही हे लक्षात ठेवा.
1 Nov 2015 - 4:46 am | स्रुजा
रात्री झोपताना चांगलं शास्त्रीय संगीत लावा, तुमच्या घरचं वातावरण पॉझिटिव असणार च, आता ते तसं ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करा. काही होत नाही आणि काही कुणाची नजर लागत नाही. नेहमीप्क्षा थोडा जास्त खेळायला पाठवा त्याला, थोडे दिवस तुम्ही लांबुन लक्ष द्या, आणि मुलाच्या आत्मविश्वासाला विशेष जोपासा थोडे दिवस, स्वतः च्या ही जोपासा. हे सगळं अशासाठी की तुम्ही काहीच उपाय केले नाहीत असं वाटुन तुम्हाला त्रास नको व्हायला. झटकुन टाका आणि हे विचार. आपण परवानगी दिल्या शिवाय कुठलीही तथाकथित वाईट नजर आपलं काही वाकडं करु शकत नाही हे लक्षात ठेवा.
3 Nov 2015 - 4:20 pm | नया है वह
आपण परवानगी दिल्या शिवाय कुठलीही तथाकथित वाईट नजर आपलं काही वाकडं करु शकत नाही हे लक्षात ठेवा
1 Nov 2015 - 5:04 am | रेवती
हम्म...........अतर्क्य आहे हे! ज्याचे त्याचे अनुभव तेवढेच खरे असतात, बाकीच्यांना ते तसेच वाटतात असे नाही. माझ्या मुलानेही एकदा आठ दहा दिवस जेमतेम खाल्ले, न खाल्ले असे केले होते पण तेंव्हा त्याला दात येत होते. हे माहित असतानाही आमची घाबरगुंडी उडाली होती. तुमचे काय झाले असेल याची कल्पना येऊ शकते.
1 Nov 2015 - 7:10 am | योगी९००
चक्रावून टाकणारा अनुभव आहे.एरवी मी या गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही पण मुलांबाबत काही झाले तर "दृष्ट काढणे" हे करतोच..तेवढेच आमच्या मनाचे समाधान...!!
दत्ताचा तो मंत्र आम्हाला कळू शकेल काय?
1 Nov 2015 - 7:18 am | मांत्रिक
दत्त मालामंत्र असेल. सर्च मारा नेटवर. खूप ताकदवान मंत्र आहे. नाहीच मिळाला तर नंतर लिंक देईन.
1 Nov 2015 - 7:20 am | मांत्रिक
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=http://sanskritdo...
4 Nov 2015 - 4:43 pm | उगा काहितरीच
मला पाठ होता हा मंत्र . पहिले रोज संध्याकाळी घरातील सर्व लोक एकत्र बसून प्रार्थना व दत्तमाला मंत्र म्हणत असत .
1 Nov 2015 - 7:24 am | मांत्रिक
दत्त या देवतेशी शाकाहार, ब्रह्मचर्य, सात्विकता व पावित्र्य या गोष्टी निगडीत असल्याने अनुष्ठानाच्या काळात तरी किमान सावधानता बाळगावी लागते, असे वाचनात आहे.
बाकी मी शाक्त असल्याने या बाबतीत ठाम काही सांगू शकत नाही.
1 Nov 2015 - 7:22 pm | संदीप डांगे
ते दत्त कवच आहे. वेळ मिळाला की टंकतो.
1 Nov 2015 - 11:11 am | इडली डोसा
मुलांच्या बाबतीत आपण चटकन हळवे आणि हतबल होतो.
माझी मुलगी पावणे दोन वर्षांची असताना अचानक झोपताना बेडरुमच्या दाराकडे बघुन "तो काका नको" "तो काका नको" असं ओरडायला लागली. रात्रीतही किंचाळत ऊठायची. असं तीन चार वेळा झाल्यावर तिच्या डे केअर मध्ये चौकशी केली. तेव्हा त्यांनी सांगितलं की दोन चार दिवसांपुर्वी कोणी तरी सफाई कामगार वर्गाच्या बाहेरुन त्यांच्या वर्गाच्या काचा स्वच्छ करणारा आला होता. त्या माणसाने हूडी घातली होती. त्याला बघुन काव्या खुप घाबरली होती. नंतर खुप दिवस तिला आम्ही समजावत होतो की तो काका तुला हर्ट नाही करणार. आता एक वर्ष झालं या घटनेला अधून मधून ती लोकं साफ सफ़ाईला येत असतात डे केअर मध्ये पण आता ती तेवढी घाबरत नाही.
सांगायचा मुद्दा असा की तुमच्या मुलाने ही असा कशाचा तरी धसका घेतला असेल आणि तो घाबरला असेल . आणि कोणत्याही उपायाने का असेना त्याला पुन्हा बरं वाटायला लागलं ते चांगलं झालं. पण तो नक्की कशाला घाबरला वगैरे होता का त्याचाही शोध घ्या म्हणजे पुढच्या वेळी खबरदारी घेता येईल .
मंत्राचं वगैरे म्हणाल तर मी रोज मुलीला झोपवताना गणपती अथर्वशीर्ष आणि संकट्नाशन स्तोत्र म्हणते. गणपती हि माझी इष्ट देवता आहे आणि हि दोन्ही स्तोत्रं म्हणुन मला प्रचंड मन:शांती मिळते.
1 Nov 2015 - 11:24 am | प्यारे१
दृष्ट काढावीच. काही गोष्टी मान्य कराव्या लागतात. मोठ्या माणसांना सुद्धा असे प्रकार त्रास देतात. लहानग्यांना पटकन त्रास होतो. ज्या त्या गोष्टीतले जे ते उपचार करुन मोकळं व्हावं त्याला होकारु नये आणि नाकारु देखील नये.
का झालं, कुणी केलं, ज्यानं/जिनं केलं त्याला/तिला बघतो हे मुद्दे डोक्यात आणू नयेत. झालं, त्यावर उपाय मिळाला तो केला विषय मिटला.
1 Nov 2015 - 12:05 pm | अभ्या..
नजर लागते ह्या गोश्टीवर माझा विश्वास आहे. बाकी संदीपरावांना आलेला अनुभव जरा इन्स्टंट इफेक्टीव्ह वाटला पण त्यांना आलाय. खरे असणारच.
1 Nov 2015 - 1:03 pm | बाबा योगिराज
कुणी काहीही म्हणो, काही गोष्टी खरच अतर्क्य असतात.
ज्या त्या गोष्टीतले जे ते उपचार करुन मोकळं व्हावं त्याला होकारु नये आणि नाकारु देखील नये.
का झालं, कुणी केलं, ज्यानं/जिनं केलं त्याला/तिला बघतो हे मुद्दे डोक्यात आणू नयेत. झालं, त्यावर उपाय मिळाला तो केला विषय मिटला.
प्यारे भौ शि सहमत...
1 Nov 2015 - 1:55 pm | साती
त्या माकडीणीला मराठी उत्तम कळत होतं आणि झाडाच्या शेंड्यावरूनही स्पष्ट ऐकू येत होतं हे पाहून बरं वाटलं.
आता - अचानक बोलू शकणारी मुले हळूहळू बोलेनाशी होतात तेव्हा टेंशन येणं सहजिक आहे. त्यातही तुम्ही म्हणताय की बाळ अजूनही पूर्ण नॉर्मल नाही तर त्याला चांगल्या बालरोगत्ज्ज्ञांकडे नेलेले उत्तम. त्यांच्या रेकमेंडेशनने गरज पडल्यास पेडिअॅट्रिक न्यूरॉलॉजिस्टकडे नेता येईल.
बाकी मुलांचे टँट्रम सारखे चालू असतातच.आईवडिलांना बर्याचदा सवयीने हे इग्नोअर करता येण्यासारखे आहे की नाही ते समजते.
जर मनात जराही किंतु आला तर योग्य त्या डॉक्टरांकडून चेक करून घेणे उत्तम!
(हे नसण्याची शक्यता जास्त आहे-पण नॉर्मल हसते खेळते बोलते मुल सडनली शांत अबोल विथड्रॉन होणे ही ऑटिझम किंवा ऑटिझम रिलेटेड डिसऑर्डर्सची / ऑटिझम स्पेक्ट्रमची सुरूवात असू शकते.)
1 Nov 2015 - 5:47 pm | प्यारे१
माकडीणीच्या अकलेबाबत शंका ? समस्त प्राणिमित्र संघटनेकडून निषेध.
सीरियसली प्राण्यांना भाषा समजतात ना? एकाच भवतालामध्ये वाढलेल्या प्राण्यांना ती ती भाषा समजत असावी असं मला वाटतं. घरातला कुत्रा, मांजर सगळं समजतो ना? अर्थात दृष्ट माकडीणीनं काढण्याबाबत साशंकता नक्कीच असणार.
इतर उपचाराबद्दल सहमत आहेच.
1 Nov 2015 - 7:09 pm | संदीप डांगे
माकडीणीबद्दलः प्रश्न शब्द वा भाषेचा नाही आहे सातीजी, भाषा ही दुय्यम आहे. आविर्भाव, हातवारे, चेहर्याचे भाव यावरून मतितार्थ जाणवतो. फार वर्षांपूर्वी एका दिड वर्षांच्या मुलाने खेळता-भांडता चिडून जाऊन सोबतच्या मुलांना 'जा न बे पोट्ट्या' म्हणजे 'ए भाऊ, डोकं नको खाऊ' हे शब्द अशा आविर्भात ओरडून म्हटले की मी चमकलो. त्या साध्याशा शब्दांच्या ठिकाणी त्याच्या आविर्भावामुळे मला एका अश्लाघ्य शिवीचा प्रत्यय आला. असेच अनुभव इतरांनाही असतीलच. चेहर्यावरचे हावभाव प्रत्यक्ष बोललेल्या शब्दांपेक्षा जास्त परिणामकारक ठरतात कधी कधी. शिव्या देण्यामधे योग्य तो आविर्भाव नसेल तर त्या परिणाम साधत नाहीत असं निरिक्षण आहे.
मुलाबद्दलः 'ते' सर्व घडण्याआधी सुमारे वीस-पंचवीस दिवस आधी त्याला दात येण्याचा भयंकर त्रास झाला. तेव्हाही त्याचे साधारण असाच रडण्या-चिडण्याचा एपिसोड झाला. दात येत असतांना त्याला शी-ला भयंकर त्रास होत होता. पण तेव्हाचे रडणे आणि हे रडणे यात एक विशेष फरक होता. तेव्हा त्याला डेन्टॉनिक देऊन आराम पडला होता. त्या सर्व काळातही तो पूर्ण नॉर्मल होता. त्या दात येण्याच्या एपिसोड मुळेच आम्हाला सुरुवातीला हेही तसेच काहीसे आहे असे वाटले. पण नंतर त्याचे वेगळेपण जाणवले.
एक खबरदारी म्हणून डॉक्टरकडे नेणे हेही योग्यच आहे.
प्रतिसाद व मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद!
1 Nov 2015 - 2:06 pm | गामा पैलवान
संदीप डांगे,
तुमचा अनुभव वरपांगी 'नजर लागणे' या प्रकारचा दिसंत असला तरी तो मुळातून एखाद्या पितराचा त्रास असावा असं दिसतंय. दत्ताचं कार्य अतृप्तांना गती देणं आहे. ते काम मंत्राच्या चौथ्या ओळीतच साध्य झालं.
तुमच्या किंवा पत्नीच्या पितरांपैकी कोणीतरी मातृसुखाला वंचित झालेला असावा. मुलामार्फत ते सुख भोगायचा त्याचा प्रयत्न असावा असं दिसतंय. जो मंत्र तुम्हाला लाभदायी ठरला त्याची किमान तीन पारायणे (मनात अथवा मोठ्याने) रोज करीत चला म्हणून सुचवेन. बाकी सर्व सांभाळून घेण्यास श्रीदत्तमहाराज समर्थ आहेतंच.
आ.न.,
-गा.पै.
1 Nov 2015 - 2:10 pm | अभ्या..
पैलवान साहेब. मूळ धाग्यात वैयक्तिक अनुभव असला तरी प्रतिसाद ओढायचे पोटेन्शिअल आहेच. तुम्ही नायट्रो बूस्टर लावले.
अब क्या. भ्रूम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म.
1 Nov 2015 - 3:22 pm | चांदणे संदीप
+100
1 Nov 2015 - 4:21 pm | बॅटमॅन
अगदी अगदी!!!!!!
(पथपुटकुळ्या प्रेमी) बॅटमॅन.
1 Nov 2015 - 6:13 pm | आदूबाळ
पथपुटकुळ्या!!
बेक्कार हसतोय.
4 Nov 2015 - 9:26 pm | अजया
=))
1 Nov 2015 - 4:40 pm | प्रकाश घाटपांडे
लहानपणी दृष्ट काढून घ्यायला मला फार आवडायचे.मीठ मोहरी ओवाळून विस्तवावर टाकली की एक दर्प यायचा. तो जेवढा घाण तेवढी दृष्टी पॉवरफूल लागली होती असे समजायचे. मला दृष्ट लागली आहे माझी दृष्ट काढ असे मीच आईला सांगायचो.
आजही मला ओवाळून घ्यायला फार आवडते.आमच्या कै. बिट्टू भूभू लाही फार आवडायचे.वाढदिवसाच्या दिवशी आई ओवाळायची तेव्हा बिट्टू पटकन माझ्या शेजारी बसून ओवाळून घ्यायचा.
बाकी आपण केलेले उपाय हे वैज्ञानिक दृष्टीकोनात बसणारे नसले तरी त्याने मन शांत व्हायला मदत होते. डोक्यात वळवळणारा किडा शांत होतो. असे माझे निरिक्षण आहे.
1 Nov 2015 - 4:54 pm | पैसा
सहमत आहे.
सातीने लिहिल्याप्रमाणे प्रीमॅच्युअर आणि नाजुक बाळ असेल तर सतत डॉक्टरांच्या संपर्कात रहाणे चांगले. एम एम आर ची लस दिल्यानंतर तो बोलायचा बंद झाला असे काही लक्षात आले का? स्वमग्नता एकलकोंडेकर यांच्या लेखाची आठवण झाली.
1 Nov 2015 - 7:20 pm | संदीप डांगे
मुलाला एमएमआर दिलेले नाही.
1 Nov 2015 - 8:35 pm | चतुरंग
एमेमारची लस दिल्यानंतरचा बदल आहे का?
1 Nov 2015 - 10:35 pm | अनिरुद्ध.वैद्य
आमच्याकडे नेमके उलट चालते. दृष्ट लागली असेल तर वास मुळीच येत नाही असे मानले जाते. मीठ मिरची प्रत्यक्ष जाळतांना वास न येण्याचे बघितले असल्याने बरेच नवल वाटलेले.
मानसिक आधार मिळून जात असेल कदाचित.
1 Nov 2015 - 7:33 pm | चैदजा
डॉक्टरच्या संपर्कात रहा. पण कुलदैवतेच्या दर्शनास जाऊन या !!!!!
1 Nov 2015 - 7:46 pm | कंजूस
त्या मुलास कसलीतरी भीती बसली आहे.रोज "अमुक अमुक ला हाssट करायला आई गेलीय वगैरे सांगितले की भीती खूप कमी होईल.
काही नजर लागणे /जादू /मंत्र मारणे वगैरे शंका येत असेल तर फुकट मिळालेल्या संशयित वस्तू फेकून द्या.
2 Nov 2015 - 10:31 am | एक सामान्य मानव
माझे बालपण मिरज शहरात गेले. म्हणजे अगदी लहान नसलो तरी १०-१२ वर्षांचा होइपर्यंत तिथे होतो. ब्राह्मणपुरी भागातील जुन्या वाड्यात ताईबाई, किरकिरप्पा असे देव टाइप प्रकार असल्याचे लोक सांगत. तिथे अगदी लहान मुलांना नेल्यावर रडणे, पोट बिघडणे असे त्रास होत. त्यावर जुन्या जाणत्या आजीबाई नारळ वाहणे, ओटी भरणे हे उपाय सांगत. ते केल्यावर बहुदा त्रास बंद होत असे. माझी लहान बहीण तेंव्हा तान्ही होती. तिच्याबद्द्ल असे अनुभव आलेले पाहिले आहेत. बॅटमॅन हे आधिक माहिती देऊ शकतील.
2 Nov 2015 - 11:44 am | बॅटमॅन
याबद्दल ऐकूनच आहे मोस्टली. ब्राह्मणपुरीत न राहिल्याने याबद्दल प्रत्यक्ष अनुभव शून्य आहे.
4 Nov 2015 - 8:49 pm | रेवती
ताईबाईबद्दल माहित नाही पण किरकिरप्पाचे देऊळ मिरजेजवळ आहे. म्हणजे ट्रेनने जावे लागते. लहान मुले किरकिर करत असली किंवा रडूरडू होत असले, झोपत नसली की एकदा किरकिरप्पाच्या देवळात नेऊन आणायची प्रथा खूप पूर्वी होती असे ऐकले आहे.
4 Nov 2015 - 8:52 pm | मांत्रिक
ताईआई हा खरा शब्द आहे. बहुतेक तिय्यम दर्जाची देवता आसावी. तिला पुरणपोळीचा गोड नैवेद्य दाखवतात. साधारण साती आसरासारखे उभे, चपटे ३ किंवा ७ दगड असतात.
मी पूजा केली आहे एकदा तासगावातील एका जुन्या घरात.
यावर हसू नये. ;) ;) ;)
मी मांत्रिकच आहे. असले विषय आवडतातच!!!
4 Nov 2015 - 8:57 pm | मांत्रिक
तिय्यम दर्जा = demigod यक्ष, दुष्टग्रह असा अर्थ घ्यावा.
5 Nov 2015 - 12:04 pm | बॅटमॅन
कुठे आहे मिरजेजवळ?
6 Nov 2015 - 2:26 am | रेवती
विचारून सांगेन.
6 Nov 2015 - 11:05 am | बॅटमॅन
नक्की सांगा.
6 Nov 2015 - 3:36 pm | यसवायजी
कागवाडजवळ संतूबाई(सटवाई) आहे. इथे लहान मुलांना घेऊन जातात.
6 Nov 2015 - 5:01 pm | बॅटमॅन
अच्छा तिकडं होय? धन्स बे.
2 Nov 2015 - 10:59 am | वेल्लाभट
स्ट्रेन्ज.
पण वर कुणीतरी म्हटल्यप्रमाणे इथे तर्क चालेनासा होतो. आणि प्यारे भाउंशी सहमत की खोलात न जाता सहज सोपा उपाय असेल तर करून मोकळं व्हावं. मनाचं समाधान; बाकी काही नसलं तरी.
हे प्रकार ऐकलेले आहेत. विश्वास नाही खरं तर, पण गोष्टी नाकारता न येण्यासारख्या होतात, तेंव्हा एकच वाटतं... स्ट्रेन्ज!
2 Nov 2015 - 12:09 pm | _मनश्री_
एक जपयंत्र आणा .
आमच्याकडे श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र असणारे जपयंत्र आहे
चोवीस तास सुरु असते , हलक्या आवाजात कानावर पडत राहते ,त्याने घरात प्रसन्न वाटते
मन अगदी शांत राहते
तुम्हीही बघा करून हा उपाय ,
तुळशीबागेत किंवा कुठल्याही पूजासाहित्य मिळणाऱ्या दुकानात मिळते
5 Nov 2015 - 12:20 pm | जातवेद
त्याचा चांगला परिणाम होतो.
2 Nov 2015 - 6:44 pm | दिवाकर कुलकर्णी
माकडाच प्रकरण मनातून काढून टाका,
त्याचे कांही चाळे असू शकतात ,त्याच्या चाळ्याला, आपण
आपल्या मनातला अर्थ देतो,
प्रश्न बाळाच्या बरे नसण्याचा ,
चांगल्या पेडिया याट्रीकला दाखवा,
मंत्र जप जाप्य नं ,तुम्हाला बरं वाटेल बाळाला नाही ,
त्यात अडकून पडू नका ,
माकडाचा किस्सा पुन्हा कुणाला शेअर
करि नका ,हळव्या मनाला अशा गोष्टी
लगेच पटतात,बाळाला लवकर बरे वाटूदे ही सदिच्छा , व
अनेक आशीर्वाद
6 Nov 2015 - 5:56 pm | असंका
+१
4 Nov 2015 - 2:55 pm | काव्यान्जलि
स्त्रोत्र - मंत्राच सामर्थ्य अफाट आहे. त्या साठी "सोत्र-मंत्राचे विज्ञान " म्हणून पुस्तक मिळतं. खूप छान आहे ते.
4 Nov 2015 - 8:01 pm | बाबा पाटील
झपटाणारी भुते नेहमी,मरि आई,सटवाई,खविस यांचीच का असतात ? ती आईन्स्टाइन्,आयसेनहावर्, दानबो माउली,तुकोबाराया,किंवा शुर विरांची का बरे नसतात, अगदी गेला बाजार पेशवाईतला अतृप्त आत्मा राघोभरारीने पण कुनाला झपटाल्याचे ऐकिवात नाही.
4 Nov 2015 - 8:33 pm | मांत्रिक
मरीआई = रोगराईची देवता.
खविस = अत्यंत दुष्ट माणसाचे भूत.
राघोभरारी मला माहिती नाही.
बाकी ही मंडळी दुष्ट कॅटॅगरीतीलच वाटतात. त्यामुळे कुणाला झपाटतील याबाबत नवल नाही. तुम्हाला तर झपाटलेलं असावंच.
म्हणून ज्ञानोबा, तुकाराम यांचा असला उल्लेख करताना तुमच्या तोंडाला अजिबात श्रम झाले नसावेत. बाकी आयुर्वेदातील बालग्रह वगैरे कन्सेप्ट शिकताना क्लासला दांडी मारली होतीत का?
(संपादित)
4 Nov 2015 - 9:44 pm | बाबा पाटील
तु मला भुत दाखव नाही तर मी तुझ्यावर जादुटोणा विधेयकानुसार खटला भरणार आहे का तयारी बोल ? माघार घ्यायची नाही.
4 Nov 2015 - 9:11 pm | मांत्रिक
दानबो माउली,
हा शब्द तुमच्या अल्पतम शैक्षणिक प्रगतीची चिह्ने दाखवतो!!!
माऊली हेल्प दी पुअर सोल!!!
4 Nov 2015 - 10:41 pm | संदीप डांगे
डॉक्टरसाहेब,
अध्यात्मिक आत्मे शांत असतात. अतृप्त आत्मे झपाटतात. ज्ञानोबा-तुकोबा वैगेरे महात्मा झपाटायला लागले तर झालेकी मग...
4 Nov 2015 - 10:53 pm | बाबा पाटील
आपण शिकली सवरलेली लोकच जर या गोष्टींच्या मागे पळायला लागलो तर अवघड होइल,आगरकर गोखले,गाडगेबाबा,दाभोळकर,पानसरे या लोकांनी आपली आयुष्य खर्ची पाडली हा समाज उभा करता करता,बाळ आजारी पडते त्यामागे एक निच्छित कार्यकारण भाव असतो,काहीतरी फिजिओलॉजी,पॅथोलॉजी घडलेली असते, अध्यात्म असावे पण ते फक्त मानसिक समाधानासाठी, पण समाजाच्या भित्र्या मानसिकतेचा फायदा घेवुन कोणी मांत्रिक त्या आत्म्यांचे आणी भुतांचे नाव घेवुन पुजा अर्चनेच्या नावाखाली समाजालाच लुबाडत असेल तर त्यांना वेळेतच रोखले पाहिजे.
4 Nov 2015 - 11:23 pm | मांत्रिक
मांत्रिक हा माझा फक्त आयडी आहे. व्यवसाय नाही. जसा बाबा पाटील हा तुमचा आयडी तुमच्याविषयी काहीच सांगत नाही तसा माझा आयडीही माझ्याविषयी काही सांगत नाही. माझे लेखन थोडे वाचले तर कळून येईल की मी सर्व मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणार्या अद्वैतवादी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा पुरस्कार करतो. कोणत्याही अंधश्रद्धांचा नव्हे.
बाकी माझा विरोध तुम्हाला नसून केवळ ज्ञानेश्वर व तुकाराम या आईस्वरूप संतश्रेष्ठांना भुताखेताच्या पातळीवर ओढण्यास होता.
5 Nov 2015 - 12:56 am | ट्रेड मार्क
जे आपल्याला दिसतं तेच फक्त सत्य असं आपल्याला शिकवलं जातं. परंतु जे दिसतं त्यापलीकडे सुद्धा काही असू शकतं. काही गोष्टी जाणवतात उदा. एखाद्या ठिकाणी गेल्यावर अचानक उदास वाटणे, भिती वाटणे किंवा आजारी पडणे. यातील उदास वाटणे, भिती वाटणे हे मानसिक असू शकते परंतु आजारी पडणे हे तर शारीरिक आहे.
आमच्या शेजारी एक बाई राहायची ती काळी विद्या/ करणी प्रकार करायची. कितीही विश्वास ठेवायचा नाही म्हणलं तरी बऱ्याच गोष्टी आम्ही अश्या अनुभवल्या ज्याचं वैज्ञानिक स्पष्टीकरण देता येणार नाही. त्यात काही मृत्यू सुद्धा आहेत.
कोणी मला हे सिद्ध करून दाखव म्हणलं तर ते आता मला शक्य नाही. पण म्हणून माझे अनुभव खोटे नाहीत… निदान माझ्यासाठी तरी.
5 Nov 2015 - 10:26 am | संदीप डांगे
डॉक्टरसाहेब,
माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल तर तुमच्या प्रतिसादाचं उत्तर देऊ शकेन.
"विलपॉवर किंवा मनोबल हे सत्य की असत्य?"
5 Nov 2015 - 11:03 am | बाबा पाटील
या गोष्टीच वेगळ्या आहेत्, इच्छाशक्ती आणी दैवीशक्ती यांची सांगड घालण कधीच योग्य ठरणार नाही,आपल्या मागे दैवी शक्ती आहेत ही गोष्ट मानसाच मनोबल वाढवायला उपयुक्त ठरते त्या पलीकडे त्याला काहीही अर्थ नाही.
5 Nov 2015 - 12:26 pm | संदीप डांगे
मी दैवीशक्ती बद्दल बोललोच नाही. इथे फक्त मनशक्तीबद्दल बोलत आहे. मनाच्या शक्तीने जर सकारात्मक-नकारात्मक घडतं तर त्याच्या इंटेन्सिटीनुसार भोवतालचे वातावरण व इतर सजीव-निर्जीवांवरही प्रभाव पडतो. काही झाडांना शिव्या व काही झाडांना प्रेम देऊन झालेला बदलाचा प्रयोग आपणांस माहिती असेलच. एखादा माणूस ओळखीचा नसला तरी त्याबद्दल मनात राग वा प्रेम उत्पन्न होतं. मनाच्या शक्तीला मर्यादा नाहीत. काही गोष्टी आकलनाबाहेर आहेत म्हणून त्या अस्तित्वातच नाहीत असे म्हणणे अहंकाराशिवाय दुसरं काय असू शकते?
दृष्ट लागणे वा देव आहे असे मानणे हे एखाद्याने व्यक्त केले म्हणजे तो पार बाबा बंगालीच्या छा-छु-मंतरला मानणारा, बुवा-मांत्रिकांच्या नादी लागणारा, नवस-बिवस करणारा गावंढळ अशिक्षितच आहे ह्या टोकाला जायची गरज काय असते? कुणीही पराकोटीचा नास्तिक वा पराकोटीचा आस्तिक नसतो. लोक अनुभवानुसार मान्यता, तारतम्य ठेवतात. ज्यांना अनुभव येतो ते मानतात, येत नाही ते मानत नाहीत. मेडीकल सायन्समधेही कित्येक गोष्टींवर योग्य इलाज करूनही परिणाम येत नाही तरी लोक मेडीकल सायन्सला मानतातच ना? आजकाल तर निरक्षर गावंढळही आधी दवाखाना गाठतात, बुवा-बाजीपर्यंत तेव्हाच जातात जेव्हा सगळे भौतिक उपाय थकतात.
दुसरे असे की ज्याला अनुभव आला त्याचं त्यालाच माहित असतं, बाकीचे फक्त आपल्या वकुब व विचारसरणीनुसार फक्त अनुमान लावू शकतात. आठ दिवस भयावह किंचाळणारं बाळ एका क्षणात नॉर्मल होणं माझ्यासाठी चमत्कारिक आहे. इथे लिहिलेले शब्द त्या आठ दिवसातला अनुभव जसाच्या तसा आपल्यापर्यंत पोचवू शकत नाहीत. तो अनुभव कसा असेल हे आपण आपल्या पुर्वग्रहांनुसार फक्त इमॅजिन करू शकता. तुमचे इमॅजिनेशन माझ्या अनुभवाशी म्याच होणे अशक्य आहे. म्हणून माझा अनुभव असत्य कसा असू शकतो?
इथेच मागे गविंनी आपल्याला पित्त, कफ, वात याबद्दल प्रश्न विचारलेला कि हे शरिरात कुठे असते ते सिद्ध करा. आयुर्वेद न जाणणाराला हे पटवून देणे अशक्य का होते हे आपणास चांगले ठावूक आहे. तसे भूत-खेत, मंत्र-सामर्थ्य वैगेरे पटवून देणेही अवघड आहे. आयुर्वेदाच्य नावाखाली लुबाडणारे आहेत तसे बुवाबाजीच्या नावाखाली लुबाडणारे आहेत. पण म्हणून जसा आयुर्वेद खोटा ठरत नाही तसंच हे आधुनिक विज्ञानात सिद्ध न होऊ शकणारे अनुभवही खोटे नाहीत. बाकी तारतम्य किती बाळगायचे हे ज्याचे त्याला कळतेच.
5 Nov 2015 - 1:53 pm | बाबा पाटील
दृष्ट काढणे ही आपल्या समाजात पुर्वपार चालत आलेली रीत आहे,माझा आक्षेप मांत्रिक बुवाला होता,त्याच्या अतिशयोक्तीला होता,बाकी आयुर्वेदाबाबत म्हणाल तर मी महाराष्ट्रात एक वेगळी सुरुवात केली आहे,आयुर्वेदाचे निदान ,त्याची औषधे,त्याची उपचाराचा प्रोटोकॉल आणी औषधांची कम्प्युटराइझ्ड बील्,गरजे नुसार,MBBS,MD(Med.)चे ओपिनियन हे सगळ निदान माझ्या हॉस्पिटल मध्ये तरी होत असत. प्रत्येक गोष्ट ऑनलाइन आहे, त्याचे सॉफ्टवेअर डेव्हलप केले आहे त्यामुळे १००% ट्रान्सपरन्सी . हा त्याला आता बर्याच जुन्या वैद्यांचा विरोध होत आहे आणी नेहमीप्रमाणे मी तो फाट्यावर मारला आहे. ही ट्रान्सपरन्सी जर प्रत्येक क्षेत्रात आली तर कुठला आक्षेप कोणी घेण्याचे काहीच कारण उरणार नाही.
5 Nov 2015 - 2:00 pm | संदीप डांगे
अगदी सहमत....
5 Nov 2015 - 11:37 am | प्रभाकर पेठकर
बाबा पाटील साहेब,
सुशिक्षित आणि साक्षर ह्यात फरक असतोच. कठोर सत्य स्विकारण्याऐवजी सहज, सोपं, असत्य चटकन पचनी पडतं. आपल्या तुटपुंज्या ज्ञानात ज्याची उत्तरे सापडत नाहित अशा गोष्टी चेटूक, जादूटोणा, भूत प्रेत अशा अनाकलनिय शक्तींच्या नांवाखाली ढकलायची आणि आपल्याला उत्तर सापडले आहे अशा भ्रमात समाधान मानायचं हा सोयिस्कर मार्ग बहुतेक जणं (त्यात तथाकथित सुशिक्षितही आले) स्विकारतात.
आपल्या मराठीत एक म्हण आहे, 'भित्यापाठी ब्रह्मराक्षस' ह्याचाच अर्थ असा आहे की जर तुमच्या मनांत भिती असेल तर तुम्हाला आजुबाजूला अनेक भुते, राक्षस, जादूटोणा, करणी वगैरे वगैरे प्रकार दिसतात आणि उत्तर न सापडलेल्या कुठल्याही घटनेची वर्गवारी त्यात करता येते. आपल्या दृष्टीने सोक्षमोक्ष लागलेला असतो. त्यावर साधक-बाधक चर्चा, विचार करण्याची गरज उरत नाही. आणि आपण आपली 'झाकली मुठ' झाकलेलीच ठेवण्यात यशस्वी होतो.
प्रत्येकाच्या मनांत भित्रेपणाचा अंश असतोच. त्याचे प्रमाण जेव्हढे जास्त तेव्हढा भूतप्रेत, जादूटोणा, करणी वगैरे गोष्टींवर विश्वास चटकन आणि कायमस्वरूपी बसतो. कमीतकमी भित्रेपणा असलेला माणूस आधी वैद्यकिय उपाय करण्याचा प्रयत्न करतो. अगदी आपलं मूल, नातेवाईक वैद्यकिय उपायांनाही दाद न देता मरणासन्न अवस्थेत पोहोचतं तेंव्हा असा माणूस देव ह्या संकल्पनेला शरण जातो पण तरीही भूतप्रेत, जादूटोणा, करणी वगैरे अशास्त्रीय कारणांकडे वळत नाही.
माझ्या ओळखित एक न्यूरो सर्जन आहेत. जे अमेरिकेत प्रॅक्टीस करतात. अत्यंत विज्ञाननिष्ठ स्वभाव आणि भूतप्रेत, जादूटोणा, करणीच काय पण देवावरही विश्वास नसणारे डॉक्टर आहेत. ते रजेवर मुंबईत आले असता त्यांच्या १२ वर्षाच्या मुलीला डेंग्यू झाला. आठवडाभर मुंबईच्या इस्पितळात उपचार घेतल्यावर त्यांनी मुलीला अमेरिकेला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि ते तिला अमेरिकेला घेऊन गेले. तिथे ती आयसीयूत होती. १५ दिवसाच्या वैद्यकिय उपचारांनंतरही ती दाद देईना आणि तिची प्रकृती खालावत गेली. डॉक्टर तिचा हा अटळ दुर्दैवी घटनेकडे जाणारा प्रवास पाहून मनोमन हादरले. त्यांना त्यांच्या एका नातेवाईकांनी कुठल्यातरी देवाची उदी दिली आणि ही त्या मुलीच्या खाटेभोवती फिरवा आणि तिच्या कपाळाला लावा असे सांगितले. ह्यांचा त्यावर विश्वास नव्हता पण पोटच्या मुलीची अवस्था त्या पित्याला पाहवेना आणि अगदी शेवटचा उपाय म्हणून त्यांनी तेही केले. लगेच नाही पण आठवड्याभराने त्या मुलीने औषधांना प्रतिसाद देणे सुरू केले आणि महिन्याभराने बरी होऊन घरी गेली. आता लगेच देव आणि भूतप्रेतावर विश्वास ठेवणारे उदीचे महात्म्य वगैरे म्ह्णून आनंद मानतील तर कोणी तिने औषधांना प्रतिसाद न देणे आणि इतकी औषधे पोटात गेल्या नंतर हळूहळू नैसर्गिकरित्या प्रकृतीत फरक पडून प्रतिसाद देणे ह्या दोन गोष्टींच्या मध्ये डॉक्टरसाहेबांची मानसिक अवस्था अत्यंत दुर्बल झाल्यामुळे ते उदीप्रकरणाला शरण गेले आणि सर्व श्रेय वैद्यकिय उपचारांकडून दैवी उपचाराकडे गेले.
ह्या घटनेला इथे देण्याचे प्रयोजन असे की आपल्या मनांतील भिती हीच आपल्याला अशा गोष्टींकडे आकर्षित करते. भिती जेव्हढी जास्त तेव्हढा भूतप्रेत, जादूटोणा, करणी ह्यांचा मानवी मनावर पगडा जास्त आणि जेव्हढी कमी (जशी डॉक्टरसाहेबांची होती) तेव्हढा विज्ञानावर विश्वास जास्त असे असावे. कदाचित, उदी प्रकरण घडले नसते तरी ती मुलगी त्या वेळी वाचलीही असती पण पोतच्या मुलीबद्दलचे प्रेम आणि घरच्यांचा दबाव ह्याला कुठेतरी ते बळी पडले असावेत.
देव किंवा भूत पाहिल्याचे अनेक जणं सांगतात पण मला अजून तरी दोन्हीचाही अनुभव नाही. जो आपल्याला संकटात ढकलतो तो राक्षस किंवा भूत आणि जो संकटातून वाचवतो तो देव असे समीकरण असावे. एकदा एका घाटात एस्टीचे ब्रेक निकामी झाले आणि एस्टी दरीच्या दिशेने घसरू लागली. आपले अटळ मरण पाहून सगळे घाबरले आणि देवाचा धावा करू लागले. दरीकडे घसरणारी एस्टी एका मैलाच्या दगडाला अडकली आणि सर्व प्रवासी वाचले. तो दगड त्यांच्यासाठी देव होता. ह्या गोष्टी आपल्या मानण्यावर आहेत.
5 Nov 2015 - 11:50 am | बाबा पाटील
या लेखावर एव्हड सुंदर विवेचन केल्याबद्दल मनःपुर्वक आभार,बहुदा सर्वांच्या शंका दुर झाल्या असतील
5 Nov 2015 - 12:31 pm | जातवेद
मजा अशी कि त्या गाडीतल्या प्रत्येक प्रवाशाने वेगवेगळ्या देवाचा अथवा संताचा, गुरूचा धावा केला असताना प्रत्येकजण सांगताना आमच्या गुरूमुळेच बस वाचली असे सांगत जाणार. पुढे अशा दगडांचे किस्से 'अनुभव कथन' मधे पसरवले जातात भक्तगणांची वाढ होण्यासाठी.
5 Nov 2015 - 11:57 am | पिलीयन रायडर
हे फार महत्वाचे वाक्य आहे.
5 Nov 2015 - 12:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
काही झपाटतात काही विडंबने पाडतात. आवड एकेकाच))=))
4 Nov 2015 - 9:41 pm | बाबा पाटील
त्याबाबत मी कधी कॉलेजच्या पेपरात लिव्हल नाय बा ?बाकी मिपावर Dnyanoba एकदा मराठीत कसा लिहायचा हे जरा खरडुन दाखवता,म्हणजे जरा माझ्या सारख्या वैदुला उगच हुच्च्भ्रु लिवता येइल.
5 Nov 2015 - 10:25 am | _मनश्री_
5 Nov 2015 - 10:46 am | पैसा
jYaanobaa.
5 Nov 2015 - 10:56 am | बाबा पाटील
पैसाताई
6 Nov 2015 - 4:46 pm | मुक्त विहारि
dnyaanobaa
ज्ञानोबा....
4 Nov 2015 - 9:54 pm | कैलासवासी सोन्याबापु
संदीप भाऊ,
हा धागा काढायच्या मागची तुमची अवस्था अन मानसिकता मी जाणु शकतो, मी आधी फारच विज्ञाननिष्ठ वगैरे होतो पण ड्यूटी च्या क्रमात असे काही काही पाहिले आहे की मी चक्क सश्रद्ध झालो, अर्थात तुम्हाला घाबरवणे हा माझा हेतु मनःपूर्वक नाही हे वेगळे सांगणे नलगे, शिवाय मी वैद्यकीय तज्ञ नाही तस्मात् मी आपणाला ते सल्ले देणार नाही तरी काही उपाय सांगतो ते जमल्यास कराल (आमच्या घरी बाळ असे करत असल्यास जे करतात तेच सांगतोय)
१. मीठ मिर्ची मोहरी नजर उतरवणे
२.(केले नसल्यास) ग्राम देवतेचे अन गावदेवी चे दर्शन आता तुम्ही जिथे राहता तिथले करता आल्यास उत्तम अन्यथा तुम्ही आमचेच गाववाले आहात म्हणून पिन पॉइंट सांगतो बाळाला एकदा अकोल्याला जाल तेव्हा राजेश्वराच्या दर्शनाला नेऊन आणा, सोबत पोलिस लाइन ची देवी (हिला गावदेवी सुद्धा म्हणतात) दर्शन कराल नवजात बाळांस बरे असते ते.
एक छोटासा वैयक्तिक अनुभव,
माझे आजोळ सांगली जिल्ह्यात आहे कराड-ताकारी रूट ने तिकडे जावे लागते, कराड गाव सोडुन कृष्णा नदी चा पुल पार केला की मी किंचाळून रडत असे (लहानपणी) तेव्हा असेच अकोला ते कराड प्रवास बाधला असेल वगैरे म्हणत सगळे पण त्या पुलाशी काहीतरी कनेक्शन होतेच कारण मोठा झालो तरी (अगदी अजुनही) ड्राइव करत जरी त्या पुलावरुन गेलो तरी मी तापाने फणफणत असे अन ते ही १०२ डिग्री वगैरे ताप, आमच्या आजीने एकदा असेच सांगितले मला जाताना किंवा येताना पुलावरुनच नदीला एक नारळ सोडत जा म्हणुन, दरवेळी जेव्हा कधी मी त्या पुलावरुन जातो मी नक्की नारळ देतो एक अन असेच सरप्राजाझिंगली मला त्यावेळी काहीच त्रास नाही होत.
4 Nov 2015 - 10:37 pm | संदीप डांगे
धन्यवाद बापुसाहेब!
आता दिवाळीत जाईन तर कुलदैवतापासून सगळीकडेच जाऊन येईन म्हणतो. तुम्ही सांगितलेला अनुभवही चमत्कारिक आहे.
5 Nov 2015 - 11:54 am | पिलीयन रायडर
संदीपभाऊ,
दृष्ट लागणे हा प्रकार नक्की काय असतो ते समजत नाही पण कधी कधी मुलं नजर काढली की गप्प होतात. कधी होतही नाहीत. आपण करुन पहायला काय जातं म्हणुन बाकी १०० उपचारात ते ही करतो. इथवर ठिकच.
पण समजा, नजर काढली आणि मुल शांत झाले किंवा तुमच्या केस मध्ये थोडेसे बोलु लागले, तर कदाचित असंही होऊ शकतं ना की इतर काही कारणाने ते तेवढयपुरते शांत झाले आहे. कावळा बसायला न फांदी तुटायला...
त्यामुळे नजर वगैरे काढलीत तरी अशा तात्पुरत्या बरं वाटण्यावर विसंबुन राहु नका. आपल्या मुलाला चांगल्या डॉक्टरकडे नक्की न्या. पुण्यात एफ.सी रोडवर एक फार फेमस बालरोगतज्ञ आहेत. आत्ता नाव आठवत नाही. त्यांनीही एक अशीच अनाकलनीय केस होती, ज्यात मुल प्रचंद रदायचे. पार एखादे ऑपरेशन करावे लागेल पोटाचे असं काहीतरी पण सांगितलं होतं.. आणि ती केस निव्वळ एका औषधात बरी केली असे ऐकीवात आहे. नाव आठवले की देतेच.
तुमच्या बाळाला संपुर्ण बरे वाटो.
अजुन नाजुक वयात आहे बाळ, काळजी घ्या.
5 Nov 2015 - 12:31 pm | संदीप डांगे
धन्यवाद!
6 Nov 2015 - 11:38 am | अनुप ढेरे
पंडित, वैशाली समोरचे?
6 Nov 2015 - 3:43 pm | आदूबाळ
हो तेच बहुदा. त्यांची एक आठवण आहे. चांगला डॉक्टर वैद्यकीय ज्ञानाबरोबर कॉमन सेन्सही कसा बाळगून असतो याचा एक अवांतर किस्सा.
मी चारेक वर्षांचा असेन. जमिनीवर बसायचो तेव्हा दोन्ही पाय फाकवून, लांब करून बसायचो. मांडी घालून बसायला कुरकुरायचो.
आईबाबा चिंतेत पडले - मुलाच्या पायात काही दोष आहे का? मला अनेकदा "दुखतंय का" वगैरे विचारून झालं. पण तसं काही नव्हतं. शेवटी मला डॉ आनंद पंडितांकडे घेऊन गेले. त्यांनी सगळं ऐकून घेतलं, आणि विचारलं, "घरी कोणाला आर्थ्रायटिसचा त्रास आहे का?"
बाबा एकदम उठून उभा राहिला. डोक्यात झगझगीत प्रकाश पडला! आईबाबा दोघेही नोकरी करत असल्याने आजीआजोबा मला सांभाळत असत. आजी दिवसभर स्वैंपाकघरात आणि अन्य कामांत व्यस्त असे, त्यामुळे मी आजोबांच्या भोवती घोटाळत असे. आजोबांना गुडघेदुखीचा त्रास होता, पण खुर्चीवर बसणं आवडत नसे. त्यामुळे ते असे पाय पसरून जमिनीवर बसत. मी बालवयातल्या अनुकरणशील स्वभावाप्रमाणे त्यांची बसण्याची स्टाईल उचलली होती!
पाच मिंटात इतर गप्पा हाणून बिनऔषधाचे आम्ही बाहेर!
6 Nov 2015 - 5:02 pm | बॅटमॅन
आयला जबराट अठवण की बे. एकच नंबर.
6 Nov 2015 - 6:29 pm | रेवती
भयंकर सहमत. नातवंडे आजी आजोबांची ष्टाईल उचलतात. माझी आई जमीनीवर उठता बसताना गुढग्यावर हात ठेवून देवा रे! आईगं.....असं म्हणते तर माझी भाची, जी सतत आजीबरोबर असायची तीही उठताबसता आईगं, देवा रे म्हणू लागली होती.
6 Nov 2015 - 6:55 pm | कैलासवासी सोन्याबापु
आदूबाळ साहेब ह्यांचे पाय पाळण्यात दिसले होते म्हणा! :P
5 Nov 2015 - 12:02 pm | प्यारे१
दृष्ट काढणे, उतारा ठेवणे वगैरे या गोष्टी मुख्य औषधोपचार करण्याबरोबर करायच्या गोष्टी आहेत.
उदाहरणार्थ-पोटात दुखणे वगैरे असलं तर ओवा शेकवणे हा औषधोपचार आधी करावा. दृष्ट वगैरे नंतर.
5 Nov 2015 - 12:36 pm | विजुभाऊ
सटवाई बद्दल कोणाला माहीत आहे का?
सातार्यात करंजे नाक्याजवळ सटवाईचे एक देऊळ होते. तेथे घरातील लहान मुलाना सटवाईचे दर्शन करवून द्यायला जात असत. ( बहुधा पाचवीला )
5 Nov 2015 - 5:53 pm | दिवाकर कुलकर्णी
द्दृष्ट काढणे इत्यादि मुळे गुण येइल असं वाटत
असल्यास , ज्याना असं वाटतं त्याना उपचाराची गरज आहे,
5 Nov 2015 - 6:22 pm | चित्रगुप्त
अनाकलनीय गोष्टी आपल्या जीवनात घडत असतात . त्याचे नेमके स्पष्टीकरण देता येत नाही . तुमच्या बाळाला झालेला त्रास आणि मग त्यातून झालेली सुटका हा त्यापैकीच . काळजी घ्या. शुभेच्छा .
माकडिणीची घटना वाचून आश्चर्य वाटले . Desmond Morris नामक प्रख्यात प्राणी-वागणुक तज्ञाने अशी काही निरिक्षणे नोंदवली आहेत का बघितले पाहिजे .
6 Nov 2015 - 1:33 am | वाचक
मारुती चितम्पल्लींच्या एका पुस्तकात अशी आठवण दिलेली आठवते.
"माकडे थंडीच्या वेळी लाकडाच्या ढिगा भोवती, जणू काही ती शेकोटीच आहे असे समजून, न पेटवता 'शेकत' बसलेली असतात. नंतर ती लाकडे, कोरडी ठणठणीत असूनही पेटत नाहीत, जणू काही माकडांनी त्यातले अग्नीतत्व काढून घेतले असावे."
6 Nov 2015 - 10:02 am | जातवेद
'विंटर'एस्टींग!
6 Nov 2015 - 3:48 pm | प्रभाकर पेठकर
अरे व्वा! अशा लाकडांचे फायरप्रुफ घर बांधले पाहिजे.
6 Nov 2015 - 1:47 pm | रंगासेठ
असे कित्येक किस्से ऐकले वाचले आहेत. काळजी घ्या. शुभेच्छा.
6 Nov 2015 - 2:33 pm | एक सामान्य मानव
मारुती चित्तमपल्लीनी त्यांच्या पुस्तकात अशा अनेक कथा दिल्या आहेत. पण त्यातल्या बर्याच पटत नाहीत. म्हणजे काही अनुभव असतील पण कारणमिमांसा मात्र पटत नाही.