परवा बायको आमच्या छोट्या बाळाला घेऊन शेजारच्या घरी काही कामानिमित्त गेली होती. त्यावेळी तिथल्या आजींनी हिला सहज विचारले, "अगं याची दृष्ट वैगेरे काढतेस की नाही? मला वाटतंय ह्याला जबरी दृष्ट लागली आहे." तेव्हा बायकोनी त्यांना उत्तर दिले की आम्हाला यातलं काही कळत नाही, त्यामुळे आम्ही हे दृष्ट उतरवणे वैगेरे प्रकार करत नाही. तेव्हा त्या आजींनी एक अनुभव सांगितला, तो अक्षरशः चकरावणारा होता....
ते सगळं कुटुंब अंदाजे पंधरा सोळा जण त्यांच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला गेले होते, तिथे त्या निसर्गरम्य ठिकाणी काही माकडेही होती. एका उंचशा झाडावर एक माकडीण आपलं पिल्लू सांभाळत बसली होती. ते पिल्लू अगदी हाताच्या पंजाएवढं, नाजुक, चिमुकलं, त्याला ती कसंबसं धरून छोट्याशा फांदीवर तोलून बसली होती. ह्या लोकांनी तिला पाहिले, ते पिल्लू पाहिले. सगळे त्या दृष्याकडे पाहू लागले. ते एवढूसं पिल्लू, एवढ्या उंचीवर ती कशी हाताळत होती याबद्दल सगळ्यांना काळजी वाटू लागली. कुणाच्या तरी तोंडून हे शब्द निघालेच, "अरे ते किती लहानसं पिल्लू आहे. इतक्या वरून पडलं बिडलं तर मरेल..."
झालं. हे शब्द तोंडातून बाहेर पडताक्षणीच, त्या माकडीणीने जे केले ते तिथल्या सर्व लोकांना हादरवून गेले. तीने झटकन तिथल्या फांदीची एक काटकी मोडली, त्यावर ती थुंकली, आपल्या पिल्लाभोवती दृष्ट काढल्यासारखी फिरवली आणि ह्या लोकांच्या अंगावर सरळ फेकून मारली...! तिच्या ह्या कृत्याने ही सगळी मंडळी टरकलीच.
तेव्हा आजी म्हणाल्या, अगं ते प्राणी असून एवढी काळजी घेतात मुलांची, आपण नको का घ्यायला....?
वर घडलेली घटना अजिबात काल्पनिक नाही. आम्ही त्या आजींना आणि सगळ्या घरच्यांना गेले तीन वर्षे ओळखतो. गोष्टी रचून सांगणे, काही तरी पुड्या सोडणे असले प्रकार ते लोक कधीच करत नाहीत. चांगले सुसंस्कृत आणि प्रांजळ स्वभावाची माणसे आहेत. त्यांनी खोटं सांगून त्यांना आमच्यापासून काही फायदा नाही. वाचकांपैकी कुणाला अशा घटनांबद्दल काही माहिती असेल तर नक्की सांगावी.
आता अजून एक चमत्कारिक घटना. ही माझ्या घरात घडली असून प्रत्यक्ष अनुभव असल्याने काय खरे काय खोटे मानावे असे झाले आहे. माझा हाच छोटा मुलगा (वय १.५ वर्ष) ऑगस्ट महिन्यापर्यंत चांगला खेळायला, माफक बोलायला लागला होता. त्याचा सतत बाबा, बाबा घोष चालू असे. वेगवेगळ्या आलापीत, लयीत बाबा, दादा, आई असे म्हणणे चालू असे. कोणत्याही वस्तूचे पहिले अक्षर उच्चारायचा, जसे मोबाइल चे मो, पोळीचे पो, इत्यादी. कामवाली मावशी जायला लागली की छान बाय करायचा, ती गेली की "गेयी... गेयी" असे उच्चारायचा. तो प्रीमॅच्युअर असल्याने त्याची वाढ स्लो आहे. म्हणजे नॉर्मल वयाच्या मुलांपेक्षा तो किमान चार महिने मागे आहे. पण सुदृढ आणि स्टेडी ग्रोथ होती. अचानक ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात एकेदिवशी तो बोलायचा बंद झाला. फक्त "ऊं..ऊं..ऊं... " करायचा. फक्त रडायचा. जवळ घेतले की घट्ट चिकटून बसायचा. जरा दूर म्हणज अगदी १०-१२ इंच जरी दूर ठेवले तरी त्याचे डोळे भयानक भीतीने भरून जायचे आणि तो प्रचंड भेसूर, अभद्र आवाजात ओरडायचा. त्या आवाजात रडतांना त्याला आम्ही कधीही ऐकले बघितले नाही. त्याच्या आईजवळ, माझ्याजवळ शांत असायचा. पण घट्ट चिकटून असेल तरच. अन्यथा त्याला जरा म्हणजे अगदी एक सेकंदासाठीही अंगापासून दूर केले की तो तेच अभद्र किंचाळणे, भीतीने थरथरून जाणे, प्रचंड घाबरून जाणे असेच करायचा. आम्ही सुरुवातीचे दोन-तीन दिवस हे सगळे त्या अँगलने बघितलेच नव्हते. त्याचे पोट दुखत नव्हते, इतर काही शारिरिक त्रास नव्हता. कारण तसे असते तर तो शांतच बसला नसता. पण तो शांत बसायचा, तेही घट्ट चिकटून. नेहमी बायको रोज सकाळी साडेसहाला उठते, तेव्हा हे साहेब आईशिवाय सकाळी ११-१२ पर्यंत निवांत झोपायचे. पण त्या नऊ दिवसांत ज्याक्षणी आई त्याच्यापासून फूटभराच्या रेंजमधून बाहेर गेली की त्याक्षणी हा भोकांड पसरत उठून बसायचा. नंतर झोपायचाच नाही. रात्रीही शांत झोपत नव्हता. सतत भीतीचे सावट त्याच्या डोळ्यात दिसायचे. आम्ही दोघेही नुसते गुंतून बसलो होतो. तो एक क्षणही आम्हाला सोडतच नव्हता. सहाव्या सातव्या दिवशी तर अगदी टॉर्चरस झाले होते. ना मी काम करू शकत नव्हतो ना ती. आम्ही आलटून पालटून त्याला घेऊन आपली कामे करत होतो. त्याला मी घेऊन बसायचो जोवर तिचे काम संपत नव्हते. पण त्याला आई दिसली की तो तिच्याकडेच जाण्यासाठी आरडाओरडा करायचा. हे मी इथे लिहितो आहे तेवढे सोपे अजिबात नव्हते. त्या नऊ दिवसांमधे जे भयानक वातावरण आमच्या घरात होते की आम्ही दोघेही वेडे होण्याचा मार्गावर आलो होतो. दिवसभर नुसता चिडचिड, संताप-संताप व्हायचा. त्याचे वजन झपाट्याने कमी झाले. त्याला नेमक्या कोणत्या डॉक्टरकडे न्यावे ह्यावर विचार करत होतो. कामवाली मावशी बोलली, इकडे ह्या मंदीरात घेऊन जा, तिकडे जा वैगेरे. आम्हाला असलं काही पटत नाही. आमच्या शेजारची आजी (ह्या दुसर्या) त्यांचे आमचे घर चिकटून आहे. मुलाचे रडणे त्याही ऐकत होत्या. त्यांनाही ते विचित्र वाटत होते. त्यांनी बायकोला जबरदस्तीने एक मंत्र दिला लिहून आणि म्हटले की हा मंत्र म्हण. बहुधा दत्ताचा काहीतरी मंत्र होता. हाच नववा दिवस. त्या दिवशी रात्री साडे-आठ वाजता बायकोने तो कागद हाती घेतला आणि चांगला वीस-पंचवीस ओळींचा मंत्र, म्हणायला सुरुवात केली. फक्त चौथ्या ओळीच्या समाप्तीवरच..... बाळ शांत झाले. त्याने मला मोठ्याने 'बाबा...बाबा' अशी हाक मारली. मी वरच्या बेडरूममधे होतो. गेल्या आठ दिवसांच्या चोविस तासांमधे त्याने एकही शब्द तोंडातून काढला नव्हता. आठ दिवसांनी तो स्पष्ट बाबा बोलला. मी धावत खाली आलो. तुम्ही समजू शकाल की नाही माहित नाही. पण सतत बाबा बाबा जप करणारं बाळ अचानक अबोल होतं आणि जे शब्द ऐकायला तुमचे कान आतुर झालेले असतात. ते शब्द इतक्या भयंकर परिस्थितीतून गेल्यावर कानी पडतात. तेव्हा माझे डोळे निरंतर वाहत होते. आताही आहेत... तो त्याच्या आईपासून चार-पाच फुटांवर एकटा मजेत खेळत होता, बाबा बाबा करत होता. जणू काही कधी घडलेच नाही.
माझ्या मुलामधे त्या क्षणी मोड स्वीच केल्यासारखा तो झटक्यातला बदल मी रेकॉर्ड करू शकलो असतो तर तुम्हाला खरंच दाखवू शकलो असतो आम्ही काय चमत्कार पाहिला. इथे तर्क थांबतात. बोलणारे काही बोलू देत. त्यांना तो अनुभव नाही जो मी आठ दिवस गुणिले चोविस तास घेतला आणि मूल असं एका मिनिटात नॉर्मल झालेलं बघितलं. त्याचे डोळ्यातले बदललेले भाव आधीचे मी कधीच विसरू शकणार नाही. जणू त्याला वाटायचं की कुणीतरी त्याला आमच्यापासून दूर नेणार आहे, काहीतरी भयंकर जे मी शब्दात सांगू शकत नाहीये. अजूनही तो पूर्ण नॉर्मल नाही पण ८०-९० टक्के तरी उत्तम आहे. त्याचे शब्द उच्चारणे मात्र फार कमी झाले आहे.
ह्या सगळ्या प्रकाराला नजर लागणे, दृष्ट लागणे म्हणतात काय? आम्ही आमच्या ह्या दुसर्या मुलाचे कुठलेही संस्कार आजवर केलेले नाहीत. पाचवी पुजली नाही, जावळं काढली नाहीत, कान टोचले नाहीत, कुलदैवतेच्या दर्शनास नेले नाही. अजून बारसं म्हणजे नामकरणही केले नाही. त्याचे नाव असेच घेतो. रूढ अर्थाने बाळासाठी म्हणून जे धार्मिक संस्कार आहेत ते कुठलेही केलेले नाहीत. ह्याबद्दल आम्हाला बर्याच जणांनी बरे-वाईट सांगितले आहे. आम्ही मनावर घेत नाही. पण खरंच ह्यामुळे मुलांवर काही परिणाम होतात का? आमच्या जवळच्या नातेवाईकांपैकी एकाशी आमचे विडीओ कॉलिंग झाले, त्यात त्यांनी घर, मुले बघितली. नंतर २४ तासांतच हा प्रकार सुरु झाला. बघा... मन एका वाटेने जायचे ठरवते तर कशाचाही संबंध कशासही जोडू पाहते.
हा काय प्रकार आहे राव....? आधुनिक वैद्यकशास्त्रात अशी काही प्रकरणे हाताळली गेली आहेत का? समजा अशा प्रकरणात नेमके कोण्या डॉक्टरकडे जावे, त्यांना नक्की काय सांगावे व ते काय उपचार देऊ शकतात?
(वाचकांना विनंती: वरील सर्व घटना शंभर टक्के सत्य आहेत. त्याबद्दल आपण काही मौल्यवान माहिती, सल्ला, अनुभवजन्य ज्ञान देऊ शकत असाल तर आपले स्वागत आहे, निरर्थक वाद टाळल्यास कृपा होईल.)
प्रतिक्रिया
6 Nov 2015 - 6:53 pm | पुष्करिणी
इंटरेस्टिंग कोर्स ..जरा स्लो आहे
https://www.coursera.org/learn/soulbeliefs/home/welcome