असेच काही क्षण जगणे शिकवणारे....
नेहमी प्रमाणे भेटल्यावर नमस्कार करुन " अण्णा ५० रुपये दे रे " असे हक्काने चौधरी बोलला म्हणजे आज चौधरी एकदम जोरात आहे १० - १२ दिवस एकदम शांत असणारा चौधरी सकाळ पासूनच देशी लावून आहे हे लगेच समजून आले.
चौधरी म्हणजे पिंपरी - चिंचवड मध्ये घंटागाडी कामगार हा गेले २० वर्ष कंत्राटी कामगार म्हणून काम करणारा असा इतर कामगारातला एक कामगार. कधीही ड्रेनेज, गटर तुंबले कि याला सांगायचे येऊन ते काम एक रुपया न मागता करुन जाणार. तर १० - १२ दिवस एकदम शांत असणारा चौधरी सकाळ पासूनच देशी लावून आहे हे समजले आणि मी सुध्दा त्या ५० रूपयावर त्याचा हक्कच आहे असे समजून त्याला ते दिले आणि सहज विचारले
" चौधरी गेले १५ दिवस पिलेला दिसला नाहीस मला वाटले दारु सोडली होती कि काय ?"
त्यावर चौधरी फ़क्त हसला आणि मला म्हणाला " अण्णा चल चहा पाज " आता आम्ही दोघे चहच्या टपरिवर गेलो आणि दोन चहा सांगितले.
चहा आल्यावर एका कोपर्यात आम्ही चहा पिण्यास उभे राहिलो.मी चौधरिकडे पाहिले मग त्याला मी विचारलेला प्रश्न आठवल्यासारखा करत तो बोलू लागला....
" अण्णा गणपती येण्याच्या २-३ अगोदर पासून कधी नाही ते माझ्या मंडळीने सर्व ताण तणाव विसरून गणपतीची तयारी साठी घराची साफसफाई करायला सुरुवात केली आता अण्णा माझे घर तू पाहिले आहेस. घरभाडे परवडत नाही म्हणून कमी भाड़े असलेल्या जुन्या खोलीत आम्ही राहत आहे. ४०-४५ वर्षापूर्वीच्या त्या चाळीतल्या खोलीला मातीच्या भिंती असून खाली असलेली फरशी सुध्दा कोठे कोठे उखडली आहे. पण झोपडपट्टीत राहण्यापेक्षा आम्ही इथे राहतोय. तर त्या खोलीत तीची ती स्वच्छता राखण्याची धडपड पै-पै वाचवुन स्वतःसाठी काही न घेता सजावटी साठी छोट्या छोट्या वस्तुंची सुरु असलेली खरेदी तर कधी आवडलेली वस्तु परवडत नाही म्हणून पडलेला चेहरा थोड्याच वेळात हसरा ठेवण्यासाठी केलेली कसरत मी पहात होतो.
घरात रोज मला बडबड करणारी वादाचे विषय टाळत होती.मग मलाच कसेतरी वाटू लागले आणि मी पिणे थांबवले."
यावर मी म्हणालो " अरे मग दारु कायमचीच सोडायची होती."
यावर हसत तो बोलला " अण्णा,अरे तुंबलेल्या एखाद्या चेंबर किंवा नाल्या पासून जाताना नाकावर रुमाल लावणारे तुम्ही कधी त्या ठिकाणी फक्त ५-१० मिनिट थांबून दाखवा आणि मग मला सांग. अरे गटर,ड्रेनेज का ब्लॉक होतात याचा कधी विचार केलास का? त्या मध्ये प्लास्टिक,शिल्लक भाज्या,कचरा आणि अक्षरशः मासिक पाळीत वापरले पैड्स टाकले जातात आणि चोक अप झाले कि आम्हाला बोलावले जाते. आता तूच सांग आम्ही काय माणसे नाही का? आम्हाला त्रास होत नाही का? यांनी केलेल्या केलेल्या छोट्या छोट्या चुका आणि शिक्षा मात्र आम्हाला असते.नको वाटते पण नजरे समोर बायका पोरांचे चेहरे येतात आणि आम्ही त्या घाणी मध्ये उतरतो. अण्णा अरे तहान लागली तर प्यायला पाणी सुध्दा देत नाहित. काही ठिकाणी तर आम्ही जेवायला बसलो तर वॉचमन कड़े शिळे अन्न आमच्यासाठी पाठवून देतात. आम्ही काय भिकारी आहोत का?"
मग राग येतो त्या देवाचा नाही आम्ही काही जण तर देवच मानत नाही. नेहमी असेच अनुभव येतात मग शिणलेलो,थकलेलो वैतागलेलो आम्ही दारुच्या गुत्याकड़े वळतो.पिउन घरी गेलो कि घरात रोजची कटकट ठरलेलीच असते पण ह्या गणपतीच्या दिवसात बायको,मुले सगळा ताण तणाव,कटकट विसरून आनंदात असतात. मग माझी मलाच लाज वाटते आणि मग मी दारु बंद करतो.घरातले सर्व खुश पाहुन मी ही खुश असतो."
थोड़ा वेळ आम्ही दोघेही शांत होतो.असेच काही क्षण शांततेत गेल्यावर मी त्याचा निरोप घेतला.
आज संध्याकाळी काही आस्तिक व नास्तिक मंडळीचे गणपती वरील पोस्ट पाहिल्यावर मला सहज चौधरीचे गटर का चोक अप होते? त्यांना एखाद्या सोसायटित किंवा एखाद्या गल्लीत कशी वागणूक दिली जाते ते बोलणे आठवले.
आणि क्षणात हि मंडळी आस्तिक सुध्दा असतील आणि नास्तिक सुध्दा असतील असे जाणवले.
देव आहे असे मानतात म्हणून आस्तिकवादी आणि देव नाही आसव मानतात म्हणून नास्तिकवादी असणारे या "आस्तिकवादी - नास्तिकवादी" असण्यापेक्षा चौधरी आणि त्याच्या सारख्या माणसांना माणूस मानणारे त्यांना पाणी देणारे, एकवेळ देऊ नका पण शीळे अन्न न देणारे.
अहो सर्वात महत्वाचे सार्वजनिक स्वच्छता पाळणारे "मानवतावादी" कधी होणार?
खरेच सांगा आपण "मानवतावादी" कधी होणार?
प्रतिक्रिया
28 Sep 2015 - 9:21 pm | लालगरूड
+1
28 Sep 2015 - 9:37 pm | मित्रहो
लोकांना त्यांचीच घाण साफ करनाऱ्यांची लाज वाटते
28 Sep 2015 - 9:38 pm | एस
विचार करायला लावणारा लेख. 'कोर्ट' पाहतानाही मयत सफाई कामगाराच्या पत्नीची उलटतपासणी चालू असते तेव्हाच्या प्रसंगाची आठवण झाली.
28 Sep 2015 - 10:10 pm | बहुगुणी
पुन्हा-पुन्हा भूतकाळातले निरर्थक, अनुत्पादक वाद उकरून काढून एकमेकांना ते आणि त्यावरील वांझोट्या चर्चा एकमेकांना फॉरवर्ड करीत बसण्यापेक्षा वर्तमानकाळातील, मानवाचं अस्तित्वच धोक्यात आणणार्या गलिच्छ सवयी आपण टाळल्या तरी पुरेसे 'मानवतावादी' होऊ हे अगदी खरं आहे.
29 Sep 2015 - 5:08 pm | नाखु
ज्ञानेश्वरी ई. साफ कारायची का ते नंतर आधि घरपरिसर-पेठ-गाव-शहर-राज्य आतून बाहेरून साफ करू म्हणजे कुठलाही विदा-धुंडाळावा लागणार नाही. आणि निवडक "मिपा-लेख" वाचतानाही नाकाला रुमाल लावावा लागणार नाही !
"दु"कानाने बहिरा मुका परी नाही
नाखु
28 Sep 2015 - 10:28 pm | भिंगरी
++११
29 Sep 2015 - 7:22 am | संजय पाटिल
+११११
29 Sep 2015 - 7:30 am | मांत्रिक
:(
विचार करायला लावणारे लेखन!!!
29 Sep 2015 - 7:41 am | वगिश
+1
29 Sep 2015 - 10:23 am | तर्राट जोकर
+१००००