वजन कमी करणारा आहार

बाबा पाटील's picture
बाबा पाटील in जनातलं, मनातलं
4 Mar 2015 - 8:48 pm

वजन कमी करणारा आहार
१) सकाळी १ कप चहा/ काफी/ दुध (साय काधलेले )साखर ( शुगर फ्री) कमी घालुन घेणे.
२) सकाळचा नाश्ताः ९ ते ११ वाजता १ गव्हाचा फुलका, १ चहाचा चमचा, साजुक तुप, २ चहाचे चमचे कोण्तीही चटणी.
३) दुपारचे जेवण ; जेवणपुर्वी १ ते २ ग्लास वरणाचे नुसते पाणी/ कोमट पाणी प्यावे,३ गव्हाचे फुलके, १ नैवेद्याची वाटी कोणतीही भाजी (बटाटा सोडुन),१ फुलपात्र वरणाच्यावरील पाणी, डाळ अजीबात नको,काकडी ,गाजर,कोवळा मुळा, टोमटो, बीट, कांधाची पात,सॅलेड पान , कोबीची कोंशिबीर वाटेल तेवढे खाल्ले तरी चालते भात बंद करावा.
४) संध्याकाळ नाश्ताः४ वाजता १ कप चहा /कोफी /दुध (साय काडुन) कमी साखर (शुगर फ्री) घालुन घेणे.
५) रात्रीचे जेवण ; दुपार प्रमाणेच घ्यावे.
६) जेवणात गोड पदार्थचा समावश करु नये. तसेच चिंकु, केळी, द्राक्ष,आंबा ही फळे सोडुन बाकी सर्व फळे खावीत.चाकलेट्स बेकरी प्राडक्टस ,शितपेय, फास्ट फुड, होटेलींग, मिठाई बंद करावी.
७) योग्य आहाराला योग्य व्यायाम व आयुवेदीक औषधीची जोड दिल्यास दर आढवडयाला एक ते दिड किलो वजन कमी होते व पुन्हा वाढत नाही तसेच शरीराचे कु्ठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही.
८)जेवणात मिठ कमी घ्यावे.

समाजजीवनमानराहणीऔषधोपचारलेखअनुभवशिफारससल्ला

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

4 Mar 2015 - 8:53 pm | राघवेंद्र

खुप सोप्या शब्दात माहिती दिली.
योग्य आहाराला योग्य व्यायाम हा कसा ठरवायचा ?

तुषार काळभोर's picture

4 Mar 2015 - 8:53 pm | तुषार काळभोर

यातले काही उपाय पाळून जानेवारी २०१३ ते मार्च २०१४ १०किलो कमी केले होते. (९२ ते ८२ ; उंची १८२सेमी)
व्यायामाची जोड नव्हती. आता ८३-८५ स्थिर आहे.

७५ पर्यंत जायची मनाची इच्छा आहे, पण शरीराची नाही ;)

प्रज्ञाताई's picture

4 Mar 2015 - 8:57 pm | प्रज्ञाताई

"तसेच चिंकु, केळी, द्राक्ष,आंबा ही फळे सोडुन बाकी सर्व फळे खावीत"

बाबाबा! असं काही नसतं हो.
वेट लॉस करायचा असला तरी ही फळं सुद्धा तुम्ही खाऊ शकता.
फक्त कोणत्या वेळी आणि किती हे महत्वाचे..

बाबा पाटील's picture

4 Mar 2015 - 9:00 pm | बाबा पाटील

ही फळे वजण वाढवण्याकरिता उपयुक्त आहेत.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Mar 2015 - 9:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

+१

बाबा पाटील's picture

4 Mar 2015 - 8:58 pm | बाबा पाटील

घाम निघेल इतका आणी स्वतःला सहन होइल इतका जो आवडतो तो व्यायाम प्रकार करावा,जसे चालणे,पोहणे,पळणे,खेळणे.इत्यादी.

जेपी's picture

4 Mar 2015 - 9:11 pm | जेपी

हम्म...

१ फुलपात्र वरणाच्यावरील पाणी, डाळ अजीबात नको

काही विशेष कारण?

माझीही शॅम्पेन's picture

4 Mar 2015 - 9:43 pm | माझीही शॅम्पेन

अगदि

+१

चांगला लेख आहे पण प्रोटीन्स कुठून मिळणार ?

श्रीरंग_जोशी's picture

4 Mar 2015 - 9:26 pm | श्रीरंग_जोशी

या उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद.

मी गेल्या दिड महिन्यापासून आहारातील साखरेचा समावेश १००% थांबवला आहे. चहा व कॉफीमध्ये साखर घालणे दोन वर्षांपूर्वीच थांबवले होते.

वजनाचा फारसा प्रश्न नसला तरी ठरवून कमी करण्याची वेळ न येऊ देणे हे एक उद्दीष्ट आहे. दुसरे महत्वाचे उद्दीष्ट म्हणजे कॉलेस्टरॉलचे प्रमाण कमी करणे.

त्यासाठी बेकरी उत्पादने व तळलेले पदार्थ खाणे जवळ जवळ बंद केले आहे (सदर पदार्थ महिन्यातून एखाद्यावेळेस थोडेसे खातो).

नियमीत व्यायाम करणे शक्य नसल्याने हापिसातील जिन्याचा वापर ५ मजले चढून जाण्यासाठी नियमीतपणे करतोय.

साखरेबाबत असे मार्गदर्शन मिळाले आहे की, कृत्रिम साखर शरीराला अजिबात आवश्यक नसते. शरीराला ग्लुकोज हवे असते जे शरीर आपल्या आहारातील इतर पदार्थांपासून बनवते अन फळांमधील नैसर्गिक ग्लुकोज शरीराला उपयुक्त असते.

ज्यांना गोड पदार्थ खाणे थांबवणे अवघड आहे पण गरजेचेही आहे ते साखरेऐवजी शुभ्र न केलेल्या गुळाचा वापर करू शकतात.

टीप: मी या बाबतीतला कुठल्याही अंगाने तज्ञ नाही. माहिती म्हणून मी करत असलेल्या प्रयोगांबाबत लिहिले आहे.

संदीप डांगे's picture

4 Mar 2015 - 11:27 pm | संदीप डांगे

तुम्हाला मधुमेह वैगेरेचा त्रास नसेल तर दिर्घकाळासाठी साखर अजिबात वर्ज्य करणे जरा चुकीचे वाटते. इतर अन्नघटकांतून मिळणारी साखर ही शरीराची तातडीची गरज भागवण्यास असमर्थ ठरते. मेंदूला जाणार्‍या रक्तात योग्य प्रमाणात साखर नसेल तर घेरी येणे, अस्वस्थ वाटणे असे प्रकार घडू शकतात आणि त्याचा दुरगामी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे साखर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बंद केली असेल तर ठिक आहे, अन्यथा आधी सल्ला घ्या.

स्वत:च्या आगाऊपणाने केलेले साखरेचे प्रयोग माझ्या अंगलट आले होते म्हणून अनुभवी सल्ला. बाकी रोजच्या आहारात कृत्रिम साखर २ चमचे पुरेसे. पाश्चात्त्य वैद्यांनी साखरेला बदनाम करण्याचे कारण त्यांच्या आहारात (फास्ट्फूड, केक्स, शितपेये) तिचा बेसुमार वापर. तेवढी काही साखर असलेले आपण भारतीय खात नाही.

श्रीरंग_जोशी's picture

4 Mar 2015 - 11:39 pm | श्रीरंग_जोशी

सुदैवाने मधुमेहाचा त्रास नाहीये. साखर पूर्ण बंद केल्यावर पहिले दोन तीन दिवस जरा वेगळे वाटले त्यानंतर शरीराला सवय झाली. आठवड्यातून पाच दिवस हापिसातल्या दुपारच्या जेवणात भरपूर फळे खात असतो. त्यातुनही ग्लुकोजचा पुरवठा होतोच. शीतपेये वगैरेंचे सेवन वर्षातून एकदोनदा करत असेन.

अर्थात हे प्रयोग म्हणूनच आहे. काही महिन्यांनी वैद्यकिय तपासण्या करणार आहे तेव्हा डॉक्टरांबरोबर चर्चा करीनच. तसेच क्वचित एखादे वेळेस साखरेचे पदार्थही खाणार आहेच जसे हापिसात कुणी स्वहस्ते बनवून आणलेला केक किंवा गोड पदार्थ खाण्याची संधी असेल तेव्हा.

तुमचा अनुभव लिहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Mar 2015 - 9:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान. पण, नुसत्या गव्हाच्या एका फुलक्यावर आणि दोन फुलक्यावर आपलं जमु शकत नाही.
मला तर वेड लागल्यासारखंच होईल. भुक खुप हावरटासारखी असते. आवर आवर म्हटलं तरी उरकत नाही.
डॉक्टर साहेब, सतत पोट भरल्याचा फिल आला पाहिजे, असं काही आहे का ?

पण, मी अनुभवलंय नियमित फिरणं आणि खेळ (ब्याडमिंटन) याने तुम्ही सुडौल होऊ शकता.
(पोटाचा घेर कमी होत नाही)

- दिलीप बिरुटे

मला तर वेड लागल्यासारखंच होईल. भुक खुप हावरटासारखी असते. आवर आवर म्हटलं तरी उरकत नाही.
डॉक्टर साहेब, सतत पोट भरल्याचा फिल आला पाहिजे, असं काही आहे का ?

खूप मजेशीर प्रतिसाद आहे. बराच वेळ हसलो. लेख पण सोपा व माहितीपूर्ण आहे.

अप्पा जोगळेकर's picture

4 Mar 2015 - 9:37 pm | अप्पा जोगळेकर

छान. रुग्णालयासाठी शुभेच्छा.

मनीषा's picture

4 Mar 2015 - 10:28 pm | मनीषा

"योग्य आहाराला योग्यं व्यायामाची जोड दिल्यास ... " हे महत्वाचे .
फक्तं आहार नियंत्रित करून अथवा कसली औषधे घेऊन वजन कमी होत नाही हे नक्की.

उत्तम सल्ल्यासाठी आभार !

वेल्लाभट's picture

4 Mar 2015 - 10:42 pm | वेल्लाभट

वर दिलेल्या प्रतिसादांतून अनेक ओळखीचे गैरसमज भेटले. ! :) छान !

सुबोध खरे's picture

4 Mar 2015 - 10:51 pm | सुबोध खरे

आय आणि व्यय याची सांगड घालणे महत्त्वाचे आहे.
एक कॅलरी म्हणजे एक कॅलरी. कशी आली आणि कशी गेली यापेक्षा खाल्लेल्या कॅलरी पेक्षा जाळलेल्या कॅलरी जास्त असतील तर वजन कमी होईल अन्यथा नाही. हे जर मूलतत्व विसरलात तर कितीही चांगला डॉक्टर किंवा आहार तज्ञ असेल तरी वजन कमी होणार नाही.

रेवती's picture

4 Mar 2015 - 10:51 pm | रेवती

क्र. २ आणि ८ व व्यायामाचा सल्ला भयंकर आवडलेत.
आभार.

आयुर्हित's picture

4 Mar 2015 - 10:52 pm | आयुर्हित

आधी शुगरफ्री किंवा तत्सम पदार्थामध्ये काय काय हानीकारक घटक आहत हे जाणून घ्या.
Artificial Sweeteners:Sugar free but not risk free

बाकी वरचा आहार म्हणजे फक्त (बेड रेस्ट सुचविलेल्या) आजारी माणसासाठी अत्यंत योग्य आहे.

अर्धवटराव's picture

4 Mar 2015 - 10:59 pm | अर्धवटराव

असा आहार घेणं आपल्याला (पक्षी मला स्वतःला) शक्य नाहि. त्यामुळे वजन कमि करण्याचा एक फॉर्म्युला वाया गेला म्हणायचा :(
इतर डायेट प्लॅन्सच्या तुलनेत यात काहि विसंगती आहेत. बाकी सगळे लोक्स न्याहारी एकदम हेव्ही करायला सांगतात आणि रात्रिचे जेवण दुपारच्या जेवणापेक्षा बरेच कमि. शिवार मोड आलेलं कडधान्य आणि प्रोटीन्सचा भरण अधिक असतो त्यात.

वजन कमी करणारा आहार हा आरोग्यदायी असतोच असे नाही.

तुमच्या आहारसुचवणीत प्रथिनांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. जी थोडीफार प्रथिने डाळींमधून मिळतील तिचेही फक्त पाणी प्यावे असे सांगितले आहे. असा आहार दीर्घकालीन वजननियंत्रणासाठी फारसा उपयोगी ठरेल असे वाटत नाही.

१ चमचा साजूक तूप वगळता इतर स्निग्ध पदार्थ नाहीत त्यामुळे निव्वळ पिष्टमय पदार्थ खाऊन भुकेले पोट कितपत शांत राहील याचीही शंका वाटते. इतके कमी स्निग्ध पदार्थसेवन शरीराला निश्चितच हानीकारक आहे.

बाकी शेंगदाणे, खोबरे, बदाम (वगैरे सुकामेवा) यांचा अजिबात अंतर्भाव नाही हेही खटकते आहे.

नगरीनिरंजन's picture

5 Mar 2015 - 4:57 am | नगरीनिरंजन

वजन कमी म्हणजे वजन काट्यावर आकडा कमी दिसला पाहिजे एवढ्याच उद्देशाने 'डिझाईन' केलेला आहार दिसतोय हा. याने वजन १०-१२ किलो झपाट्याने कमी होईल पण पुन्हा नेहमीचे जेवण चालू केले की उसळी मारुन पहिले पाढे पंचावन्न.
त्यापेक्षा दिवसातून चार-पाच वेळा पण भुकेपेक्षा कमी खाणे आणि व्यायाम करणे हा सल्ला मला पटतो.

चौकटराजा's picture

5 Mar 2015 - 8:52 am | चौकटराजा

त्यापेक्षा दिवसातून चार-पाच वेळा पण भुकेपेक्षा कमी खाणे आणि व्यायाम करणे हा सल्ला मला पटतो.
माझे ही असेच मत आहे.
पण व्यायामास वेळ मिळत नाही ही सबब बरी नव्हे. त्यासाठी पहाटे पाच वाजता उठले पाहिजे. वजन वाढणे हे अनेक बाबींवर अवलंबून आहे. जसे मानसिक ताण, व्यायामाचा अभाव , अतिगोड पदार्थ व फळे यांचे सेवन, अनुवांशिकता, काही आजार उदा. थायरॉईड चे विकार , रजोनिवृती , पुरूष त्यात भारतीय पुरूष असणे ई.

स्वप्नांची राणी's picture

5 Mar 2015 - 8:56 am | स्वप्नांची राणी

+१...

या आहारात प्रोटीन्स जवळ जवळ नाहितच. वजन नक्कीच कमी होईल, त्याबरोबरच स्टॅमिना आणि ईम्युनिटी पण.

प्रोटीन्स शरीराच्या चलन-वलनासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. हीमोग्लोबीन हे पण एक महत्त्वाचे प्रोटीनच आहे. यशिवाय रोगप्रतिकारशक्ती असे ज्याला म्हटले जाते त्या अन्टीबॉडीज ही प्रोटिन्सनेच बन्लेल्या असतात. चयापचय, पचनसंस्था आणी रक्तशर्करेची रक्तातील घनता या सगळ्या साठी प्रथिनं हा आवश्यक घटक असतो.

प्रथिनं ब्लड क्लॉटिंग साठीही आवश्यक असतात.

सातत्याने असा लो प्रोटिन आहार घेतला तर बी वर्गातील विटामीन्सची कमतरता निर्माण होते. आणि या सगळ्याचा परिणाम ईव्हेन्चुअली शरिराच्या ईम्युन सिस्टीम वर होतो.

आयुर्वेद रुग्णालयासाठी शुभेच्छा!!

नगरीनिरंजन's picture

6 Mar 2015 - 6:41 pm | नगरीनिरंजन

आयुर्वेद रुग्णालयासाठी शुभेच्छा

हा खवचटपणा इथे अनुचित आहे. शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्या धाग्यावर द्या.

स्वप्नांची राणी's picture

7 Mar 2015 - 3:11 pm | स्वप्नांची राणी

मी कुठे काय करायचं हे मला आणी संम ला ठरवू द्या...धन्यवाद!! आपलाही प्रतिसाद तसा निरर्थकच आहे ह्या धाग्यावर.

नगरीनिरंजन's picture

7 Mar 2015 - 3:27 pm | नगरीनिरंजन

धन्यवाद! :-)

कपिलमुनी's picture

10 Mar 2015 - 2:36 pm | कपिलमुनी

हा खवचटपणा इथे अनुचित आहे.

प्राची अश्विनी's picture

10 Mar 2015 - 1:19 pm | प्राची अश्विनी

+१
आयुर्वेद रुग्णालयासाठी शुभेच्छा!!

+१११११११११११११११अगदी सहमत!:):):):)

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Mar 2015 - 8:12 am | कैलासवासी सोन्याबापु

बाबा ,

अहो मी मीठ लैच कमी खातो (इतके की पंधरवड़ा अगोदर हातपाय दुखाया लागले म्हणुन डॉक्टर कड़े गेलो तर म्हणाला मीठ खा बीपी लो झाले आहे)

चिवड़ा लाडवं असले आइटम बी खात नाही च्या बी ग्रीन टी तो बी बिना एक कण साखर घालता तरीही वजन काही ८० च्या खाली येना !! मटन पण महिन्यात एक टाइम होते फ़क्त

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

5 Mar 2015 - 8:36 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ओ लष्करवालं कशापै चिंता करु र्‍हायले? लष्करवाल्या बाप्यानी कसं ध्ष्टपुष्ट पैजे...मी स्वतः कितीही आदळआपट केली तरी ८० च्या खाली येउ शकत नाही. सांगाडा जड आहे त्याला काय करणार... =))

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Mar 2015 - 10:07 am | कैलासवासी सोन्याबापु

कॅजॅ स्पैरो खरंय पण मेंनलॅंड ड्यूटी मधे जास्त सुटलो तर फुड वर डोंगरत लै त्रास व्हनार

श्रीरंग_जोशी's picture

5 Mar 2015 - 8:30 am | श्रीरंग_जोशी

वर लिहायचे राहिले.

एक महिन्यापासून मी नेहमीच्या तांदळापासून बनवलेल्या भाताऐवजी ब्राउन राइस वापरून बनवलेला भात खात आहे.

पिलीयन रायडर's picture

5 Mar 2015 - 11:18 am | पिलीयन रायडर

माझ्याम्ते आपले आईवडील साधारण पणे जे आणि ज्या ज्या वेळेला खात होते ते खावं.. सकाळी नाश्ता, दुपारी पोळी-भाजी-वरण-भात-कोशिंबीर-ताक वगैरे.. संध्याकाळी काहीतरी उगाच.. आणि रात्री खिचडी वगैरे हलकं जेवण..
आई अध्ये मध्ये इडली-डोसा, अळुवड्या, कधीतरी गोड बासुंदी, पुरण वगैरे करायची.. भेळ वगैरे पण घरीच व्हायची शक्यतो..
सगळंच पोटात जात होतं.. क्वचित बाहेर खायचो.. दणकुन खेळायचो.. आणि आईवडीलांनी कधी रॅटरेस मध्ये पळावलं नाही पण शिस्तीत अभ्यास करायची सवय लावली.. त्यानंतर जे मिळेल त्यात आनंदी!

साधारण हेच आपण करु शकलो (घरचं खाणं - व्यायाम - समाधानी आयुष्य) तर वजन आटोक्यात रहायला हरकत नाही असे मला वाटते.

मी जेवताना इतका विचार करुन.. चिकित्सा करुन.. म्हणजे थोडक्यात त्यातला आनंद मारुन खाऊ नाही शकत.. तसंही घरंच खाऊन कसलाच त्रास होत नसतो हे माझं ठाम मत आहे.. त्यामुळे डाएट वगैरेच्या फंदात सुखी माणसाने पडू नये..

बाबा पाटील's picture

5 Mar 2015 - 11:32 am | बाबा पाटील

तुलनात्मदृष्ट्या सद्य परिस्थीत स्व आरोग्याविषयी जागरुकता वाढिस लागली आहे.
वरील आहार हा फक्त सुरुवातीच्या काळास वजन कंट्रोल करण्यासाठी आहे,जेंव्हा पोटाचा गणपती झाला असेल तेंव्हाच.
एकदा पहिल्या दोन महिण्यात वजन ८-१० किलोने कमी झाले तुमच्या तुमच्या वैद्यांकडुन अथवा आहारच्या डॉक्टरांकडुन तुमच्या शरिरास पोषक आहार विचारकरुन घ्यावा.
काही आजारांमुळे भारवृद्धी असेल तर मात्र वैद्यकिय सल्ल्याशिवाय आहारात बदल करु नयेत.

मराठी_माणूस's picture

5 Mar 2015 - 12:26 pm | मराठी_माणूस

पोटाचा गणपती

ह्या बाबतीत एक असे ऐकले आहे की पोटाच्या स्नायुंचे टोनींग (आतड्यांना धरुन ठेवण्यांची क्षमता) बिघडले असेल तर पोट सुटलेले दिसते. ह्यावर काही उपाय आहे का ?

सुबोध खरे's picture

5 Mar 2015 - 12:52 pm | सुबोध खरे

पहिल्याने आडवे झोपून पहा कि पोट गरगरीत आहे( चरबीने भरलेले) कि सुरकुतलेले (बाळंतीणी सारखे) आणी आत जाते आहे.
पहिली परिस्थिती असेल तर पळवाट शोधण्यापेक्षा ताबडतोब आहारावर नियंत्रण आणी व्यायामाला सुरुवात करा.
दुसरी परिस्थिती असेल तर पोटाच्या व्यायामाला सुरुवात करा.

संदीप डांगे's picture

5 Mar 2015 - 1:10 pm | संदीप डांगे

डॉक्टरसाहेब, आडवे म्हणजे पाठीवर उताणे झोपून ना?

सुबोध खरे's picture

5 Mar 2015 - 1:15 pm | सुबोध खरे

होय साहेब

सुबोध खरे's picture

5 Mar 2015 - 1:17 pm | सुबोध खरे

त्यातून कुणाला शंका असेल तर माझ्या दवाखान्यात या पोटावरील चरबीच्या थराची जाडी सोनोग्राफीने मोजून मिळेल.
(ती सुद्धा मिपाकरांना फुकट). हि जाहिरात नाही

संदीप डांगे's picture

5 Mar 2015 - 3:18 pm | संदीप डांगे

अरेवा. असे पण अस्ते का? ऐकावे ते नवलच.

ऑफरसाठी धन्यवाद. भेटू जरूर.

सुबोध खरे's picture

5 Mar 2015 - 12:20 pm | सुबोध खरे

पोटाचा प्रश्न सुटला कि "सुटलेल्या" पोटाचा प्रश्न चालू होतो.
आमच्या माहितीतील एका आहारतज्ञाना एका विशाल महिलेने प्रश्न विचारला होता कि डॉक्टर तुम्ही हा सगळा डाएट लिहून दिला आहे हा जेवण अगोदर घ्यायचा कि जेवणानंतर?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Mar 2015 - 1:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> पोटाचा प्रश्न सुटला कि "सुटलेल्या" पोटाचा प्रश्न चालू होतो.

हो ना. मला तर मळलेल्या पिठाच्या उंड्यासारखं दोन्ही साईडने हातात चरबीचा उंडा धरता येतो. :(
डॉक्टर साहेब, काही तरी चांगला उपाय सुचवाच.

-दिलीप बिरुटे

कपिलमुनी's picture

5 Mar 2015 - 2:23 pm | कपिलमुनी

भरपूर चाला ;)

प्रकाश घाटपांडे's picture

5 Mar 2015 - 3:32 pm | प्रकाश घाटपांडे

आमच्या माहितीतील एका आहारतज्ञाना एका विशाल महिलेने प्रश्न विचारला होता कि डॉक्टर तुम्ही हा सगळा डाएट लिहून दिला आहे हा जेवण अगोदर घ्यायचा कि जेवणानंतर?

:))

रुस्तम's picture

5 Mar 2015 - 3:34 pm | रुस्तम

आमच्या माहितीतील एका आहारतज्ञाना एका विशाल महिलेने प्रश्न विचारला होता कि डॉक्टर तुम्ही हा सगळा डाएट लिहून दिला आहे हा जेवण अगोदर घ्यायचा कि जेवणानंतर?

=))

मनिमौ's picture

5 Mar 2015 - 2:37 pm | मनिमौ

पोटाचा घेर कमी करण्यासाठी पोहणं हा अतिशय उत्तम व्यायाम आहे.

ब़जरबट्टू's picture

5 Mar 2015 - 4:01 pm | ब़जरबट्टू

असे असते तर सगळे मासे "सुक्कट बोंबिल" असते पाण्यातून काढल्यावर... व देवमास्याने माणसाची शिकार केली असती चरबी मिळावी म्हणून.. :)

वरच्या आहार तक्त्यात भाजी फक्त एक नैवेद्याची वाटी भरून आणि वरणाचे फक्त पाणीच हे काही झेपले नाही. म्हणजे जे पोटात जायला पाहिजे ते जातच नाहीये.

नुसता तोंडावर (बोलणे आणि खाणे दोन्ही बाबतीत)ताबा ठेवून उपयोग नाही. वर्कआऊट हवाच असं 'मला' वाटतं!! नेहमीच्या व्यायामानंतर दोरीउड्यांचे (२००*३) असे सेट परिणामकारक ठरतात. सुरुवात २०*३ पासून करावी आणि रोज १० उड्या जास्त मारता येतीलशा बघाव्या. २०० कधी जायला लागतात ते आपलं आपल्यालाही कळत नाही.

बॅटमॅन's picture

5 Mar 2015 - 3:49 pm | बॅटमॅन

दोरीउड्या लय भारी. तरी चालणे वा पळणे हे त्यापेक्षाही सरस असं आपलं मला वाटतं.

सामान्य वाचक's picture

6 Mar 2015 - 6:22 pm | सामान्य वाचक

पळणे आणि पोहणे हे सगळ्यात जास्त परिणामकारक व्यायाम प्रकार आहेत
१० १५ मित्र मैत्रिणी + स्वतः च्या उदाहरणावरून हा निष्कर्ष काढला आहे

अत्रुप्त आत्मा's picture

6 Mar 2015 - 7:30 pm | अत्रुप्त आत्मा

@ असं आपलं
मला वाटतं.>>> असच 'मलाही' वाटतं!

असंका's picture

9 Mar 2015 - 11:52 am | असंका

पळणं अशक्य असतं ...गुडघे दुखतात ,झिजतात.

मॅराथॉन सांगत नाय ओ कुणी. रोज १ किमी बास आहे.

नाय खरंय तुमचं. पळण्यामुळे जसं वजन कमी झालं होतं तसं इतर कशानेच कधी झालं नव्हतं माझंही.

आपण या क्षेत्रातले तज्ज्ञ आहात काय? रोज एक किमी पळल्याने गुडघ्यांना काहीही धोका नाही हे खरं आहे का? (जेन्युइन शंका....या क्षेत्रातील कुणाही व्यावसायिकाने सांगावे..)

मी कसला तज्ञ? पण मला वाटतं की तसा धोका नसावा.

प्रभाकर पेठकर's picture

10 Mar 2015 - 10:13 am | प्रभाकर पेठकर

वजन जास्त असेल (१००+) तर धावण्याने गुडघ्यांवर नक्कीच विपरीत परिणाम होतो. हे माझे नाही अस्थितज्ञांचे मत आहे. त्यापेक्षा नियमितपने द्रूतगतीने चालणे + पोहणे + आहारावर योग्य नियंत्रण ह्याने वजन कमी होते आणि गुडघ्याचे कार्टिलेजीस झिजण्याची शक्यताही नसते.

हो ना. आणि ती दुखणी फारच चिकट. शेवटी सरळ चार पाच लाख घालून गुडघे रीप्लेस करायचे. त्यापेक्षा चालणे ठीक. फार फायदा नाही तरी फार तोटाही नाही.

ब़जरबट्टू's picture

5 Mar 2015 - 4:23 pm | ब़जरबट्टू

साधारण एका व्यक्तीला दिवसाला अंदाजे २००० कॅलरीज हव्या असतात, वजन कमी करायचे म्हणून १६५० गृहीत धरतो. ,

आता बाबासाहेबांनी दिलेला आहार बघुया :-

कॅलरीज :- www.livestrong.com आधारावर :-

१) सकाळी १ कप चहा/ काफी/ दुध (साय काधलेले )साखर ( शुगर फ्री) कमी घालुन घेणे. :- ६० कॅ,
२) सकाळचा नाश्ताः ९ ते ११ वाजता १ गव्हाचा फुलका - ७२ कॅ, १ चहाचा चमचा, साजुक तुप,- १२० कॅ, २ चहाचे चमचे कोण्तीही चटणी.- १५० कॅ (नारळाची)
३) दुपारचे जेवण ; जेवणपुर्वी १ ते २ ग्लास वरणाचे नुसते पाणी/ कोमट पाणी प्यावे - ५० कॅ ,३ गव्हाचे फुलके - २१६ कॅ , १ नैवेद्याची वाटी कोणतीही भाजी (बटाटा सोडुन) - १३५ कॅ ,१ फुलपात्र वरणाच्यावरील पाणी, डाळ अजीबात नको - ५० कॅ, काकडी ,गाजर,कोवळा मुळा, टोमटो, बीट, कांधाची पात,सॅलेड पान , कोबीची कोंशिबीर वाटेल तेवढे खाल्ले तरी चालते (?) - १५० कॅ, भात बंद करावा. = अंदाजे ६०० कॅ
४) संध्याकाळ नाश्ताः४ वाजता १ कप चहा /कोफी /दुध (साय काडुन) कमी साखर (शुगर फ्री) घालुन घेणे. - ६० कॅ,
५) रात्रीचे जेवण ; दुपार प्रमाणेच घ्यावे. - अंदाजे ६०० कॅ
६) जेवणात गोड पदार्थचा समावश करु नये. तसेच चिंकु, केळी, द्राक्ष,आंबा ही फळे सोडुन बाकी सर्व फळे खावीत.चाकलेट्स बेकरी प्राडक्टस ,शितपेय, फास्ट फुड, होटेलींग, मिठाई बंद करावी.
७) योग्य आहाराला योग्य व्यायाम व आयुवेदीक औषधीची जोड दिल्यास दर आढवडयाला एक ते दिड किलो वजन कमी होते व पुन्हा वाढत नाही तसेच शरीराचे कु्ठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही. - (-) २०० कॅ ( दररोज २ किमी धावणे )
८)जेवणात मिठ कमी घ्यावे.- बरोबर

सगळे मिळुन दिवसाला फक्त १४५० कॅलरीज येतील, कदाचित कमीच, ते सुध्दा मी किमान घेतलेय . वर यामध्ये कार्बोदके, प्राथिने व वसा ? ( Carb, Protein, Fat ) संतुलन नाही . Protein इतके कमी घेतल्यास वजन तर कमी होईल, पण ते फक्त मसल्स मास असेल, म्हणजे चरबी जैसे थे. वर शरीर धड खायला भेटत नाहीये म्हणून सुस्त होईल. :)

माझ्या आजीने दिलेल्या काही हेल्थ-टीप्स इथे देते. मी या सल्ल्यानुसार गेली ७वर्षे माझं वजन कायम राखण्यात यश मिळवलं आहे (उंची १६५सेमी, वजन ५५).

दिवसाचा आहार रिव्हर्स पिरॅमिड सारखा असावा
रिव्हर्स पिरॅमिड म्हणजे - दिवसाच्या सुरूवातीला सर्वात जास्त आहार घ्यावा म्हणजे हेवी नाश्ता, दुपारचं जेवण त्यामानाने कमी आणि रात्रीचं जेवण त्याहूनही कमी.

ह्या तिनही आहारांमधे तळलेल्या पदार्थांचं प्रमाण कमीत-कमी असावं, नसल्यास उत्तम.
१) हिरव्या पालेभाज्या, शक्यतो घट्ट वरण (तुरडाळ,मूगडाळ) यांचं प्रत्येकी १ वाटी प्रमाण आवश्यकच.
२) ह्याचबरोबर बीटरूट, गाजर, काकडी, मुळा ह्यापैकी सर्व किंवा ऋतूमानानुसार उपलब्ध असलेले सॅलड निदान एक वाटी असावे.
३) पोळी/ भाकरी आवडीनुसार पण प्रमाण शक्यतो भाजीच्या मानाने कमी.म्हणजे जर १ वाटी भाजी असेल आणि नेहमी तुम्ही त्यासोबत ३ पोळ्या जेवत असाल तर १ पोळी कमी करा.

४) फलाहार शक्यतो सकाळी न्याहारीसोबत किंवा दुपारच्या जेवणानंतर अर्ध्या तासानंतर करावा, शक्यतो संध्याकाळची फळे खाणं टाळा.

५) चहा, कॉफी चं प्रमाण कमीतकमी १ आणि जास्तीतजास्त २ कप दिवसाला असं ठेवावं.

६) भूक लागली पण खायला वेळ नाही अशावेळेस चहा, कॉफी घेऊन भूक मारू नका त्यामुळे शरीराची हानी होऊ शकते ( कित्येक वेळा अ‍ॅसिडीटीचा त्रास ह्यामुळे सुरू होऊ शकतो ). ह्यावरती उपाय म्हणून मूठभर शेंगदाणे-गुळ खावा किंवा दाण्याची चिक्की खावी. सुकामेवा आवडत आणि परवडत असल्यास तो खाल्ला तरी उत्तम. सुकामेव्यामधे शक्यतो काजू आणि पिस्ते यांचा वापर करू नये. सुके अंजीर, काळ्या मनूका, बदाम (पण प्रमाणात), अक्रोड यांचा समावेश जास्त असावा.

७) जर चिवडा,शेव असे चटपटीत पदार्थ खायची इच्छा रोजच होत असेल तर त्याला पर्यात म्हणून बाजारात तयार मिळणा-या ज्वारी, बाजरीच्या लाह्या, गव्हाचे तिखट-मीठ लावलेले मुरमुरे असे पदार्थ खावेत. ह्यामुळे शरीरासाठी हानिकारक मैदा जाणार नाही.

८) उपवासाच्या दिवशी साबुदाणा हा पदार्थ अजिबात खाऊ नये. शक्यतो फलाहार सेवन करावा पण शक्य नसल्यास वरईचे तांदूळ खावे.

प्रतिसाद वाचुन भुख लागली..

प्रतिसाद वाचुन भुख लागली..

भुख लागणं थांबून भूक लागेल तेव्हा काहीतरी खाऊन घ्या!

चौकटराजा's picture

5 Mar 2015 - 7:19 pm | चौकटराजा

मग मुवि ला कोन्टॅक्ट करा..... कट्टा ठरवा !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

विटेकर's picture

5 Mar 2015 - 5:14 pm | विटेकर

डॉक्टर साहेब,
मी १० दिवस नर्मदेवर परिक्रमेला गेलो तेव्हा एकूण १७७ किमी चाललो. म्हणजे रोज अंदाजे १७ किमी.
या दहा दिवसात माझे वजन ७ किलो कमी झाले ( ९४ पासून ८७ झाले) पण पुढच्या एका महिन्यात ब्याकलॉग भरून निघाला.
असे होऊ नये म्हणून मी परत आल्यावर आठवड्यात ५ दिवस रोज ५ कि.मी.चालतो. पण वाढलेले वजन आता अजिबात कमी होत नाही
प्रश्न १ - फक्त चालण्याने ( आहार तोच ठेऊन ) खरेच वजन कमी होते का ?
प्रह्न २- माझा असा समज झाला आहे की व्यायाम बेतास बात केला तरी चालेल पण खाण्यावर स्ट्रीक्ट कन्ट्रोल असायला हवा... कारण नर्मदेवर जेव्हा वजन कमी झाले तेव्हा चालणे ही भरपूर असे आणि तशी खाण्याची आबाळ होत असे.
प्रशन ३ - वजन कमी होण्यासाठी नेमके किती किमी चालायला हवे ( आहार आहे तेवढाच ठेऊन )
प्रश्न ४- ताशी किती किलोमिटर चालणे आणि किती वेळ चालणे हे व्यायाम म्हणून ठीक राहील.

नक्की काय ? खाणे की चालणे की दोन्ही की दोन्ही नाही ??

बाबा पाटील's picture

5 Mar 2015 - 7:10 pm | बाबा पाटील

जवळ पासच्या डॉक्टरांचा सल्ला घेवुन डायट ,व्यायाम व उपचार ठरवा.

अनिरुद्ध.वैद्य's picture

23 Jul 2015 - 1:02 pm | अनिरुद्ध.वैद्य

मी मध्ये काही वाचले होते त्याचा सारांश काहीप्रमाणात लागू पडेल … अर्थात हे माझे मत आहे … आणि मी काही ह्यातला तज्ञ नाही :)

चालणे, फिरणे प्रकार कार्डीओ व्हस्क्युलर प्रकारात मोडतो. हे व्यायाम आपल हृदय मजबूत करत असत. जर हे व्यायामप्रकार वजन कमी करण्यासाठी करायचे असतील तर आपण किती वेळ व्यायाम करतो आणि किती तीव्रतेने करतो ते महत्वाचे असते.

जेव्हा चालणे फिरणे आपण सुरु करतो तेव्हा सगळ्यांच वजन कमी व्हायला सुरुवात होते. साधारण ३ ४ व्यवस्थित वजन कमी होत. पण नंतर हळू हळू लक्षात येत की वजन कमी होतच नाही आहे. मग अजून जास्त चालायला सुरवात होते, वजन परत थोडसंच कमी होत पण नंतर काहीही फरक पडत नाही.

जवळपास सगळ्यांनीच असे अनुभवलेले असते.

ह्याच मुख्य कारण व्यायामाची तीव्रता आपण वाढवत नाही. फिरायला सुरुवात केली की हृदयाला सवय होई पर्यंत वजन कमी होत. एकदा का सवय झाली की पुन्हा वजन कमी होण थांबत. सबब, सतत तीव्रता वाढवत न्यावी लागते.

सुरुवातीला चालणे, मग जोरयात चालणे, हळू पळणे, व्यवस्थित वेगाने धावणे अशा स्टेप्समध्ये तीव्रता वाढवत गेल्यास फरक नक्कीच आणि भरपूर दिसेल. पण एकाच स्पीडनी भरपूर वेळ चालत राहिलात तर जास्त फरक पडणार नाही.

तुम्ही नर्मदा परिक्रमेत रोज जवळपास १७ - १८ किमी चाललात. त्यामुळे तुमची क्षमता बऱ्यापैकी वाढली. पण नंतर त्या क्षमतेच्या तुलनेत कमी तीव्रतेचा व्यायाम करत राहिलात. म्हणून वजन काही कमी झाले नाही. उलट कमी झालेले वाढले, म्हणजे वॉटर लॉस भरून निघाला आणि नंतर जो वेट लॉस झाला तोही काही प्रमाणात भरून निघाला असेल.

प्रभाकर पेठकर's picture

5 Mar 2015 - 5:37 pm | प्रभाकर पेठकर

वजन कमी करणारा आहार
१) सकाळी १ कप चहा/ काफी/ दुध (साय काधलेले )साखर ( शुगर फ्री) कमी घालुन घेणे. - २ ते ३ बिनसाखरेचा चहा होतो.
२) सकाळचा नाश्ताः ९ ते ११ वाजता १ गव्हाचा फुलका, १ चहाचा चमचा, साजुक तुप, २ चहाचे चमचे कोण्तीही चटणी. - १ प्लेट इडली किंवा पोहे किंवा सांजा किंवा उपमा असा असतो.
३) दुपारचे जेवण ; जेवणपुर्वी १ ते २ ग्लास वरणाचे नुसते पाणी/ कोमट पाणी प्यावे,३ गव्हाचे फुलके, १ नैवेद्याची वाटी कोणतीही भाजी (बटाटा सोडुन),१ फुलपात्र वरणाच्यावरील पाणी, डाळ अजीबात नको,काकडी ,गाजर,कोवळा मुळा, टोमटो, बीट, कांधाची पात,सॅलेड पान , कोबीची कोंशिबीर वाटेल तेवढे खाल्ले तरी चालते भात बंद करावा. - २ फुलके, भाजी, आम
टी, ताक असे असते दुपारचे जेवण. भात नसतो

४) संध्याकाळ नाश्ताः४ वाजता १ कप चहा /कोफी /दुध (साय काडुन) कमी साखर (शुगर फ्री) घालुन घेणे. - १ कप चहा बिना साखर. दुध बदलावे लागेल.,
५) रात्रीचे जेवण ; दुपार प्रमाणेच घ्यावे. - २ फुलके, भाजी.
६) जेवणात गोड पदार्थचा समावश करु नये. तसेच चिंकु, केळी, द्राक्ष,आंबा ही फळे सोडुन बाकी सर्व फळे खावीत.चाकलेट्स बेकरी प्राडक्टस ,शितपेय, फास्ट फुड, होटेलींग, मिठाई बंद करावी. - ह्यापैकी कसली सवय नाही.
७) योग्य आहाराला योग्य व्यायाम व आयुवेदीक औषधीची जोड दिल्यास दर आढवडयाला एक ते दिड किलो वजन कमी होते व पुन्हा वाढत नाही तसेच शरीराचे कु्ठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही. - रोज ४ किमी चालतो (आठवड्यात १-२ दांड्या होतात.)
८)जेवणात मिठ कमी घ्यावे. - कमी असतं शिवाय वरून घेत नाही.

ह्या व्यतिरिक्त उकडलेल्या अंड्यातील पांढरे, भाजलेले शेंगदाणे, आठवड्यातून २ पेग व्हिस्की (कंपनी असेल तर) उकडलेले पांढरे चणे. महिन्यातील १ - २ दिवस नो डाएट.

वय ६० वर्षे आणि वजन ११७ किलो.

वजन कमी करण्याचे अपयशी प्रयत्न चालू आहेत.

वेळ मिळाला तर भेटुन जा. डिटेल केस स्टडी करुन उपाय करुयात.

प्रभाकर पेठकर's picture

7 Mar 2015 - 3:22 pm | प्रभाकर पेठकर

नक्कीच भेटेन.

चौकटराजा's picture

5 Mar 2015 - 7:23 pm | चौकटराजा

एकदम वजन कमी करण्याचे अपरात्री प्रयत्न चालू आहेत असे वाचले.

प्रभाकर पेठकर's picture

7 Mar 2015 - 3:25 pm | प्रभाकर पेठकर

वय वर्षे ६० वाचले नाही का?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Mar 2015 - 12:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कुंभ रास का हो तुमची माझ्यासारखी?

प्रभाकर पेठकर's picture

7 Mar 2015 - 3:26 pm | प्रभाकर पेठकर

चंद्रराशी 'कर्क'.

स्वप्नांची राणी's picture

5 Mar 2015 - 6:57 pm | स्वप्नांची राणी

वय ६० वर्षे आणि वजन ११७ किलो....पण उंची किती आहे..??

प्रभाकर पेठकर's picture

7 Mar 2015 - 3:28 pm | प्रभाकर पेठकर

पूर्वी ६ फूट १ इंच होती.
आता कौलं उडाली आहेत, त्यामुळे ६ फूट फक्त.

मनिमौ's picture

6 Mar 2015 - 6:32 pm | मनिमौ

त्याच पाण्यात whale पण राहतात जे हत्ती च्या तिपटीने मोठे असतात हे आपण विसरलेले दिसता. प्रतिसाद द्यायचा म्हणून काहीही लिहीत जाऊ नका

ब़जरबट्टू's picture

10 Mar 2015 - 8:24 am | ब़जरबट्टू

म्याव... :)

ज्योति अळवणी's picture

7 Mar 2015 - 5:00 pm | ज्योति अळवणी

रोज चालण्यासारखा व्यायाम नाही. किमान 1 तास चालण्याने वजन कमी होण्यास आणि मेंटेन होण्यास खूप उपयोग होतो.

विजयकुमार भवारि's picture

8 Mar 2015 - 8:59 pm | विजयकुमार भवारि

आपण त्यांच्या समान व्हावे !...

स्पा's picture

9 Mar 2015 - 11:30 am | स्पा

=))

रोचक चर्चा

-सडसडीत (स्पा)

श्रीरंग_जोशी's picture

9 Mar 2015 - 5:46 pm | श्रीरंग_जोशी

स्पावड्या मित्रा, काही वर्षांपूर्वी मी पण असाच हसायचो डायट करणार्‍यांना. हा काय पालापाचोळा खाताय म्हणून हिणवायचो.

कधी आपण या किनार्‍यावरून त्या किनार्‍यावर पोचतो कलत बी नाय.

ते एका नव्या पक्षाचे लोक इंग्रजीमधला कोट बोलते ना, की पयले इग्नोर मारतील, मंग हसतील अन मंग शिरेसली घेतील. ह्ये बी तसंच हाय... ;-).

बॅटमॅन's picture

9 Mar 2015 - 5:57 pm | बॅटमॅन

कोणे एके काळी आमीबी अशेच सडसडीत होतो पण अता मात्र नाही. अता डाएट केले पाहिजे.

जोशी तुमच्या तोंडात सुगर फ्री पडो बघा

श्रीरंग_जोशी's picture

9 Mar 2015 - 7:10 pm | श्रीरंग_जोशी

:-)

नको नको त्यापेक्षा मध किंवा गोड फळे चालतील ;-) .

स्पंदना's picture

9 Mar 2015 - 12:56 pm | स्पंदना

खरं सांगू का बाबा पाटिल, या अश्या मॉड फॅडां ऐवजी तुम्ही आयुर्वेदवर आधारित काही सांगाल अशी अपेक्षा होती. जसे की जवसाचा आहारात समावेश, भाज्या फळं आणि मध यांचे उपयोग.
डाळीचे पाणी काही झेपले नाही, आणि स्किम मिल्क तर अजिबात नाही आवडत. डाळ ही प्रोटिनयुक्त असते. अन प्रोटिन आपल्या आहारात अतिशय गरजेचे. तसेच ताज्या भाज्या अन कोशिंबीरी, शेंगदाणे हे सगळच तुम्ही सुचवु शकत होता.

आनन्दा's picture

9 Mar 2015 - 5:29 pm | आनन्दा

माझे थोडे वेगळेच मत आहे.. काही गाड्या खूप फ्युएल एफिशिअंट असतात. त्यांना इंधन जपून वापरायची सवय असते. काही गाड्या मात्र उधळ्या असतात. तसंच मेटेबॉलिझमचे असते असे मला वाटते. आता मेटॅबॉलिझमला उधळपट्टीची सवय कशी लावायची ते मात्र मला माहीत नाही. त्यावर विचार सध्या चालू आहे.

वेल्लाभट's picture

9 Mar 2015 - 8:16 pm | वेल्लाभट

वजन ही गोष्ट 'फिटनेस' वरही 'भारी' पडते.... :) काय रे बाबा

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Mar 2015 - 9:00 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

लैचं वेळा वजन कमी केल्यानी अनुभवाचा सल्ला देतो.

रोज ५ मिनिट जॉगिंग, ५ मिनिट सायकलिंग आणि ५ मिनिट क्रॉसस्टेपर/ इलिप्टीइकल पासुन सुरुवात करायची. दररोज एक मिनिट प्रत्येक प्रकारात वाढवत जायचं. प्रत्येकी ३० मिनिट (९० मिनिट कार्डिओ रोज) प्रत्येकी पर्यंत साधारणपणे दिड महिन्यामधे पोहोचता येतं.
प्रत्येक व्यायामप्रकारानंतर इलेक्ट्राल वॉटरचे २-३ घोट घ्यायचे २ ते ५ मिनिट रिलॅक्स व्हायचं (बसायचं नाही. हळु हळु इकडुन तिकडे चालायचं. लागलेला दम कमी झाला की पुढच्या व्यायाम प्रकाराकडे वळायचं)

हा व्यायाम झाला की ५ मिनिट ब्रिदिंग एक्सरसाईजेस करायचे जेणेकरुन रक्तामधली ऑक्सीजनची पातळी योग्य प्रमाणात येते. गुढगेदुखी वाल्यांनी एवढा व्यायाम टाळा. त्यांनी त्याऐवजी रोज जलद चालणे (६ कि.मी. प्रतितास) हा व्यायामप्रकार दोन ४५ मिनिटांच्या सेशनमधे करुन बघा. ज्यांना दमा आणि फिट्स चा वगैरे त्रास आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय व्यायाम करु नये.

हे झालं की रोज एक किंवा दोन अवयवांच मसल ट्रेनिंग करायचं. साधारणपणे ८ व्यायामप्रकार प्रत्येकी ३ सेट १०-१२-१५ च्या रिपिटेशनप्रमाणे (आपली क्षमता लक्षात घेऊन आणि ट्रेनरच्या सल्ल्याने). दोन व्यायामप्रकार करणं मला जास्त फायदेशिर दिसतं.

आहार म्हणाल तर,

उठल्या उठल्या एक मोठ्ठा ग्लास गरम पाणी. व्यायाम सुरु करायच्या आधी एक ग्लास कच्च गायीचं दुध+ बोर्न्व्हिटा अर्धा चमचा साखर घालुन.
व्यायाम झाल्यावर
१ अंड+ कॉफी+ १ प्लेट मोड आलेली कडधान्य+ १ छोटी प्लेट उपमा, पोहे किंवा एक फळ
२. जेवणामधे ३ पोळ्या+ भाजी+ सॅलड आणि एक वाटी ताक हिंग घालुन (बैठं काम असणार्‍यांनी ३ ऐवजी २ पोळ्या) भात मी आवडत नाही म्हणुन खात नाही. प्यायला कोमट पाणी लिंबु पिळुन.
३. जेवण झाल्यावर तीन तास अजिबात काही खायचं नाही.
४. ३ तासानी परत एखादं फळ किंवा एखादी पोळी आणि चहा/ कॉफी वगैरे साखर घालुन.
५. नंतर परत २-३ तासाने अगदी नियमानी ३०० मि.ली. लिंबु पाणी साखर प्रमाणात घालुन
६. रात्रीचं जेवणं म्ह्णजे २ पोळ्या+ भाजी/ आमटी+ मोठी डिशभरुन परत कडधान्यं. जेवण झालं की परत कमीत कमी अर्धा तास चालुन येणं (आमच्याकडे वेगळं जायला लागत नाही, कुत्र्याला फिरवतानाचं ह्याच्याहुन जास्त चालणं होतं)

७. आठ ते साडेआठ तास झोप अनिवार्य. कमी झोपलात तर आदल्या दिवशीची झिज अजिबात भरुन येणार नाही आणि वजन कमी व्हायच्या ऐवजी अजुन मसल टिअर वगैरे दुष्परिणाम दिसतील.

एवढा व्यायाम मला झेपतो म्हणुन तुम्ही थेट करायला जाउ नका. हळु हळु सुरुवात करा भले एवढ्या व्यायामापर्यंत पोचायला २ वर्ष लागली तरी चालतील. आणि आठवड्यातुन एक दिवस आळशी व्हायचं. अजिबात व्यायाम करायचा नाही. पण तोंडावर मात्र नियंत्रण ठेवायचं. मद्यपान, धुम्रपान वगैरे करणार्‍या मंडळींनी हे दोन्ही प्रकार बंद करायचे. काही अडचण आल्यास नक्की विचारा.

(लोका सांगे ब्रम्हज्ञान...सद्ध्या व्यायाम बंद आहे) कॅजॅस्पॅ.