मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग १०) - ह्याच भागात आधीच्या भागांचे दुवे दिलेले आहेत.
---------------------------------------------------------
मंदिर/मशीद पुजणार्या पंडित, शेख ह्या सगळ्या तथाकथित धर्ममार्तंडांच्या पाखंडीपणाला थेट आव्हान देण्याची धमक दाखवणारे हरिवंशराय हे खरोखरच द्रष्टे म्हणायला हवेत. ज्या काळात हे त्यांनी लिहिले त्या काळाचा विचार करता ते विद्रोहीच ठरले ह्यात नवल नाही! धर्मातल्या कुठच्याही भोंदू चालीरीतींना आणि संस्कृतिरक्षकांच्या तथाकथित ओरड्याला यत्किंचितही भीक न घालता मधुशाला तिचे मायाजाल पसरवणारच आहे आणि ह्या जालात भलेभले अडकणार आहेत, ह्या मधुशालेच्या सामर्थ्याबद्दल आपल्याला किती खात्री आहे ह्याचा वस्तुपाठच पुढच्या रुबायातून बच्चन आपल्यापुढे मांडतात. चला प्राशन करुया पुढचा प्याला!
कोई भी हो शेख नमाज़ी या पंडित जपता माला,
बैर भाव चाहे जितना हो मदिरा से रखनेवाला,
एक बार बस मधुशाला के आगे से होकर निकले,
देखूँ कैसे थाम न लेती दामन उसका मधुशाला! ||५१||
और रसों में स्वाद तभी तक, दूर जभी तक है हाला,
इतरा लें सब पात्र न जब तक, आगे आता है प्याला,
कर लें पूजा शेख, पुजारी तब तक मस्जिद मन्दिर में
घूँघट का पट खोल न जब तक झाँक रही है मधुशाला ||५२||
आज करे परहेज़ जगत, पर, कल पीनी होगी हाला,
आज करे इन्कार जगत पर कल पीना होगा प्याला,
होने दो पैदा मद का महमूद जगत में कोई, फिर
जहाँ अभी हैं मंदिर मस्जिद वहाँ बनेगी मधुशाला ||५३||
यज्ञ अग्नि सी धधक रही है मधु की भटठी की ज्वाला,
ऋषि सा ध्यान लगा बैठा है हर मदिरा पीने वाला,
मुनि कन्याओं सी मधुघट ले फिरतीं साकीबालाएँ,
किसी तपोवन से क्या कम है मेरी पावन मधुशाला ||५४||
सोम सुरा पुरखे पीते थे, हम कहते उसको हाला,
द्रोणकलश जिसको कहते थे, आज वही मधुघट आला,
वेदिवहित यह रस्म न छोड़ो वेदों के ठेकेदारों,
युग युग से है पुजती आई नई नहीं है मधुशाला ||५५||
------------------------------------------
भावानुवाद
असो कुणीही शेख नमाजी, पंडित घेऊन जपमाला,
वैरभाव मग असो कितीही, मदिरेप्रति एखाद्याला
एकदाच जर जाती कोणी मधुशालेच्या पुढुनी त्या,
बघाच कैसी धरुन ठेविते पदर तयाचा मधुशाला! ||५१||
रस सगळे तरि मधुर वाटती दूर असे जेव्हा हाला
प्यारे दुसरे चषक जोवरी हाती येत नसे प्याला
शेख, पुजारी, पुजा तुम्ही ते मशीद आणिक मंदिरही,
वदन झाकुनी असा जोवरी बघे वाकुनी मधुशाला ||५२||
अव्हेर करते आज जग तरी उद्याच घेईल ते हाला
नाकारे जरी आज जग तरी धरिल उद्या ते करि प्याला
लाल माईचा जन्मे कोणी पहा जगति मदमस्त जरी,
आहे मंदिर मशीद जेथे, राहिल उभी मग मधुशाला ||५३||
यज्ञाग्नीसम दहकत आहे मदिराभट्टीची ज्वाला
ध्यान लावुनी बसे ऋषीसम रसिक वारुणी घेण्याला
मधुघट घेउन फिरती साकी, भासति मुनिकन्याच जणू
तपोवनाहुन कमी नसे मुळी पावन माझी मधुशाला ||५४||
पूर्वज घेती सोम-सुरा, अन आपण म्हणतो तिज हाला,
म्हणती ज्याला द्रोणकलश बघ तोच मधूचा घट झाला
वेद-रीतही नकाच सोडू घेउन ठेका वेदांचा,
युगे युगे जी पुजली जाई नवी नसे ही मधुशाला ||५५||
चतुरंग
प्रतिक्रिया
2 Oct 2008 - 12:34 am | प्राजु
यज्ञाग्नीसम दहकत आहे मदिराभट्टीची ज्वाला
ध्यान लावुनी बसे ऋषीसम रसिक वारुणी घेण्याला
मधुघट घेउन फिरती साकी, भासति मुनिकन्याच जणू
तपोवनाहुन कमी नसे मुळी पावन माझी मधुशाला ||५४||
हे खूप खूप आवडलं.
हरिवंशराय बच्चन यांनी मंदिर मशिदीची तुलना मधुशालेशी केली आहे. हा खरोखर त्या काळातला वोद्रोहच म्हणावा लागेल..
अभिनंदन चतुरंग..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
2 Oct 2008 - 5:23 am | नंदन
भावानुवाद. शेवटची दोन कडवी विशेष आवडली. भा. रा. तांब्यांनीही हे मधुघटाचे रुपक वापरले आहेच, अर्थात वेगळ्या संदर्भात
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
2 Oct 2008 - 10:23 am | विसोबा खेचर
वेद-रीतही नकाच सोडू घेउन ठेका वेदांचा,
युगे युगे जी पुजली जाई नवी नसे ही मधुशाला ||५५||
क्या केहेने..!
रंगा, जियो....!
आपला,
(मधुशालाप्रेमी) तात्या.
6 Oct 2008 - 9:19 pm | चतुरंग
(खुद के साथ बातां : रंग्या, ह्या वेळची मधुशाला थोडी आडवाटेला गेली का रे? असो, शोधणारे बरोबर पत्ता शोधत येतातच ;) )
चतुरंग
6 Oct 2008 - 9:45 pm | धनंजय
हासुद्धा भाग आवडला. ५१-५३ रुबाया वेगळ्या आहेत. बाकीच्या रुबायांत हाला-प्याला-साकी-मतवाला-मधुशाला प्रत्येक उपमेचे अंग आहे, अशी पूर्णोपमा असते. या रुबायांत तशी पूर्णोपमा दिलेली नाही.
रुबाई ५३ मला बरीच कठिण जाते आहे. पुढे पीणर ती हाला, पुढे घेणार तो प्याला, या दोन वेगवेगळ्या वस्तू मनात यायच्या आहेत का?
"मदा"चा प्रेषित नेमकी कुठली क्रांती आणतो? (चतुरंग यांनी "लाल माईचा..." ...वेगळा अर्थ प्रकाशित केलेला दिसतो. तोही मला नीट लागलेला नाही.)
6 Oct 2008 - 10:12 pm | चतुरंग
५३ मलाही अनुवादायला कठिण गेली कारण 'मद का महमूद' ला चपखल समांतर उपमा मराठीत काय?
पुढच्या ओळीत मंदिर/मशिदीच्या जागी 'तो महमूद' मधुशाला उभारेल असा उल्लेख आहे. त्याला अनुसरुन थोड्या विचाराने मी असे ठरवले की मराठीत आपण म्हणतो ना "असेल माईचा लाल तर करुनच दाखव अमूक अमूक..." म्हणजे जो कोणी असा तर्कट (एक्सेंट्रिक ह्या अर्थी) असेल तोच असे जगावेगळे काम करुन दाखवील!
'मदमस्त' मधे मधुशालेच्या प्रेमात्/अमलात मदमस्त असलेला माईचा लाल (मंदिर्/मशिदीच्या जागी मधुशाला उभारणे) हे करुन दाखवेल असा अर्थ अभिप्रेत आहे.
मद्याचा आधी अव्हेर करणारे मद्य घेतील, प्याला हातात न धरणारे धरु लागतील! एकच गोष्ट आहे पण द्विरुक्तीतून मुद्दा ठसवला आहे! :)
चतुरंग
6 Oct 2008 - 10:50 pm | विसोबा खेचर
इतक्या सुंदर अनुवादाला अवघे पाचसहाच प्रतिसाद मिळतात याची मिपाचा मालक म्हणून मला शरम वाटते!
रंगा, माफ कर रे मला!
आपला,
(चुल्लूभर पानीमे डुब मरण्याची लायकी असलेला!) तात्या.
6 Oct 2008 - 11:30 pm | यशोधरा
शेवटची दोन कडवी अतिशय आवडली!! किती ताकदीने तुम्ही अनुवाद करताय!! ग्रेट!