मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ३)

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
18 Mar 2008 - 2:10 am

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग १)
मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग २)
----------------------------------------------------------------------------------------
मागच्या भागात जीवनरुपी सुरेचे गुंग करुन टाकणारे वर्णन आपण अनुभवले.
आता पुढल्या पाच रुबायात (क्र. ११ ते १५) मधुशालेच्या अंतरंगात कवीचं बोट धरुन आपला प्रवेश होतोय.
दुसर्‍या भागातला तत्वचिंतनाचा धागा, भिंतीवर सुबक जाळे विणणार्‍या कोळ्याच्या कुशलतेने, अलगद पुढे खेचून हरिवंशराय आपल्याला मद्यालयाच्या अंतरंगात घेऊन जातात!
हे जीवनरुपी मद्यालय कसे आहे ह्याचे साग्रसंगीत वर्णन करताना कवी सांगतोय की हे मद्यालय रंगरंगीलं, सुरांनी भारलेले आणि सुरेने भरलेले तर आहेच पण त्याशिवाय ते भेदक आहे; वास्तव जीवनाची खरी ओळख करुन देणारे आहे!
पण तरीहि तू घाबरुन जाऊ नकोस, तुला समजून घेण्याइतकी संवेदनशीलता आहे ह्या मधुशालेजवळ, असा आश्वासक सल्ला द्यायलाही तो विसरत नाही.. एकदा का तुझी तिच्याशी ओळख झाली की पहाच कसा गुरफटत जाशील त्या मायाजालात!!
ज्वालेच्या रंगासम लाल असली तरी ही मदिरा ज्वाला नाहीये. तुझ्या अंतःकरणातल्या दु:खानं ओथंबून आलेल्या त्या आठवणी जणु साकी बनून फेसाळ मद्य तुला देताहेत ते घे, त्याचा अव्हेर करु नकोस! वेदनेत जळण्यातला आनंद ज्यांना समजलेला आहे त्यांच्यासाठीच ही मधुशाला आहे, इतरांनी त्याच्या वाटेला न जाणेच शहाणपणाचे; अशी एक गर्भित धमकीही इथे आहे असे वाटते.
जगातल्या इतर ठंड्या गोष्टींसारखीच एक असे समजून माझा प्याला हाती धरु नकोस हा तुला चटका लावून जाईल, त्यातलं माझं काव्य हे ही साधी सुधी कविता नव्हे तर जहाल असं अनुभवांचं जळजळतं सार आहे ते तुला आतून जाळून टाकेल. पण म्हणूनच तर तू इथे आला आहेस ना? तर मग चिंता कशाची? तुझं स्वागत असो!

जलतरंग बजता, जब चुंबन करता प्याले को प्याला,
वीणा झंकृत होती, चलती जब रूनझुन साकीबाला,
डाँट डपट मधुविक्रेता की ध्वनित पखावज करती है,
मधुरव से मधु की मादकता और बढ़ाती मधुशाला।।११।

मेंहदी रंजित मृदुल हथेली पर माणिक मधु का प्याला,
अंगूरी अवगुंठन डाले स्वर्ण वर्ण साकीबाला,
पाग बैंजनी, जामा नीला डाट डटे पीनेवाले,
इन्द्रधनुष से होड़ लगाती आज रंगीली मधुशाला।।१२।

हाथों में आने से पहले नाज़ दिखाएगा प्याला,
अधरों पर आने से पहले अदा दिखाएगी हाला,
बहुतेरे इनकार करेगा साकी आने से पहले,
पथिक, न घबरा जाना, पहले मान करेगी मधुशाला।।१३।

लाल सुरा की धार लपट सी कह न इसे देना ज्वाला,
फेनिल मदिरा है, मत इसको कह देना उर का छाला,
दर्द नशा है इस मदिरा का विगत स्मृतियाँ साकी हैं,
पीड़ा में आनंद जिसे हो, आए मेरी मधुशाला।।१४।

जगती की शीतल हाला सी पथिक, नहीं मेरी हाला,
जगती के ठंडे प्याले सा पथिक, नहीं मेरा प्याला,
ज्वाल सुरा जलते प्याले में दग्ध हृदय की कविता है,
जलने से भयभीत न जो हो, आए मेरी मधुशाला।।१५।
--------------------------------------------------

भावानुवाद -

जलतरंग जणु हा वाजतसे, तव प्याला चुंबित तो प्याला,
नाद वीणेचा झंकारतसे, रुणझुण चाले साकीबाला,
मधुविक्रेता असा कडकडे, पखवाजाचे बोल जसे,
नादमधुर ह्या वारुणिची ती नशा वाढवी मधुशाला ||११||

मेंदी रंगित नाजुक हाती घेउन मग ती तो प्याला
सोमरसा त्या पुरवितसे झणि स्वर्ण वर्ण साकीबाला
नील-जांबु त्या वसनांसंगे मधुर वारुणि 'तो प्याला'
सप्तरंगही फिकेच पडतिल आज रंगण्या मधुशाला ||१२||

हाती येण्याआधि दाखवी एक नजाकत तो प्याला,
अदा दाखवी वारुणि देखिल, स्पर्शहि नसता अधराला,
नकोच म्हणशिल माहित आहे, साकी येण्या आधि 'तिला',
नको घाबरु, सवंगड्या तू, तुला जाणते मधुशाला ||१३||

लाल सुरेची धार असे, जरि तुला वाटते ती ज्वाला,
घाव उरीचा मानु नको तू, मदिरा फेनिल असण्याला,
ही मदिरा जणु दु:ख नशेचे, गतस्मृती त्या साकी ही,
दु:ख मानिती आनंदासम, त्यांना माझी मधुशाला ||१४||

नसे सुरा ही शीतल माझी, जग समजे जणु मदिरेला,
थंडगारही नसे जगाच्या प्याला परि, माझा प्याला,
विदग्ध हृदयी काव्य असे हे, ज्वलज्जहाल सुरा प्याला,
जळण्यापरि भयभीत नसे जो, स्वागतते ही मधुशाला ||१५||

चतुरंग

हे ठिकाण

प्रतिक्रिया

नंदन's picture

18 Mar 2008 - 9:00 am | नंदन

हाही भावानुवाद आवडला. फक्त शेवटून दुसर्‍या ओळीत विदग्ध (हृदयी) याऐवजी भग्न किंवा ध्वस्त चालू शकेल का? विदग्धचा शब्दशः अर्थ जरी पूर्णपणे जळून गेलेला असला तरी अधिक प्रचलित अर्थ चतुर, निपुण, विद्वान असा आहे, म्हणून असं वाटलं.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चतुरंग's picture

18 Mar 2008 - 9:08 am | चतुरंग

संपूर्ण 'मधुशाले'च्या अनुषंगाने विचार केला असता 'विदग्ध' शब्द जास्त योग्य वाटतो कारण ह्यात दोन्ही अर्थच्छटा दाखवायच्या आहेत.
एक म्हणजे कवी भग्न हृदयी तर आहेच पण तो वाचकाला वाटही दाखवतो आहे, अनुभवाचे सार देतो आहे त्यामुळे तो निपुण आहे दुनियादारीने शहाणा झालेला आहे!
पुढच्या रुबायांच्या जोडीने हा अर्थ योग्य आहे असे तुम्हालाही जाणवेल.

चतुरंग

विसोबा खेचर's picture

18 Mar 2008 - 9:43 am | विसोबा खेचर

पण तरीहि तू घाबरुन जाऊ नकोस, तुला समजून घेण्याइतकी संवेदनशीलता आहे ह्या मधुशालेजवळ, असा आश्वासक सल्ला द्यायलाही तो विसरत नाही.. एकदा का तुझी तिच्याशी ओळख झाली की पहाच कसा गुरफटत जाशील त्या मायाजालात!!

जळण्यातला आनंद ज्यांना समजलेला आहे त्यांच्यासाठीच ही मधुशाला आहे, इतरांनी त्याच्या वाटेला न जाणेच शहाणपणाचे; अशी एक गर्भित धमकीही इथे आहे असे वाटते.

वा वा! सुरेख विवेचन आणि सुरेख अनुवाद!!

रंगराव, तुमच्या मधुशालेला 'केवळ अप्रतिम!' असंच म्हणावं लागेल...

ह्या मधुशालेमुळे मिपा खूप खूप श्रीमंत झाली आहे आणि अजूनही होईल असे वाटते!

पुढील लेखनाकरता अनेकानेक शुभेच्छा!

तात्या.

केशवसुमार's picture

18 Mar 2008 - 6:27 pm | केशवसुमार

चतुरंगशेठ,
भावानुवाद उत्तम चालू आहे..
खंड पाडू नका..
(वाचक)केशवसुमार

बेसनलाडू's picture

19 Mar 2008 - 8:56 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Mar 2008 - 7:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चतुरंगशेठ,
भावानुवाद उत्तम चालू आहे......!!!!

धनंजय's picture

19 Mar 2008 - 8:18 pm | धनंजय

> जलतरंग जणु हा वाजतसे, तव चुंबन करता हा प्याला,
ऐवजी असे चालेल का?
जलतरंग जणु हा वाजतसे, चुंबन करता प्याल्या प्याला, ...
("तव" प्याला चुंबिता जलतंरंगासारखा आवाज येणार नाही, प्याल्यास प्याला चुंबिता तसा आवाज येईल.)

आपण योग्य दुरुस्ती सुचविता आहात त्या बद्दल आपले कौतुक वाटते.
मुळात मला शब्दांची योग्य जुळणी काही केल्या सुचेना मग प्रयत्न सोडून दिला.
आज तुम्ही दुरूस्ती सुचविल्यावर पुन्हा एकदा उचल घेतली आणि शब्द मिळाले - दुरुस्ती केली आहे.
धन्यवाद!

चतुरंग

प्राजु's picture

20 Mar 2008 - 1:02 am | प्राजु

चतुरंग,
तुमचा हा भावानुवद.. मराठी काव्य जगतात एकदम खळबळ उडवून देइल नक्की... अतिशय सुंदर विवेचन. मधुशाला मराठीत येणं हे मराठी वाचकांच भाग्यच म्हणावं. आणि ते मिपावर सगळ्यात आधी यां हा मिपाचा सन्मान आहे.
धन्यवाद.

- (सर्वव्यापी)प्राजु