मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग १)
मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग २)
मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ३)
----------------------------------------------
या आधीच्या तिसर्या भागात आपण हे पाहिलं की जळजळत्या अनुभवांचं सार देण्यासाठीच कवीनं आमंत्रण दिलेलं आहे. ते पिण्याची ज्यांची छाती आहे त्यांनीच यावं, येरागबाळ्याचे काम नाही!
(रुबाया १६ ते २०)
आता ह्यापुढे काय? अशी उत्सुकता लागलेली असतानाच हरिवंशराय त्यांच्या प्रतिभेची चुणूक दाखवतात. मद्य, प्याला, साकी ह्यांच्या प्रतिकांतून ते एका क्षणात आपल्याला अशा अनुभवांपाशी घेऊन जातात की आपण थक्क होतो! ह्या मूर्त स्वरुपातल्या प्रतिमांना कोणी असा छेदून टाकणारा अर्थ देऊ शकत असेल तर तो कवी व्यवहारी जगात किती पोळलेला असेल ह्याची कल्पना आपण करु शकतो. धार्मिक कल्पनांना कवटाळून सर्वसामान्य माणसाचे सुखी आयुष्य उध्वस्त करणार्या धर्ममार्तंडांवर एवढ्या जोराचे कोरडे त्यांनी ज्याकाळात ओढले आहेत ते बघता त्यांचे धाडस अचंबित करुन टाकते! गोड, सुंदर पण तकलादू अशा कविकल्पनांतून केवळ वहावा मिळवण्याएवढी आपली प्रतिभा कवडीमोलाची नाही असा ह्यातला संदेश आपल्याला त्यांच्या परखडपणाला दाद द्यायलाच लावतो.
अरे, मंदिर, मशीद अन् इतर धार्मिक स्थळेच काय पण राजे रजवाड्यांच्या गढ्या आणि संपत्ती सुध्दा कःपदार्थ आहे जर ती सामान्य माणसाला पिळून घेत असेल तर!
आणि मग त्या सामान्यांचा त्राता कोण? ती तर माझी मधुशाला - तिचे कार्यच ते आहे, कोणीही यावे आणि त्या धगधगत्या अनुभवांत स्वतःला झोकून द्यावे. स्वतः कवि शिवप्रतिमा आणि मधुशालेला मंदिर म्हणतोय! क्या बात है!! चला तर मग -
बहती हाला देखी, देखो लपट उठाती अब हाला,
देखो प्याला अब छूते ही होंठ जला देनेवाला,
'होंठ नहीं, सब देह दहे, पर पीने को दो बूंद मिले'
ऐसे मधु के दीवानों को आज बुलाती मधुशाला।।१६।
धर्मग्रन्थ सब जला चुकी है, जिसके अंतर की ज्वाला,
मंदिर, मसजिद, गिरिजे, सब को तोड़ चुका जो मतवाला,
पंडित, मोमिन, पादिरयों के फंदों को जो काट चुका,
कर सकती है आज उसी का स्वागत मेरी मधुशाला।।१७।
लालायित अधरों से जिसने, हाय, नहीं चूमी हाला,
हर्ष-विकंपित कर से जिसने, हा, न छुआ मधु का प्याला,
हाथ पकड़ लज्जित साकी को पास नहीं जिसने खींचा,
व्यर्थ सुखा डाली जीवन की उसने मधुमय मधुशाला।।१८।
बने पुजारी प्रेमी साकी, गंगाजल पावन हाला,
रहे फेरता अविरत गति से मधु के प्यालों की माला'
'और लिये जा, और पीये जा', इसी मंत्र का जाप करे'
मैं शिव की प्रतिमा बन बैठूं, मंदिर हो यह मधुशाला।।१९।
बजी न मंदिर में घड़ियाली, चढ़ी न प्रतिमा पर माला,
बैठा अपने भवन मुअज्ज़िन देकर मस्जिद में ताला,
लुटे ख़जाने नरपितयों के गिरीं गढ़ों की दीवारें,
रहें मुबारक पीनेवाले, खुली रहे यह मधुशाला।।२०।
------------------------------------------------
भावानुवाद -
जाणशि तू त्या झरत्या मदिरे, जाण दहकत्या वारुणिला,
अधर जाळतो स्पर्शताच तो, घेउन बघ तू हा प्याला,
'अधर न केवळ, देह जळो तो,' आसुसला परि थेंबाला
अशा सुरेच्या प्रेमिजनांना, आज बोलवी मधुशाला ||१६||
धर्मग्रंथ ते जाळुन सगळे, धगधगते ज्याची ज्वाला,
मानि तया जो तोडुन गेला मंदिर, गिरिजा, मशिदीला,
पुरुन उरला पंडित, पादरि, मोमीनांच्या कपटाला,
करेल त्याचे स्वागत हर्षे आज माझि ही मधुशाला ||१७||
थरथरत्या अधरांनी ज्यांनी नाहि चुंबिले मदिरेला,
नाहि स्पर्शिला हर्ष-विकल त्या हातांनी तरि तो प्याला,
समिप न ओढी, हात पकडुनी, लज्जित मग त्या साकीला,
व्यर्थच सुकुनी जात असे ती जीवनरुपी मधुशाला ||१८||
गंगाजल, ही पवित्र मदिरा, प्रेमि पुजारी साकी तो,
अविरत गतिने फिरत ठेवतो, मदिरा भरल्या प्याल्यां तो,
'रहा घेत अन् पीत रहा तू', जपतो जणु त्या मंत्राला ,
बनुनी जावो शिवप्रतिमा मी, मंदिर होवो मधुशाला ||१९||
नसे मंदिरी घंटानादहि, नसती मूर्तीला माला,
बसुनि असे तो मोमिन सदनी, लावुन मशिदी कुलुपाला,
लुटोत खजिने, राजांचे ह्या, आणि गढ्यांच्या भिंतीही,
वरदहस्त तो मद्यपिनाही, राहो उघडी मधुशाला ||२०||
चतुरंग
प्रतिक्रिया
20 Mar 2008 - 9:15 pm | llपुण्याचे पेशवेll
मधुशालेचा हा भागही आवडला. आणि काव्यातले यमक, मात्रा वगैरे काही कळत नसल्याने आम्हाला हे अर्थगर्भित काव्य आवडले.
पुण्याचे पेशवे
21 Mar 2008 - 6:40 am | प्राजु
थरथरत्या अधरांनी ज्यांनी नाहि चुंबिले मदिरेला,
नाहि स्पर्शिला हर्ष-विकल त्या हातांनी तरि तो प्याला,
समिप न ओढी, हात पकडुनी, लज्जित मग त्या साकीला,
व्यर्थच सुकुनी जात असे ती जीवनरुपी मधुशाला ||१८||
गंगाजल, ही पवित्र मदिरा, प्रेमि पुजारी साकी तो,
अविरत गतिने फिरत ठेवतो, मदिरा भरल्या प्याल्यां तो,
'रहा घेत अन् पीत रहा तू', जपतो जणु त्या मंत्राला ,
बनुनी जावो शिवप्रतिमा मी, मंदिर होवो मधुशाला ||१९||
या ओळी अगदीच खास..
मात्र्...
नसे मंदिरी घंटानादहि, नसती मूर्तीला माला,
बसुनि असे तो मोमिन सदनी, लावुन मशिदी कुलुपाला,
लुटोत खजिने, राजांचे ह्या, आणि गढ्यांच्या भिंतीही,
वरदहस्त तो मद्यपिनाही, राहो उघडी मधुशाला ||२०||
या शेवटच्या कडव्यांत :
बसुनि असे तो मोमिन सदनी, लावुन मशिदीला ताला,
लुटोत खजिने, राजांचे ह्या, आणि गढ्यांच्या त्या भिंती
असे बदल केले तर कसे वाटतील..??
- (सर्वव्यापी)प्राजु
22 Mar 2008 - 12:17 am | चतुरंग
पण हा विचार पटतो का बघ -
बसुनि असे तो मोमिन सदनी, लावुन मशिदी कुलुपाला,
ह्यातल्या 'मशिदी कुलुपाला' ह्या शब्दयोजनेत मशिदीला कुलुपापेक्षा दुय्यम स्थान दिले आहे - ओळीचा जोर कुलुपावर जास्त आहे! इथे जी भावना पोचवायची आहे ती वेगळी आहे.
लुटोत खजिने, राजांचे ह्या, आणि गढ्यांच्या भिंतीही,
इथेही पुन्हा अर्थ कोणता पोचवायचा आहे ते ठरते. 'आणि गढ्यांच्या भिंतीही' म्हणताना जो कःपदार्थ लेखण्याचा भाव आहे तो महत्वाचा.
(उदा. हेच वाक्य इथे कसे मिळमिळीत वाटते बघ - 'राजांचे ह्या लुटोत खजिने आणि गढ्यांच्या त्या भिंती' - तेच शब्द पण मांडणी हुकली आणि सगळा जोरच गेला!!)
चतुरंग
21 Mar 2008 - 5:17 pm | विसोबा खेचर
पुरुन उरला पंडित, पादरि, मोमीनांच्या कपटाला,
करेल त्याचे स्वागत हर्षे आज माझि ही मधुशाला ||१७||
लुटोत खजिने, राजांचे ह्या, आणि गढ्यांच्या भिंतीही,
वरदहस्त तो मद्यपिनाही, राहो उघडी मधुशाला ||२०||
वा रंगा! फारच सुरेख. वाचून खूप प्रसन्न वाटलं!
आपला,
(मधुशालेतला एक प्रवासी) तात्या.