मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग १)
मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग २)
मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ३)
मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ४)
---------------------------------------
मागच्या भागात आपण तथाकथित धर्मलंडांच्या बाबतीत असलेले कवीच्या मनातले परखड विचार अनुभवले.
अरे, मंदिर, मशीद अन् इतर धार्मिक स्थळेच काय पण राजे रजवाड्यांच्या गढ्या आणि संपत्ती सुध्दा कःपदार्थ आहे जर ती सामान्य माणसाला पिळून घेत असेल तर!
केवळ असेच म्हणून कवी थांबलेला नाही, तो पुढे काय म्हणतो आहे पहा -
(रुबाया २१ ते २५) -
भौतिक सुखाच्या क्षणभंगुरतेची कल्पना येण्याकरता हरिवंशराय कोणते दाखले देताहेत?
राज्ये, संपत्ती, तिथले वैभव काही काही म्हणून वाचणार नाहीये, सगळी कडे मृत्यूचे थैमान असेल आणि त्याही ठिकाणी साकी असेल कोण तर प्रत्यक्ष यम!
तो हलाहलाचे प्याले देत असेल सगळं संपवून टाकण्यासाठी!!
मद्य-मद्यपी जोडीबद्दल जगाच्या मनात कधीच फारसे आपलेपणाचे भाव नसतात, साकीबद्दलही लोक नाकेच मुरडतात. पण ते हे विसरतात की जग क्षतिग्रस्त आहे क्षणाक्षणाला जर्जर होते आहे आणि मधुशाला मात्र नित्यनूतन आहे!
उत्पत्ती, स्थिती आणि लय - चराचराच्या ह्या तीन मूलभूत अवस्थांमधून जाताना प्रत्येक ठिकाणी मधुशालेचा दाखला देऊन आपल्याला पुढे जाता येते - हे पचवणे खरंच अवघड आहे. एकाच वेळी लय आणि नवनिर्माण ह्या प्रक्रिया सुरु असतात आणि मधुशाला त्यातला दुवा असते अशी कल्पना करा आणि कवीच्या कल्पनाशक्तीपुढे नतमस्तक व्हा!
बड़े बड़े पिरवार मिटें यों, एक न हो रोनेवाला,
हो जाएँ सुनसान महल वे, जहाँ थिरकतीं सुरबाला,
राज्य उलट जाएँ, भूपों की भाग्य सुलक्ष्मी सो जाए,
जमे रहेंगे पीनेवाले, जगा करेगी मधुशाला।।२१।
सब मिट जाएँ, बना रहेगा सुन्दर साकी, यम काला,
सूखें सब रस, बने रहेंगे, किन्तु, हलाहल औ' हाला,
धूमधाम औ' चहल पहल के स्थान सभी सुनसान बनें,
झगा करेगा अविरत मरघट, जगा करेगी मधुशाला।।२२।
बुरा सदा कहलायेगा जग में बाँका, मदचंचल प्याला,
छैल छबीला, रसिया साकी, अलबेला पीनेवाला,
पटे कहाँ से, मधु औ' जग की जोड़ी ठीक नहीं,
जग जर्जर प्रतिदन, प्रतिक्षण, पर नित्य नवेली मधुशाला।।२३।
बिना पिये जो मधुशाला को बुरा कहे, वह मतवाला,
पी लेने पर तो उसके मुह पर पड़ जाएगा ताला,
दास द्रोहियों दोनों में है जीत सुरा की, प्याले की,
विश्वविजयिनी बनकर जग में आई मेरी मधुशाला।।२४।
हरा भरा रहता मदिरालय, जग पर पड़ जाए पाला,
वहाँ मुहर्रम का तम छाए, यहाँ होलिका की ज्वाला,
स्वर्ग लोक से सीधी उतरी वसुधा पर, दुख क्या जाने,
पढ़े मर्सिया दुनिया सारी, ईद मनाती मधुशाला।।२५।
--------------------------------------------
भावानुवाद -
संपुनि जाता बडी घराणी, नुरेच कोणी रडण्याला,
महाला मधुनि सन्नाटा, कधि थिरकत होत्या मधुबाला,
राज्य खालसा होउन जाई, भाग्य जाय ते दिगंतरा,
असेच जमतिल मदिराप्रेमी, राहिल जागत मधुशाला ||२१||
प्रलयातहि त्या बनुनी राहिल साकी यमही साथीला,
सुकून जाता रस ते सगळे, राहि हलाहल, अन् प्याला,
निर्जन होती जागा सगळ्या, कधीतरी ज्या गजबजल्या,
जळत राहि ते स्मशान आणिक, असेल जागी मधुशाला ||२२||
सदाच ठरला वाइट जगती, मदिरेचा चंचल प्याला,
आणि प्रेमिही साकीवाला, अधरी धरि जो तो प्याला,
कुणाच नसते मनास ये ती, जोडी जग अन् वारुणिची,
नश्वर असते जग हे प्रतिक्षण, नित्यनवी ही मधुशाला ||२३||
सांगे वाइट मधुशाला ती, स्पर्शही नसता वारुणिला,
सखी जरी तरि होता मदिरा, म्हणसि कशी 'ती नको मला'?
द्रोही आणिक दासांमधुनी विजय मद्य अन प्यालाचा
जगज्जेति ही होउन आली, आता माझी मधुशाला ||२४||
राहि भरुनि जरि हे मदिरालय, जग ते देखे दुष्काळा,
बुडते जग ते तमात सारे, येथ होळीची ती ज्वाला,
दु:ख न ठावे कसे तिला, जी स्वर्गातुन उतरे मदिरा,
असता शोकाकुल जग सारे, करे दिवाळी मधुशाला ||२५||
चतुरंग
प्रतिक्रिया
26 Mar 2008 - 8:35 am | केशवसुमार
रंगाशेठ,
उत्तम चालू आहे..चालू द्या..
पेग भरायचा वेग जरा मंद झाला आहे का?!....
केशवसुमार
26 Mar 2008 - 8:44 am | सृष्टीलावण्या
गूढ अर्थ आहे प्रत्येक ओळीत, प्रत्येक शब्दात. मी आत्तापर्यंत त्याला मद्यगीतच समजत होते. बरे झाले तुम्ही मराठीत त्याचे भाषांतर केलेत (अभिजात हिंदीच काय सामान्य हिंदी पण माझी दांडी उडवते).
हरिवंशरायांच्या काव्य प्रतिभेला आणि तुमच्या अनुवाद कौशल्याला शत शत नमन. असितगिरीसमं स्यात् कज्जलं सिन्धुपात्रं...
>
>
मराठियांची पोरे आम्ही, नाही भिणार मरणाला ।
सांगून गेला तो शिवराया, हे अवघ्या विश्वाला ।।
26 Mar 2008 - 9:23 am | धनंजय
मस्त चालू आहे. हे अत्यंत कठिण काव्य आहे, तुम्हाला वेळ लागणे साहजिक आहे. लगे राहा.
रुबाई क्र २३ चा भावानुवाद पटला नाही - कदाचित मी चुकीचा वाचत असेन.
हिंदीतला अर्थ मला असा वाटतो :
(पहिल्या दोन ओळी) जग प्याल्याला, मदिरेला, पीणार्याला नावे ठेवते
(तिसरी ओळ) अर्थातच जगाची-मदिरेची जोडी जमणारच नाही
(चौथी ओळ) कारण जग जरासन्न आहे, तर मधुशाला नित्यतरुण आहे
तुमची तिसरी ओळ आहे की :
"मद्यपी-वारुणीची जोडी मनास येत नाही", बाकी ओळी साधारणपणे हिंदीतल्यासारख्याच. "मद्यपी-वारुणीची जोडी मनास न ये" चा काय संदर्भ लावावा?
रुबाई २४ :
"मधुशाला" हे यमक पहिल्या ओळीत घेतले हे मुळीच रुचले नाही. या काव्यात "मधुशाला" हा शब्द गझलेच्या काफियासारखा महत्त्वाचा आहे. (पहिला शेर सोडला तर) गझलेच्या बाकी कुठल्याही शेरात काफिया पहिल्या ओळीत चुकून योजला तर ज्या प्रकारचा रसभंग होईल, त्याच प्रकारचा रसभंग येथे होत आहे. तो टाळावा.
"द्रोहि आणि त्या दासांमधुनी..." येथे "त्या" शब्द केवळ वृत्तपूर्तीसाठी घातल्यासारखा वाटतो. तो खटकतो. दास "ते" पण द्रोही "ते" का नाहीत? मुळात दास-द्रोही सामासिक शब्द आहे, दोन्ही समसमान वजनाचे आहेत.
"द्रोही आणिक दासांमधुनी..." असे करूनही मात्रा भरतात.
रुबाई २५ : "दिवाळी" वापरायची कल्पना मस्तच. (बहुतेक मराठी वाचकांना मुसलमानी सण/शोकप्रसंग जड जातील असे वाटते का? पण काही असो, दिवाळी पटते खास.)
26 Mar 2008 - 7:58 pm | चतुरंग
एक वेगळे परिंमाण लाभते आहे त्याबद्दल प्रथम धन्यवाद.
रुबाई २३ -
पटे कहाँ से, मधु औ' जग की जोड़ी ठीक नहीं,
(तिसरी ओळ) अर्थातच जगाची-मदिरेची जोडी जमणारच नाही
तुम्ही म्हणता आहात ते बरोबर आहे कारण पहिल्या आणि चौथ्या ओळीतही जगाचाच संदर्भ दिलेला आहे. तेव्हा मद्यपि-वारुणी हे तितकसं ठीक नाहीये.
मी त्यात बदल करेन.
रुबाई २४ -
बरोबर अगदी बरोबर - इथे संपूर्ण चार ओळीचा तोल काहीसा ढळल्यासारखा जाणवत होता, तो पहिल्या ओळीच्या शेवटी आलेल्या 'मधुशाले' मुळे!
माझा 'रुबाई' ह्या प्रकाराचा अभ्यास नसल्यामुळे असेल, मला ते लक्षात आले नाही. तुम्ही अगदी नेमकी पकडलीत त्रुटी, कौतुक आहे!
हे सुध्दा बदलावे लागेल.
(अवांतर - मधुशालेमुळे तोल जावा ह्यात नवल नाही पण त्याचा अनुवाद करताना जाऊ द्यायचा नाही हे महाकठिण, काय विरोध आहे!)
"द्रोही आणिक दासांमधुनी..." - काय योगायोग? अहो इथेही सुरुवातीला मी अगदी हेच शब्द वापरले होते पण नंतर संपादना दरम्यान मी त्यात बदल केला. कारण मला "द्रोही आणि त्या.." असे जास्त गेय वाटले - पण त्या बदलाबदलीत सामासिक शब्दाचा कासोटा सुटला!;)
रुबाई २५ -
'दिवाळी' वापरण्यामागचा उद्देश म्हणजे आपला हिंदी सण आहे हा तर आहेच. शिवाय 'होळी' चा ज्वालेशी संबंध येतो आणि दिवाळीचाही. होळीत अभद्राचा नाश आहे तर दिवाळीत तेजाचा उत्सव त्या अर्थानेही हा बदल मला चपखल वाटला.
चतुरंग
26 Mar 2008 - 10:02 am | जुना अभिजित
चतुरंग..
मीही जेव्हा प्रथम मधुशाला वाचलं होतं तेव्हा असाच भारावून गेलो होतो. रुबायांमधल्या कल्पनांची झेप थक्क करुन टाकणारी आहे.
ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
26 Mar 2008 - 5:47 pm | स्वाती राजेश
हा भाग सुद्धा छान झाला आहे..
सुरेख अनुवाद..
26 Mar 2008 - 10:16 pm | प्राजु
निर्जन होती जागा सगळ्या, कधीतरी ज्या गजबजल्या,
जळत राहि ते स्मशान आणिक, असेल जागी मधुशाला ||२२||
क्या बात है...
- (सर्वव्यापी)प्राजु
27 Mar 2008 - 7:13 am | विसोबा खेचर
राज्य खालसा होउन जाई, भाग्य जाय ते दिगंतरा,
असेच जमतिल मदिराप्रेमी, राहिल जागत मधुशाला ||२१||
निर्जन होती जागा सगळ्या, कधीतरी ज्या गजबजल्या,
जळत राहि ते स्मशान आणिक, असेल जागी मधुशाला ||२२||
द्रोही आणिक दासांमधुनी विजय मद्य अन प्यालाचा
जगज्जेति ही होउन आली, आता माझी मधुशाला ||२४||
राहि भरुनि जरि हे मदिरालय, जग ते देखे दुष्काळा,
बुडते जग ते तमात सारे, येथ होळीची ती ज्वाला,
दु:ख न ठावे कसे तिला, जी स्वर्गातुन उतरे मदिरा,
असता शोकाकुल जग सारे, करे दिवाळी मधुशाला ||२५||
वा रंगा! नेहमीप्रमाणेच अप्रतीम! अगदी भरून पावलो..!
तुझी मधुशाला आता अगदी छान रंगू लागली आहे!
तात्या.
27 Mar 2008 - 8:12 pm | चतुरंग
चतुरंग