एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !
एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !
एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !
एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग.
एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य !
एका गारुड्याची गोष्ट ७: नाग: अंधश्रद्धेचा बळी !
मनातलं एका गारुड्याची गोष्ट ८: नाग: माझे कॉलचे अनुभव
एका गारुड्याची गोष्ट ९: मण्यार: पडद्यामागचे कलाकार !
आपल्या मध्ये जसे (जाती-)जमाती प्रकार असतो,तसाच सापांमध्ये पण असतो. (अजून साप आपल्या एवढे प्रगत नाही म्हणून त्यांच्या मध्ये जाती नसतात.) नेपाळी गुरखा म्हणले की कसे "शलाम साब" डोळ्यासमोर उभे राहते, अंबानी म्हणले की "बिजिनेस" ऐकू येते आणि "गांधी" ऐकले की "राजकारण" दिसते, तसेच सापांचे पण असते.
नाग हा "येलापिडे (Elapidae)" या ("सौथ इंडियन अण्णा") कुटुंबातील असतो, यामध्ये चष्मा नाग, राज नाग (किंग कोब्रा) ते आफ्रिकन मंबा आणि शेवटी मण्यार पर्यंत अनेक विषारी साप येतात. या सर्व बंधू भावांची वर्तणूक, त्यांचे विषाचे परिणाम साधारण पणे सारखेच असतात. पुण्यात जसे "घराच्या पत्त्यावरून" त्या कुटुंबाच्या स्वभावाचा किंवा वर्तनाचा अंदाज लावता येतो तसेच एकदा का 'येलापिडे' सापडला की पुढचे अंदाज बांधता येतात. म्हणूनच आधीच्या दोन्ही लेखात मी नाग आणि मण्यारची ओळख करून दिली आहे.
त्याच प्रमाणे घोणस आणि फुरसे हे एकाच कुटुंबातील जत्रेत हरवलेले करन- अर्जुन आहेत (जमात: व्हायपरीडे-Viperidae) त्यामुळे त्यांचे दोघांचे स्वभाव,(हो सापांना पण स्वभाव असतात.) त्यांच्या दंश करण्याच्या पद्धती, लुक्स जवळपास सारखेच असते.
त्यातला घोणस म्हणजे सैन्यातील "स्नायपर" !(enemy at the gates मधला व्हासिली आठवा.)
घोणस (विषारी):
सोनेरी-बदामी रंगावर काळपट ठिपक्यांची वेलबुट्टी, जसा काही पैठणीचा पदर काठ. तळपता बाण डोक्यावर रेखलेला आणि कॉलेज मधल्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारे हार्ट-शेप डोके.
घोणसाला, एका स्कॉटिश फिरंग संशोधकाने शोधून काढले म्हणून त्याला त्याचे नाव 'रसेल व्हायपर' (Patrick रसेल) दिले गेले.
हा साप म्हणजे "अमेरिकन अपाची" हेलिकॉप्टर सारखा..सगळ्या अस्त्रांनी सज्ज आणि लपून राहण्यात पटाईत.
खात्या पित्या घरचा साप, ग्राईप वाटर च्या जाहिरातीमधल्या बाळासारखा गुटगुटीत असतो. उगाचच झाडावर चढ,छपरात घूस असे उरफाटे प्रकार हा करत नाही. आपला गप गवतात लपून राहतो आणि डब्बा उडवायला कोणी आला की 'इस्टोप' करून टाकतो. अंगावरील नक्षी ही त्याला निसर्गाने दिलेले बर्थडे गिफ्ट आहे, त्यामुळे पिवळ्या पडलेल्या गवतामध्ये असला तर कधी कधी पाय पडे पर्यंत दिसत नाही.
हा साप नागासारखा जंटलमन असल्याने, आधी वार्निंग द्यायला प्रेशर कुकर च्या शिट्टी सारखा खर्जातला सूर लावतो. त्या सुरात इतकी बेक्कार वार्निग असते की, जो तो सूर ऐकतो त्याला डायरेक्ट ए.मे.सी.बी च्या ट्रान्सफोर्मार वरची कवटी दिसते.
"माझ्या सुरवातीच्या काळात, एका बांधकामाच्या कामचलाऊ गोदामात दोन घोणस असल्याचा कॉल होता. राजाभाऊंनी एक घोणस पकडून पिशवीत टाकला होता आणि मी दुसरा शोधात होतो. प्रेशर कुकर च्या शिट्टी सारखा आवाज येत होता आणि इतक्यात कोणीतरी गोदामाच्या छताचा सांधा हलवला आणि आख्खे छत खाली आले. धुराळा उठला, त्याच अंधारात मी टारझन सारखे दोन्ही हाताने छत पकडले. त्या धुराळ्यात तो प्रेशर कुकर चा आवाज येत होता पण मला काहीच दिसत नव्हते. तेंव्हा भीती वाटून पण उपयोग नव्हता, त्यांमुळे त्या आवाजाचा मी आध्यात्मिकपातळीवर ;) आनंद घेतला. नंतर तो आवाज हळू हळू कमी होत गेला, मग माणसे आली, छत उचलले वगैरे. पुढे आयुष्यात असे (घोणस बरोबरचे)एकांतातील क्षण फार कमी आले.(भाग ४) "
इंजेक्शनच्या सुई सारखे पोकळ, १६ एम.एम. चे दोन विषाचे दात हे घोणसाचे मुख्य अस्त्र ! हे दात हायपो-डर्मिक सुई सारखे पोकळ असून विष ग्रंथिना जोडलेले असतात. (मोसादच्या) बेरेत्ता पिस्तुलातील म्यागझीन सारख्या याच्या जबड्यात ५-६ दाताच्या जोड्या असतात, एक फायर झाली की दुसरा तयार. त्यातून ते दात फोल्डिंग चे असतात, म्हणजे छत्रीत गुप्ती ठेवतो ना तसे...काम तमाम झाले की गुप्ती छत्रीच्या दांड्यात !
पहिला फोटो घोणसाचे विष काढतानाचा आणि दुसरा त्याच्या डोक्याची रचना दाखवणारा.
नाग हा फण्याच्या समोरच्या बाजूला म्हणजे साधारण पणे १८० अंशात हल्ला करू शकतो तर घोणस ३६० अंशात कुठे पण हल्ला करू शकतो....म्हणजे दिवाळी मध्ये भुईनाळा फेल गेला ही कसा फिरतो, तसाच हल्ला करताना घोणस फिरतो.
त्यामुळे तुम्ही पहिले असेल तर, नागांचे चुंबन घेणारे खूप लोकं असतात पण घोणसाच्या वाटेला जात नाही.(जगात चुंबन घ्यायला एवढ्या सुंदर गोष्टी असताना, लोकं इंटर-स्पेसियल रिलेशन मध्ये का पडतात कोण जाणे?) गारुडी, थाईलंडवाले सापवाले पण घोणसाच्या खेळापासून जास्त करून दूरच राहतात.
डोळ्याची पापणी लवते न लवते तो पर्यंत जीवा महाला ५ हातावरचे लिंबू पट्ट्याने उडवून जागेवर यायचा,याच कुळीतला घोणस असतो. १/३ सेकंदात: "तोंड उघडून -विषदंत बाहेर काढून -दंश करून -विष सोडून - दात मिटून -परत जागेवर".. या सगळ्या क्रिया होतात.( मला हे वाक्य लिहायला पण ३० सेकंद लागली.) हा व्हिटेकर सर्पतज्ञांचा व्हिडिओ बघा: घोणसाचा हल्ला. .हाय-स्पीड कॅमेरा मध्ये त्यांनी घोणसाचा हल्ला चित्रित केला आहे. )
वरती लिहिल्याप्रमाणे या जमातीचे विषपण नागापेक्षा वेगळ्या प्रकारचे म्हणजे हिमो-टोक्सिक असते. साधरण पणे १३० ml तो २५० ml म्हणजे पाउण ते आख्या (कुकिंग) कप एवढे विष टोचू शकतात, त्यातले माणसाला पाव कप विष ढगात पोचवायला पुरेसे असते.
हे विष मुख्य करून रक्ताभिसरण संस्थेवर (तर नागाचे मज्जासंस्थेवर) हल्ला करते, थोडक्यात म्हणजे रक्ताचे पाणी करते. रक्ताची गुठळ्या करायची क्षमता गंडल्यामुळे शरीरातून रक्तस्त्राव होऊ लागतो. पहिल्यांदा हिरड्या मधून रक्त चालू होते,नंतर मिळेल त्या भागातून रक्त पडू लागते...रक्त दाब कमी होऊ लागतो आणि शेवटी किडनी फेल होऊन रुग्ण दगावतो. अमेरिकन झोंबी हा (हिडीस) प्रकार पहिल्या वर मला घोणस चावलेला आणि अगदी शेवटच्या स्टेज मध्ये असलेला माणूस आठवला होता.
ज्यांना हा साप चावला आहे त्यांच्या भाषेत,"उकळते तेल शरीराच्या आत मध्ये इंजेक्शन ने टोचायचे- म्हणजे घोणसाचा चावा !"
माणूस वाचला तरी, ज्या जागी घोणस चावतो तिकडचे टिशू जळून जातात. अशी घोणसाची कृपा झाली की त्याची परिणीती हाता-पायाची बोटं किंवा हात-पाय गमावण्यात होते. लान्सेत या मेडिकल जर्नलच्या मते जी कोणी माणसे घोणस चावून वाचतात, त्यातील २६% लोकांची पिटूटरी ग्यांडची वाट लागते आणि मग त्यांचा हार्मोनल-लोचा होतो.
घोणस चावून वाचलेला माणूस जर कधी पहिला पहिला तर हे डिस्कवरी प्रेरित सर्पमित्र कधी सापाशी खेळ करायची हिम्मत करणार नाहीत. हा व्हिडिओ बघा: विषाचे रक्तावर परिणाम
"कूच डाग भी अच्छे होते है!" याच चालीवर हे घोणसाचे विष मेडिकल क्षेत्रात खूप ठिकाणी वापरले जाते. "Dilute Russell's viper venom time (dRVVT)" ही पद्धत हॉस्पिटल मध्ये वापरून रक्ताची गुठळ्या करण्याची क्षमता तपासली जाते.
२००५ सालची एक सकाळ...मी सर्पोद्यान मध्ये एक स्नेक-पिट साफ करत होतो, इतक्यात एक माणूस पळत आला, त्याने डोक्यावर दोन्ही हाताने साप पकडला होता (लावणीवाली बाई पदर पकडते तसा !)..."अहो अजगराचे पिल्लू पकडून आणले आहे, कुठे सोडू ?" मी दृश्य बघताच, हादरलो...३ फुटी चकचकीत घोणस त्याने हातात डोक्याजवळ पकडला होता, चावला असता तर औषध द्यायला पण वेळ मिळाला नसता. मी आधी त्याच्या पासून लांब झालो आणि त्याला, जमिनीवर त्या अजगराला (घोणसाला!) टाकायला सांगितले. (नंतर स्नेक स्टिक ने नीट उचलून त्याला घोणसाच्या पिट मध्ये टाकले.)..."काय हो, तुम्ही एवढे सर्पोद्यान चे असून अजगराला घाबरता , बारामती ला एसटी मध्ये चढलो या बेन्याला (अजगराला) घेऊन, मध्ये मध्ये पोत्यांमधून डोके काढायचा ...की द्यायचो एक टप्पू ठेवून, असाच आणला याला इकडे स्वारगेट वरून ....
मी काहीच बोललो नाही,मला फक्त राजाभाऊंचे (मूळ वाक्य:जिम कार्बेट) वाक्य आठवले "अज्ञानात नेहमीच सुख असते ! "
पुढच्या लेखात फुरसे ...
(या लेखातले सर्व फोटो अंतरजालावरून आणि चिराग रॉय कडून घेतले आहेत.त्यांना कुठल्या पद्धतीने बदलण्यात आले नाही.)
प्रतिक्रिया
8 Oct 2013 - 2:28 pm | केदार-मिसळपाव
तुमच्या लेखमालिकेची नेहमीच प्रतिक्षा असते.
8 Oct 2013 - 7:51 pm | मी-सौरभ
वाचतोय
9 Oct 2013 - 12:03 am | एस
मागच्या लेखात निनादरावांनी इथे चांगला मुद्दा मांडला आहे.
मला असे वाटते की बलात्कार्यांना फाशीबिशी देण्याऐवजी घोणशीचे चुंबन घ्यायला लावावे. जगला तरी मरणप्रायः जीवन, मेला तरी त्याने त्याच्या व्हिक्टीमला दिलेल्या वेदना सव्याज त्याला परत, इतका तडफडून...
माफ करा, पण राहवलं नाही म्हणून अवांतर!
14 Oct 2013 - 12:56 pm | चिगो
मित्रा, इथे तू लिहीलंयस..
आणि 'घोणसाच्या विषाचे रक्तावर परीणाम' वाल्या व्हिडियोत दाखवलंय की रक्त गोठून जेलीसारखं होतं.. नेमके काय होते? तुझ्याकडून किंवा डाॅ. खरे ह्यांच्याकडून कळेल, असे वाटते.. धन्यवाद..
14 Oct 2013 - 1:04 pm | सुबोध खरे
चिगो साहेब.
त्या व्हिडियो मध्ये रक्त गोठ्ताना दाखवले आहे जी रक्ताची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. तो विषाचा प्रभाव नाही असे मला वाटते( व्हिडियो चुकीचा आहे असे मला वाटते.) उलट घोणस किंवा फुरसे या सापाची विषे हि रक्तभंजक (haemolytic) असतात त्यामुळे रक्ताच्या पेशी फुटून निघतात आणि रक्त गोठवणाऱ्या प्रथिनांचे विभाजन झाल्याने रक्त गोठत नाही.उलट जर ते विष गोठलेल्या रक्तात मिसळले तर रक्त पातळ आणि प्रवाही होऊ लागते. यामुळेच घोणस चावलेल्या माणसाला गेल्या काही दिवसात झालेल्या क्षुल्लक जखमातून परत रक्तस्त्राव होऊ लागतो. त्या ठिकाणच्या केशवाहीन्यात तयार झालेल्या रक्ताच्या गाठी विरघळून रक्तस्त्राव सुरु होतो आणि रुग्णाला रक्ताचे फोड येतात.
19 Oct 2013 - 9:11 pm | डॉ.प्रसाद दाढे
जॅक साहेब अभिनंदन !! खूपच छान माहिती आणि अतिशय आकर्षक शैली. खूप दिवसांनी मिपावर आलो; सार्थक झाले. विषारी साप व विंचू याबद्दल महाडच्या डॉ. हिम्मतराव बावस्करांच्या आत्मचरित्रातही खूप डिटेलवार माहिती दिली आहे. तेही एक थोर संशोधक असून ह्या विषयावर अॅथॉरिटी मानले जातात. मी जबड्याचा सर्जन असल्याने माझा सल्ला घोणस दंशाच्या एका केसमध्ये घेतला गेला होता; रूग्णाच्या हिरड्यांमधून खूप रक्तस्त्राव होत होता, थांबतच नव्हता,तेव्हा मी डॉ. बावस्कर सरांना फोन करून माहिती विचारली होती. त्यांच्या सल्ल्यानुसार रूग्णास ए.एस.व्ही आणि ब्लड रिप्लेस्ड बाय ब्लड असे केले तेव्हा कुठे हिरड्यांमधला रक्तस्त्राव थांबला आण रूग्ण वाचला.
घराभोवती वाळू टाकली असता साप त्यावर सरपटू शकत नसल्याने धोका कमी होतो असे ऐकले आहे. अदरवाईज गमबूट आणि जाड जीन्स पॅन्ट वापरणे अन काठी आपटत जंगलात फिरणे हे प्रतिबंधात्मक उपाय करावेत.
आणखीन एक बातमी वाचलेली आठवते. घराची साफसफाई करताना एका माणसाला (पुण्यातच) साप चावला आणि दडून बसला. आजुबाजुच्या लोकांनी साप हुडकून मारला आणि मृत सर्पासकट त्या माणसाला दीनानाथ मध्ये आणला. तपासणी अंती डोक्टर म्हणाले की हा बिनविषारी सर्प असून भीतीचे काही कारण नाही. पण आपली प्रिकॉशन म्हणून त्या माणसास त्यांनी थोडावेळ आयसीयू मध्ये ठेवले. परंतु थोड्या वेळाने त्या माणसाचे बीपी खाली येऊ लागले, दंशाची जागा टम्म सुजली व इतर सर्व विषारी सर्पदंशाची लक्षणे दिसू लागली. आयसीयूवाले पण चक्रावले. त्यांनी तातडीने आवश्यक ती ट्रिटमेंट सुरू केली आणि त्याच्या नातेवाईकाना घरात नीट शोधाशोध करायला सांगितली तर अडगळीत लपून बसलेला एक नाग सापडला !! त्या माणसाला जर आयसीयूत निरिक्षणासाठी ठेवला नसता तर काही खरं नव्हतं !!
सापावरून अजुन एक चावट किस्सा आठवला.. दादा कोंडकेंच्या एका चित्रपटात दादा आपल्या नायिकेवर इम्प्रेशन मारण्यासाठी तिला सांगतो,"अगं मी तर आहेच पण माझे आजोबा तर इतके शूर होते की त्यांच्या धोतरात एकदा नाग सापडला होता !" मग ती भयचकित होऊन विचारते,"मग त्यांना चावला नाही तो..?" "अगं, एक नाग दुसर्या नागाला कधी चावत नसतो" इती दादा. ती विचारते,"म्हणजे..?" "अगं, माझ्या आजोबांचे नाव 'नागनाथ' होते !!"
19 Oct 2013 - 9:49 pm | जॅक डनियल्स
मस्त प्रतिसाद दिला आहे.
डॉ. हिम्मतराव बावस्करांचे "ब्यारीस्टेर चे कार्टे " आणि काही संशोधन पेपर मी वाचले आहेत. खूपच चांगले काम ते कठीण परीस्थित,त्या परिस्थीतीवर न रडता करत आहेत.
त्या माणसाचा अनुभव खूप कॉमन आहे, पण तो माण्यारीच्या बाबतीत खूप वेळा घडतो. कारण मण्यार दुसऱ्या सापाला खायला घरात घुसते आणि दंश करते, आपल्याला तो बिनविषारी साप सापडतो. मण्यार चावली हे कळत पण नाही, आणि जेंव्हा कळते तेंव्हा उशीर झाला असतो.
दादा कोंडकेंना सलाम !
20 Oct 2013 - 8:33 am | रुस्तम
मस्तच ….
21 Oct 2013 - 10:41 pm | एस
वाळवंटातही साप आढळतात. वाळूऐवजी घराच्या भिंतींना सर्व बाजूंनी जमिनीपासून काही उंचीपर्यंत गुळगुळीत गिलावा केल्यास सापांना दूर ठेवण्यास मदत होते. साप हे खवल्यांच्या आधारे सरपटत असल्याने त्यांना थोडातरी खडबडीत पृष्ठभाग त्यासाठी गरजेचा असतो. वाळू त्यांना आडकाठी करू शकणार नाही. उलट त्यामुळे सापांना लपण्यासाठी मदतच होईल असे वाटते. त्याचप्रमाणे पाण्याचा खंदक करूनही उपयोग होणार नाही. साप केवळ अतिशीत पर्माफ्रॉस्ट प्रदेश वगळता इतर सर्व अधिवासांमध्ये आढळतात. त्यामुळे गुळगुळीत पृष्ठभाग हाच सापांना घरात येऊ न देण्याचा बराचसा खात्रीशीर उपाय आहे. इतर कुठल्या समजावर खातरजमा केल्याशिवाय विश्वास ठेऊ नये.
21 Oct 2013 - 11:32 pm | जॅक डनियल्स
तुमचे बरोबर आहे, वाळूमुळे जास्त काही होणार नाही. मी मागे प्रतिसादामध्ये लिहिले होते की फिनैल किंवा बाथरूम धुण्याचे आसीड टाकावे, त्याच्या उग्र वासाने साप येण्याची शक्यता कमी होते. तंबू लावून राहणार असाल तर "सापासाठी खड्डा" (स्नेक त्रेंच) जो आर्मी मध्ये खोदायला शिकवतात तो खोदावा.
8 Nov 2013 - 4:17 pm | म्हैस
@स्वॅप्स -
हा लेख वाचत असताना माझ्याही मनात हा विचार चमकून गेला . मुलींना जन्मताच अशी काही सोय असायला हवी होती ज्याच्यामुळे कोणताही पुरुषाला शारीरिक जबरदस्ती करता आली नसती .
8 Nov 2013 - 8:31 pm | अमेय६३७७
लेखनशैली खूप आवडली. माहिती उत्तमच पण सापाची भीती काही जायची नाही त्यामुळे दुरूनच टाळावे हे बरे.
1 Dec 2013 - 12:38 pm | आनंदराव
क
अजुन कुथल्यहि सापाला प्रत्यक्श बघन्याचा योग आला नाहि.
हाय रे कर्मा!इतार प्रतिक्रियावाच्युन जल्फालात झाला.
1 Dec 2013 - 1:13 pm | आनंदराव
वीदीओ ज ब र द स्त आहेत.
1 Dec 2013 - 1:21 pm | आनंदराव
वीदीओ ज ब र द स्त आहेत.
29 Aug 2016 - 12:24 pm | मन१
https://en.wikipedia.org/wiki/Mongoose इथे वाचल्याप्रमाणे खुद्द मुंगूसही घोणसाला जरा वचकूनच असतो. घोणसाला नागाला / कोब्र्याला पिडायला जमतं. पण घोणसासमोर मात्र...
.
.
.
भारिच लिहिलय.
30 Aug 2016 - 7:00 am | जॅक डनियल्स
धन्यवाद्!
हो, बरोबर आहे. कारण घोणस ३६० अंशात हल्ला करू शकतो आणि नागापेक्षा दात खूप लांब असल्यामुळे मुंगसाच्या केसांचा मुंगसाला काही उपयोग होत नाही. त्यामुळे "फुकटची का आपली वाट लावून घ्या" या उक्ती प्रमाणे मुंगूस घोणसाच्या नादी लागत नाही.
6 Jun 2017 - 5:59 am | रुपी
मस्त.. शेवटचा प्रसंग तर फारच भारी लिहिला आहे.
21 Oct 2017 - 8:27 am | वाईकर गोविंद
वाई - महाबळेश्वर रस्त्यांवर बऱ्याचदा हे सरपटणारे प्राणी भरधाव जाणाऱ्या वाहनांखाली येऊन चिरडले जातात. यावर काहीतरी उपाय व्हावा !
6 Mar 2022 - 7:24 pm | Pratham
नोव्हेंबर चा महिना, सकाळचे सात वाजले होते. मी व माझा एक मित्र बाईक वरून पंढरपूर कडून साताऱ्यास निघालेलो.
आमच्या बाईक पासून पुढे ५० एक फुटांवर एक माणूस मस्त मोकळी बाटली घेऊन कार्यक्रम मस्त झाल्याच्या आनंदात रस्त्याच्या कडेने चालला(मोबाईल बघत) होता तेवढ्यात आम्हाला त्याच्या पायात मातकट रंगाचे ते ध्यान दिसले. दिसताक्षणी मी त्याला तात्काळ ओळखला की हा घोणसच व मित्रानेही ओळखला. त्या माणसाच्या अगदी पायात आल्यावर त्याला तो दिसला व त्याने त्याच्या तंगड्या फाकवल्या, व निवांतपणे सापाकडे एकदा बघितले व चालू लागला.आम्ही गाडी थांबवून(लांबूनच) सापाला न्याहाळला व त्या सुंदर पण घातक जीवाला तिथेच सोडून निघालो.