परवापासून घरात, साळंत “यष्टी येणार” बोल्तेत.
गुर्जीबी ‘जगाची कवाडं उगडणार’ असलं कायबाय म्हन्ले.
आमी समदयांनी जग्याकडं माना वळवून पायलं; तर बेनं रडाया लागलं जोरात.
राती भाकरी हाणली की माजे डोळे गपागपा मिटत्यात.
आण्णा म्हन्ले, “अन्जाक्का, झोपू नका. आपण एसटी पहायला जाऊ”
“अंदारात दिसाचं नाय; सकाळी जाऊ” असं म्या बोल्ले तर आजीबी हसाया लागली.
चावडीवर पोरंसोरं, आजीसकट झाडून समद्या बायाबी आल्यता.
मान्सं तमाकू थुकत व्हती.
बत्तीच्या उजेडात म्या आण्णांच्या मांडीवर जाऊन बसली.
ते ‘विकास व्हणार, गाव सुदारणार’ म्हनत व्हते.
जोरात आवाज आला. डोंगरावर कायतरी चमाकलं.
“यष्टी” समदे वराडले.
आण्णा हसत व्हते.
तेनी मला खांद्यावर बशिवलं.
लई लई दिसांनी.
मला यष्टी आवडली.
*शतशब्दकथा
प्रतिक्रिया
1 Oct 2013 - 10:29 pm | पैसा
मस्त! आमच्या गावात पहिल्यांदा यष्टी आली तो प्रसंग आठवला!
1 Oct 2013 - 11:36 pm | अत्रुप्त आत्मा
यष्टि आवाडली!
1 Oct 2013 - 11:36 pm | पहाटवारा
मस्त !
2 Oct 2013 - 12:45 am | अग्निकोल्हा
लेखन नेहमीच आतपर्यंत भिडते.
4 Oct 2013 - 8:47 am | आतिवास
आभार.
आन्जीमध्ये ही प्रांजळ निरागसता मला जेव्हा दिसते तेव्हा ती व्यक्त होते इतकंच!
शेवटी काय, माझ्यासारखे 'लेखक' (!) अनेकदा नुसते भारवाहक असतात :-)
2 Oct 2013 - 4:34 am | स्पंदना
काय सांगु अन्जाक्का आमच्या गावात आजुन न्हाय आली आन तुमाला दिसली बी? वा! वा!!
अतिवासताई दंडवत स्विकारा!
2 Oct 2013 - 9:55 am | मुक्त विहारि
झक्कास..
2 Oct 2013 - 10:33 am | सुधीर
मिरसदारी वाचताना एखादं गाव डोळ्यासमोर उभं रहायचं, अगदी तसाचं अनुभव आला.
2 Oct 2013 - 11:05 am | यशोधरा
स्वदेस सिनेमामध्ये ती म्हातारी आजी वीजेचा दिवा पाहून बिजली, बिजली असे उच्चारते त्याची आठवण झाली.
3 Oct 2013 - 2:04 am | प्यारे१
ती आमच्या पसरणीच्या न्हाव्याची म्हातारी.... मेली चित्रपट प्रदर्शित झाल्यावर सहा महिन्यात.
शतशब्दकथा भन्नाट असतात हे नव्यानं काय सांगावं? :)
एक पुस्तक होऊ शकेल! विचार करा.
2 Oct 2013 - 1:39 pm | तुषार काळभोर
आनंद य्ष्टीच्या येन्याचा न्हाई, तर यष्टीच्या निमित्तानी आण्णांनी खांद्यावर घेतल्याचा झाला..
2 Oct 2013 - 4:12 pm | आतिवास
:-)
2 Oct 2013 - 2:07 pm | बिपिन कार्यकर्ते
"तेनी मला खांद्यावर बशिवलं."
हाहाहा! कोणाला कशाचं तर कोणाला कशाचं! :)
मला ही आंजी आवडते कारण ही अशी सटल्टी. :)
2 Oct 2013 - 3:00 pm | प्रभाकर पेठकर
सुंदर शतशब्द कथा. छोटीच्या आणि मोठ्यांच्या वेगवेगळ्या भावना फार छान शब्दात पकडल्या आहेत. अभिनंदन.
मला गावाकडचा अनुभव नाही. पण गावात प्रथमच सुरु होणारी यष्टी रात्री एवढ्या उशीरा येते? जरा पटलं नाही.
3 Oct 2013 - 1:20 am | अभ्या..
मुक्काम गाडी म्हणून सुरु केली असेल पेठकर काका. ;) सकाळी तो हार बिर घालून नारळ फोडायचा कारेक्रम आसेल. ;)
.
.
आणि नेहमीप्रमाणेच आंजी एक नंबर सॉलीड.
धन्यवाद अतिवासतै. :)
3 Oct 2013 - 9:21 am | आतिवास
मुक्काम गाडी
2 Oct 2013 - 4:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फ़ॉर्मेट लै भारी जमलाय आणि कथाही सुप्पर येताहेत.
अजून येऊ दे....
-दिलीप बिरुटे
2 Oct 2013 - 4:40 pm | चाणक्य
फारच छान
2 Oct 2013 - 7:26 pm | चिगो
यष्टी तशीबी आठवणीतली खुणगाठ आहे.. अन्जाक्का नेहमीप्रमाणेच झकास..
2 Oct 2013 - 7:47 pm | जे.पी.मॉर्गन
यष्टी येकदम झ्याक! भाषेतला साधे-सोपेपणा आणि हा फॉर्मॅटच लई आवडला !
जे.पी.
3 Oct 2013 - 4:10 am | साऊ
किती सुंदर अन प्रभावशाली आहे लिखाण.
मला तुमच्या या आधीच्या गोष्तीही आवडल्या.
4 Oct 2013 - 9:19 am | दादा कोंडके
शतशब्दकथा आवडली.
4 Oct 2013 - 11:54 am | प्रीत-मोहर
आन्जाक्क्का लैच ब्येस !!!!
4 Oct 2013 - 12:12 pm | स्वाती दिनेश
सहजसुंदर!
स्वाती
5 Oct 2013 - 2:37 pm | आतिवास
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
5 Oct 2013 - 5:09 pm | तिमा
शतशब्दकथा सर्वांनी लिहाव्यात पण, काळजाला हात घालणारी कथा फक्त आतिवास यांचीच. आवडली हे सांगणं, ही फॉर्मॅलिटी ठरेल.
5 Oct 2013 - 6:19 pm | आतिवास
तुम्ही आणि अन्य काही मिपाकरांनी इथं कौतुक केलं आहे या कथेचं, त्याबद्दल आभार. पुन्हा एकदा.
"शतशब्दकथा" प्रकार माझ्या माहितीप्रमाणे नवा आहे मराठी आंतरजालावर. तो रुजण्यासाठी, सशक्त होण्यासाठी अनेकांनी विविध प्रयोग करण्याची गरज आहे. असे प्रयोग होताहेत, अनेक लोक लिहिताहेत आणि या विविधांगी कथा वाचकांच्या पसंतीस उतरत आहेत; निदान काहींना तरी त्या आवडत आहेत :-) ही एक समाधानाची बाब आहे.
हा प्रकार टिकेल का - हा प्रश्न माझ्याही मनात आहे. बघू, काय होतंय ते!
5 Oct 2013 - 9:11 pm | जॅक डनियल्स
मस्त ! भट्टी जमली आहे !
6 Oct 2013 - 12:50 am | खेडूत
शतशब्दकथा आवडली!
6 Oct 2013 - 12:13 pm | भ ट क्या खे ड वा ला
पहिल्यांदा यष्टीत बसलेली एक म्हातारी आपल्या वाडीतली झाड मागे पळताना बघून ,खाली उतरण्यासाठी आरडा ओरडा करू लागली ,असा किस्सा आई सांगायची
6 Oct 2013 - 12:13 pm | भ ट क्या खे ड वा ला
पहिल्यांदा यष्टीत बसलेली एक म्हातारी आपल्या वाडीतली झाड मागे पळताना बघून ,खाली उतरण्यासाठी आरडा ओरडा करू लागली ,असा किस्सा आई सांगायची
6 Oct 2013 - 12:18 pm | भ ट क्या खे ड वा ला
गुर्जीबी ‘जगाची कवाडं उगडणार’ असलं कायबाय म्हन्ले.
आमी समदयांनी जग्याकडं माना वळवून पायलं; तर बेनं रडाया लागलं जोरात.
6 Oct 2013 - 1:48 pm | सोत्रि
सुंदर!
- (यष्टीने खूप प्रवास केलेला) सोकाजी
7 Oct 2013 - 6:07 pm | भावना कल्लोळ
मस्तच … मला हि भावतात तुमच्या शत शब्दकथा
8 Oct 2013 - 12:11 am | कवितानागेश
आवडली यष्टी. :)
8 Oct 2013 - 11:22 am | मदनबाण
मस्त ! :)