गपचिप

आतिवास's picture
आतिवास in जनातलं, मनातलं
28 Dec 2013 - 9:43 pm

आमची आई येकदम वाईट.
च्या काय देत नाही कदी.
ही मोटी मान्सं बरी च्या पित्यात. आमाला मात्र न्हाई.
आण्णा म्हन्त्यात, “चहा नको पिऊ; काळी होशील.”

त्यादिशी पाटीलकाका आल्ते. आई च्या दिऊन बोलत बसली तितचं.
मला म्हन्ली, “बेटा, तेवढी कपबशी आत नेऊन ठेव मोरीत. न फोडता ने.”
आता पावणे होते; तेंच्यासमोर आईचं ऐकाया पायजे ना! वाईट असली ती तरी!

पाटीलकाकांनी कपात उलिसा च्या तसाच ठुला व्हता.
म्या पिऊन टाकला तो गपचिप.
येकदम झ्याक.

तवापासून आले पावणे, की उचल कपबशी ...
प्या च्या.....

पावणे नाय आले तर?
म्या रस्त्यावर जाऊन कुणालाबी सांगतिया “आई-आण्णा बोलावत्येत” म्हनूनशान.
आई करतेच च्या.
म्याबी पिते.
उलिसा.

गपचिप.

* शतशब्दकथा

कथाअनुभव

प्रतिक्रिया

खेडूत's picture

28 Dec 2013 - 9:55 pm | खेडूत

अगदी असंच एक पात्र पाहिलं होतं ...
कथा आवडलीच !

जेपी's picture

28 Dec 2013 - 10:00 pm | जेपी

कथा आवडली हाय .

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Dec 2013 - 10:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

लै भारी ! ही पोर लै चॅप्टर हाय. राजकारनात नाव काडंल. ग्येला बाजार जिल्ला परिशदेची उपाद्यक्श श्येकडा शंबर टक्के ! :)

पाषाणभेद's picture

28 Dec 2013 - 11:18 pm | पाषाणभेद

एकदम खरं हाय.

प्रचेतस's picture

28 Dec 2013 - 10:35 pm | प्रचेतस

कथा आवडली.

आदूबाळ's picture

28 Dec 2013 - 10:46 pm | आदूबाळ

पोर लय गुणाची :))

अत्रुप्त आत्मा's picture

28 Dec 2013 - 11:04 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/yes/ok-sign-smiley-emoticon.gif

बिजुरीया's picture

29 Dec 2013 - 12:18 am | बिजुरीया

आवडेश!

बॅटमॅन's picture

29 Dec 2013 - 1:23 am | बॅटमॅन

काय ट्याक्ट तरी =))

बेरकी हाये पोरगी एकदम ;)

अभ्या..'s picture

29 Dec 2013 - 11:03 am | अभ्या..

आंजीच हाय न्हव ही.
लैच आवचिंदर पोरगी. ;-)
.
.
मस्त लिव्हलय.

प्यारे१'s picture

29 Dec 2013 - 1:15 pm | प्यारे१

आंजी?
नसंन. ही आंजीयेवडी 'ढेप' न्हाय.
सोभावानं पन आन पैक्यानं पन. च्याप्टर हाय.

आतिवास's picture

29 Dec 2013 - 3:19 pm | आतिवास

'ढेप' म्हणजे? 'ढ'?
आन्जीला 'ढ' म्हणताय/समजताय तुम्ही? .... अरेरे :-)

प्यारे१'s picture

29 Dec 2013 - 4:29 pm | प्यारे१

:)

आतिवास's picture

30 Dec 2013 - 2:03 pm | आतिवास

म्हणजे काय? "आगाऊ"?
नवीन शब्द आहे हा माझ्यासाठी.

हतोळकरांचा प्रसाद's picture

29 Dec 2013 - 10:03 am | हतोळकरांचा प्रसाद

झ्याक हाये लेख... वाचून मलाबी च्या ची तल्लफ आली बगा…. वाइच घोटबर च्या घेउन्शान येतु!!

यशोधरा's picture

29 Dec 2013 - 10:11 am | यशोधरा

मस्त लिहिलंय!

अनुप ढेरे's picture

29 Dec 2013 - 10:44 am | अनुप ढेरे

आवडली गोष्ट

देशपांडे विनायक's picture

29 Dec 2013 - 10:53 am | देशपांडे विनायक

गपचिप. टाळी घ्या!!

अजया's picture

29 Dec 2013 - 11:06 am | अजया

लै भारी!!!

मुक्त विहारि's picture

29 Dec 2013 - 1:34 pm | मुक्त विहारि

झक्कास...

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Dec 2013 - 3:22 pm | बिपिन कार्यकर्ते

=))

कवितानागेश's picture

29 Dec 2013 - 3:42 pm | कवितानागेश

आंजी थोडी मोटी जाली की सोताच्या सोता च्या बनवील, आदुगरच उलिसा च्या पिईल, मंग पावण्याना दील! ;)

नाखु's picture

30 Dec 2013 - 9:31 am | नाखु

"च्या" साठी काय पण (तुमच्या साठी काय पन च्या चालीवर)

कपिलमुनी's picture

30 Dec 2013 - 10:37 am | कपिलमुनी

मस्त कथा आहे ..

युगन्धरा@मिसलपाव's picture

30 Dec 2013 - 11:28 am | युगन्धरा@मिसलपाव

एवढी छोटि का कथा अजुन जरा लिहा ना वाचताना मज्जा येतेय.

आतिवास's picture

30 Dec 2013 - 11:39 am | आतिवास

धन्यवाद.
'शतशब्दकथा' हा साहित्यप्रकार त्याचे नाव सांगतो त्यानुसार स्वाभाविकच छोटा (शीर्षक सोडून शंभर शब्द) आहे. या मालिकेतल्या अन्य कथा मी इथं(ही) प्रकाशित केल्या आहेत, त्या जरुर वाचा. 'मिसळपाव'वर अन्य लेखकांनीही शतशब्दकथा लिहिल्या आहेत - त्याही अवश्य वाचा अशी विनंती.

मदनबाण's picture

30 Dec 2013 - 11:42 am | मदनबाण

:)

सुहास..'s picture

30 Dec 2013 - 12:59 pm | सुहास..

=))

युगन्धरा@मिसलपाव's picture

30 Dec 2013 - 2:34 pm | युगन्धरा@मिसलपाव

ओके माहितच न्हवत मला असाही साहित्यप्रकार असतो ते.

नगरीनिरंजन's picture

30 Dec 2013 - 2:50 pm | नगरीनिरंजन

भारीच!
अनवट प्रसंग आणि लहान मुलांची इन्जेन्युइटी दाखवणार्‍या या शतशब्दकथा फारच आवडतात.
लिहीत राहा.

यसवायजी's picture

30 Dec 2013 - 3:06 pm | यसवायजी

नाद खुळा..

जयनीत's picture

30 Dec 2013 - 7:45 pm | जयनीत

वाटलं नव्ह्तं वं पोट्टे तुह्या कडं बगून इतकि इचक असशील त्ये!!!

आतिवास's picture

30 Dec 2013 - 9:31 pm | आतिवास

"इचक" म्हणजे? "भोचक?"
वा! आन्जीच्या निमित्ताने मिपाकरांकडून बरेच नवे शब्द कळताहेत मला :-)

जयनीत's picture

31 Dec 2013 - 8:30 pm | जयनीत

उचक वाचक ह्या वरुन कदाचित 'इचक ' किंवा ' इच्चक ' हा शब्द निघाला असावा.

आमच्या विदर्भात हा शब्द खुप वापरला जातो बदमाश पोट्टे लोकाई साठी म्हनुनशान तसं म्हटलं

आमच्या विदर्भात हा शब्द खुप वापरला जातो बदमाश पोट्टे लोकाई साठी म्हनुनशान तसं म्हटलं
:-)
शब्द वापराबद्दल काहीच नाराजी नाही हो, शब्द मला माहिती नव्हता म्हणून त्याचा अर्थ विचारला इतकंच.
शब्द या प्रसंगाला चपखल बसतो आहे हे वेगळे सांगायला नको :-)

नाही हो, तुम्ही फक्त शब्दाचा अर्थ विचारला त्यात तक्रारीचा सूर नव्ह्ता. मलाच घाई असल्या मुळे घाईगर्दीत टायपण्यात घोळ झाला .
असो.
'गपचिप' मस्त जमली आहे आता पुढेही असेच खुसखुशीत लेखन येऊ द्या.

चिगो's picture

11 Jan 2014 - 6:08 pm | चिगो

ईचक (उच्चार 'ईच्चक') म्हणजे काडेल (काड्या करणारा/री) बदमाश, शायनी पोरं.. विदर्भातले काही आणखी शब्द सांगायचे झाल्यास 'भैताड' , 'बह्याड' (मुर्ख), इपित्तर (काडेल).. बाकीचे आठवल्यावर सांगतो.. आंजीचा च्या आवडला, हे वेगळं सांगायलाच नको.. लिहीत्या रहा, ही विनंती..

आतिवास's picture

11 Jan 2014 - 10:21 pm | आतिवास

अरे वा! एकदम बरेच नवीन शब्द मिळाले. जमतील तशी भर घाला त्यात :-)

इचक हा शब्द नवीन होता. बाकी भैताड अन बह्याड हे ऐकले होते. इपितर हा सोलापूरच्या मित्राकडून ऐकला होता. भैताड शब्द बाकी आवडला. बादवे सोलापुरात मूर्ख म्हणायचे असेल तर 'गहिन्या' असंही म्हणतात.

चिगो's picture

12 Jan 2014 - 12:57 pm | चिगो

'गहिन्या' म्हणजे आमच्याकडच्या 'मख्या' ('मक्या' नव्हे, ते वेगळं बह्याड आहे.. ;-) ) शब्दासारखा आहे..

इपितर मराठवाड्यात पण चालते. आवचिंदर चा अर्थ जवळपास तोच. :) त्याचाच शॉर्टफॉर्म चंद्रा, म्हणजे "गाबडं लै चंद्रा हाय" आसा. गहिन्या (गैन्या) पण भारीच वापरला जातो पण बार्शी परांडा साईडला तो गैबान्या असा होतो. ह्याचा अर्थ मात्र गहाळ, गबाळा असा होतो.

पैसा's picture

12 Jan 2014 - 7:28 pm | पैसा

'गैबती' हा शब्द ऐकला अहे.

हाहाहा ;) गहिन्या, गाबड्या हे आमच्या षोडशपुरनिवासी मित्रगणांचे परमप्रिय शब्द!!!

बाकी चिगो, नवा शब्द सांगितल्याबद्दल धन्यवाद!

प्यारे१'s picture

12 Jan 2014 - 4:03 pm | प्यारे१

>>>इपित्तर

असंच इचिपितर ऐकलं होतं. विचित्र सारखं असावं काही.

पद्मश्री चित्रे's picture

31 Dec 2013 - 9:57 am | पद्मश्री चित्रे

छोट्या मुलीची छोटी कथा मस्त.

आतिवास's picture

31 Dec 2013 - 3:46 pm | आतिवास

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.

जयंत कुलकर्णी's picture

31 Dec 2013 - 5:18 pm | जयंत कुलकर्णी

फुर्र...
आमची मैत्री येकदम घट्ट
भेटल्याशिवाय चैन नाही
सगळे दुसऱ्यांदा चा पितात. आमाला मात्र नाही.
आण्णा म्हन्त्यात, “काम धंदा कर चहा नको ढोसू उगा.”
त्यादिशी सासरा आल्ता. बायको च्या दिऊन बोलत बसली तितचं.
मला म्हन्ली, “जरा साखर दुध घेऊनशान या बाबाला परत चा पायजे.”
आता सासरे व्हते; तेंच्यासमोर बायकोचं ऐकाया पायजे ना!
सासऱ्यानी कपात उलिसा च्या तसाच ठुला व्हता.
म्या पिऊन टाकावा म्हटल तो गपचिप.
एकदम बाद आयडिया....
तवापासून आले पावणे, की पड बाहेर् ...
पारावर जा.....
पावणे नाय आले तर?
पांड्या म्हनत होता आंजीच्या घरावरुन जा
आंजी बोलावतिया
“आई-आण्णा बोलावत्येत” म्हनूनशान.
तिची आय करतेच च्या.
म्याबी पितो.
फुर्र फुर्र....
दुसऱ्यांदा....तिसऱ्यांदा.

:-)
बघा, आणि लोकांना उगीच शंका की आन्जीच्या बोलवण्यावर कोण घरी यायला बसलंय (आणि आन्जीला कुठला चहा मिळतोय) म्हणून.. आन्जीला उलिसा च्या ठेवताय नव्हं कपात :-)

कल्पनाविस्तार आवडला.

जयंत कुलकर्णी's picture

31 Dec 2013 - 7:39 pm | जयंत कुलकर्णी

अर्थात तुमच्या एवढे काही जमलेले नाही आणि ते शक्यही नाही. आन्जीच्या निरागस बनेलपणाची कमाल बाप्यांमधे कुठली यायला ? :-)

चाणक्य's picture

1 Jan 2014 - 10:56 am | चाणक्य

नेहमीप्रमाणे...आवडली

आंजीला नवीन वर्षात कप भरून च्या मिळो !

तिमा's picture

1 Jan 2014 - 6:34 pm | तिमा

शतशब्दकथा आवडली. न मिळणार्‍या गोष्टीचे जास्त आकर्षण असते लहान मनांत, हे अगदी स्वानुभवावरुन पटले.

आण्णा म्हन्त्यात, “चहा नको पिऊ; काळी होशील.”

असे लहान मुलांना काहीबाही सांगून, त्यांचा हिरेमोड करणारेही लहानपणी खूप बघितलेत.
तसेच,मुंजीत उगाचच, आता तुझी मांडी कापून त्यांत बेडुक भरतील हाँ! असले घिसेपिटे विनोद करणारे काका लोकही बघितलेत.

सहमत आहे.
असे लहान मुलांना काहीबाही सांगून, त्यांचा हिरेमोड करणारेही लहानपणी खूप बघितलेत.
लहान मुला-मुलींशी काही लोक असे विचित्र वागतात - हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे - म्हणजे इतका मोठा आहे!

राही's picture

2 Jan 2014 - 12:45 am | राही

या मुलीला निरागस म्हणावे की बिलंदर? खरे तर मुलांवर असा एकाच गुणाचा छाप मारता यायचा नाही. मुले एकसुरी नसतातच शिवाय मोहकपणे चंचल असतात. क्षणात एक स्वभाव तर क्षणात दुसरा. त्यांच्यावर एकाच स्वभावाचा शिक्का अजून बसायचा असतो.
सर्व कथा आवडत आहेतच.

त्यांच्यावर एकाच स्वभावाचा शिक्का अजून बसायचा असतो.
सहमत. स्वतःला हवं ते कसंही मिळवायचा प्रयत्न करणं ही स्वाभाविक प्रवृत्ती दिसून येते लहानपणी. लहान मुला-मुलींच्या वागण्यावर मोठ्यांचा काय प्रतिसाद मिळतो त्यावरुन मग स्वभाव 'बनत' जातो माणसाचा असं मला वाटतं. बरोबर-चूक - माहिती नाही.

ऋषिकेश's picture

2 Jan 2014 - 9:08 am | ऋषिकेश

'गोंडस' कथा! आवल्डी :)

नक्शत्त्रा's picture

2 Jan 2014 - 12:09 pm | नक्शत्त्रा

आवडेश!

मीराताई's picture

2 Jan 2014 - 12:14 pm | मीराताई

गमतीदार आहे कथा. आवडली.

पैसा's picture

9 Jan 2014 - 8:55 pm | पैसा

आंजीकथा न्हेमीप्रमाणे झक्कास! जयंत कुलकर्णींची पूरक कथा पण मस्त झालीय. एक सुरुवातीचे कथासूत्र घेऊन अशा शतशब्दकथा बाकीच्यांनी एका धाग्यात लिहीत जायच्या असा काही प्रयोग करा बघू!

आतिवास's picture

9 Jan 2014 - 9:51 pm | आतिवास

कल्पना चांगली आहे. पाचेक (तसे दोन-तीनही चालतील म्हणा) लोक तयार झाले तर प्रयोग करुन पाहता येईल. त्या प्रयोगाचा विषय अर्थात सर्व सहभागी सदस्यांनी चर्चेतून ठरवावा - म्हणजे आन्जीच्याच कथा लिहायला पाहिजेत असं नाही :-)

फक्त पुढाकार कोणीतरी घेतला पाहिजे इतकंच ;-)

वात्रट मेले's picture

12 Jan 2014 - 7:34 pm | वात्रट मेले

च्या लै भारी व्ह्ता.....उलिसा माला भी दे ना.

चित्रगुप्त's picture

12 Jan 2014 - 7:54 pm | चित्रगुप्त

लै मंजे लईच भारी राव.

येक डाव शेरातले पावणे आल्ते.
त्ये म्हण्ले आमी च्या पीत नाय, कापी पितो.
आता कापी म्हंजे काय, आमास्नी कुनालाबी ठऊक न्हायी.
आई म्हन्ली की जा गं, शेजारच्या बामण वैनीस्नी इच्यारून ये.
बामण वैनी म्हन्लि, अगो कापी नव्हे कॉफी म्हणतात कॉफी.
शिष्टच हाय वैनी.
पन मंग तिनं गरमागरम कापी करून बी दिली.
मलाबी प्याला दिली सुंदर काचेच्या कपात.
शेराचे पावणे तर लई खुस झाले कापी पिऊन.
तवापास्नं कुनी पावणे आले, की मीच आधी इच्यारते,
काय घ्येनार, च्या की कापी?
कापी पिनार म्हनाले की धुम धावत सुटते वैनीकडे.

आतिवास's picture

12 Jan 2014 - 9:32 pm | आतिवास

हाहा! जमलाय कल्पनाविस्तार.
आन्जीला काय, च्या असो की कोपी, उलिसा प्यायला मिळाल्याशी मतलब! ;-)

चित्रगुप्तजी आणी जयंत काकाचा कथा विस्तार आवडला .

मनीषा's picture

15 Jan 2014 - 9:38 am | मनीषा

असं वागणं बरं नव्हे, हे पोरीला सांगायला हवं .
लगीन झाल्यावर सासरे म्हणतील .. पोरीला नीट वळण नाही लावलं :(

तिला रोज रोज , हवा तसा चहा मिळो ही सदिच्छा ! :)