अजिंठा

निखिल देशपांडे's picture
निखिल देशपांडे in जनातलं, मनातलं
12 May 2012 - 11:24 pm

अजिंठा झाडांचा...झाडांच्या झुलत्या प्रवाही पाण्यातला...
लेनापूर फर्दापूरच्या गावंढळ गर्दीतला...
बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला...अजिंठा

नितीन चंद्र्कांत देसाई अजिंठ्यावर चित्रपट काढताहेत म्हणजेच काहीतरी भव्यदिव्य असणार असे अजिंठाचे ट्रेलर पाहिल्या पासुन वाटायला लागले होते. त्यामुळे हा चित्रपट पहावा असे मनात होतेच. पारो आणि मे.रॉबर्ट गिल यांची प्रेमकहाणी. ना. धो महानोरांचे अजिंठा हे महाकाव्य आणि डोक्यात बसलेले अजिंठा. या सगळ्या गोष्टींमुळे चित्रपट पाहायची हिंमत आज केली.

चित्रपटाची सुरूवात आम्ही चुकवली त्यामुळे अजिंठ्याचा शोध ब्रिटींशांना कसा लागला वगैरे दाखवले आहे का हे माहीत नाही. सुरवातीलाच एक ब्रिटिश अधिकारी हैद्राबादला, बहुधा निझामासमोर अजिंठ्याच्या लेण्याची महती सांगून रस्ता बांधण्याची परवानगी मागतो. हातोहात एक दुभाष्याही त्याला या कामी दिला जातो. १८२४ ते १८४४ या काळात हे काम पूर्ण होतं आणि या स्थळाचं अनन्यसाधारण महत्व ध्यानी घेऊन ते जतन व्हावं, संवर्धित व्हावं यादृष्टीनं कलेची जाण असलेल्या आणि तरीही मूळ सोजीर असलेल्या मेजर रॉबर्ट गिलची इकडे रवानगी होते. रॉबर्ट इथली लेणी पाहून वेडापिसा होतो. एक संस्कृत-पाली-अर्धमागधी चे जाणकार पंडित आणि निझामाने दिलेला दुभाषा ही चित्रे त्याला अधिक समजाऊन घेण्यासाठी मदत करतात. हे सर्व करताना रॉबर्ट गिलची अजिंठ्याची, इथल्या संस्कृतीशी, त्याद्वारे बुद्धाशी होणारी ओळख आणि या सर्वात त्याची मोलाची साथ देणारी, तसेच प्रेरणास्थान पारो यांची प्रेमकहाणी म्हणजे अजिंठा!

इथं पारोची भूमिका सोनाली कुलकर्णीने केलीय हे सर्वांना ठाऊक आहेच. तिला आदिवासी दाखवताना काळा रंग फासण्याची केलेली कसरत अगदी दिसून येते. तिने अभिनयाचा प्रयत्न बरा केलाय, पण तिच्या मूळ व्यक्तिरेखेतच काहीतरी उणीव असल्याचं जाणवतं. मेजर गिल, फिलीप स्कॉट वॉलेस हा अगदी त्या भूमिकेत फिट वाटतो. आपली भूमिका नीट समजून उमजून केलीय हे चांगलं जाणवतं. दुभाषी झालेल्या मनोज कोल्हटकरने आणि मेजर गिलनेच काय तो मनापासून अभिनय केलाय असं चित्रपटभर वाटत राहतं. आणि हो, आपले अविनाश नारकर राह्यलेच. मेजर गिलला बुद्धाच्या जातक कथा सांगणार्‍या पंडिताची भूमिका त्यांच्या वाट्याला आलीय. तिथे त्यांनी ओव्हरअ‍ॅक्टिंग न करून त्यांचा वावर बर्‍यापैकी सुसह्य केलाय. यावेळी नारकर बाबांची ही उणीव उभ्या आयुष्यात केसाला फणी न लावलेल्या मकरंद देशपांडेंनी इतकी भरून काढलीय की जणू हा त्यांना मिळालेला पहिलाच रोल की काय असं वाटावं.

आपलं आर्ट डायरेक्शन, सेट, स्टुडिओ यासगळ्याच्या माध्यमातून आपली निर्मिती ही भव्यदिव्यच होईल असं वाटून बहुधा नितीन देसाईंनी दिग्दर्शनाकडे दुर्लक्ष केलंय असं हा चित्रपट पाह्यल्यावर वाटतं. चित्रपटाकडे एकूणच पॅकेज म्हणून पाहताना, त्यातल्या अनेक त्रुटी प्रकर्षाने जाणवतात. मी इथे वानगीदाखल काही देतोय, जाणकार राहिलेला प्रकाश टाकतीलच.

१. चित्रपटाच्या सुरवातीस एक होळीचं गाणं दाखवण्यात येतं. त्यात ते गहू-हरभरा मुबलक प्रमाणात पिकल्याचं सांगतात. शब्द अर्थात महानोरांचेच आहेत. पण १८४५ साली अजिंठ्यातल्या आदिवासी/बंजारा समाजातले लोक गहू पिकवत असतील का असा प्रश्न येतोच येतो.
२. लगोलग मेजर गिलला एक शेतकरी एक मोठ्ठासा कॉलीफ्लॉवरचा गड्डा भेट म्हणून देताना आणि तेव्हा त्यांच्याकडे फ्लॉवरचं पीक यायचं याचा पुरावा म्हणून कॉलीफ्लॉवरचे शेतही दाखवून टाकलंय.
३. गावात लोहार आहेत, पण गावातले आदिवासी मात्र बांबूपासून तयार केलेली शस्त्रे वापरतात.
४. १८४५ साली बोगनवेलीची झाडे भारतात होती का? इथे बघावं त्या फ्रेममध्ये फुलं आहेतच, त्यात जिकडेतिकडे बोगनवेलिया बघून हा प्रश्न आल्यावाचून राहात नाही.
५. मध्येच कुठेतरी एक फुलपाखरू गिलकडून पारोकडे आणि पारोकडून गिलकडे फिरतं. हे अ‍ॅनिमेशन अक्षरश: अगदीच हास्यास्पद झालं आहे.

असो. चित्रपट बघताना डोके बाजुला ठेवायचे मान्य. पण कोणी जर आम्ही खुप रिसर्च करुन हा पिक्चर तयार करतोय असे क्लेम करत असेल तर अशा गोष्टी मला खटकतात आणि उरलेल्या पिक्चरची मजा घालवतात. सिनेमा पाहून मनात बरेचसे प्रश्न उद्भवले आणि थोडा गुगल सर्च केला असता रॉबर्ट गिलबद्दल रोचक माहिती मिळाली. त्याचा पणतू की खापरपणतू आयर्लंडमध्ये राहतो आणि २००२ मध्ये तो आपल्या पणजोबांबद्दल माहिती शोधत फिरत होता. त्या बिचार्‍याने हा चित्रपट पाहावा. अर्थात मी महानोरांचे काव्य वाचलं नाहीय, त्यामुळे मूळ कथा काय, त्यावर महाकाव्यात त्यांनी घेतलेलं काव्यात्मक स्वातंत्र्य किती आणि त्यानंतर नितीन देसाईंनी घेतलेली सिनेमॅटिक लिबर्टी कितपत हे मला माहित नाही, तरीही फारशा अपेक्षा ठेवून चित्रपट पाहायला जाऊ नये. रिसर्च म्हणजे काय केले असा प्रश्न विचारावा वाटतो. कदाचित फ्लॉवर खेडोपाडी पोहचवण्याचा रिसर्च केलेला दिसतो.

असा चित्रपट पाहिला की "मराठी चित्रपटांना बरे दिवस आलेत का?" अशा वागळे छाप चर्चांना मोठ्याने ओरडून नाही म्हणून उत्तर द्यावे वाटते. मराठी चित्रपटांची विषय निवड नक्कीच वेगळी असते पण एक्झीक्युशन मधे आपण कुठे तरी मागे पडतो. आपले चित्रपट बरे असतात पण त्यात अजून सुधारणांना वाव असतो. भव्यदिव्यतेच्या मागे लागून आपण चित्रपटाच्या बेसिक डीटेलिंग कडे दुर्लक्ष केलं जात आहे. गेल्या काही दिवसात पाहिलेल्या, देउळ, बालगंधर्व, शाळा, गोळाबेरीज, या चित्रपटातून हेच जाणवत आहे. चित्रपट म्हणजे छानशा लोकेशनचा लाँग शॉट, किंवा भव्य दिव्य सेट, दागिने यांचा भडिमारा असा तर आपला गैरसमज होत चाललेला नाही ना?

कलासंस्कृतीनाट्यसाहित्यिकचित्रपटलेखआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

पैसा's picture

12 May 2012 - 11:35 pm | पैसा

हम्म. म्हणजे कॉस्मेटिक सर्जरी करूनही हिरविण तितकीशी बरी दिसत नाय म्हणा की! असो. अजंठा लेण्यांचा भाग तरी नीट आला आहे का? आणि लेण्यांमधे सिनेमाचं शूटिंग करायला परवानगी मिळते का?

मायला ! एवढा बोगस सिनेमा आहे?
बरं झालं. हे लिहीलंत त्याबद्दल धन्यवाद. :)
एकवेळ पुन्हा अजिंठ्याला जाऊन येऊ आणि तिथल्या उगाच फुटकं तुटकं हिंदी इंग्रजी बोलणार्‍या गाईडकडून अजिंठा काय आहे ते समजून घेऊ, पण सिनेमा पाहणार नाही. :)

भडकमकर मास्तर's picture

13 May 2012 - 1:05 am | भडकमकर मास्तर


असा चित्रपट पाहिला की "मराठी चित्रपटांना बरे दिवस आलेत का?" अशा वागळे छाप चर्चांना मोठ्याने ओरडून नाही म्हणून उत्तर द्यावे वाटते.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

हाहा... काय राव संस्थळावर रिव्यू लिहिताना सिनेमाचं कौतुक करायचं असतं.... भव्य दिव्य वगैरे... मराठी सिनेमा मोठा झाला... ....." छान वावरलाय, उत्तम अभिनय केलाय.. नितीन देसाई म्हणजे प्रश्णच नाही.. रोमांच उभे राहिले " ... तुमच्या
अशा रिव्यू ने प्रोत्साहन कसे मिळणार? ... ;)

सोनाली कुलकर्णी(ज्यु.) बाईंना अभिनय येतो असे म्हणणे धाडसाचेच नाही तर येडेपणाचे ठरेल. चित्रपटाचा ट्रेलर पाहतानाच बाईंना काळा रंग फासलेला दिसत होता. ट्रेलर बघूनच उत्सुकता कमी झाली होती. तुमच्या लेखाने ती संपवली. नितिन देसाईंचे नाव वाचून तरी बघायची इच्छा चाळवली गेली होती. बरे झाले तुम्ही इथेच विल्हेवाट लावलीत.
मराठी चित्रपटाला प्रोत्साहन देणे म्हणजे कुठल्याही टिनपाट, खत्रूड, कचरा लेव्हलच्या चित्रपटाला चांगले म्हणणे (पक्षी वाईट न म्हणणे) अशी एक समजूत सध्या रूढ झाली आहे. पण तसे करण्याची काहीही आवश्यकता नाही हेदेखील असले काही चित्रपट दाखवून देत असतात. तुम्ही स्पष्ट शब्दात लिहिल्याबद्दल धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2012 - 9:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ना.धो.महानोरांच अजिंठा दीर्घ काव्य मला आवडतं. एक हळूवार फूलणारी वास्तव प्रेककथा. अजिंठा वाचतांना वाचक कधी रॉबर्ट गिल होतो, कधी पारो, कधी अजिंठा. तर कधी पारोच्या समाधीवर वाहणारी फूलंही होतो.

अजिंठा चित्रपट हा मला मिळणा-या काव्यातला आनंद हिरावून घेणार असेल तर अजिंठा पाहण्याची मला अज्याबात उत्सूकता नाही. चित्रपटापूर्वीच पारो ही आदिवासी की बंजारा, अशा वादाने चर्चेला आलाच होता. नितीन देसाई आणि ना.धो.महानोरांनी चित्रपटापूर्वी अजिंठा आणि परिसर पिंजून काढल्याच वाचनात आले होते. मागे श्रामोंनी अजिंठ्याच्या गाईडचा उल्लेख केला होता त्या चाचाला अजिंठा ख-या अर्थाने माहित होता त्यांच्यासारख्या जाणकारांनी बरीच माहिती देसाईला सांगितली आणि चित्रपट आकाराला आला असे वाचनात आले होते.

निखिलंच परीक्षण वाचून चित्रपटातल्या पटकथेत आणि दृष्यात अनेक उणिवा आहेत असं दिसतं. अजिंठा चित्रपटच असल्यामूळे काही अधिक-उणे असणारच परंतु हास्यास्पद आणि वास्तवापासून दूर जाणारी दृष्य असतील तर चित्रपटातल्या एका मूख्य विषयाला किती न्याय मिळाला असेल. ते चित्रपट रसिकच जाणो. असो,

सालं या अजिंठा काव्यसंग्रहावर लिहीन म्हणतो. (कधी ते माहिती नाही)

-दिलीप बिरुटे

प्राजु's picture

13 May 2012 - 11:14 am | प्राजु

>>>>>>>>>>>>>>सालं या अजिंठा काव्यसंग्रहावर लिहीन म्हणतो. (कधी ते माहिती नाही)<<<<<

चित्रपटाचं जाऊद्या. हे लिहाच तुम्ही. आणि 'अजिंठा' महाकाव्य असेल तुमच्याकडे तर प्लिज इमेल करा ना मला. :)

मन१'s picture

13 May 2012 - 11:22 am | मन१

अज्याबात हा जिवंत , बोली शब्द कित्येक दिवसांनंतर "गावला" बघा हाताशी.
आभार.

निखिल देशपांडे's picture

13 May 2012 - 11:25 am | निखिल देशपांडे

सालं या अजिंठा काव्यसंग्रहावर लिहीन म्हणतो. (कधी ते माहिती नाही)

याची वाट बघतोय..
लवकर लिहा हो.

सालं या अजिंठा काव्यसंग्रहावर लिहीन म्हणतो. (कधी ते माहिती नाही) >>.

प्रॉमिस करताय का ;)

डोळे ( आमचे, तुमचे नव्हे ;) ) मिटायच्या आधी लिहा. ;)

कुंदन's picture

14 May 2012 - 2:34 pm | कुंदन

>>ना.धो.महानोरांच अजिंठा दीर्घ काव्य मला आवडतं. एक हळूवार फूलणारी वास्तव प्रेककथा. अजिंठा वाचतांना वाचक कधी रॉबर्ट गिल होतो, कधी पारो, कधी अजिंठा. तर कधी पारोच्या समाधीवर वाहणारी फूलंही होतो.

मस्त हो प्रा डॉ , काय भारी लिहिलय हो.

सुहास झेले's picture

13 May 2012 - 10:16 am | सुहास झेले

हम्म्म्म..... बघणार नव्हतोच :) :)

प्राध्यापक's picture

13 May 2012 - 10:22 am | प्राध्यापक

एकदम सहमत,
नितीन देसाइ एक चांगले आर्ट डायरेक्टर असतील सेट, स्टुडिओ या बाबत त्यांना माहीती असेल पण दिग्दर्शन......थोडे लांब राहीलेलेच बरे.

बाकी स्मिता पाटील ची आठवण झाली,अशा भुमिकांचे सोने करण्याची क्षमता त्यांच्यातच होती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2012 - 10:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> बाकी स्मिता पाटील ची आठवण झाली,अशा भुमिकांचे सोने करण्याची क्षमता त्यांच्यातच होती.

जैत रे जैतची आठवण झाली. पारो अशीच पाहिजे होती.
तसंही आपल्या वाटण्याला काय अर्थ असतो म्हणा.

-दिलीप बिरुटे

५० फक्त's picture

14 May 2012 - 8:45 am | ५० फक्त

+१०००००००००, जैत रे जैत आणि स्मिता पाटिल, या पेक्षा नैसर्गिक आदिवासी फक्त नॅशनल जिओ. च्या डॉक्युमँटरी मध्ये असतात कधी कधी.

मन१'s picture

13 May 2012 - 11:25 am | मन१

परिक्षण उत्तम. चित्रपट कॉलीफ्लॉवरप्रमाणे सच्छिद्र व भुसभुशीत असावा का काय असे वाटते.
सोनाली ज्यु. ह्यांना अशा भूमिका देणे म्हणजे आमच्या सन्नी देओल साहेबांनी तलम गुलाबी , हळुवार लव्हर बॉय करायला लावणे. किंवा बंधू बॉबी ह्यास ड्यान्स करायला लावणे. डोळ्यावर काळी पट्टी घट्ट बांधल्या शिवाय असले काही बघायच्या फंदात पडू नये हे खरेच.

भडकमकर मास्तरांची प्रतिक्रिया तर हुच्च आहे.
तरीही हल्ली हल्ली आपल्याकडे जे काही चित्रपट बनताहेत ते अगदिच काही टाकाउ नाहित.(बहुतांश सर्वच बॉलीवूडी मेन स्ट्रीम पेक्षा उल्लेख केलेले मराठी चित्रपट उजवे आहेत. मी अगदि तिकिट काढून पाहिलेले आहेत.)

मृगनयनी's picture

14 May 2012 - 5:10 pm | मृगनयनी

सोनाली ज्यु. ह्यांना अशा भूमिका देणे म्हणजे आमच्या सन्नी देओल साहेबांनी तलम गुलाबी , हळुवार लव्हर बॉय करायला लावणे.

:( :( :( :| असहमत! .. सोनाली कुल्कर्णीचं काम इतकंही वाईट नाहीये.. सावळ्या रंगातही ती गोडुस दिसते.. आदिवासी-अपुर्‍या वस्त्रात असली, तरी ती बिल्कूल 'व्हल्गर' वाटत नाही.... :)
फक्त तिच्या आणि तिच्या मयतरीनींच्या गुन्डाळलेल्या काही साड्या पाहून त्या आदिवासी असल्याचे बिल्कूल वाटत नाही.. काही दिवसांनी मार्केटमध्ये इतक्या सुन्दर साड्या आल्या.. तर त्यांची किम्मत २-३ हजारांपेक्षा कमी नसेल! साड्या खूप सुन्दर होत्या.. डिझाईन्स अप्रतिम!!!!... आवडेश!!.. :)

"गिल साहेब" तर छानच!
'मकरन्द देशपांडे' बेवडा (आणि मरतुकडा) आदिवासी म्हणून शोभतो.. ;)
अविनाश नारकर्राना पिच्चरात घ्यायचा मोह यावेळीही देसायांना आवरलेला नाही.. नारकराचा आवाज ऐकायला नकोसे वाट'थे'. कारण त्यांचा आवाज धड भसलेलाही नस'थो'.. किन्वा पुहुर्णपणे पिचलेला पण नस'थो'.. =)) =)) =))
मनोज कोल्ह्टकरांनी भूमिकेस पूर्ण न्याय दिलेला आहे..
अ‍ॅनिमेटेड फुलपाखरू खरोखर फनी वाटतं! :)

बाकी भित्तीचित्रे, गौतमबुद्धाचा शान्त प्रसन्न चेहरा. त्याभोवतालच्या पणत्या.. यांचे चित्रीकरण खूप मनमोहक वाटते. :)

_______-

मध्ये "बन्जारा क्रांती दला"ने पिक्चरवर घेतलेल्या आक्षेपामुळे या पिक्चरचे पोस्टर्स मल्टीप्लेक्स'च्या आतही कुठे दिसले नाहीत. :)

रेवती's picture

13 May 2012 - 11:26 am | रेवती

ट्रेलर पाहिला आत्ताच तूनळीवर्........

निखिल देशपांडे's picture

13 May 2012 - 11:30 am | निखिल देशपांडे

(बहुतांश सर्वच बॉलीवूडी मेन स्ट्रीम पेक्षा उल्लेख केलेले मराठी चित्रपट उजवे आहेत. मी अगदि तिकिट काढून पाहिलेले आहेत.)

मनराव हे सर्व चित्रपट व ईतर अजुन काही मीही तिकिट काढुनच पाहिले आहेत. त्यांचा विषय निवडी बद्द्ल मला त्यांना मार्क द्यावे वाटतातच पण वर म्हणल्याप्रमाणे काही बेसिक गोष्टी मिस केल्या जातात. त्यामुळे चित्रपटाची मजा निघुन जाते. मराठी चित्रपट न चालण्याबद्दल निर्माते प्रेक्षकांना जवाबदार धरतात त्यापेक्षा त्यांनी आपले प्रॉडक्ट तपासावे एवढेच मला म्हणायचे आहे.

बापु देवकर's picture

13 May 2012 - 6:06 pm | बापु देवकर

विचार करत होतो कि बघावा..अर्थात नितिन देसाइ याचंयामुळे.
पन राव तुम्हि माझे पैसे वाचावले ... थान्कुं

रमताराम's picture

14 May 2012 - 9:32 am | रमताराम

एकवेळ मराठी चित्रपट चाकोरी सोडतील पण जालावरची परीक्षणे काही पठडी सोडत नाहीत असे दिसते. असो.

नाना चेंगट's picture

14 May 2012 - 10:31 am | नाना चेंगट

+१

मस्त कलंदर's picture

14 May 2012 - 6:10 pm | मस्त कलंदर

जेव्हा निर्माता-दिग्दर्शक आम्ही खूप संशोधन केलं आहे असं जिथं तिथं सांगत असतात,काहीतरी माफक अवधान आणि व्यवधान असावं अशी प्रेक्षक म्हणून माझी अपेक्षा असते. माझ्यामते संशोधन म्हणजे त्या कलाकृतीच्या अनुषंगाने तत्कालिक सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक, भौगौलिक अभ्यास होय आणि त्यात तेव्हाचं अर्थकारणही लक्षात घ्यावयास हवं. यातलं बरंचसं या चित्रपटात झाल्याचं दिसत नाही. मूळ काव्याशी इमान राखलं आहे की नाही हे मी ते काव्य न वाचल्याने माहित नाही, पण जालावरच्या माहितीनुसार पाहिलं तर एकंदरीतच 'उरकण्याचा सोहळा' झाल्यासारखा वाटतोय.

मूळ परिचयात मला खटकलेल्या गोष्टी आल्या आहेतच, म्हणून आता ही फक्त भरः
१. चित्रपटाच्या नायिकेचं खरं नांव काय, पारो की पारू? मराठी म्हणून 'पारू' हे नांव जास्त योग्य वाटतं. गुगलवर देखील जिथं तिथं पारूच आहे. मग इथं ही 'पारो' का म्हणून? की ती गेल्यानंतर गिलला दुसरा काही उद्योग न करता देवदासासारखा भणंग भटकताना दाखवलाय म्हणून?
२. पुन्हा एकदा गुगल माहितीवरूनच मेजर गिल व पारो यांची कहाणी १८४५ ते १८५६ या काळात घडते. पण चित्रपटात हा काळ अत्यल्प दिसतो, साधारण तीन वर्षांचा. पात्रांच्या संवादांवरून किंवा प्रत्यक्ष दिसण्यावरून तरी इतक्या वर्षांचा कालावधी गेल्याचं जाणवत नाही. कालावधीवरून गिलने आपल्या आयुष्याची किती वर्षे अजिंठा चितारण्यात व्यतीत केली ते कळतं. तो काळ एकमेकांची भाषा शिकायला पुरेसा असतो, तसेच जेव्हा इतकी खपून काढलेली चित्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात, त्या मागची वेदना जास्त जाणवते. (कालावधीच्या अनुषंगाने आणखी अनेक मुद्दे येतील, पण ते नकोच. पिक्चरची पारच चिरफाड होईल)
३. चित्रपटातलं नाचकाम अगदी भारी आहे. कधी ते अगदी आदिवासींचं असावं हुबेहूब येतं, तर कधी सोनालीबाई चिकनीचमेली छापाच्या स्टेप्स घेतात.
४. बालगंधर्वनंतर अजिंठा बघितल्यानंतर देसाई म्हणजे पोषाखी भव्यदिव्यच असायला पाहिजे हे नक्की झालं. १९च्या शतकात आदिवासी बायका जरीकाठी साड्या नेसतात, त्याही सफाईदार कशिदाकाम केलेल्या. पुरूष अंगभर बंडी-धोतर घालतात, बायकांच्याकडेही लांबलचक साड्या आहेत, पण त्या नेसण्याची ढब मात्र रँपवरच्या ललनांची आहे. दोन हात पदर वार्‍यावर उडायला सोडून कमरेभोवती आवश्यक तितकंच गुंडाळलंय. ते कमी का म्हणून वेगवेगळ्या ब्लाऊजची फॅशन पण आहे. अगदी कंचुकीछापा (टुयूब)पासून हॉल्टरनेक, वन शोल्डर्स व स्लीव्हलेस पर्यंत सगळं काही आहे. आणखी छिद्रान्वेषीपणा करायचा तर साड्या जरीकाठी गढवाल कॉटन, जरीकाठी हैद्राबाद (बहुतेक मंगलगिरी) कॉटन आणि राहिलेल्या प्रिंटेड्+एम्ब्रॉयडरी सिल्क आहेत.
५. जी कथा कपड्यांची तीच दागिन्यांची. लोहारलोक शस्त्रं तयार करत नाहीत म्हणजे सगळ्यांना ऑक्सडाईज्ड दागिने बनवाय्च्या कामाला जुंपलेले दिसतात. आजही लमाणांपासून पारध्यांपर्यंत सर्वच स्त्रिया दागिने घालतात, पण ते वेगळ्याच धाटणीचे, फॅशन अ‍ॅक्सेसरीज नाही! जैत रे जैत मधले अस्सल ठाकर लोक कुठे आणि हे अजिंठ्यातले तथाकथित आदिवासी कुठे?
६. बोगनवेलियाच्याच काय, इतर पानाफुलांचा इतका भडिमार केला आहे, की एके ठिकाणी ती एका कापडामागे कपडे बदलते, त्यालाही वरून पानं-फुलं चिकटवली आहेत. या वर्षीच्या मार्चमध्ये वेरूळ लेणी पाहायला गेले होते. सगळी झाडे निष्पर्ण होती. नाही म्हणायला पांगिर्‍याची लाल भडक फुले आणि एखादुसरं पान तेवढं दिसलं. दोनशे वर्षांपूर्वी अजिंठ्याचं इतकं तापमान नसलं, तरी होळीच्या मोसमात अगदी एनचांटिंग केरलाटाईप्स तरी नसावं. दाखवायचंच असेल तर वैराण वाळवंटातदेखील सौंदर्य असतं, फक्त ते दाखवण्याची हातोटी हवी.
७.देसाईंच्याच 'राजा शिवछत्रपती' मध्ये भली मोठी फौज म्हणून वीस-पंचवीसजण दाखवले जातात, पण सिनेमात मात्र बगळ्यांचा उल्लेख असलेल्या गाण्यात अजिंठ्याच्या परिसरात बगळे स्थलांतरित होऊन येतात की कायसेसे वाटावे.
८. गिलच्या पेंटिंग्जसोबतच त्याचं छायाचित्रणावरतीही प्रभुत्व होतं. याचा उल्लेख शेवटी एका पाटीवर येतो. तो तिच्या प्रेमात वेडा झाला वगैरे ठीक आहे, पण त्याचं एकूण कार्य दुर्लक्षिलं गेल्यासारखं मला वाटलं. म्हणजे सिनेमात एक कथा फक्त दिसते, सत्य जाणून घ्यायचं असेल तर गुगल करा असं थोडक्यात म्हणणं दिसतं.
९. आपला सिनेमा परदेशी चित्रपटमहोत्सवात दिसेलच असं आपल्या निर्माते-दिग्दर्शकांना का वाटतं> आणि जर वाटतं, तर तितकी मेहनत घेऊन सत्याशी कमीत कमी फारकत घेतलेला सिनेमा का बरे काढत नाहीत? जरी सिनेमात फक्त प्रेमकहाणी दाखवायची असली, तरी मेजर गिलने अजिंठ्यासाठी जे केलं, ते स्मरता त्याच्या व्यक्तिरेखेवर अन्याय केला आहे असं वाटतं.

त्यातल्या त्यात भारतीय तत्वज्ञान नारकरांच्या मुखी चांगलं वदवलंय, आणि मेजर-दुभाष्या यांची कामं चांगली झाली आहेत, अजिंठ्याचे सेट्स बहुतेक खास उभारले असावेत, ते चांगले झाले आहेत एवढंच दु:खातलं सुख आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

14 May 2012 - 6:37 pm | बिपिन कार्यकर्ते

अगागागागा! जबरी! देसाईंनी वाचावंच हे. मूळ धाग्यात कमी पडलं म्हणुन वर हे. हे वाचून, हा चित्रपट बघायची उरलीसुरली हिंमतही जाईल असं वाटतंय. पैसे टाकुन तर नक्कीच नाही बघणार आता. टिव्हीवर येईलच लवकर! तेव्हा बघू.

स्मिता.'s picture

14 May 2012 - 7:12 pm | स्मिता.

छे! हिंमत वगैरे काही गेली नाही. उलट निखिल आणि मकीचं परिक्षण वाचून चित्रपट बघायचाच असं मी ठरवलं आहे. आता आपली मराठीवर आला की पाहिलाच जाईल.

पैसा's picture

14 May 2012 - 7:39 pm | पैसा

विनोदी म्हणून बघायला काय हरकत आहे?

बिपिन कार्यकर्ते's picture

14 May 2012 - 7:48 pm | बिपिन कार्यकर्ते

माझ्या मते अति झालं आणि हसूही नाही आलं मात्र डोकं दुखलं असं होईल!

सूर्यपुत्र's picture

15 May 2012 - 11:53 am | सूर्यपुत्र

कॉमेंट्स करणारे प्रेक्षक असतील, तर अजिबात डोकं दुखणार नाही. मी तर 'अजिंठा' नावाचा अतिशय विनोदी पिक्चर बघितला.

-सूर्यपुत्र.