द स्पिरिट ...

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
14 Mar 2012 - 10:23 am

पूर्वीचा भाग: झुईं..

राईट ब्रदर्सनी हवेपेक्षा जड इंजिनवर चालणारं आणि पायलटच्या हाती संपूर्ण कंट्रोल्स असलेलं विमान उडवून दाखवलं. माणूसप्राण्याचा हा एक जबरदस्त लोभस गुण आहे की एकदा "ब्रेक थ्रू" सापडला की पुढे सुधारणा करुन तंत्र परफेक्ट बनवण्याचं काम हा प्राणी फार झपाट्याने करतो. राईट्सनी आपल्या विमानात सुधारणा करत करत ते आणखी स्थिर बनवलं.. आणखी नियंत्रित बनवलं...

नव्या तंत्राचा पहिला उपयोग आपण माणसं ज्यासाठी करतो त्यासाठी, अर्थात युद्धासाठी, विमानाचा वापर शोध लागताक्षणीच सुरु झाला. बर्‍याच देशांनी हलकीफुलकी विमानं स्वतःच्या सैन्यात "ठेवली" होती. नोव्हेंबर १९११ मधे विमानातून जगातलं पहिलंवाहिलं बॉम्बिंग झालं. इटलीकडून तुर्कस्तानवर. विमानाचा शोध सार्थकी लागला असं म्हणायला जीभ रेटत नाही.. पण पहिला उपयोग झाला तो असा.

महायुद्धाच्या आसपास आणि नंतरही बार्नस्टॉर्मर्स नावाचा पायलट्सचा प्रकार तयार झाला. हे लोक सर्कशीप्रमाणे किंवा तमाशाची पालं पडतात तसे विमान घेऊन अमेरिकाभर किंवा आपापल्या देशात फिरत, आय मीन उडत रहायचे. ते शेतांमधल्या मोकळ्या सपाट जागा वापरुन अक्षरश: कुठेही लँडिंग करायचे. शक्य तेवढ्या अ‍ॅक्रोबॅटिक कसरती करुन लोकांच्या मनात धडकी कम थरार भरवायचे. मग त्या त्या गावातल्या एखाद्या धाडसी अन श्रीमंत मनुष्याकडून पैसे घेऊन त्याला थोडीशी आसमान की सैर घडवून आणायचे..

हळूहळू या बार्नस्टॉर्मर्सनी एकत्र येऊन एअर शोज सुरु केले. पैजा लावणं, विमानांच्या शर्यती अशा थरारक खेळांना या लोकांनी इतकं फेमस करुन टाकलं की त्यामुळेच जास्त जास्त वेग आणि जास्त जास्त तंत्र असलेली विमानं तयार करण्याला दणकट आर्थिक पाठिंबा मिळायला लागला. अन्यथा हे झालं नसतं.

त्या निमित्ताने का होईना पण हळूहळू बर्‍यापैकी विमानं तयार व्हायला लागली.. १९२० नंतरचा काळ म्हणजे विमानांना एकदम सुगीचा काळ म्हणतात तसा होता. पण..

पण.. कितीही हातपाय मारले तरी "सरड्याची धाव..." म्हणतात तशी विमानाची धाव खूप खूप मर्यादित होती.

ही होती अंतराची मर्यादा...

ढसाढसा पाणी पिणार्‍या बैलांसारखी ही विमानाची इंजिनं इंधन प्यायची.. मग पुन्हापुन्हा इंधन भरावं लागणं आणि त्यासाठी लांब अंतराची फ्लाईट न करता येणं..

झालंस्तर इंजिनंही आताच्या मानाने असली कंडम होती की त्यात बरेच पार्ट उघडे असायचे.. म्हणजे व्हॉल्व, शाफ्ट्सचे भाग आणि असे अनेक भाग हवेतच उघडेनागडे गरागरा किंवा धडाधडा फिरत असायचे. एक छोटीशी फ्लाईट झाली तरी हे उघडे पार्टस् कोरडे आणि घाण व्हायचे.. त्यांना ग्रीस वगैरे वंगण लावण्याचं काम दर टेकऑफच्या आधी पुन्हापुन्हा करावं लागायचं. यामुळेही नॉनस्टॉप लांब फ्लाईट शक्य नव्हती.

पण माणसाला इच्छा तर फार.. काहीतरी झालं पाहिजे अशी इच्छा ईश्वरालाही चुकली नाही म्हणून त्याने जग तयार केलं असेल असं म्हणावं तर मग माणसाला इच्छा कशा चुकणार...?

त्याला, पक्षी : माणसाला.. आता वेध लागले विमानाने दूरवर जाण्याचे.. १९१९ साल उजाडलं. या वर्षी रेमंड ऑर्टीग नावाच्या श्रीमंत माणसाने खिसा खुळखुळवत एक भन्नाट ऑफर जगासमोर ठेवली.. आव्हानच म्हणा ना.. जो कोणी पायलट येत्या पाच वर्षांत विमानातून एकदाही न थांबता न्यूयॉर्क ते पॅरिस.. अर्थात नॉनस्टॉप अटलांटिकपार जाईल त्याला रेमंड पंचवीस हजार डॉलर्स देईल.

रक्कम त्या काळच्या मानाने मोठी होतीच पण त्यामागे असलेलं आव्हान जास्त जोरकस होतं. तरीही पाच वर्षं कोणी म्हणजे कोणीच माईचा लाल पुढे आला नाही. एकदाही न थांबता अटलांटिक पार करण्याच्या कल्पनेने पिवळी होण्याच्या जमान्यात असा लाल तयारच झाला नसावा अशी समजूत व्हायला लागली. पाच वर्षं संपून गेल्यावर रेमंडने अजून पाच वर्षांनी या बक्षिसाची मुदत वाढवली. यंदा मात्र अनेक गडी पुढे सरसावले आणि मोहीमांची तयारी झडायला लागली..

त्यातच एकजण होता चार्ल्स लिंडबर्ग. हा साधासुधा पायलट त्यावेळी आपल्या बुरबुर विमानातून पोस्टाची पत्रं आणि हलकी पार्सलं पोचवण्याची कामं करायचा. तो काही त्यावेळच्या "हिरो" रेसर पायलट्सपैकी नव्हता.. कोणाला फारसा माहीतही नव्हता. पण त्यानेच सेंट लुईस या गावापासून शिकागोपर्यंतची मेल सर्व्हिस सुरु केली होती.. त्याच्या मनात आलं की माझ्यात काय कमी आहे भाई? मीच करतो प्रयत्न..

मग आपल्या सेंट लुईस गावापासून सुरु केलेल्या नवसाच्या मेल सर्व्हिसच्या पुण्याईवर त्याने तिथल्या चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षाला पटवलं आणि पंधरा हजार डॉलर्सची स्पॉन्सरशिप पदरात पाडून घेतली.

त्यानंतर सुरु झाला या विलक्षण भरारीसाठी सुटेबल विमानाचा शोध.

त्यावेळच्या इतर स्पर्धकांच्या "अटलांटिक पार करु शकेल इतक्या मजबूत अन सुरक्षित" विमानाच्या कल्पना एकदम चाकोरीतल्या होत्या.. म्हणजे सुरक्षिततेसाठी दोन इंजिनवालं विमान हवं..स्थिरतेसाठी एकावर एक दोन पंखवालं विमान (बायप्लेन) जास्त बरं..वगैरे.

लिंडबर्गच्या डोक्यात वेगळंच शिजत होतं.. त्याला हवं होतं एक सिंगल इंजिन विमान.. त्याचा हिशोब साधा होता. मला प्रचंड दूरवरचं अंतर काटायचंय.. अशा वेळी जितकी इंजिनं जास्त तितकी इंधन खाणारी तोंडं जास्त. शिवाय विमानाचं वजनही एकदम बुदगुलसारखं वाढणार. नकोच ते. त्याकाळी अधिक इंजिनांनी अधिक ताकद यायची पण एक इंजिन फेल झालं तर उरलेल्या इंजिनावर लांबचा प्रवास शक्य नव्हता.

अशावेळी लिंडबर्गने असं म्हटलं की "तीन इंजिनं म्हणजे फेल्युअरची तिप्पट शक्यता..नको, मला एकच इंजिनवालं विमान हवं. " त्यातही ते भलतंच फ्युएल एफिशियंट हवं.. आणि त्यात तो एकटाच बसून जाणार.. म्हणजे वजन आणखीन कमी.. म्हणजे इंधन आणखी काळ पुरणार.

पण असं आखूडशिंगी बहुदुधी विमान कोणाकडेच तयार नव्हतं. जवळजवळ वर्षभर गेलं तरी लिंडबर्गला विमानच मिळेना. पंधरा हजाराचं बजेट होतं.. त्यातही काही बसेना.

अशात एक दिवस रायन एअरलाईन्स नावाच्या आडबाजूच्या छोट्याश्या कंपनीने अशी तयारी दाखवली की ते त्याला हवं तसं विमान सहा हजार डॉलरांत बनवून देतील. इंजिन सेपरेट घ्यावं लागेल पण तरी पंधरा हजारात बसत होतं. जुनाट फिश प्रोसेसिंगच्या शेडमधे असलेलं रायन कंपनीचं वर्कशॉप पाहून मासळीची घाण लिंडबर्गच्या नाकात आणि तशाच वासाची निराशा मनात दाटली.. पण रायन कंपनीच्या डोनाल्ड हॉल नावाच्या इंजिनियरने लिंडबर्गच्या विमानाच्या चॉईसला पूर्ण पाठिंबा दिला आणि त्याला थोड्याच वेळात जिंकलं.

प्रचंड कष्ट घेऊन फक्त दोन महिन्यांत डोनाल्डने "स्पिरिट ऑफ सेंट लुईस" हे विमान बनवलं.. त्याला ते बनवताना कल्पना असेल नसेल.. पण तो जगात विमानाच्या इतिहासात कायम नाव कोरणारं विमान बनवत होता.

२८ एप्रिल १९२७ ला स्पिरिट ऑफ सेंट लुईस तयार झालं.. जवळजवळ दहा फूट उंच, अठ्ठावीस फूट लांब..आणि ४६ फूट विंगस्पॅन..

त्यात २२० हॉर्सपॉवरचं नऊ सिलिंडरवालं रेडियल इंजिन होतं. रेडियल म्हणजे ज्याचे सिलिंडर शाफ्टभोवती चक्राकार रचनेत बसवले आहेत असं.

(सर्व फोटो आंतरजालावरुन साभार..)

राईट ब्रदर्सशी संबंध न राहिलेल्या आणि फक्त नाव उरलेल्या राईट कंपनीने हे इंजिन बनवलं होतं. हे उघडे असलेले पार्टस समोरून येणार्‍या जोरदार वार्‍याने थंड ठेवले जायचे.. अर्थात एअर कूल्ड इंजिन.

लिंडबर्गने ५८०० किलोमीटर्सचा अफाट प्रवास आणि तोही अटलांटिक समुद्रावरुन करण्याचं वेडं आव्हान घेतलं होतं.. पण वेड्यासारखं वागून ते पूर्ण झालं नसतं.. त्यामुळेच लिंडबर्गने "डोकं चालवून" या स्पेशलमेड विमानात कायकाय उद्योग केले होते ते पहायला रोचक वाटेल..

विमानाच्या पंखात असलेले फ्युएल टँक आणखी मोठे व्हावेत म्हणून पंखांचा विस्तार मोठा घेतला होता.

शिवाय अजून एक जास्तीचा फ्युएल टँक कॉकपिटमधे स्वतःच्या डोक्यावर समोरच्या बाजूला इन्स्टॉल केला होता. या फ्युएल टँकमुळे एक विचित्र गोष्ट होत होती की "स्पिरिट ऑफ सेंट लुईस"ला समोरुन काचच नव्हती. जे काही बघायचं ते बाजूच्या खिडकीतूनच. बाकी उपकरणांच्या आधारे. पायलट अशा रचनेने आंधळा झाल्यामुळे पाणबुडीला असतो तसा पेरिस्कोप विमानाबाहेर काढून त्यातून समोरच्या दृश्यावर काही प्रमाणात अधूनमधून नजर टाकता येईल अशी सोय केली होती. पुन्हा फ्युएल टँक डोक्यावरच ठेवल्याने एअर क्रॅश झाला तर लिंडबर्ग वाचण्याची शक्यता शून्यवत झाली.

इंधनासाठी जास्तीतजास्त जागा ठेवल्याने आणि उरलेल्या जागेत उपकरणं कोंबल्यामुळे स्वत: लिंडबर्गला कॉकपिटमधे बसायला अतिशय कमी जागा होती. त्याला इतकं आखडून बसायला लागणार होतं की पायही सरळ करता येणार नव्हते. त्यातून त्याची सीटही एकदम कडक होती..

"स्पिरिट"चं चिंचोळं क्लॉस्ट्रोफोबिक कॉकपिट :

कोणत्याही विमानाचे पंख, कंट्रोल्स, शेपटीची रचना, हे अशा रितीने डिझाईन केलेले असतात की ज्यामुळे विमानाला "एरोडायनामिक स्टॅबिलिटी" मिळते. याचा अर्थ असा की विमान ज्या अवस्थेत स्थिर केलं आहे आणि उडतं आहे ती अवस्था विमान स्वत:हून बदलत नाही.. किंवा अजून सोपं करायचं तर, पायलटने मुद्दामहून कंट्रोल्स हाताळले नाहीत तर विमान आपसूक जमिनीला समांतर आणि सरळ अशा रितीने स्थिर होऊन राहतं, बॅलन्स होतं.

स्पिरिट ऑफ सेंट लुईसमधे मात्र अशी रचना केली किंवा बिघडवली गेली, की हे विमान अनस्टेबल झालं. म्हणजे ते सारखं भरकटणार होतं.. सतत करेक्शन करणार्‍या अ‍ॅक्शन्स पायलटकडून केल्या गेल्या नाहीत तर विमान वेडंवाकडं उडणार होतं आणि नंतर ऑफ बॅलन्सही होणार होतं..

लिंडबर्ग वेडा नव्हता हे मी आधी म्हटलंय हे यासाठीच.. कारण आखडून बसायला लागणं..क्षणभरही "आरामात" बसता न येणारी सीट, विमान नाठाळ घोड्यासारखं सतत इकडेतिकडे भरकटणं आणि त्याचे लगाम सतत खेचत रहायला लागणं... या सर्व तापदायक गोष्टी लिंडबर्गने जाणूनबुजून तशा ठेवल्या होत्या.. कारण त्याने पस्तीसचाळीस तास सर्वस्वी एकट्याने समुद्रावर सतत उड्डाण करण्यातला सर्वात मोठा शत्रू ओळखला होता..

"झोप"..

वर उल्लेखलेल्या दोन्ही तापपीडांमुळे लिंडबर्गला "जागं" रहावं लागणार होतं. रिलॅक्स होऊन, क्षणभरही निष्क्रीय होऊन तेवढ्यात झोपेने झडप घातली असती तर ती मरणाची झडप ठरणार होती.

याउप्पर इतक्या लांबलचक सलग फ्लाईटला लागणारी ग्रीसिंगची अर्थात बाह्यभागांना वंगण लावण्याची सोय राईटसच्या त्या विशिष्ट इंजिनातच होती. इंजिन चालू असताना आपोआप होणारं "सेल्फ लुब्रिकेशन टेक्निक" त्यात होतं.. अन्यथा अटलांटिकवर उड्डाण करताकरता एकुलत्या एका पायलटने कॉकपिट सोडून हवेत उतरुन टरटरा फिरणार्‍या इंजिनाला ग्रीसिंग करणं अवघडच होतं नं..

विमानात वजन कमीतकमी हवं म्हणजे फ्युएल आणखी वाचेल या तत्वासाठी लिंडबर्गने अक्षरश: टोकाची काळजी घेतली. रेडिओज सोबत घेतले नाहीत. असेही ते इतक्या लांब प्रवासाला उपयोगी नव्हते आणि त्यावरुन लिंडबर्गला अटलांटिकच्या मध्यात मदत मिळण्याची शक्यताही नव्हती. त्याने सोबत काहीही सामान घेतलं नाही. स्वतःच्या नॅव्हिगेशन नकाशांची मार्जिन्सही त्याने कापून टाकली होती.. अगदी कणाकणाने विमानाच्या आतलं वजन कमी केलं होतं.

स्पिरिट ऑफ सेंट लुईसच्या शंक्वाकृती प्रॉपेलर कव्हरच्या (स्पिनर) आतमधे भारतीय स्वस्तिक होतं. शुभ प्रतीक म्हणून हे विमानक्षेत्रात त्या काही दशकांत प्रसिद्ध होतं. स्पिरिट ऑफ सेंट लुईसला लिंडबर्गने आपला "फ्लाईंग पार्टनर" बनवून टाकलं. जणू एखादी व्यक्ती असावी तसं.. आणि असाच आग्रह ठेवला की मी आणि स्पिरिट वेगवेगळे नाही.. यापुढे आमचा "वुई" असाच उल्लेख होईल... आणि जे काही होईल ते आमचं दोघांचं असेल..

२० मे १९२७ ला सकाळी सात वाजून बावन्न मिनिटांनी स्पिरिट मधे बसून न्यूयॉर्कजवळच्या रूझवेल्ट एअरफिल्डमधून लिंडबर्गने टेकऑफ घेतला.. अफाट अटलांटिक लगेचच त्याच्या खाली पसरला.. एकटा जीव.. अनंत वाटणारं अंतर..

त्यात त्याला येणार्‍या संकटांची सुरुवात झाली जमिनीपासून साधारण दहा हजार फुटांवर जबरदस्त वादळाने. तुफानाने भरलेले ढग त्याला उलथून टाकायला पहात होते. अक्षरशः जीव मुठीत धरुन लिंडबर्गने या संकटाला पार केलं.

दुसरं आक्रित आलं ते पंखांवर जमा होणार्‍या बर्फाचं.. असा बर्फ पंखांवर साठला की तो पंखांचा शेप बिघडवून विमानाची उचल कमी करतो आणि विमानाला थेट कोसळवू शकतो. त्या बर्फापासून वाचण्यासाठी विमान खूप खाली पाण्याजवळ आणावं लागलं.. त्यापुढे पाण्याच्या उसळलेल्या उंच लाटांचा तडाखा बसला..

या सर्वांतून जरा स्थिर होतोय तोवर जवळच्या कंपास आणि थोडक्या नॅव्हिगेशन उपकरणांनी दिशा समजायला अडचण व्हायला लागली. खाली अथांग समुद्र असल्याने जमिनीचा रेफरन्सही नव्हता. तेव्हा मग लिंडबर्गने अक्षरशः खिडकीतून दिसणार्‍या मर्यादित आकाशात तार्‍यांकडे पाहून दिशा ठरवत प्रवास केला.. पुढेपुढे विमान अनेकदा तासनतास दाट ढगात घुसल्यामुळे काहीही दिसत नसताना पूर्ण आंधळ्या अवस्थेत अंदाजे उडवत पुढेपुढे जात रहावं लागलं.

संकटं जरा थांबली आणि वीसेक तासांच्या आसपास आनि त्यानंतर सर्वात भयानक संकट आलं.. आधीच माहीत असलेलं.. झोपेचं... अमानवी ताकदीचा प्रयत्न करुनही झोप उडेना.. खाली समुद्रात उतरुन झोप काढायची सोय नाही.. झोप म्हणजे सरळसरळ मृत्यू असं समीकरण होतं.

झोपेशी लढा लिंडबर्गला सर्वात कठीण गेला. मुळात टेकऑफच्या आधी एक्साईटमेंटमुळे आणि गडबडीमुळे असेल, पण तो २४ तास झोपला नव्हता.. त्यात उड्डाणाचे अजून चोवीस तास सरत आले तशी ही समस्या आणखी गडद झाली.

जागे राहण्यासाठी लिंडबर्गने बाजूची खिडकी उघडून बर्फाळ वार्‍यांनी आपले गाल ओरबाडून घेतले.. स्वतःला खूप चिमटे काढत राहिला.. तरीही काही क्षण मायक्रोस्लीप म्हणतात तशी झोप त्याला लागली असणारच.. एका क्षणी त्याला आपण हरलो आणि मेलो असंही वाटलं. भास झाले.. पण तरीही तो उडतच राहिला.. त्याच्या "स्पिरिट"च्या कुशीत स्पिरिटला चिवटपणे धरुन.

साडेतेहतीस तासांनी म्हणजे दुसर्‍या दिवशी, २१ मार्चला रात्री सव्वादहाच्या सुमारास लिंडबर्ग आणि त्याचं लाडकं विमान पॅरिसच्या ली बोर्ग एअरपोर्टवर सुखरूप उतरले..त्या काळी दीड लाखाचा जमाव हे लँडिंग बघायला जमला होता.. त्या सर्वांनी लिंडबर्गला उचलून घुसळून काढलं.. जोशात आलेल्या जमावाने स्पिरिट ऑफ सेंट लुईसची मोडतोड केली. त्यातले बाहेरचे छोटे भाग आठवण म्हणून उचकटले.. अशा भागांना नंतर प्रचंड किंमत येणार हे ते लोक ओळखून होते.. पण लुईसला खूप मोठं नुकसान झालं नाही..

रातोरात लिंडबर्ग हा साधा पोस्टल पायलट एक जागतिक तारा बनला. पंचवीस हजार डॉलर्सचं बक्षीस तर जिंकलंच, पण त्याहूनही खूप जास्त मानसन्मान पुढे त्याच्या वाट्याला आला. विमानक्षेत्राचा तो पोस्टरबॉय बनला..

माझ्या दृष्टीनं त्याने केलेलं सर्वात मोठ्ठं काम म्हणजे आपल्या जिगरबाजीने "विमान म्हणजे खेळणं नव्हे, त्याचा वापर खरोखरच्या प्रवासासाठी करता येतो" हे त्याने सिद्ध केलं. भले स्पिरिटचं उड्डाण प्रायोगिक किंवा स्पर्धेसाठी केलेलं असेल.. पण विमानाने समुद्र जिंकला.. माणसाची भीड चेपली.. लिंडबर्गच्या या धाडसानंतर लगेचच झपाट्याने "कमर्शियल" विमानक्षेत्राची वाढ झाली. आजच्या जगभरात कुठेही काही तासांत पोचवणार्‍या प्रवासी एअरलाईनर्सची सुरुवात लिंडबर्गच्या जिगरबाज ब्रेकथ्रूमुळे झाली...

माझ्या विमानोड्डाण शिक्षणामधे जी टेक्स्टबुकं होती त्यातल्या एकात पुस्तकाच्या सुरुवातीलाच अशा शेकडो जिगरबाजांच्या स्मरणासाठी लिहिलेल्या ओळी होत्या:

Heights by great men reached and kept
Were not obtained by sudden flight
But,while their companions slept,
They were toiling upward in the night.
They were toiling upward in the night.

देशांतरसमाजजीवनमानतंत्रराहणीभूगोलप्रकटनविचारप्रतिक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

मनिष's picture

14 Mar 2012 - 10:43 am | मनिष

अशक्य माणसं आणि खिळवणारा लेख. गवि रॉक्स!

अमृत's picture

14 Mar 2012 - 10:43 am | अमृत

मस्त लिहीलय गवि. बहुत खूब. शिर्षक वाचून हा धागा 'पाकृ' या सदराखाली मदीराचार्य/पंडीत 'सोत्रिं' नी लिहीला असावा असे वाटले होते. :-)

अमृत

सोत्रि's picture

14 Mar 2012 - 10:47 am | सोत्रि

विचित्र गोष्ट होत होती की "स्पिरिट ऑफ सेंट लुईस"ला समोरुन काचच नव्हती. जे काही बघायचं ते बाजूच्या खिडकीतूनच

ऑ, असे विमान चालवता येऊ शकते ? :O

- (हे वेगळे 'स्पिरीट' आवडलेला) सोकाजी

स्पा's picture

14 Mar 2012 - 11:07 am | स्पा

केवळ आणि केवळ थरारक ....

गवि hats off to u !!!!!

प्रचेतस's picture

14 Mar 2012 - 11:12 am | प्रचेतस

अप्रतिम.
बुंगाट लिखाण

चाणक्य's picture

14 Mar 2012 - 11:12 am | चाणक्य

लिन्डबर्ग च्या धाडसाला सलाम

मुक्त विहारि's picture

14 Mar 2012 - 11:20 am | मुक्त विहारि

एका सिनेमाचे नाव देत आहे...

अशाच काही धेय वेड्या माणसान्नी केलेल्या प्रयत्न्नावर आधारित...

Those Magnificent Men in their Flying Machines

जमल्यास बघा....

sagarpdy's picture

14 Mar 2012 - 11:21 am | sagarpdy

झोपेशी लढा लिंडबर्गला सर्वात कठीण गेला. मुळात टेकऑफच्या आधी एक्साईटमेंटमुळे आणि गडबडीमुळे असेल, पण तो २४ तास झोपला नव्हता.. त्यात उड्डाणाचे अजून चोवीस तास सरत आले तशी ही समस्या आणखी गडद झाली.

जागे राहण्यासाठी लिंडबर्गने बाजूची खिडकी उघडून बर्फाळ वार्‍यांनी आपले गाल ओरबाडून घेतले.. स्वतःला खूप चिमटे काढत राहिला.. तरीही काही क्षण मायक्रोस्लीप म्हणतात तशी झोप त्याला लागली असणारच.. एका क्षणी त्याला आपण हरलो आणि मेलो असंही वाटलं. भास झाले.. पण तरीही तो उडतच राहिला.. त्याच्या "स्पिरिट"च्या कुशीत स्पिरिटला चिवटपणे धरुन.

सलाम!

प्यारे१'s picture

14 Mar 2012 - 11:44 am | प्यारे१

मस्तच...!

इरसाल's picture

14 Mar 2012 - 11:57 am | इरसाल

मान गये !
कसला सॉलीड माणूस असेल.

आणि नेहमीप्रमाणेच गविंची लेखणी सुरती...............

तर्री's picture

14 Mar 2012 - 11:59 am | तर्री

मला वाटत होते , मी ही पॅरिस ला , त्या दिड लाख लोकांच्यात ऊभा राहिलो आहे.
हे अतुल साहस , आणि गविं ची लेखणी हा एक समसमा योग.

नंदन's picture

14 Mar 2012 - 12:16 pm | नंदन

लेख आवडला.

नन्दादीप's picture

14 Mar 2012 - 12:33 pm | नन्दादीप

मस्त माहिती...
<<स्पिरिट ऑफ सेंट लुईसच्या शंक्वाकृती प्रॉपेलर कव्हरच्या (स्पिनर) आतमधे भारतीय स्वस्तिक होतं. शुभ प्रतीक म्हणून हे विमानक्षेत्रात त्या काही दशकांत प्रसिद्ध होत<< हे खासच....

हा भाग खूप चित्रदर्शी वाटला
निवेदन तर कथा जीवंत करणारे, अस्खलित झाले आहे..
शिट्या आणि टाळ्या !!

मी-सौरभ's picture

15 Mar 2012 - 12:48 pm | मी-सौरभ

सहमत

गणपा's picture

14 Mar 2012 - 1:38 pm | गणपा

हा ही भाग आवडला.

क्रमश: टाकायचं राहून गेलं का हो?

रणजित चितळे's picture

14 Mar 2012 - 2:00 pm | रणजित चितळे

फार छान लिहिता. हा लेख खूप आवडला मला.

स्मिता.'s picture

14 Mar 2012 - 2:11 pm | स्मिता.

वाचताना वाटत होतं की मीसुद्धा लिंडबर्गसोबत हा थरार अनुभवतेय.

असंही विमानं बघून ते सुधारणा करत-करत बनवणार्‍या आणि उडवणार्‍या लोकांबद्दल प्रचंड आदर, कौतुक वाटतच होते पण गविंचे लेख वाचून भारावून जायला होतं.

इष्टुर फाकडा's picture

14 Mar 2012 - 2:50 pm | इष्टुर फाकडा

मम म्हणतो. :)

सर्वसाक्षी's picture

14 Mar 2012 - 2:29 pm | सर्वसाक्षी

विमान हा आबालवृद्धांच्या आकर्षणाचा विषय. त्याचा हा अद्भुतरम्य प्रवास सुरेख मांडला आहे. आपल हे उत्कंठावर्धक लेखन आवडल.

बहुगुणी's picture

14 Mar 2012 - 2:51 pm | बहुगुणी

खूप वेळा वाचलेलीच माहिती होती, पण तिची 'थरारक गोष्ट' केलीत, गवि, आणि नेहेमीप्रमाणेच, अपेक्षापूर्ती केलीत.

रणजित चितळे's picture

14 Mar 2012 - 4:20 pm | रणजित चितळे

.. पुढेपुढे विमान अनेकदा तासनतास दाट ढगात घुसल्यामुळे काहीही दिसत नसताना पूर्ण आंधळ्या अवस्थेत अंदाजे उडवत पुढेपुढे जात रहावं लागलं.

बापरे व्हाईट आऊट ने काय भयंकर डिसओरीएटेशन होते ते अनभवले आहे.

जबरदस्त प्रसंग आणि जबरदस्त लेखन आहे, मी सुद्धा तर्रीच्या बाजुला उभा होतो, पॅरिसची प्रसिद्ध चिक्की खात,

प्रास's picture

14 Mar 2012 - 3:56 pm | प्रास

लेखमाला उत्तम सुरू आहे आणि हा भाग अगदी खास झाला आहे. आवडला. :-)

पुढल्या लेखांची वाट बघतोय.

स्वातीविशु's picture

14 Mar 2012 - 4:49 pm | स्वातीविशु

हॅट्स ऑफ फॉर लिंडसबर्ग आणि गवि.

रोचक आणि थरारक वर्णन आवडले. :)

गणेशा's picture

14 Mar 2012 - 5:11 pm | गणेशा

अप्रतिम ... निव्वळ अप्रतिम.

आपण स्वता तेथे उपस्थीत आहोत असेच ओघवते वर्णन.

त्या लिंडबर्ग पायलटला, विमान बनवणार्‍या डोनाल्ड ला, आणि इंजिना साठी राईट कंपनीला सलाम ..

त्याच बरोबर आपल्या लेखनीला ही सलाम ..

असेच लिहित रहा.. वाचत आहे

विवेक मोडक's picture

14 Mar 2012 - 5:20 pm | विवेक मोडक

गविशेठ
या विषयावर एक पुस्तक काढायचं मनावर घ्या की राव !!

पिंगू's picture

14 Mar 2012 - 5:50 pm | पिंगू

लिंडबर्गला सलाम आणि गवि तुम्हालापण दंडवत. असे रोचक लिखाण केल्याबद्दल..

- (गविपंखा) पिंगू

पैसा's picture

14 Mar 2012 - 7:17 pm | पैसा

त्या स्पिरिटमधून लिंडबर्गबरोबर फिरून आल्यासारखं वाटलं!!

गोंधळी's picture

14 Mar 2012 - 8:14 pm | गोंधळी

बायदवे ते स्पिरिट कुठे मिळेल?

अजुन एक ही शोध लावु नशकल्यामुळे निराश झालेला....

खूप वर्षापूर्वी अर्नेस्ट हेमींगवे यांचे 'द ओल्ड मॅन ऍंड द सी' चे पु. लं. नी अनुवादीत केलेले 'एका कोळीयाने' हे पुस्तक वाचले होते. त्यापेक्षाही हा जबरदस्त थरार आहे आणि तो ही खराखुरा! छान माहिती. मुख्य म्हणजे प्रेरणादायक!
लिंडबर्गने ५८०० किलोमीटर्सचा अफाट प्रवास आणि तोही अटलांटिक समुद्रावरुन करण्याचं वेडं आव्हान घेतलं होतं.. पण वेड्यासारखं वागून ते पूर्ण झालं नसतं..
हे वाक्य आवडलं.

सांगलीचा भडंग's picture

14 Mar 2012 - 7:53 pm | सांगलीचा भडंग

मस्त लेख ......हे विमान वाशिंग्टन डी सी मधील ऐअर एंड स्पेस म्युझिअम मध्ये डिस्प्ले ला आहे
http://www.nasm.si.edu/collections/artifact.cfm?id=A19280021000

jaypal's picture

14 Mar 2012 - 8:04 pm | jaypal

च्या मारी अजुन झिंग उतरत नाहीये.
spritpilot

माझीही शॅम्पेन's picture

14 Mar 2012 - 8:48 pm | माझीही शॅम्पेन

बाप रे !!! आसल जबरदस्त लेखन करून तुम्ही स्वताहाच एक दन्तकथा बनला आहात :)

आदिजोशी's picture

14 Mar 2012 - 8:55 pm | आदिजोशी

भन्नाट, बुंगाट आणि सुसाट :)

स्वाती दिनेश's picture

15 Mar 2012 - 12:35 pm | स्वाती दिनेश

अफाट,भन्नाट, बुंगाट आणि सुसाट
आदिसारखेच म्हणते,
स्वाती

रामपुरी's picture

14 Mar 2012 - 9:50 pm | रामपुरी

!!!

मराठे's picture

14 Mar 2012 - 10:02 pm | मराठे

गविंचं लेखन म्हणजे मस्त मेजवानी!
न्युयॉर्क पॅरिस विमानप्रवासाचं आव्हान देणारा आणि पेलणारा दोघेही कौतुकास पात्र आहेत.

कापूसकोन्ड्या's picture

15 Mar 2012 - 12:19 am | कापूसकोन्ड्या

न्युयॉर्क पॅरिस विमानप्रवासाचं आव्हान देणारा आणि पेलणारा दोघेही कौतुकास पात्र आहेत.
नव्हे नव्हे!
न्युयॉर्क पॅरिस विमानप्रवासाचं आव्हान देणारा पेलणारा आणि वर्णन करणारा, तिघेही कौतुकास पात्र आहेत.

अप्रतिम.गवि तुम्हि महान आहत आनि मिपाच्या माझ्या लाडक्या लेखकांपैकि एक आह्हत.

आबा's picture

15 Mar 2012 - 12:05 am | आबा

हा भाग सुद्धा सुरेख आहे गवि.

मन१'s picture

15 Mar 2012 - 12:09 am | मन१

भन्नाटच करामत केली म्हणायची पठ्ठ्यानं.

मनराव's picture

15 Mar 2012 - 1:25 pm | मनराव

लय भारी !!!... एनवाय ते पॅरिसचा पहिला प्रवास दमदार हाय.....

सानिकास्वप्निल's picture

15 Mar 2012 - 4:51 pm | सानिकास्वप्निल

सुरेख लेख, तुमची लेखनशैली खुपचं आवडते :)

गवि साहेब, बुंबास्टी़क मस्त लिहिल आहेत

भाषा मस्त ओघवति व वाचनिय आहे.
वाचताना अस वाटत होत कि हा लेख संपूच नये म्हणुन.
प्रत्येक शब्ब्द जसा, मोतियाच्या माळेतिल मणी.

मस्त लेख, वाचनिय लेख

मुक्तसुनीत's picture

15 Mar 2012 - 10:10 pm | मुक्तसुनीत

लिखाण आवडले. संपूर्ण लेखमाला उत्कंठावर्धक होते आहे असं दिसतंय.

निशदे's picture

15 Mar 2012 - 11:38 pm | निशदे

वर्णन केलेल्या घटनेइतकेच तुमचे लिखाणही खिळवून ठेवते.....
अफाट लिहिले आहे....... हे क्रमशः करावे........ विमानांमध्ये झालेली प्रगती अशीच आमच्यासमोर मांडत रहा....... :)

मिपाच्या खजिन्यातील एक रत्न.....
मुद्दाम वर काढतोय.
गवि..... तुमचे लिखाण मिस करतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Feb 2022 - 3:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता लिहित नाहीत हे का तुमचे गविसर.
चांगले लिहायचे. आजच त्यांचा एक विमानाचा धागा वर काढावा वाटला.
काढतो.

-दिलीप बिरुटे

Bhakti's picture

6 Feb 2022 - 8:19 am | Bhakti

मस्त!
किती झपाटून काम केलं असेल.
योगायोगाने काल मर्सिडीजची गोष्ट पाहत होते,८ horse power चे इंजिन अशा गोष्टी पाहून मजा वाटत होती.

विजुभाऊ's picture

25 Dec 2024 - 2:45 pm | विजुभाऊ

गविंची लेखणी(कळफलक) पुन्हा वहाता व्हावा म्हानुन लेख वर आणतोय.
गवि ना जरा आग्रह करा कोणीतरी

तुम्ही लोक योग्य प्रश्न टाकून डिवचत नाही मग ते लिहिणार कसे.

आता वाचक भराभर गूगलून माहिती वाचून काढतात. तरीही शंका काढत नाहीत. खफवरच्या विजयपत सिंघानियांच्या खरडीवर त्यांनी लगेच लिहिलं होतं. पण खफ साफ होत जातो. गेलं.
............
लेखातली उड्डाणातली अडचण म्हणजे झोप येणे, उंचावरती पंखांवर बर्फ जमणे आणि कमी उंचीवर समुद्राचे पाणी यावरून जुनी ग्रीक कथा आठवली ......
The Greek myth of Daedalus and Icarus is about a father and son who escape from Crete by flying with wings made of feathers and wax:
The story
Daedalus and Icarus were trapped in a cave on the island of Crete by King Minos. Daedalus built wings for himself and Icarus using feathers and beeswax to escape. Before they flew, Daedalus warned Icarus not to fly too close to the sun or the sea. " Iwarn you Icarus fly the middle course , sun will melt the beeswax while Ocean's dampen the wings of feathers..."

वामन देशमुख's picture

26 Dec 2024 - 10:07 am | वामन देशमुख

गविंची लेखणी(कळफलक) पुन्हा वहाता व्हावा म्हानुन लेख वर आणतोय.
गवि ना जरा आग्रह करा कोणीतरी

अनुमोदन, आग्रह, विनंती आणि इतर समानार्थी शब्द...

- (गविंच्या विमानाचा पंखा) द्येस्मुक् राव

वामन देशमुख's picture

26 Dec 2024 - 10:05 am | वामन देशमुख

गविंचा एक लेख आहे. त्याचा "विमानप्रवासाला घाबरू नका, तो तुलनेने सर्वात सुरक्षित प्रवास आहे कारण त्यात सुरक्षेतीततेची खूप काळजी घेतली जाते" असा आशय आहे. इथे सर्व धुंडाळूनही तो सापडला नाही. कुणी लिंक देईल का?

कर्नलतपस्वी's picture

26 Dec 2024 - 11:18 am | कर्नलतपस्वी

आपको अगर कोई गब्बर से बचा सकता है तो वो सिर्फ गब्बर ही है.
..........