हिंदुस्थानी घराणेदार रागसंगीत, नारायणराव बालगंधर्व, अब्दुल करीमखासाहेब, भीमसेनअण्णा, बापुराव पलुस्कर, भाईकाका, बाबूजी, दीदी, पंचमदा, किशोरदा, मधुबाला, वहिदाआपा.. इ इ अनेक, हे सारे आमचे जबरदस्त दुखरे बिंदू. त्यांचा अभ्यास आणि त्यांच्यावरची भक्ति ही कधीही न संपणारी आहे!
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
या पूर्वी -
इस दर्द को लेकर जिता है, इस दर्द को लेकर मरता है.. (भाग - १)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
वसंता पोतदार तसा वेडझवाच होता, परंतु दोस्त होता आपला. भीमण्णा हा आमच्या दोस्तीतला दुवा. एकेदिवशी केव्हातरी वसंताचा फोन आला,
"तात्या, मधुबालेवर प्रेम करतोस ना..?"
"हो..काही कोटींपैकी मीही एक.." मी उत्तरलो.
"एक पत्ता लिहून घे..."
संशोधन करणं हे वसंताचं व्यसन होतं. त्यामुळे वसंता जे काही सांगेल ते ऑथेन्टिकच असेल म्हणून मी पत्ता लिहू लागलो. वसंताने 'दाईमा' नावाच्या कुणा स्त्रिचा पत्ता मला दिला. ही दाईमा मधुबालेच्या शेवटच्या काळातील तिची नोकर होती. तिचा पत्ता म्हणजे डोंगरी अग्निशमन दलाजवळची कुठलीशी एक चाळ होती. वसंताने दिलेल्या पत्त्यावर मी पोहोचलो. मधुबालेची आवडती गुलाबाची काही फुलं आणि तिला अत्यंत प्रिय असलेला कलाकंद सोबत घेतला होता. चाळ शोधून काढली. दारावर टकटक केली. साधारण ८० च्या आसपास असलेल्या एका वृद्ध स्त्रिने दरवाजा उघडला. तीच दाईमा होती.
"नमस्ते. मंझली आपा के बारे मे कुछ जानना है.." (मधुबालेला बरेचजण 'मंझली आपा' या नावाने ओळखत.)
दाईमाच्या चेहेर्यावर स्मितहास्य उमटलं ( मधुबालेच्या संगतीत राहिल्यामुळे तेही गोडच होतं! :) ) आणि तिनं मला घरात घेतलं. पाणी विचारलं. मी गुलाबाची फुलं आणि कलाकंद तिला दिला. दाईमाचं अस्पष्ट बोलणं आणि तिचं हिंदी, हे मला प्रयत्नपूर्वक समजून घ्यायला लागत होतं. प्रास्ताविक झालं आणि कुठलेच आढेवेढे न घेता म्हातारी भूतकाळात हरवली. वय बरंच असल्यामुळे तिच्या बोलण्यात सुसंगतेचा थोडा अभावच होता. ती माझ्याशी हिंदीतच बोलत होती, पण इथे मी ते मराठीत लिहिणार आहे..
"ती खूप म्हणजे खूपच खोडकर होती.." दाईमा आता सांगू लागली..
काही वेळेला आपल्या मधाळ सौंदर्याचा उपयोग ती काही लोकांची गंमत करण्यासाठी करत असावी. पटकन कुणाच्याही प्रेमात पडावं इतकी काही ती नासमझ नव्हती. तिनं मनापासून प्रेम केलं ते फक्त युसुफमियावर.. किशोरबाबावर पण तिचा जीव होता, नाही असं नाही! पण एकंदरीत अवखळ वृत्ती, खळाळून हसणं हा तिचा स्थायीभाव होता. पटकन हास्याच्या कारंज्यात शिरायला तिला काही विशेष कारण लागत असे असं नाही.. पुष्कळदा शक्ति सामंता, देवसाब सारखे लोक तिचं हसू थांबायची वाट पाहात असत. "झालं का गं बये तुझं पोटभर हसून? म्हणजे आम्हालाही काही तुझ्याशी बोलता येईल." असं ते म्हणायचे.. :)
आपल्या आवडत्या व्यक्तिला गुलाबाचं फूल द्यायची तिची एक सवय होती.
"पण त्या फुलासोबत 'तू मला खूप आवडतोस. माझ्याशी लग्न करणार असलास तर हे फूल स्विकार कर.. - अशी एक चिठ्ठीही द्यायची ना..?" -- मी दाईमाला विचारलं.
त्यावर दाईमा स्वत:च खळखळून हसली.
"हम्म.. पण तशी चिठ्ठी प्रत्येक वेळेलाच द्यायची असं नाही. एक बार ऐसा मजाक उसने प्रेमनाथ के साथ किया था..! बेचारा प्रेमनाथ. बुद्दू कहिका..!" :) -- इति दाईमा.
"बेटा, चाय पियोगे..? रुको, 'मंझली आपा' को प्यारी तुलसीपत्तेवाली चाय बनाके लाती हू.."
दाईमा आता स्वत:च मुडात येऊ लागली होती..
पहिल्या दिवसापासूनच प्रेमनाथने मधुबालेवरती गोंडा घोळायला सुरवात केली होती. म्हणून मग गंमत म्हणून मधुबालेनं गुलाबाचं फूल आणि चिठ्ठी त्याला दिली.. प्रेमानाथ बिचारा उभ्याउभ्याच जमिनीवर कोसळून पडायचा बाकी होता.. सार्या दुनियेतली सर्वात सुंदर स्त्री आपल्याला फूल देते आहे..! ओहोहो..! :)
पुढे मग काही दिवस प्रेमानाथचं आणि मधुबालेचं प्रेमप्रकरण हा चित्रसृष्टीतला एक चर्चेचा विषय ठरला. पण तुला अंदरकी बात सांगते - प्रेमनाथच्या गोंडा घोळण्याच्या स्वभावामुळे मधुबालेनेच त्याची मस्करी केली होती. तिला भोगू पाहणारे खूप म्हणजे खूप होते रे तेव्हा आजूबाजूला. पण मंझलीआपा त्या सर्वांची वस्ताद होती. त्या सगळ्यांची ती मस्तपैकी फिरकी घ्यायची. मनमुराद हसत आणि एन्जॉय करत! :)
काही दिवसांनी काय झालं कोण जाणे, प्रेमनाथ दुरावला तिला.. एकदा केव्हातरी प्रेमनाथने म्हणे त्या गुलाबाची अन् चिठ्ठीची हकिकत मोठ्या विश्वासाने अशोककुमारला सांगितली. त्यावर अशोलकुमार त्याला चमकून म्हणला,
"काय सांगतोस..? अरे पण अशी चिठ्ठी आणि गुलाबाचं फूल तिनं मलाही दिलं आहे..!"
एवढं सांगून दाईमा तोंडातलं बोळकं दाखवत मोकळी हसली आणि तिनं माझ्याकडे पाहून आपला म्हातारा मिचमिचा डोळा मारला.. ;)
"पण खर सांगू का तुला, खर्या प्रेमाकरता ती नेहमी भुकेली राहिली आणि भुकेलीच मेली रे.."
घटकेपूर्वी हसून मला डोळा मारणार्या दाईमाच्या डोळ्यात कधी पाणी उभं राहिलं हे तिचं तिलाही कळलं नाही..!
(क्रमश: ..)
-- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
6 Jan 2012 - 9:23 pm | गणपा
हा आठवांचा पेटारा आमच्या सोबत शेयर केल्याबद्दल धन्यवाद.
पुभाप्र.
6 Jan 2012 - 10:02 pm | मेघवेडा
असंच म्हणतो.
लहान पोराला कुणीतरी अचानक चॉकलेट द्यावं तसं झालंय. एक संपलं.. अजून पायजे! दुसरं दिलं.. तेही संपलं.. अजून! :)
7 Jan 2012 - 9:33 am | नंदन
असेच म्हणतो. शेवटचा फोटो 'नको वितळते डोळे लावू एकांताच्या पारी'ची आठवण करून देणारा.
6 Jan 2012 - 9:32 pm | विजुभाऊ
तात्या मधुबालेचा हा फोटो एकदम झकास आहे.
6 Jan 2012 - 10:21 pm | आत्मशून्य
फोटो अप्रतीम.
7 Jan 2012 - 3:31 am | स्मिता.
अजून वाचायला सुरुवात केली नाही की संपलाही हा भाग! पण काहितरी वेगळी माहिती असलेला हा भाग आवडला. पुढचेही लेख येवू द्या.
7 Jan 2012 - 9:45 am | किसन शिंदे
छोटासाच का होईना पण हा भाग टाकल्याबद्दल धन्यवाद!
(या दिलखेचक सौंदर्याच्या अशा अनेक आठवणींची वाट पाहणारा) - किसन
7 Jan 2012 - 11:59 am | चिरोटा
झकास. मधुबालेने दिलिपकुमारच्या आधी अशोककुमारला ही 'विचारले' होते म्हणतात. पण अशोककुमारने 'तू तो मेरे बेटी जैसी है' म्हणून नाही म्हंटले. (दोघात २२ वर्षांचे अंतर होते)
7 Jan 2012 - 1:11 pm | RUPALI POYEKAR
एकदम झकास, अजून लेख येवू द्या, वाट पाहत आहोत
7 Jan 2012 - 2:10 pm | तिमा
अरेरे, आम्हाला अशी मस्करीतली चिठ्ठी जरी मिळाली असती, तरी त्या एका चिठ्ठीवर आमचे जगणे हवेत तरंगत झाले असते!
7 Jan 2012 - 2:44 pm | जाई.
दोन्हीही भाग छान जमलेत
पुढचा भाग लवकर येउ दे
7 Jan 2012 - 3:06 pm | ५० फक्त
मस्त लिहिलंय तात्या, एकदम छान वाटलं, आणि तो खालचा फोटो फारसा पाहण्यात आलेला नाही .
7 Jan 2012 - 4:16 pm | बिपिन कार्यकर्ते
.
7 Jan 2012 - 4:25 pm | रेवती
छान.
लेखन आवडले.
7 Jan 2012 - 4:26 pm | विनायक प्रभू
.
विप्र
9 Jan 2012 - 10:58 am | विसोबा खेचर
सर्व प्रतिसादकर्त्या रसिकांचा मी ऋणी आहे. वाचनमात्रांचेही औपचारीक आभार मानतो..
तात्या.
9 Jan 2012 - 12:23 pm | बबलु
..