आषाढाचा मास । दर्शनाची आस ।
होती तुझे भास । पांडुरंगा । ।
साठवावे नेत्री । भक्तीचिया गात्री ।
दिवसा नि रात्री । रूप तुझे । ।
खोवलेला शिरी । तुरा हा मंजिरी ।
वसतो पंढरी । विठू राया । ।
भिवरेच्या तिरी । उभा विटेवरी ।
कर कटेवरी । ठेवोनिया । ।
काळा नि सावळा । प्रेमाचा पुतळा ।
मनाचा निर्मळा । पांडुरंग । ।
नामयाचा घास । घेऊनिया खास ।
जागवली आस । भक्तीयोगे । ।
घेऊनी वळण । दळितो दळण ।
करितो राखण । जनाईचे । ।
तुकोबाचा भार । घेई शिरावर ।
परि गुन्हेगार । आवलीचा । ।
काय त्या म्हणावं ? देव की मानव ।
कोणाला कळाव ? गारूड ते । ।
श्रद्धा अंधश्रद्धा । फरक तो करा ।
परी कास धरा । प्रयत्नांची । ।
प्रयत्नाच्या अंती । ध्येयाची ती पूर्ती ।
करा श्रम भक्ती । विठू सांगे । ।
जाणा एक सर्व । विश्व हाच देव । ।
सांगे ज्ञानदेव । सकलांना । ।
प्राजू म्हणे ऐसे । विश्वाला जपावे ।
प्रयत्न करावे । ध्येयासाठी । ।
- प्राजु.
वरील काव्य वाचून प्राजुला विरक्ती आली आहे असा गैर समज करून घेऊ नये. काही ओव्या वाचता वाचता मला या ओळी सुचल्या.. म्हणून इथे लिहिल्या.
प्रतिक्रिया
18 Jul 2008 - 9:11 pm | इनोबा म्हणे
अप्रतिम रचना...
नामयाचा घास । घेऊनिया खास ।
जागवली आस । भक्तीयोगे । ।
घेऊनी वळण । दळितो दळण ।
करितो राखण । जनाईचे । ।
तुकोबाचा भार । घेई शिरावर ।
परि गुन्हेगार । आवलीचा । ।
काय त्या म्हणावं ? देव की मानव ।
कोणाला कळाव ? गारूड ते । ।
या ओळी तर खासच...
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
20 Jul 2008 - 3:10 am | आनंदयात्री
सुंदर अभंग तायडे !
18 Jul 2008 - 9:03 pm | प्रमोद देव
धन्य आहे तुझी!
अतिशय प्रासादिक रचना!
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
18 Jul 2008 - 11:19 pm | धनंजय
सुरेख प्रासादिक रचना.
19 Jul 2008 - 3:18 am | प्रियाली
मस्तच आहेत
19 Jul 2008 - 12:28 am | मुक्तसुनीत
नव्या युगातल्या , नव्या जगातल्या ओव्या आवडल्या. भक्तियोगाचा धागा आजच्या जगण्याशी जोडण्याचा प्रयत्न वाटला. शब्दांमधे सहजपणा असूनही रचनेत निर्दोष वाटल्या हे विशेष.
18 Jul 2008 - 9:07 pm | वरदा
सगळ्याच ओव्या आवडल्या....
श्रद्धा अंधश्रद्धा । फरक तो करा ।
परी कास धरा । प्रयत्नांची । ।
हे सगळ्यात छान....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
18 Jul 2008 - 9:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काळा नि सावळा । प्रेमाचा पुतळा ।
मनाचा निर्मळा । पांडुरंग । ।
आणि
प्राजू म्हणे ऐसे । विश्वाला जपावे ।
प्रयत्न करावे । ध्येयासाठी । ।
स्सही !!! प्राजुची अभंग रचना आवडली.
अवांतर : वृत्त- मात्रावाले आल्यावर अभंगाचे वृत्त तपासले जाईल तो पर्यंत मार्क देत नाही. ;)
18 Jul 2008 - 9:33 pm | मदनबाण
फारच सुंदर.....
(जाता पंढरीसी सुख वाटे जिवा...)
मदनबाण.....
18 Jul 2008 - 10:03 pm | विद्याधर३१
सुंदर ते ध्यान
उभे विटेवरी |
कर कटावरी
ठेवोनीया|
याचीच आठवण झाली.
विद्याधर
18 Jul 2008 - 10:04 pm | संदीप चित्रे
क्या बात है प्राजु !
काय त्या म्हणावं ? देव की मानव ।
कोणाला कळाव ? गारूड ते । ।
श्रद्धा अंधश्रद्धा । फरक तो करा ।
परी कास धरा । प्रयत्नांची । ।
हे तर खूपच आवडलं :)
कुणी तरी ह्याला छान चाल द्यावी.
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
18 Jul 2008 - 10:12 pm | शितल
प्राजु,
मस्तच
सह्ही वाचना प्रत्येक शब्द अन शब्द भावला मनाला.:)
18 Jul 2008 - 10:14 pm | यशोधरा
प्राजू, तुला दंडवत गं बाई :) काय सुरेख लिहिले आहेस :)
18 Jul 2008 - 10:28 pm | मनीषा
श्रद्धा अंधश्रद्धा । फरक तो करा ।
परी कास धरा । प्रयत्नांची । ।
प्राजू म्हणे ऐसे । विश्वाला जपावे ।
प्रयत्न करावे । ध्येयासाठी । ।.... वा!!
18 Jul 2008 - 10:34 pm | केशवसुमार
प्राजूताई,
अतिशय उत्तम रचना.. आवडली
(वारकरी)केशवसुमार
स्वगतः अता ह्याचे विडंबन करणे आले.. :B काय काय पाप घडवणार आहे हा पांडुरंग त्यालाच माहित :W
18 Jul 2008 - 10:37 pm | प्राजु
यातच आपली प्रतिक्रिया मिळाली.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Jul 2008 - 11:07 pm | बेसनलाडू
तू सनी देओल तर मी चंकी पांडे :) 'पाप की दुनिया' होणार इकडे ;)
(पापी)बेसनलाडू
प्राजुताई,
अभंगवाणी पर्फेक्ट अभंगवाणीच झालीये.साचा,रचना,गेयता ... सगळं सांभाळलंय. तुका घेई डोक्यावरी पण आवलीचा गुन्हेगार ही कल्पना फार आवडली. स्त्री मुक्तीवादी चळवळीच्या एखाद्या कार्यकर्तीने लिहिल्यासारखी :) (ह. घ्या.)
(गुन्हेगार)बेसनलाडू
18 Jul 2008 - 10:44 pm | चकली
वाचता वाचता पटकन स्वतःशी अभंगासारखी म्हणून पाहिली. छान!
चकली
http://chakali.blogspot.com
18 Jul 2008 - 11:10 pm | सहज
छानच लिहले आहे.
आवडले.
18 Jul 2008 - 11:15 pm | नंदन
अभंग आवडले.
तुकोबाचा भार । घेई शिरावर ।
परि गुन्हेगार । आवलीचा । ।
काय त्या म्हणावं ? देव की मानव ।
कोणाला कळाव ? गारूड ते । ।
-- या अभंगांवरून 'तुकयाची आवली' कादंबरी आठवली :)
शेवटचा प्रयत्नवादाचा संदेशही खासच.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
19 Jul 2008 - 12:22 am | सर्किट (not verified)
अत्यंत सुंदर ओव्या. छान !
(तुमच्या घरी "जाते" आहे का ? त्यावर दळताना अशा सुंदर ओव्या होतात असे ऐकले आहे. ह्या मिक्सर-ग्राइण्डर च्या ओव्या नव्हेत, एवढे नक्की.)
- (भाविक) सर्किट
19 Jul 2008 - 12:32 am | विसोबा खेचर
संपूर्ण अभंगच सुरेख व अत्यंत गेय...!
आषाढाचा मास, दर्शनाची आस
होती तुझे भास, पांडुरंगा!
या पहिल्याच ओळी वाचल्या आणि लगेच याची 'पिलू' रागावर अधारीत चाल मला सुचली! आता याहून अधिक कोणता प्रतिसद देऊ? :)
प्राजू, आत्ताच खास फोन करून मी तुला ही चाल ऐकवली. आवडली का ते सांग हो! :)
आपला,
(बाबूजींचा शिष्य) तात्या.
19 Jul 2008 - 12:41 am | प्राजु
तुम्ही लावलेली चाल अतिशय सुंदर आहे. तुम्ही मला ताबडतोब फोन करून चाल ऐकवलीत... यापेक्षा चांगली प्रतिक्रिया काय असेल आणखी.. ??
खूप खूप धन्यवाद.
आपल्या सगळ्यांची मनापासून आभारी आहे..
सर्किटशेठ, मार्कांबद्दल धन्यवाद. माझ्याकडे जाते नाही हो :(
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Jul 2008 - 1:15 am | आपला अभिजित
आषाढाचा मास। दर्शनाची आस।।
होती तुझे भास। वरुणराजा।।
आठवावे नेत्री। भिजलेल्या गात्री
चिंब ओल्या रात्री।। रूप तुझे।।
भरल्या ताटावरी। उठोनि सत्वरी
खरकट्यावरी। जेवोनिया।।
मुठेच्या तीरी। होई तिरीमिरी।।
कधी येणार तू तरी। पाऊसराया।।
सप्तरंगांचा सोहळा। इंद्रधनुचा लळा।।
याचि देही याचि डोळा। का न अनुभवणे।।
कांदाभज्यांचा वास। वा मिसळ सुग्रास।।
संपणार कधी आस। तुझ्या शिंपण्याने।।
हळुवार पुळण। कधी रानाचे गान।।
कधी रूप भीषण। दाव तरी तुझे।।
चातकाची हार। पापाचा साक्षीदार।।
होऊ नको गुन्हेगार। समस्तांचा।।
काय तुला म्हणावं? देव की दानव।
घे भूवरी धाव। सर्व सोडुनी।।
श्रद्धेचा महापूर। प्रार्थनांचा कहर।।
भावनांचा बहर। त्याचसाठी।।
प्रयत्नांच्या अंती। ध्येयाची होईल पूर्ती।
कोसळेल अंती। बदाबदा तो।।
जाणा हेचि कर्म। पावसाचे मर्म।
गाळुनिया घर्म। झाडे लावा।।
अभिजित म्हणे ऐसे। निसर्गास जपावे।
चुलीत न घालावे। नियम सारे।।
-----------------------
19 Jul 2008 - 1:19 am | प्राजु
जाणा हेचि कर्म। पावसाचे मर्म।
गाळुनिया घर्म। झाडे लावा।।
हे मस्त.
पण अभंग किंवा ओवी लिहिताना ६ -६-६-४ हे बंधन पाळावे लागते . काही ठिकाणी हे नाही झाले..
एकूण कवितेतला भाव सुंदर आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Jul 2008 - 1:25 am | आपला अभिजित
अहो,
हापिसातली खर्डेघाशी झाल्यानंतर रात्री एक वाजता आमच्या प्रतिभेने भांगडा करावा, अशी तुमची अपेक्षा आहे काय?
काहीतरी खरडले, झाले!
चुभूद्याघ्या.
19 Jul 2008 - 1:27 am | मदनबाण
चातकाची हार। पापाचा साक्षीदार।।
होऊ नको गुन्हेगार। समस्तांचा।।
हे फारच आवडले..
मदनबाण.....
19 Jul 2008 - 1:31 am | आपला अभिजित
बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाच्या वेळीही असेच एक भोचक काव्य प्रसवले होते.
ते उद्या टाकीन.
19 Jul 2008 - 8:16 am | सुचेल तसं
सर्व ओव्यांमधे यमक छान जुळले आहे. कुठेही यमक जुळवण्यासाठी मुद्दाम खटाटोप केला आहे असं वाटत नाही.
माझं मुळ गाव पंढरपूर असल्याने मला फारच आवडला हा अभंग. वाचताना विठोबाची प्रसन्न मुर्ती डोळ्यांसमोर उभी राहिली.
http://sucheltas.blogspot.com
19 Jul 2008 - 9:12 am | प्राजु
आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Jul 2008 - 9:47 am | विकास
एकदम आवडली!
आणि तितकीच केशवसुमारांचीपण!
19 Jul 2008 - 10:10 am | ऋषिकेश
कविता चिक्कार आवडली
एकदम बेष्ट!
अजून येऊ दे
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
19 Jul 2008 - 12:08 pm | स्वाती दिनेश
सुरेख रचना!
श्रद्धा अंधश्रद्धा । फरक तो करा ।
परी कास धरा । प्रयत्नांची । ।
आणि
प्राजू म्हणे ऐसे । विश्वाला जपावे ।
प्रयत्न करावे । ध्येयासाठी । ।
हे विशेष आवडले.
स्वाती
19 Jul 2008 - 6:02 pm | सुवर्णमयी
मस्त!
अशाप्रकारची तुझी मी वाचलेली पहिली रचना. मस्त. आवडली
19 Jul 2008 - 6:06 pm | ANIRUDDHA JOSHI
PRAJUTAI NAMSKAR,
TUMACHI HA ABHANG FARCH CHAN AAHE, KHUP CHAN LIHITA TUMHI KEEP IT UP.
ANIRUDDHA KOLHAPUR.
19 Jul 2008 - 6:27 pm | चतुरंग
प्राजू, सुरेख, अर्थपूर्ण, प्रासादिक ओव्या!
तुक्याची-आवलीची ओवी विशेष भावली, फारच छान!
(स्वगत - प्राजूसारखी 'आवली' असेल तर 'जगदीशा'चा तुका झाला ह्यात काय नवल! (ह.घे.) ;) )
चतुरंग
19 Jul 2008 - 7:29 pm | प्राजु
विकास, हृषिकेश, सुचेलतसं, अनिरूद्ध, सुवर्णमयी, स्वाती आणि चतुरंग.. आपले सर्वांना मनापासून धन्यवाद..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Jul 2008 - 6:11 am | चित्रा
छान लिहीले आहेस प्राजू, खूपच आवडले.
20 Jul 2008 - 6:37 am | धोंडोपंत
अप्रतिम, सुंदर, प्रासादिक, छंदबध्द, अर्थपूर्ण रचना.....
एकदम रिफाईन्ड पोएट्री.
क्या बात है! खासच.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
आपला,
(हरिभक्त) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
3 Aug 2008 - 3:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राजु मॅम आणि मिपा दोस्त हो,
वरील अभंग सुरेख गाताहेत प्रमोद देव, इथे जरुर ऐका !!!
3 Aug 2008 - 5:16 pm | सहज
सुंदर चाल. कुठलेही वाद्य /पार्श्वसंगीत नसताना गुंतवुन ठेवणारी चाल. सोप्पे काम नाही.
प्राजू व प्रमोदकाका, सह्ही!!!!!
3 Aug 2008 - 6:31 pm | ऋषिकेश
असेच म्हणतो
सुंदर चाल, ऐकून मनाला शांत वाटलं..
प्रमोदकाका व प्राजू अभिनंदन!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
3 Aug 2008 - 9:55 pm | चतुरंग
'प्राजू'चे अभंग । 'प्रमोदा'चे संग।
सर्व होती दंग । मिपाकर ||
चाल हीच खास | काही ना साथीस|
सुरातच खास | सर्व ओळी ||
(स्वगत - प्रा.डॉ. दुवा देण्याची अशी काही सुरेल कामेही करतात तर! (ह.घ्या.);)
चतुरंग
3 Aug 2008 - 4:15 pm | पंचम
माझा पांडुरंग । ओठाओठावरी फुले ।
सद्गुणांची सुमने । चरणावरी । ।
प्राजुचा अभंग । जणू गाभा-यातील नादब्रह्म ।
घुमतो अखंड । पंढरीत । ।
अभंग आवडला ।
-पंचम
3 Aug 2008 - 6:46 pm | प्राजु
प्रमोदकाका,
ह्याला चाल लावू माझ्या अभंगाला तुम्ही एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे...
धन्यवाद.
बिरूटे सर, आपलेही धन्यवाद. प्रमोदकाकांची चाल इथे दिल्याबद्दल.
सर्व वाचकांचे आणि रसिकांचे मनापासून आभार.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Aug 2008 - 8:30 pm | श्रीकृष्ण सामंत
प्राजूजी,
खूप सुंदर अभंग आहे.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
3 Aug 2008 - 8:43 pm | प्राजु
प्राजूजी,
प्राजूजी.............. झालं.. मेलीस प्राजु आता तू.
सामंत काका,
मला "जी' लावू नको हो.. तसंही मी कोणापुढे जी जी नाही करत :) प्राजु च म्हणा..
खूप सुंदर अभंग आहे.
धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
4 Aug 2008 - 10:15 am | मनस्वी
अप्रतिम रचना. खूपच आवडली.
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
13 Mar 2009 - 11:09 am | राघव
आता याहून म्या पामर काय बोलणार?
संपूर्ण अभिव्यक्ती आहे ही.. आमची बुद्धी त्यापुढे तोकडीच. :)
खूप आवडली अभंगवाणी!
राघव