एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग पहिला. प्रिमाईस

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
1 Jul 2008 - 2:43 am

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग पहिला. प्रिमाईस
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग दुसरा : प्रमुख व्यक्तिरेखा
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) भाग तिसरा : संघर्ष

" नाट्यलेखन काय क्लासमध्ये शिकवून येतं का रे? "
" काय एवढं शिकवतात रे लेखन कार्यशाळेत? "
अशा काही सीनियर नाटकवाल्याच्या प्रश्नांना तोंड देत देत आम्ही एक दोन लेखन कार्यशाळांमध्ये जाऊन शिकून वगैरे आलो... मग तिथून प्रेरणा घेत घेत आंतरजालावरती बरंच लेखनतंत्राविषयी वाचलं... पटकथा लेखन शिक्षण आणि नाट्यलेखन शिक्षण या विषयावर आंतरजालावरती प्रचंड साहित्य उपलब्ध आहे, त्यातलं काही वाचून समजून घेतलं, मजा आली...स्वत:च्या लेखनासाठी याचा उपयोग झालाच आणि समीक्षणात्मक लेखनासाठीही नेहमी उपयोग होतो. सरावासाठी घरचा अभ्यास दिलेला आहे काही संस्थळांवरती...तोही भलताच मजेदार आहे...हॊलीवूड मधल्या काही पटकथा,संवाद संस्थळावर उपलब्ध आहेत..त्यांचं या निमित्तानं वाचन झालं..

दरम्यान काही स्क्रीनरायटिंगचा कोर्स केलेली / करणारी काही मंडळी दोस्त झाली... यांनी लेखनतंत्रासाठी पाठ्यपुस्तक म्हणून वापरलेली काही पुस्तके सांगितली, त्यांचा अभ्यास झाला.या सार्‍या अभ्यासातलंच काही इथे थोडक्यात क्रमश: देण्याची इच्छा आहे....

इथे एक स्पष्टीकरण आवश्यक आहे की इथे दिलेले सगळे नियम किंवा ठोकताळे तारतम्याने घ्यायचे आहेत.... प्रत्येक ठिकाणी ते लागू पडणारच असा माझा कोणताही दावा नाही आणि कोणीही करू नये...कुठेकुठे कदाचित काही विसंगतीही सापडण्याची शक्यता आहे. मात्र आपल्या आवडत्या कथा / नाटक / चित्रपट अशा कलाकृतींना यातले बरेचसे ठोकताळे फ़िट्ट बसतात असे समजत जाते तेव्हा झकास वाटते.
अजून एक म्हणजे प्रत्येक इंग्रजी शब्दाला मला प्रतिशब्द सापडला नाहीये, तिथेतिथे मी त्यासाठी थोडासा प्रयत्न केला पण त्यातच अडकलो नाही, पुढे लिहीत गेलो आहे.

terminology...यातल्या प्रत्येकावर पुढे काही भागांत लिहिणार आहे.
1.premise.
2.plot
3.dramatic structure
4.protagonist
5.conflict
6.rhythm
7.genre
8.dialogue
9.progression of play...

१. premise...प्रिमाइस याला चपखल मराठी शब्द मला सुचला नाही.. कथासार, कथाबीज, किंवा तात्पर्य वगैरे जवळ जाणारे शब्द आहेत पण प्रिमाईस ला ते अचूक वाटत नाहीत. असो..ते फ़ारसे महत्त्वाचे नाही.मी सध्या याला प्रिमाईसच म्हणेन. (काही लोक यालाच वन लाईन स्टोरी असे म्हणतानाही ऐकले आहे .ते असो.)
लिहायला सुरुवात करण्यापूर्वी आपला प्रिमाईस तयार असणे उत्तम.... आपल्याला नक्की काय सांगायचंय? तेच का सांगायचंय? आणि कुठवर कसं सांगायचंय? अशा प्रश्नांची उत्तरे माहित असायलाच हवीत... प्रत्येक दृश्य, प्रत्येक संवाद, प्रत्येक नवीन व्यक्तीरेखा तुमच्या मूळ प्रिमाईसशी सुसंगत आहे का हे पाहणे अत्यंत आवश्यक असते.प्रिमाईस साधारणपणे गोष्टीतल्या मूलभूत मानवी भावनेबद्दल सांगतो.

उदा. समजा आपली गोष्ट मत्सराबद्दलची आहे. मग मत्सराबद्दल आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे ते ठरलं पाहिजे.
म्हणजे मत्सरामुळे सर्वनाश होतो
मत्सरामुळे मानहानी होते.
मत्सर माणसाला एकटा पाडतो.
मत्सरामुळे माणूस प्रेमाला पारखा होतो.
आता यातलं काहीतरी एक नक्की केलं की आपलं कथासार तयार होणार.

प्रिमाईस मध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आल्या पाहिजेत.
१.भावना २.संघर्ष ३.निराकरण / गोष्टीचे ध्येय.
उदा. रोमिओ आणि जुलिएट चा प्रिमाईस असा होईल... सच्चं प्रेम मृत्यूवरही मात करतं.

कोणत्याही नाटकाला / गोष्टीला सुस्पष्ट प्रिमाईस नसला की बरेच गोंधळ निर्माण होतात.थातुरमातुर प्रसंग, नको त्या व्यक्तिरेखा वाढत जातात ...खुद्द लेखक गोष्ट पूर्ण होईपर्यंत गोंधळून जातो. लेखकाला नक्की काय सांगायचंय ते वाचकाला / प्रेक्षकाला कळेनासं होतं...

कधीकधी एखादा साधासा विचार, कल्पना किंवा प्रसंग यापासून गोष्ट सुरू होऊ शकते परंतु लिहिता लिहिता लवकरात लवकर प्रिमाईस तयार होणे आवश्यक असते.

प्रिमाईस जसाच्या तसा संवादात येऊ नये... प्रेक्षकांना तो गोष्ट संपताना आपोआप कळायला हवा... आणि प्रिमाईस काहीही असला तरी लेखकाला तो शेवटी सिद्ध करता यायला हवा.

आणखी एक सांगायचं म्हणजे आपल्या अत्यंत आवडत्या नाटकाचा / सिनेमाचा प्रिमाईस तयार करणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नसते पण तो एक मजेदार खेळ होऊ शकतो. ... या धाग्यात असा खेळ खेळून पाहूयात काय?

प्लॉट ( कथानक ?)
प्लॉट म्हणजे विशिष्ट प्रसंगांची, ठराविक क्रमाने केलेली, भावना उद्दिपीत करणारी अर्थपूर्ण मांडणी..
कथानकाशेवटी व्यक्तिरेखेच्या आयुष्यात अर्थपूर्ण बदल घडला पाहिजे.योगायोग नको.( उदा. गरीब कष्टाळू माणसाला शेवटी यश मिळते असा संदेश देताना हीरोला शेवटी लॊटरी लागते आणि तो श्रीमंत होतो , हे चूक...मान्य आहे,असं खरं घडू शकतं...लॊटरी काय कोणालाही लागू शकते पण या हीरोला लॊटरी लागली तर आपला प्रिमाईस खोटा पडला ना.... ).

नुसतंच खरं आयुष्य हे प्रत्येक वेळी परिणामकारक लेखन होऊ शकत नाही...अगदी रिअलिस्टिक नाटकातसुद्धा खर्‍या आयुष्याचा केवळ भास घडतो.पण तेच जसंच्या तसं खरं आयुष्य नव्हे.खर्‍या आयुष्यात बर्‍याचदा कार्यकारणभाव नसतो . पण प्रत्येकाला कार्यकारणभाव असलेल्या भासमान विश्वाची गरज असते आणि गोष्ट ती गरज पूर्ण करते.म्हणून नाटकाची गोष्ट संपूर्ण काल्पनिक किंवा संपूर्ण सत्य नसते तर ती या दोन्हींचे सुयोग्य मिश्रण असते.

ऍरिस्टॉटलचे ड्रामॆटिक स्ट्रक्चर

सुरुवात : यात पहिल्या १० % भागात स्थल,काल,व्यक्ती यांच्याबद्दल माहिती देणारे प्रसंग घडतात.
मध्य : पुढच्या ७५ % भागात नाट्यमय ताण वाढत जातो आणि आणीबाणीच्या परिस्थितीत अत्युच्च ताणापाशी क्लायमॆक्स, इथून माघार अशक्य.
शेवट : आणि मग उरलेल्या १५ % भागात ताणाचे निराकरण आणि तात्पर्य समजते.

(क्रमशः)

नाट्यसाहित्यिकतंत्रशिक्षणप्रकटनविचारलेखअनुभवमाहितीप्रतिभा

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

1 Jul 2008 - 2:58 am | चतुरंग

चांगला चर्चाविषय. नाटकाच्या/चित्रपटाच्या लिखाणाची पार्श्वभूमी समजावून देणारा विषय.
('प्रिमाईस = प्रमेय' शब्द कसा वाटतो.)
(प्लॉट = आराखडा?)

चतुरंग

चांगला चर्चाविषय. तंत्राबद्दल वाचून मला नाटक लिहायला शिकता येणार नाही, हे मान्य, पण नाटक बघताना अधिक आस्वाद घेता येईल.

प्रेमिस/प्रिमाइस म्हणजे ज्यावर (नाट्य)वास्तू उभी करतो ते आधारस्थान, म्हणजे गृहीतक.
प्रमेय म्हणजे जे प्रमाणांनी सिद्ध करायचे आहे ते.

थोडक्यात "मत्सराने माणूस एकाकी पडतो" हे प्रिमाईस असले, तर नाटकाच्या शेवटी ते सिद्ध होत नाही - ते सुरुवातीलाच नाटककार + प्रेक्षकांना पूर्ण मान्य असते. हे मान्य असल्यामुळेच नाटकातल्या पात्रांच्या आयुष्यात जे काही नाट्यमय प्रसंग येतात ते प्रेक्षकांना पटतात.

चतुरंग's picture

1 Jul 2008 - 6:14 am | चतुरंग

प्रिमाइस = गृहितक हे मान्य.

ते सुरुवातीलाच नाटककार + प्रेक्षकांना पूर्ण मान्य असते -
हे मात्र पटत नाही. नाटककाराला मान्य असणारच कारण त्यावरच नाटक आधारित असते पण प्रेक्षकांना गृहितक शेवटी पटणे/न पटणे हे नाट्य कसे उलगडत जाते त्यावर ठरते. ह्या गृहितकाची बांधणी ज्या तत्त्वांवर आधारलेली आहे ती जेवढी दृढ आणि ते हाताळण्याचे कौशल्य जितके जास्त तेवढी ते प्रेक्षकांना पटण्याची शक्यता जास्त.

चतुरंग

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Jul 2008 - 8:57 am | llपुण्याचे पेशवेll

उत्तम उपक्रम.. कदाचित माझ्यासारख्या दगडाला या धाग्याचा नक्की उपयोग होईल..

नाटककाराला मान्य असणारच कारण त्यावरच नाटक आधारित असते पण प्रेक्षकांना गृहितक शेवटी पटणे/न पटणे हे नाट्य कसे उलगडत जाते त्यावर ठरते. ह्या गृहितकाची बांधणी ज्या तत्त्वांवर आधारलेली आहे ती जेवढी दृढ आणि ते हाताळण्याचे कौशल्य जितके जास्त तेवढी ते प्रेक्षकांना पटण्याची शक्यता जास्त.

हे देखील पटले..

पुण्याचे पेशवे

भडकमकर मास्तर's picture

1 Jul 2008 - 3:15 am | भडकमकर मास्तर

(प्लॉट = आराखडा) योग्य वाटतोय...
पण प्रमेय काही कळत नाही , गणिती वाटतंय ... :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

नंदन's picture

1 Jul 2008 - 3:14 am | नंदन

एका वेगळ्या विषयावर लेखमाला सुरू केल्याबद्दल आभार. सुरुवात छान झाली आहे, पुढील लेखांची उत्सुकतेने वाट पाह्तो आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

अरुण मनोहर's picture

1 Jul 2008 - 3:43 am | अरुण मनोहर

मास्तर, खूपच आवाडला हा लेख. नवीन शिकायला मिळाले.

प्रिमाईसला "पूर्वपक्ष" असा चपखल मराठी शब्द आहे.

पिवळा डांबिस's picture

1 Jul 2008 - 4:55 am | पिवळा डांबिस

(|:
संपलं की मला उठवा बरंका, मास्तर!

चतुरंग's picture

1 Jul 2008 - 7:51 am | चतुरंग

प्रिमाईस -नाट्यलेखनतंत्राबद्दल लिखाण सुरु झाले की पिडाकाका झोपतात आणि संपले की पिडा काकांना उठवावे लागते! ;)

चतुरंग

मेघना भुस्कुटे's picture

1 Jul 2008 - 8:10 am | मेघना भुस्कुटे

मास्तर,
झकास झालीय सुरुवात. जाम मजा येतेय. पण जमतील तितकी उदाहरणं द्या बरं का. आणि इथेपण घरचा अभ्यास दिलात तरी चालेल. :) तुम्हांला सापडलेले दुवे इथे द्यायला जमतील का? (अवांतर वाचन करून जास्तीचा अभ्यास केलेला बरा असतो! वर्गात हमखास भाव खाता येतो!)
पुढच्या भागाची वाट पाहते.

मेघना भुस्कुटे's picture

1 Jul 2008 - 9:02 am | मेघना भुस्कुटे

हे प्रतिशब्द चालतील का?

terminology... (परिसंज्ञा)
1.premise - गृहितक
2.plot - कथानक
3.dramatic structure - नाट्य आराखडा
4.protagonist - मुख्य पात्र
5.conflict - संघर्ष
6.rhythm - ताल / लय (?)
7.genre - प्रकार (/जातकुळी?)
8.dialogue - संवाद
9.progression of play... नाटकाचा (कथानकाचा?) ओघ?

अमोल केळकर's picture

1 Jul 2008 - 9:09 am | अमोल केळकर

मस्त माहिती
आर्टस् मधे ही एक सायन्स दडले आहे ( ऍरिस्टॉटलचे ड्रामॆटिक स्ट्रक्चर ) हे लक्षात आले.
धन्यवाद या अभ्यासपुर्ण माहितीबद्दल

मनिष's picture

1 Jul 2008 - 11:30 am | मनिष

मास्तर...मालिका चालू ठेवा, मजा येतेय!