पूर्वीच्या सोविएत संघराज्याचा एक भाग असलेल्या परंतु आता स्वतंत्र अशा तातारस्तानची राजधानी कझान इथे दि.५ मे २०११ पासून, म्हणजे उद्यापासून, बुद्धीबळ जगताचे लक्ष लागून राहिलेल्या कँडिडेट्स मॅचेस सुरु होत आहेत.
२०१२ सालच्या जगज्जेतेपदाच्या स्पर्धेसाठी सध्याचा जगज्जेता विश्वनाथन आनंदचा प्रतिस्पर्धी ठरवण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट ह्या मॅचेसमधून साध्य होणार आहे.
आठ खेळाडूंमधून एकाची निवड होईल. कोण असेल हा खेळाडू? या स्पर्धेतल्या खेळाडूंची थोडक्यात ओळख करुन घेऊयात.
वॅसेलीन टोपालोव - बल्गेरियाचा हा खेळाडू २०१० सालचा उपविजेता आहे.
गतसालच्या स्पर्धेतल्या पराभवाचा वचपा काढण्याची नामी संधी टोपालोव सोडेल असे आतातरी वाटत नाही. या वर्षी फारसा कोणत्याच स्पर्धेत त्याने भाग घेतलेला नाहीये, अंडर द रडार म्हणतात तशा पद्धतीने तयारी चालू असेल त्याची!
"रशियन खेळाडूशी मी रशियात खेळणार नाही!" अशा तर्हेचे वादग्रस्त विधान त्याने करुन ठेवलेले आहेच. २००६ च्या व्लादिमीर क्रामनिक बरोबर झालेल्या जगज्जेतेपद स्पर्धेतली वादग्रस्त बाथरुम काँट्रोवर्सी ही अशा विधानाच्या मुळाशी आहे. परंतु तसाही टोपालोव भडक विधाने करण्याबाबत प्रसिद्ध आहेच त्यामुळे ह्याकडे कितपत लक्ष द्यायचे हे तारतम्यानेच ठरवावे लागेल पण एकूण त्याचा सहभाग रंगतदार होईल हे नक्की!
गाटा काम्स्की
हा अमेरिकन खेळाडू २००९ मधे टोपालोवकडून कँडिडेट मॅचेस मध्येच हरला होता त्यामुळे त्याची आनंदबरोबर खेळण्याची संधी गेली होती! वयाच्या १२ व्या वर्षी मार्क तैमानोवसारख्या रशियन ग्रँडमास्टरला हरवाणारा गाटासुद्धा जिद्दीने खेळणार. अतिशय प्रतिभावान असला तरी खेळात सातत्य नसल्याने त्याचा एकूण बुद्धीबळ प्रवास खूपच उंचसखल पद्धतीने झालाय. तो कधी काय करेल याचा नेम नाहीये परंतु धक्कादायक निकाल नोंदवायची क्षमता याच्याकडे आहे हे नक्की.
व्लादिमीर क्रामनिक
गॅरी कास्पारोवला हरवून हा २०००-२००६ असा क्लासिकल वर्ल्ड चँपियन होता (गॅरी कास्पारोवने फिडेपासून फारकत घेऊन काढलेली स्वतःची स्पर्धा होती).
पुन्हा फिडेच्या जागतिक स्पर्धेत २००६-२००७ मध्ये टोपालोवला हरवून हा जगज्जेता झाला होता. अतिशय उत्तम खेळ करणार्या या रशियन खेळाडूने २००८ मध्ये आनंदकडूनच पराभूत होत विजेतेपदाचा मुकुट गमावला होता. त्यामुळे हा सुद्धा 'बदले की आग में!' असणार. ;)
लेवॉन अॅरोनिअन
२००८-२०१० च्या फिडे ग्रँड प्रिक्स सेरीजचा विजेता म्हणून हा कँडिडेट मॅचेससाठी क्वालिफाय झालाय. लेवॉन एक अत्यंत आक्रमक खेळाडू आहे आणि सध्याचा जलदगती बुद्धीबळ विजेतासुद्धा आहे. २००६ सालच्या तुरीन येथे झालेल्या चेस ऑलिंपियाडमध्ये ग्रँ.मा. इवान सोकोलोवचा केवळ साडेदहा मिनिटात आणि १९ चालीत ह्याने कचरा केला होता, ते सुद्दा काळी मोहोरी घेऊन खेळताना! यावरुन ह्याच्या ताकदीची कल्पना यावी.
तैमूर रादजाबोव
आपल्या लाडक्या गॅरी कास्पारोवचा गाववाला, अजरबैजानमधल्या बाकू ह्या गावचा. २००३ साली, वयाच्या सोळाव्या वर्षी, गॅरी कास्पारोव, विशी आनंद आणि रुस्लान पोनोमारिओव अशा महारथींना काळ्या मोहर्याकडून खेळून त्याने धूळ चारली होती. 'सोळावं वरीस धोक्याचं' हे अशा पद्धतीने सिद्ध करणारा हा उमदा खेळाडू स्पर्धेतलं अतिशय तगडं आव्हान असणार आहे! ग्रँड प्रिक्स सेरीज स्पर्धेतला उपविजेता म्हणून या स्पर्धेसाठी तैमूरला क्वालिफिकेशन मिळाले आहे.
अलेक्झांडर ग्रिश्चुक
अतिशय उत्तम खेळणारा अलेक्झांडर ग्रँड प्रिक्स स्पर्धेत खरंतर तिसरा आला. परंतु मॅग्नुस कार्लसनने अचानक कँडिडेट स्पर्धेतून माघार घेतल्याने ती रिकामी जागा ग्रिश्चुकने पटकावली. नशिबाने मिळालेल्या संधीचे हा रशियन खेळाडू काय करतो हे बघणे निश्चितच मनोरंजक असेल!
बोरिस गेल्फांड
२००९ च्या विश्वचषक स्पर्धेचा विजेता म्हणून या स्पर्धेत प्रवेशकर्ता झालाय. जन्माने रशियन असलेल्या परंतु इस्राइलमधे स्थायिक झालेला हा ४२ वर्षीय खेळाडू अतिशय सुरेख खेळतो. परंतु अनेकवार कँडिडेट स्पर्धेत खेळूनही म्हणावे तसे यश याच्या पदरात पडलेले नाही. काही धक्कादायक निकाल नोंदवून हा नामांकितांची क्रमवारी उलटीपालटी करु शकेल परंतु संभाव्य विजेता म्हणून याच्याकडे बघता येईल असे सध्यातरी वाटत नाही.
शाखरियार मामेद्यारोव
२००३ आणि पुन्हा २००५ असा दुहेरी ज्युनिअर वर्ल्ड चँपिअन असलेला एकमेव खेळाडू म्हणून गणला जातो. हा सुद्धा अजरबैजानचाच. ओपनिंग मधे अतिशय चमत्कारिक प्रयोग करत राहणे ही याची खासियत आहे. त्यामुळे पुढचा डाव तो कसा खेळणार याबद्दल प्रतिस्पर्धी कायम वचकून असतात. वाइल्डकार्ड एंट्री झालेल्या या खेळाडूकडून बर्याच अपेक्षा आहेत!
तर असे हे अष्टप्रधान मंडळ! सगळे त्यांच्यात्यांच्या सहायक टीम बरोबर कझानला जमले आहेत. आज स्पर्धेचे उद्घाटन झाले. आता उद्यापासून झुंजी सुरु होणार. फिडेच्या या दुव्यावर जाऊन स्पर्धेतले सामने थेट बघता येण्याची सोय आहे. रसिकांनी याचा लाभ घ्यावा.
(कझानला दुपारी ३ वाजता म्हणजे अमेरिकन पूर्वकिनारा वेळेप्रमाणे सकाळी ७ वाजता सामने सुरु होत आहेत. यानुसार रसिकांनी कॅलेंडरे आणि गजर सेट करावेत! :) )
(टीप - सर्व प्रकाशचित्रे जालावरुन साभार.)
-चतुरंग
प्रतिक्रिया
4 May 2011 - 8:43 pm | नगरीनिरंजन
अत्यंत रंजक माहिती. बुद्धीबळाशी गेल्या सात जन्मात संबंध आलेला नसूनही शेवटपर्यंत वाचत राहावी वाटली. बुद्धीबळ हा खेळही तेवढाच रंजक आणि सोपा असता तर...
4 May 2011 - 9:19 pm | गणेशा
छान माहिती ... मस्त वाटले वाचुन ..
व्लादिमीर क्रामनिक ची शक्यता जास्त वाटते आहे मला..
अवांतर : तुम्ही लिहिलेले मागील भाग किंवा पेपर मध्ये बुद्धीबळाचे जे डाव लिहिले जातात ते वाचायचे कसे हेच कळत नाहि बघा... त्यासाठी पण एक लेख लिहा ना.. म्हणजे ज्यांना बुद्धीबल फक्त खेळता येतो त्यांना असले डाव आनि त्याचे वाचन करुन थोडेफार लाभ होतील
4 May 2011 - 10:25 pm | चतुरंग
http://www.caissa.com/chess-tools/pgn-editor.php
ह्या दुव्यावर जाऊन तिथे अॅक्टिव एडिटर आहे त्यावर खेळी खेळून बघता येतील.
डावीकडून उजवीकडे a - b - c -d .......g -h अशी अक्षरे आणि डाव्या खालच्या कोपर्यातून वर 1 - 2 - 3-........7-8 असे आकडे आहेत. त्यानुसार खेळी करुन बघता येतात. मी आधी लिहिलेले डाव असे खेळून बघता येतील.
5 May 2011 - 5:28 am | अन्या दातार
प्रमाणवेळ सांगा. शक्य तितक्या मॅचेस बघाव्यात म्हणतो. नंतर तुम्ही आहातच समजावून द्यायला. :)
5 May 2011 - 10:50 am | प्रास
मस्त आणि समयोचित लेख. आता हे सामने फॉलो करायलाच हवेत. बाकी तुमच्याकडून फीड्स आल्या तर उत्तमच!
बुद्धिबळबट्ट्याबोळकर्ता ;-)