विश्वचषकातले उर्मटशिरोमणी - पुष्प ४ - ग्लेन मॅक्ग्राथ

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
24 Mar 2011 - 4:47 pm

ग्लेन डोनाल्ड मॅक्ग्राथचा जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर उदय झाला तेव्ह मर्व ह्युजेस चा अस्त होत होता. मर्व ह्युजेस हे नाव कदाचित ह्युज नसेल. पण ऑस्ट्रेलिया साठी त्याने ५३ कसोटी सामन्यात २२५+ बळी मिळवले आहेत हे ध्यानात घेतले तर त्याच्या जाण्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये पोकळी निर्माण झाली होती / होणार होती हे मान्य करावे लागेल. ती पोकळी भरुन काढण्याचे काम डोनाल्ड मॅक्ग्राथच्या पोराने केले आणि केवळ पोकळी भरुन नाही काढली तर क्रिकेटच्या इतिहासावर असा एक जबरदस्त ठसा उमटवला की जेव्हा तो निवृत्त झाला तेव्हा ती पोकळी भरण्याची कुवत जगातल्या कुठल्याही गोलंदाजाकडे नव्हती. त्याच्या निवृत्तीनंतर ४ वर्षांनीदेखील ती पोकळी अजुन तशीच आहे.

आता आकडेवारी बघु. स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स बद्दल असे म्हणतात की Statistics means never having to say you’re certain. पण प्रत्येक नियमाला अपवाद असतोच की शेवटी. ग्लेन मॅक्ग्राथ चे स्टॅट्स या अपवादाच्या नियमाना अनुसरुन वागतात. (म्हणजे गोलंदाजीची आकडेवारी. उगाच वायटल स्टॅट्स काय? असले चावट प्रश्न विचारु नका). त्याच्या गोलंदाजीची आकडेवारी त्याच्या महानतेची ग्वाही देते. १२४ कसोटी सामन्यांत त्याने २१.६४ च्या सरासरीने ५६३ बळी घेतले. २४ धावात ८ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने २५० सामन्यांतुन २२ च्या सरासरीने ३८३ बळी घेतले. १५ धावांत ७ बळी ही त्याच्यी एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी.

ग्लेन क्रिकेट मेस्ट्रो होता हे वरच्या आकडेवारीवरुन सिद्ध होतेच. पण त्याची अजुन एका गोष्टीत मास्टरी होती. स्लेजिंग. ऑस्ट्रेलियन्स असेही स्लेजिंग बहुधा आईच्या पोटातुनच शिकुन येतात. त्यांना ते उपजतच येत असते. आणि हर्‍या शेजारी ठेवला नार्‍याच्या न्यायाने वयानुपरत्वे ते गुण वाढीस लागतात. पण मॅकग्रा ची गोष्टच वेगळी होती. पंचांशी हुज्जत घालणे हा त्याचा आवडता उद्योग होता. स्लेजिंगचा तर तो बादशाह होता. एकतर साडेसहा फूट उंची त्यात चेहेर्‍यावर साधारण कुठल्याही अस्सल सदाशिव पेठी पुणेरी माणसाच्या चेहेर्‍यावर असतात तसले भाव . तसले म्हणजे कसले हे कळण्यासाठी एक तर तुम्ही अस्सल सदाशिव पेठी (किंवा नारायण पेठी) पुणेकर बघितलेला असला पाहिजे किंवा ग्लेन मॅक्ग्राथ तरी बघितलेला असला पाहिजे. तर ही असली ताडमाड उंची आणि कमालीचे खत्रुड भाव चेहेर्‍यावर घेउन ग्लेन मॅक्ग्राथ जेव्हा गोलंदाजी करायचा तेव्हा समोरचा फलंदाज आधीच कमालीचा वैतागलेला असायचा. त्यात वर हा माणूस ठेवणीतले टोमणे मारायचा (हो हो. तेचे तेच. सदाशिव पेठेतले पॅटंटेड टोमणे शोभतील असे). त्याचा हा उर्मटपणा त्याला आयुष्यात कमालीचा उपयोगी पडायचा. अर्थात कधीकधी समोरचा माणूसही शेरास सव्वाशेर भेटायचा. श्रीलंका एकदा ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर असताना ग्लेन मेक्ग्राथ सनथ जयसुर्याला काळा माकड म्हटला होता (आणि आपला सरदार सायमंड्सला माकडतोंड्या म्हटला तेव्हा मात्र हेच ऑस्ट्रेलियन्स खवळले होते). दुसर्‍या एका सामन्यात ग्लेनने सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्याने रामनरेश सारवानला विचारले " काय मग ब्रायन लाराच्या *** चव कशी आहे?" भारतीय रक्तच ते. शांत थोडीच बसणार आहे. त्याने शांतपणे उत्तर दिले "मला नाही माहिती तुझ्या बायकोला विचार." हे ऐकल्यावर मात्र मॅक्ग्राथ खवळला. बोलायला जमते ऐकुन घ्यायला जमत नाही. दुसर्‍या एका सामन्यात झिंबाब्वेच्या एडो ब्रॅंड्सला त्याने आपल्या गोलंदाजीने जेरीस आणले होते. तरी ब्रॅंड्स आउट होइना. ते बघुन ग्लेन ने विचारले "बाबा रे तु एवढा जाड कसा?" एडो ब्रॅंड्स उत्तरला "कारण प्रत्येक वेळेस तुझ्या अनुपस्थितीत मी तुझ्या बायकोला भेटतो तेव्हा ती मला प्रेमाने बिस्कीट खायला देते". स्लेजिंग ही अश्याप्रकारे त्याच्यावर स्वतःवर देखील उलटली अहे.

वस्ताविक मॅक्ग्राथला स्लेजिंग करण्याची गरजच नव्हती, त्याच्या गोलंदाजी मध्ये असामान्य ताकद होती. त्याच्याकडे शोएबचा वेग नव्हता, अक्रमचा स्विंग नव्हता, मलिंगाचा यॉर्कर नव्हता पण या सगळ्या़ंकडे नसलेली कमालीची एकाग्रता होती, दिशा आणि टप्प्यावर कमालीचे नियंत्रण होते, अचुकतेमध्ये कमालीचे सातत्य होते. या भांडवलावर त्याने विश्वचषकामध्ये ३९ सामन्यात साधारण १८ च्या सरासरीने तब्बल ७१ बळी मिळवले. एवढी असामान्य कामगिरी विश्वचषकाच्या इतिहासात आजवर कोणीही केलेली नाही. त्याच्या गोलंदाजीची धार इतकी तेज होती की त्याला या ३९ सामन्यांमध्ये अवघ्या ४ वेळा फलंदाजी करावी लागली. त्यातील ३ वेळा तो नाबाद राहिला आणि त्याने तब्बल ३ धावा ठोकल्या. :)

मॅक्ग्राथच्या गोलंदाजीची विशेषता त्याच्या बळी मिळवण्याच्या क्षमतेमध्ये नव्हती तर तर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीची पहिली फळी कापून काढण्यात होती. बहुतेक वेळा तो त्यात यशस्वी व्हायचा. त्याच्या स्वभावधर्माला जागुन तो बहुतेक महत्वाच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाच्या सर्वोत्तम फलंदाजाला बाद करण्याची दर्पोक्ती करायचा आणि बहुतांशी वेळा त्यात यशस्वी व्हायचा. २ महत्वाच्या सामन्याच्या आधी अशी बडबड करुन त्याने लाराला खरोखर बाद देखील करुन दाखवले. माइंड इट. लारा. दुखापतीनंतर पुनरागमनानंतरच्या त्याच्या पहिल्या सामन्यात त्याने सचिनच्या यष्ट्या अश्याच वाकवल्या. नंतर सचिननेदेखील त्याच्या खुनशी वृत्तीला जागुन त्याला एका ओवरमध्ये ३ चौकार आणि एका षटकाराने बडवला हे गोष्ट वेगळी.

१९९६ त्याचा पहिला विश्वचषक. यात त्याने ७ सामन्यात केवळ ६ बळी मिळवले. भारताविरुद्धच्या सामन्यात तर सचिनने त्याला फोडुनच काढले. पण एरवी या सहाही विकेट्स महत्वाच्या होत्या हे नक्की. त्याचे बळी होते चंदरपॉल, हार्पर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८९ धावा काढणारा केनियाचा ओटिएनो आणि न्युझीलंडचा जर्मोन, फ्लेमिंग आणि ग्रांट फ्लॉवर. अंतिम सामन्यात त्याने सुरेख गोलंदाजी केली. मात्र बळी नाही मिळवता आले. ऑस्ट्रेलिया हारले. परत जाताना बहुधा मॅक्ग्रा ने मनाशी खुणगाठ बांधली होती की पुढचे ३न्ही विश्वचषक ऑस्ट्रेलियाला मिळवुन द्यायचे.

१९९९ च्या विश्वचषकात त्याने १० सामन्यांतुन १८ बळी मिळवले. त्याचे वैशिष्ट्य हे की त्याने प्रत्येक सामन्यात किमान एक बळी तरी मिळवला. विंडीज विरुद्ध तर त्याने ९ षटकात १४ धावा देउन ५ बळी मिळवले. यात सलामीवीर केम्पबेल आणि जिमी अ‍ॅडम्स बरोबर त्याने लाराचे देखील बारा वाजवले. ते सुद्धा सांगुन, त्याच्या नेहेमीच्या स्टाइलमध्ये आधी धमकी देउन. नंतर त्याने त्याचे कट्टर प्रतिस्पर्धी वॉल्श आणि अ‍ॅम्ब्रोजचे बळी देखील मिळवले. हे असे काही अपवाद वगळत मॅक्ग्रा एरवी शेपटाच्या नादी नाही लागायचा. तो केवळ सर्वोत्तम प्रतिस्पर्ध्या विरुद्धचे हत्यार होता. या सामन्यात एकही फलंदाज त्याच्या गोलांदाजीवर चौकार नाही मारु शकला. यानंतर भारताविरुद्ध त्याने ३४ धावांच्या मोबदल्यात ३ बळी मिळवले. हे ३ बळी होते सचिन, द्रविड आणि अझरुद्दीन. बळींची नावेच बरेच काही सांगुन जाइल. त्यातही त्याने सचिनला भोपळादेखील नाही फोडु दिला. परत एकदा मर्मस्थळावर हल्ला. मुर्गी मारी बच्चा दानादान तसला प्रकार. मॅक्ग्राच्या जीवावर ऑस्ट्रेलियाने प्रतिस्पर्धी संघाची मान अशी बर्‍याच वेळा कापली. ४ बाद १७ वरुन भारताचा पराभव अटळ होता. नंतर अंतिम सामन्यात त्याने पाकड्यांना असेच रडवले. ९ षटकांमध्ये अवघ्या १३ धावत २ बळी घेतले. यातला एक बळी सलामीवीराचा होता. पाकिस्तानचा डाव १३२ धावात आटोपला आणि मग जिंकण्याची औपचारिकता ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अवघ्या २० षटकात पुर्ण केली.

२००३ मध्ये परत त्याने ११ सामन्यात २१ बळी घेत ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकवुन दिला. यात नामिबियाच्या दुबळ्या संघाविरुद्ध त्याने १५ धावात ७ बळी घेतले (ही त्याची विश्वचषकातली आकडेवारीनुसार सर्वोत्तम कामगिरी) तसेच न्युझीलंड आणि भारत या बलाढ्या संघांचे पण ३-३ बळी मिळवले. भारताविरुद्धचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाने ३५९ धावा केलेला असल्यामुळे सर्वथा सचिन आणि गांगुलीवर अवलंबुन होता आणि मॅक्ग्रा ने तो सामना अवघ्या ५व्या चेंडुवर सचिनला परतावुन संपवला. मॅक्ग्रा हा असा नेहेमी मुळावरच घाव घालायचा. नंतर त्याने कैफ आणि झहीरला पण परतवले. ऑस्ट्रेलिया परत एकदा विश्वविजयी झाले.

२००७ चा विश्वचषक त्याचा शेवटचा विश्वचषक होता. विश्वचषकानंतर त्याने निवृत्तीच जाहीर केली. त्याची निवृत्ती विश्वचषकाच्या हॅटट्रिक विजयाने झाली हे योग्यच झाले. ११ सामन्यांतुन त्याने तब्बल २६ बळी मिळवले. एका विश्वचषकात याहुन आधिक बळी अजुन कोणी मिळवलेले नाहीत. जवळजवळ प्रत्येक सामन्यागणिक त्याने ३ बळी पाडले. यात आयर्लंड, नेदर्लंड, स्कॉटलंड सारखे दुबळे संघ होते तसेच इंग्लंड, साउथ अफ्रिकेसारखे तगडे प्रतिस्पर्धी देखील होते. उपांत्यफेरीच्या सामन्यात त्याने कॅलीस, अ‍ॅश्वेल प्रिंस आणि बाउचर हे प्रमुख फलंदाज परतवले. यात ६व्या षटकात जेव्हा कलीस परतला तेव्हा अफ्रिकेची अवस्था २ बाद बारा होती. एकुण सुरुवातीलाच मॅक्ग्राने अफ्रिकेचे बारा वाजवले. अंतिम सामन्यात त्याला बळी एकच मिळाला पण तो संघासाठी सगळ्यात किफायतशीर गोलंदाज ठरला. १९९६ च्या पराभवाचे उट्टे काढुन त्याने संघाला परत एकदा विजयी करवले. तोच विश्वचषकातला सर्वोत्तम खेळाडु देखील ठरला.

मॅक्ग्राचा करिष्मा एवढा जबरदस्त होता की तो गेल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला घरघर लागली. त्याची विजयी मालिका वारंवार खंडीत व्हायला लागली. अ‍ॅशेस मध्ये राख झाली.

त्याचे सहकारी त्याला पिजन म्हणायचे. का कोण जाणे? तो कधीच शांततेसाठी प्रसिद्ध नव्हता. ग्लेन मॅक्ग्राथ कमालीचा खडूस होता. असभ्य होता. उर्मट होता. स्लेजिंगचा बादशहा होता. उद्धटपणाचा कळस होता. पण या सर्वाहुनही महत्वाचे म्हणजे तो गोलंदाजीचा शहेनशहा होता. तो असेपर्यंत कोणाची टाप नव्हती ऑस्ट्रेलियावर हुकुमत गाजवायची. त्यामुळेच हा कमालीचा उर्मट गोलंदाज या मालिकेतल्या चौथ्या पुष्पाचा मानकरी आहे

तळटीपः

१. चित्रे जालावरुन साभार

२. विश्वचषकाचे पान अपडेट होत नसल्यामुळे हा लेख जनातले मनातले मध्ये टाकतो आहे. ते पान अपडेट व्हायला लागले तर पुढचे भाग तिथेच टंकेन.

क्रीडामौजमजाप्रकटनविचारआस्वादसमीक्षालेखमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

24 Mar 2011 - 4:55 pm | आत्मशून्य

रामनरेश सारवानचा कीस्सा धमाल, आधीच्या भागाच्या पण लींक द्या.

मृत्युन्जय's picture

25 Mar 2011 - 10:24 am | मृत्युन्जय

मला लिंक नीटश्या देता येत नाहीत. आधी प्रयत्न करुन बघितला होता. तरी परत एकदा प्रयत्न करुन बघतो:

http://misalpav.com/node/16799 " title="विश्वचषकाचे उर्मट शिरोमणी - पुष्प पहिले - व्हिवियन रिचर्डस ">

http://misalpav.com/node/16816 " title="विश्वचषकाचे उर्मटशिरोमणी - पुष्प दुसरे - इम्रान खान">

http://misalpav.com/node/16844 " title="विश्वचषकाचे उर्मटशिरोमणी - पुष्प तिसरे - सचिन">

आत्मशून्य's picture

26 Mar 2011 - 4:08 pm | आत्मशून्य

मला लिंक नीटश्या देता येत नाहीत. आधी प्रयत्न करुन बघितला होता. तरी परत एकदा प्रयत्न करुन बघतो

त्यात अवघड ते काय ? फारच सोप आहे, कोणताही यु.आर.एल. ब्राऊजरच्या अड्रेसबार मधून कॉपी करायचा व प्रतीसादामधे पेस्ट करायचा

उदा :- http://www.google.co.uk/ त्या(वेब अड्रेस)ला लींक बनवण्याच काम आपलं इंटेलीजंट मिपा स्वतःहून करते.

लींक दील्याबद्दल पून्हा एकदा धन्यवाद. या पूढील लेखात आधीच्या लेखांच्या लींक पण द्यावयात हे वे.सा. न ल. :)

५० फक्त's picture

24 Mar 2011 - 5:02 pm | ५० फक्त

'' ते बघुन ग्लेन ने विचारले "बाबा रे तु एवढा जाड कसा?" एडो ब्रॅंड्स उत्तरला "कारण प्रत्येक वेळेस तुझ्या अनुपस्थितीत मी तुझ्या बायकोला भेटतो तेव्हा ती मला प्रेमाने बिस्कीट खायला देते". स्लेजिंग ही अश्याप्रकारे त्याच्यावर स्वतःवर देखील उलटली अहे.''

आणि मॅकग्रा यावेळी चिडला होता कारण त्यावेळेसच त्याच्या बायकोचा कॅन्सर शेवटच्या स्टेजमध्ये आहे हे कळालेलं होतं.

पण ही स्टोरी अजुन दुस-या खेळाडु बद्दल पण ऐकलेली आहे. नक्की कोणाची ते कोणी सांगु शकेल का ?

मृत्युन्जय's picture

24 Mar 2011 - 5:06 pm | मृत्युन्जय

नाही मॅक्ग्रा सरवानवर चिडला होता. अजुन एक शब्द बोललास तर गळा कापेन अशी त्याने सारवानला धमकी दिली.

बाकी जाडीवरुनचा किस्सा मर्व ह्युजेसचा आहे. ग्लेन मॅक्ग्राथचा मोठा भाउ होता तो स्लेजिंग मध्ये. जाड होता. त्यामुळे चिडुन जावेद मियांदाद त्याला " जाड्या बस कंडक्टर" म्हणाला. त्याच सामन्यात ह्युजेसने मियांदादचा बळी मिळवला आणि तो परतत असताना "टिकीट्स प्लीज" म्हणाला :)

हे काय कळले नाही.
म्हणजे आपणहून बोट घालायाचे आणि मग बोंबा मारायाच्या?

आत्मशून्य's picture

25 Mar 2011 - 2:53 am | आत्मशून्य

सरळ सरळ स्लेजींग करत होताच तो, आणी त्याबद्दल बोलणी खाऊन परत वरती (त्याला बस कंडक्टर) बोलणार्‍याची वीकेट घेतली, व मैदानातून हाकलताना पून्हा एकदा फीरकी घेतली.......

गोगोल's picture

25 Mar 2011 - 9:19 am | गोगोल

प्रश्न सरवान बद्दल होता.

मृत्युन्जय's picture

25 Mar 2011 - 10:14 am | मृत्युन्जय

नसते प्रश्न आधी मॅक्ग्रानेच विचारले होते. सारवान एरवी स्लेजिंग करण्यासाठी प्रसिद्ध नाही. मॅक्ग्राने नको त्या काड्या केल्यावर त्याला योग्य ते उत्तर मिळाले असे मला तरी वाटते. :)

अप्रतिम ... तुमचे लहान - लहान घटनांच्या बारकाव्यामुळे पण ही लेखमाला अद्वितीय झाली आहे ...
एकदम छान हा भाग पण ...

असुर's picture

24 Mar 2011 - 7:29 pm | असुर

ऑस्ट्रेलियन असला, वागायला कसाही असला तरी मॅकग्रा आपला आवडता बॉलर!

मृत्यंजया, मस्तच लिहीलंयस रे! आता रिचर्ड्स आणि मॅकग्रा झाल्यावर त्यांच्या लायनीत बसू शकतील असे पुढले मानकरी कोण असा बावळट प्रश्न पडल्याने त्याचाच कौल पाडायची विलक्षण इच्छा होते आहे!

--असुर

विश्वनाथ मेहेंदळे's picture

24 Mar 2011 - 8:24 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मस्त लेख भाऊ. आवडला. पुढील लेखांच्या प्रतीक्षेत..

बाकी एडो ब्रॅंड्सचा किस्सा खूपच सौम्य करून लिहिला आहे हो तुम्ही.
मूळ व्हर्जन "Every time time I make love to your wife, she gives me biscuit" असे ऐकले होते. इथे "मेक लव्ह" म्हणजे हिंदी सिनेमातल्यासारखे बागेत बसून युगुलगीत गाणे नाही ;-)

मृत्युन्जय's picture

25 Mar 2011 - 10:26 am | मृत्युन्जय

हो. अश्लीलतेच्या मुद्द्यावरुन लेख उडु नये यासाठी ...... :)

>>>>>निवृत्तीनंतर ४ वर्षांनीदेखील ती पोकळी अजुन तशीच आहे.

आजच्या मॅच मधे सिद्ध झाले

शिल्पा ब's picture

25 Mar 2011 - 12:20 am | शिल्पा ब

स्लेजिंग प्रकार काय ते मी हल्लीच youtube वर पहिले....मॅग्राबद्द्ल काहीच व्हिडीओ नाही बहुतेक...
बाकी आपल्याला आवडला हा...मी असं पण वाचलंय कि त्याच्या गर्लफ्रेंडला कॅन्सर झाल्यावरसुद्धा त्याने तिच्याशी लग्न केले आणि तिची काळजी घेतली...ब्रेकअप नाही केला.
तोंड वाजवण्यात aussie भारतीयांना मागे टाकतील असं वाटलं नव्हतं...याचसाठी मराठी खेळाडू हवेत टीममध्ये ;)

मेघवेडा's picture

25 Mar 2011 - 12:43 am | मेघवेडा

तोंड वाजवण्यात aussie भारतीयांना मागे टाकतील असं वाटलं नव्हतं.

कैच्या कैच.

बाकी हेही पुष्प उत्तम रे मृत्युंजया.. स्लेजिंग वर एखादा वेगळा लेख पाड राव! :)

मर्व्ह ह्युज्सचं नाव वाचलं वरच्या एका प्रतिसादात, आणि त्याचा तो "नाऊ हिट दॅट वन फॉर ए सिक्सर"चा किस्सा आठवला!

लंबूटांग's picture

25 Mar 2011 - 1:51 am | लंबूटांग

तोंड वाजवण्यात aussie भारतीयांना मागे टाकतील असं वाटलं नव्हतं.

हॅहॅ त्या स्वतःवरून म्हणत असतील हो ;)

शिल्पा तै ह. घ्या.

गणपा's picture

25 Mar 2011 - 2:33 am | गणपा

. स्लेजिंग वर एखादा वेगळा लेख पाड राव

येस येस मृत्युंजया होउनच जाउदे.
बाकी कांगारुं बद्द्ल म्हणाल तर मॅग्रा, वॉ, वॉर्न गेले आणि गेले ते दिन गेले... ;)

(ऑस्ट्रेलियन असुन आवडणारे खेळाडु दोनच, मॅग्रा आणि ली.)

चतुरंग's picture

25 Mar 2011 - 3:08 am | चतुरंग

डेडली होता. जबरा लेखन मृत्युंजया!
हा बघा त्याचा रिवर्स स्विंगिंग यॉर्कर. चुंबकाकडे लोखंड खेचलं जावं तसा बॉल हवेतून सरकत ष्टंपावर गेलाय! ;)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

25 Mar 2011 - 11:39 am | निनाद मुक्काम प...

चांगला लेख लिहिला आहे .
क्रिकेट ह्या खेळत गोलंदाजावर शक्यतो कमी लिहिले जाते .
आता तर फलंदाजीला धार्जिणे नियम झाले आहेत .त्यामुळे दंत काढलेल्या सापासारखी त्यांची अवस्था झाली आहे .
ग्लेन ह्याची गोलंदाजी व त्याचा वेग हा भारतीय गोलंदाजा एवढा होता .
पण अचूकता ही एकच गोष्ट त्याने आपल्या गोलंदाजी मध्ये सातत्याने कायम ठेवली .
नेहरा , टेट, अख्तर ह्यांच्या जमान्यात ही गोष्ट अत्यंत महत्वाची ठरते .
चेंडूचा टप्पा ( लेन्थ ) अचून ठेवतांना फलंदाजाच्या उणीवा शोधून कल्पतेने त्याला आपल्या जाळ्यात अडकवणे .

ही ग्लेन ची खासियत .
योग्य वेळी त्याने निवृत्ती जाहीर केली .

''ब्रेट ली अजून वाट पाहत आहे कधी आपल्याला नारळ मिळणार ते .''
कालच्या सामन्यानंतर त्याने भारतीय संगीत शिकण्यास भर दिला तर त्याला भविष्यात
एखाद्या रियालिटी शो मध्ये जज म्हणून नक्कीच संधी मिळेल .
कदाचित सिनेमात एखादी दुय्यम भूमिका

प्रमोद्_पुणे's picture

25 Mar 2011 - 1:03 pm | प्रमोद्_पुणे

हे पुष्पदेखील छान लिहिले आहेस..

परिकथेतील राजकुमार's picture

25 Mar 2011 - 1:30 pm | परिकथेतील राजकुमार

ग्लेन क्रिकेट मेस्ट्रो होता

एका वाक्यात बरेच काही बोललास रे :)

हा लेख देखील आधिच्या लेखांप्रमाणेच सर्वांगसुंदर आहे. सगळे म्हणत आहेत तसा 'स्लेजिंग' वर एक खास लेख हौन जौ दे भाऊ :)

हा सरवान आणि मॅग्राथचा झकास किस्सा :-

मृत्युन्जय's picture

25 Mar 2011 - 1:50 pm | मृत्युन्जय

ही मॅच जर वेस्ट इंडीज ने जिंकली असेल तर मला मनापासुन आनंद होइल आणि सरवान मॅन ऑफ द मॅच असेल तर क्या कहने ;)

परिकथेतील राजकुमार's picture

25 Mar 2011 - 2:02 pm | परिकथेतील राजकुमार

जिंकली ना दादा ;) चांगल्या ३ विकेटी राखुन.

मॅन ऑफ द मॅच मात्र चंदरपॉल होता.

मृत्युन्जय's picture

25 Mar 2011 - 2:09 pm | मृत्युन्जय

आयला चंदरपॉल का? सारवान च्या तर रन्स पण जास्त होत्या. चंदर बेट्या बहुधा लंगर टाकुन खेळला असावा.

मुलूखावेगळी's picture

25 Mar 2011 - 1:50 pm | मुलूखावेगळी

छान लिहिलेस. आवडले.

हरिप्रिया_'s picture

25 Mar 2011 - 1:52 pm | हरिप्रिया_

मस्त लिहिल आहे...
आता उरलेले उर्मट शिरोमणी येवुदे लवकर...
वाट बघत आहोत....

sneharani's picture

25 Mar 2011 - 1:53 pm | sneharani

मस्त लेख!

पैसा's picture

26 Mar 2011 - 8:05 pm | पैसा

मला टीव्हीवर सरवन आणि मॅग्राचा प्रसंग पाहिलेला आठवतोय. साडेसहा फुटी मॅग्रा आणि त्याच्यासमोर ६ इंच अंतरावर उभा राहिलेला छोटा सरवन! अजून ते विनोदी दृश्य आठवतंय! त्यानंतर सरवन ने बॅटचा तडाखा दाखवला होता असं आठवतं.

आयपीएल मधे मॅग्रा ला घ्यायला सुरुवातीला कोणी तयार नव्हतं. दिल्लीने त्याला बेस प्राईसला घेतला आणि वयाच्या ४० व्या वर्षी सुद्धा तो सगळ्यात प्रभावी आणी किफायती गोलंदाज होता आयपीएल मधे!