विश्वचषकाचे उर्मट शिरोमणी - पुष्प पहिले - व्हिवियन रिचर्डस

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in क्रिडा जगत
15 Feb 2011 - 8:46 pm

आंतरराष्ट्रीय राजकारणात उर्मटपणाचा सगळा ठेका अमेरिकेने घेतला आहे. तसा क्रिकेटमध्ये तो ऑस्ट्रेलिया कडे आहे. त्यांचे एकजात सगळेच खेळाडु उर्मट आहेत. अ‍ॅडम गिलख्रिस्ट सारखा एखादा सन्माननीय अपवाद वगळता बाकीच्यांचे सभ्यतेशी तसे वाकडेच आहे. उर्मटपणा तसा थोड्याफार फरकाने सगळ्याच देशाच्या खेळाडुंमध्येही दिसतो. तसे आपले श्रीशांत (याच्या नुसत्या नावातच 'शांत'ता आहे) आणि सरदार तरी काय कमी उद्धट आहेत का? पण ऑस्ट्रेलियाची गोष्टच वेगळी त्यांचा उर्मटपणा त्यांच्या देहबोलीतुन देखील जाणवतो. त्यासाठी त्यांना तोड उचकटायची किंवा हातवारे करायची गरज नसते.

ही लेखमाला विश्वचषकातल्या ७ महाउर्मट खेळाडुंना समर्पित आहे. काही नावे कदाचित अनपेक्षित असतील, काही नावे अपेक्षित असुनदेखील इथे दिसणार नाहीत. नाइलाज आहे. सध्या क्रिकेटमध्ये उर्मट खेळाडुंची संख्या बरीच आहे. पण हे जे ७ उर्मट उद्धट खेळाडु आहेत त्यांनी मैदानावर देखील करामत केली आहे. त्यामुळे त्यांची नावे इथे आहेत. ७ फक्त ७. बाकी लोग हमे माफ करे.

*************************************************************

व्हिवियन रिचर्डस

सर आयझेक व्हिवियन अलेक्झांडर रिचर्डस. बस नाम ही काफी है. १८७ एकदिवसीय सामन्यांमधुन ४७ च्या सरासरीने या पट्ठ्याने ६५००+ धावा काढल्या आहेत. ही फुटकळ माहिती झाली. विश्वचषकात या माणसाची बॅट बाजीरावाच्या तलवारीसारखी अजुन सटासट चालायची. ४ विश्वचषकात २३ सामन्यात ६३+ सरासरीने १०००+ धावा. ही आकडेवारी या माणसाची मैदानावरील मर्दुमकी सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहे. पण आकडेवारी फसवी असते. या धावा रिचर्डस बद्दल पुरेसा दरारा तयार करत नाहीत. त्याच्याबद्दल समजुन घ्यायचे असेल तर त्याला गोलंदाजी करणार्‍या दादा लोकांना विचारा. खासकरुन इंग्लिश गोलंदाजांना. औरंगजेबाच्या सरदारांना जसे जळी स्थळी काष्ठी पाषाणी संताजी धनाजी दिसायचे तसा इंग्लिश गोलंदाजांना म्हणे रिचर्डस दिसायचा.

इम्रान खान रिचर्डस बद्दल काय बोलतो ते बघा:

"Sunil Gavaskar had the most compact defence and managed his in- nings better than any other batsman of his time. Javed Miandad and Allan Border were great accumulaters and, like Gavaskar un- derstood the art of making runs. Gordon Greenidge had an orthodox defence, yet when it came to attack was devastating. Ian Chappell was best in a crisis, pos- sessing mental strength, while his brother Greg was a powerful driver off the back foot. Barry Richards was the most orthodox batsman of my time, who never seemed out of balance and played his strokes with the minimum of effort. Zaheer Abbas was the best timer of the ball. Compared to Vivian Richards, however, all those were mere mor- tals. He was the only true genius of my time. He never had the defence of Gavaskar or the balance and poise of Barry Richards but the Almighty had gifted him with reflexes that no other had. These lightning reflexes enabled him to get into position so quickly that bowlers never quite knew what length to bowl to him."

च्युइंगगम चघळत चघळत तो नुसता मैदानात येताना दिसला की गोलंदाजांना धडकी भरायची. त्या च्युइंगगम चघळणार्‍या चेहेर्‍यावर एक कमालीचा थंडपणा असायचा. जंगलात सिंह जसा आजुबाजुला कोण आहे याची पर्वा न करता येतो तसा तो यायचा. तो त्या मैदानावरचा राजा असायचा. उगाचच नाही त्याला किंग म्हणायचे. त्याच्या चेहेर्‍यावर येताना कमालीचे तुच्छ भाव असायचे. तोंडातुन तो एक चकार शब्द नाही काढायचा (बॅटिंग करताना. फिल्डींग करताना तो पंचांवर दबाव आणण्यासाठी प्रसिद्ध होता). पण त्याच्या चेहेर्‍यावरुन तो गोलंदाजाला किती किरकोळीत बडवणार आहे ते दिसायचे. आणि तसेच व्हायचे. रिचर्डस नावाच्या वादळात बहुतेक सगळे गोलंदाज पाल्यापाचोळ्यासारखे उडुन जायचे. लिली, थॉमसन, कपिल देव, इम्रान खान, इयान बॉथम, गार्नर, मार्शल असे दादा लोक गोलंदाजी करत असुनसुद्धा त्याने कारकीर्दीत एकदाही हेल्मेट वापरले नाही. हा या सगळ्यांचा धडधडीत अपमान होता. पण रिचर्डसकडे याच्याही पलीकडे जाउन गोलंदाजांना अपमानित करण्याची कला अवगत होती. उसका बल्ला बोलता था.

रिचर्डसची विश्वचषकीय कारकीर्द एकुण ४ स्पर्धांमधली. त्यातला पहिला विश्वचषक (१९७५) त्याच्यासाठी पुर्ण अपयशी होता. ५ सामन्यात मिळुन त्याला केवळ ३८ धावा करता आल्या. पण १९७७-१९७९ मध्ये पॅकर सर्कस सुरु झाली आणि त्यात जगातले झाडुन सगळे द्रुतगती गोलंदाज जमा झाले होते. त्या काळात हे गोलंदाज जेव्हा इतर सगळ्या क्लास फलंदाजांची (बॉयकॉट आणि गावसकर सोडुन कारण ते त्या स्पर्धेत खेळत नव्हते) डोकी फोडण्यात मग्न होते तेव्हा रिचर्डस ने त्यांची गोलंदाजी फोडुन काढली आणि त्यामुळे रिचर्डसची लार्जर दॅन लाइफ प्रतिमा तयार झाली. त्याचा त्याला अर्थातच १९७९ च्या विश्वचषकात फायदाच झाला. ४ सामन्यांत त्याने १०८.५ च्या सरासरीने २१७ धावा केल्या. यात अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध केलेल्या १३८ धावा आहेत. तो सामना इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज असा नव्हताच. तो सामना बॉथम, हेंड्रिक, क्रिस ऑल्ड आणि एडमंड विरुद्ध रिचर्डस असाच झाला (अर्थात सामन्यातील किंगच्या ८६ धावांचे आणि गार्नरच्या ५ बळींचे योगदान सुद्धा होते). विश्वचषकातला तो अंतिम सामना होता आणि कोण जि़ंकले असेल याचा अंदाज बांधाण्यासाठी कोण्या विद्वानाची गरज नाही. विंडीजने तो सामना ९२ धावांनी जिंकला.

१९८३ च्या विशवचषकापर्यंत तर रिचर्डस दंतकथेचा नायक झाला होता. ८ सामन्यांत ७३ च्या सरासरीने त्याने साडेतीनशे हुन आधिक धावा केल्या. त्यात त्याने कोणालाही सोडले नाही. ऑस्ट्रेलियाला बुकलला, पाकिस्तानला धुतला आणि भारताला सुद्धा तो भारीच पडला. या स्पर्धेत भारताची त्याच्याशी ३ दा गाठ पडली. २ वेळा जेव्हा तो अपयशी ठरला तेव्हा विंडीज हारले आणि एकदा जेव्हा तो बरसला तेव्हा कपिल देवसकट सगळेजण वाहुन गेले यातच सगळे आले. भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो केवळ १७ धावांवर परतला. विंडीज हारले. मात्र दुसर्‍या सामन्यात विंडीजची अवस्था १ बाद १७ असताना तो आला आणि संघाच्या २४० धावा होइपर्यंत तो भारतीय गोलांदाजांची धुलाई करत होता. या २२३ धावांमधला त्याचा वाटा ११९ धावांचा. उरलेल्या १०४ धावा काढणारे दिग्गज डेस्मंड हेन्स, क्लाईव लॉईड, जेफ दुजॉ होते हे लक्षात घेण्यासारखे आहे. या सामन्यानंतर त्याने ऑस्ट्रेलिया (नाबाद ९५) आणी पाकिस्तानला (नाबाद ८०) असेच बुकलले. आणि मग ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि झिंबाब्वेच्या छाताडावर पाय रोवुन जेव्हा विंडीज अंतिम सामन्यात पोचले तेव्हा भारताच्या आणि विश्वचषकाच्या मध्ये हाच राक्षस उभा होता. तो होता तोपर्यंत भारताला काहीच आशा नव्हत्या. एकतर आव्हान १८३ सारखे मामूली होते. आणि रिचर्डस भलताच फॉर्मात होता. तो आल्यापासुन त्याने बॅट फिरवायला सुरुवात केली. २८ चेंडुत त्याने ३३ धावांचा खुर्दा पाडला. ३३ धावांवर जाउ नका. त्या ३३ धावा जीवघेण्या होत्या. तो केवळ दांडपट्टा फिरवत नव्हता तर एक जादुई खेळी खेळण्याच्या इराद्याने आला होता. कपिल देवच्या दोन जीव ओवाळुन टाकाव्यात अश्या चेंडुंना त्याने सीमापार भिरकावले होते. त्याबद्दल कपिल देव काय म्हणतो बघा:

"My line was on and outside the off stump, to get him out with my outswinger. On both occasions I threw my arms up expecting an edge, only to see the umpire waving his arm to signal a boundary."

पण शेवटी कपिलदेवनेच ती जादू केली. मदनलालच्या गोलंदाजीवर मागे मागे जात त्याने एक अविश्वसनीय झेल घेतला आणि आख्ख्या भारताने सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर विंडीजची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली आणि भारताने विश्वचषकाला गवसणी घातली.

१९८३ चा घाव रिचर्डस च्या खुपच जिव्हारी लागला होता. १९८७ च्या स्पर्धेत तो त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठीच उतरला होता. पण दुर्दैवाने (त्याच्या दुर्दैवाने आणि आपल्या सुदैवाने) त्या स्पर्धेत भारत - विंडीज आमने सामने आलेच नाहीत. त्याचा राग मग रिचर्डसने इंग्लंड, श्रीलंका आणि पाकिस्तानवर काढला. या स्पर्धेत त्याने ६ सामन्यात ६३ च्या सरासरीने ४०० च्या आसपास धावा काढल्या. यात ३ अर्धशतके आणि १ शतक समाविष्ट आहे. याच स्पर्धेतली त्याची श्रीलंके विरुद्धची खेळी त्याच्या विश्वचषकीय कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदु ठरली. १२५ चेंडुत १६ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने त्याने तब्बल १८१ धावा कुटल्या. कुटल्या हेच विशेषण सार्थ ठरेल कारण त्याच्या त्या खेळीमध्ये डेस्मंड हेन्सच्या १०५ धावा पण झाकोळल्या गेल्या. १९९६ मध्ये कर्स्टनने १८८ धावा काढेपर्यंत ती विश्वचषकातली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती. आणि आजदेखील ती बहुधा विश्वचषकातील ३ क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. याव्यतिरिक्तही त्याने इंग्लंडविरुद्ध एक आणि पाकिस्तानविरुद्ध २ अर्धशतके ठोकली. दुर्दैवाने त्याच्या वैयक्तिक कामगिरी एवढी विंडीजची सांघिक कामगिरी उल्लेखनीय नाही झाली आणि विंडीज साखळीमधूनच बाहेर पडले. एका किंगच्या विश्वचषकीय कारकीर्दीची अखेर झाली. एक पर्व संपले. पण रिचर्डस ने विश्वचषकावर आपला ठसा उमटवला आहे.

टोनी ग्रेगने एका स्पर्धेपुर्वी दर्पोक्ती केली होती की तो रिचर्डसला धावांची भीक मागायला लावेल. ते ऐकल्यावर रिचर्डस गरजला "Nobody talks to Viv Richards like that." आणि टोनी ग्रेगला स्वत:च्या व्यक्तव्यावर पश्चात्ताप करावा लागेल एवढा इंग्लिश गोलंदाजांवर बरसला. खरेच होते. Nobody then dared to talk about Sir Issac Vivian Alexander Richards like that. हा उर्मटपणा त्याला शोभायचा कारण तो या खेळाचा अनभिषिक्त सम्राट होता. म्हणुनच या उर्मट शिरोमणींवरचे पहिले पुष्प विवियन रिचर्डसला सादर समर्पित.


तळटीपः विवियन रिचर्डस निवृत्तीला आला होता तेव्हादेखील मी खुप लहान होतो. तरीसुद्धा त्याच्या खेळ्या थोड्याफार पाहिल्या आहेत. ती नजाकत तो धडाका अवर्णनीय होता. पण इथे जे काही लिहिले आहे ते जरी माझे असले तरी आकडेवारी जालावरून साभार घेतली आहे. मी हे सामने बघितलेले नाहीत. पण आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. हा लेख म्हणजे मी त्याचे जे काही थोडेफार सामने बघितले आहेत, जे थोडेफार ईएसपीएन - स्टार स्पॉर्टस वर बघितले आहे, जे वाचले आहे आणि जे मला वाटते त्याची सरमिसळ आहे.

क्रिकेट

प्रतिक्रिया

अतिशय सुंदर लिहिले आहे..
छान माहिती दिली आहे.
पुढे वाचण्याच आतुर .. येवुद्या ..

अवांतर :
मी क्रिकेट पहायला लागलो (तेंव्हाच क्रीकेट कळायला लागले होते ) तो काळ होता १९९३ चा..
सचिन ने शेवटची ओव्हर टाकुन आफ्रिकेला जिंकुन दिले नव्हते तो आमच्या क्रिकेटचा श्रीगणेशा होता..
त्या अगोदर विव्हियन रिचर्ड, गावसकर श्रीकांत, इम्रान खान आणि वेस्टएंडीजची बरीच लिस्ट यांचा दरारा ऐकुन होतो, ते कधीच खेळताना पाहणे दिसणे शक्य नव्हते.. त्यातील एका हिर्याची महिती पाहुन छान वाटले.)

इन्द्र्राज पवार's picture

15 Feb 2011 - 9:08 pm | इन्द्र्राज पवार

एक दिवसीय क्रिकेट ज्यांच्यामुळे लोकप्रिय झाले त्यात अव्वल क्रमांक लागतो तो सर व्हिव्ह रिचर्डस् यांचाच यात कुणातही दुमत होण्याचे कारण नाही. १९८३ च्या अंतिम सामन्याची चित्रफित आताही पाहिली की पाहणारे अजूनही सुटकेचा निश्वास टाकतात त्या क्षणावर ज्यावेळी कपिलने मागमागे जात तो अफलातून झेल घेतला होता आणि सीमारेषेवर असलेले भारतीय प्रेक्षक बेहोष होऊन त्याच्याकडे धावलेले पाहून. खर्‍या अर्थाने तिथेच भारताने प्रुडेन्शिअल कपवर आपले नाव कोरले होते....इतका महिमा 'रिचर्डस' या नावाचा.

त्याची फलंदाजी लारासारखी 'ग्रेसफुल' आहे की नाही यावर वेस्ट इंडिजचे रसिक वाद घालत बसत नाहीत कारण त्याना रिचर्डसच्या 'खाटीककामा'वर बेधुंद होऊन 'कलिप्सो' करायला जास्त आवडत असे. प्रतिपक्षाकडील प्रेक्षकही रिचर्डस 'लवकर' बाद झाला की नाराज होत....[हे भाग्य नंतर फक्त जयसूर्याच्या वाट्याला आले होते...]

मैदानावर तो येणार म्हटल्यावर गोलंदाज तर घाम पुसतच आपल्या मार्किंग लाईनवर जात, तर प्रेक्षक 'तो पाहा....ज्युलिअस सीझर चालला आहे आणखीन् एक संस्थान काबिज करायला...' या भावनेने त्याच्या तंबू ते क्रिझच्या (विदाऊट हेल्मेट.....कधीच त्याने हेल्मेट घातलेले पाहिलेले नाही) चालीकडे पाहात.

लेखाची सुरूवात या 'किंग सीझर' पासून तुम्ही करावी हीच याची महती.

इन्द्रा

निशदे's picture

15 Feb 2011 - 11:56 pm | निशदे

<<१९८३ च्या अंतिम सामन्याची चित्रफित आताही पाहिली की पाहणारे अजूनही सुटकेचा निश्वास टाकतात त्या क्षणावर ज्यावेळी कपिलने मागमागे जात तो अफलातून झेल घेतला होता>>
+१
त्या सामन्यात सुद्धा च्युइंग गम चघळतच तो आला होता आणि फोडाफोडीला सुरुवात केली होती. त्याचे शॉट्स इतके सहज असायचे की ह्याला बॉल २०-३० kph ने येताना दिसतात की काय असे वाटते....

गणपा's picture

16 Feb 2011 - 12:06 am | गणपा

+२
हल्लीच टिव्हीवर Capturing The Cup या कार्यक्रमात माजी विश्वचषक विजेत्या कप्तानांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यात कपीलपाजींनी सुद्धा हेच म्हटल की जो पर्यंत हा "अ‍ॅरोगंट" माणुस समोर होता तोवर वनडे जिंकण कदापी शक्य नव्हत हे तो जाणुन होता. आणि म्हणुन जेव्हा नशीबान जेव्हा संधी दिली तेव्हा त्यान ती हातुन निसटु दिली नाही.

मैत्र's picture

16 Feb 2011 - 11:51 am | मैत्र

मालिकेची सुरुवात करायला राजाच यायला हवा !
झक्कास लेख ... उर्मट शब्द या माणसाला थोडा बरोबर वाटत नाही. प्राऊडीश अ‍ॅरोगन्स ला अगदी चपखल शब्द नाही.

कालच रात्री राजदीप बरोबर इम्रान, सर व्हिव्ह रिचर्डस आणि बोर्डर बोलत असताना इम्रान म्हणाला की ८३ ला हरलेली विंडीज टीम ही आजवरची सगळ्यात बेस्ट टिम होती तर बोर्डर च्या मते ७९ चा तोफखाना सगळ्यात कर्दन काळ होता.
पण आज सुद्धा रिचर्डस बोलताना ती शान जाणवत राहते.
जेवढे थोडे सामने स्टार वर जुने पाहिले आहेत त्यात त्याचा तो रुबाब आणि जबरदस्त टोलेबाजी पहायला मिळाली.

केवळ जिद्दीने तो कॅच घेतला कपिलने म्हणून एक तरी कप आपल्या नावावर झाला नाही तर हा माणूस उभ्या उभ्या १८४ करून गेला असता.
ज्याला सर पदवी खरोखर शोभते त्या मोजक्या दिग्गजांपैकी एक...

रमताराम's picture

15 Feb 2011 - 9:21 pm | रमताराम

आपल्या तुमची ही मालिकेची कल्पना एकदम आवडली. कणेकरांनी फटकेबाजीमधे म्हटल्याप्रमाणे प्रतिपक्षाच्या प्रेक्षकांनी 'महा हलकट' म्हणून ज्याची संभावना (मूळ अर्थ) करावी असा वीर म्हणजे रिचर्डस्. शीर्षकातल्या 'उद्धट' या शीर्षकाऐवजी इंग्रजीतील 'arrogant' हे विशेषण अधिक चपखल बसावे असा.

पुढील 'महा हलकटां'च्या प्रतीक्षेत...

असुर's picture

15 Feb 2011 - 9:46 pm | असुर

उर्मटांच्या बादशहाला आमचा मन:पूर्वक सलाम! असा उर्मटपणा परत होणे नाही! आणि उर्मटपणा त्याने नाही करायचा तर कोणी??
हल्ली काय, कोणीही उर्मट बनू पाहतोय. मायकेल क्लार्क, मिशेल जॉन्सन, केविन पिटरसन, श्रीशांत यांच्यासारख्या चिल्ल्यापिल्ल्यांनी केला तर त्याला आम्ही उर्मटपणा म्हणतच नाही! आतातायीपणा म्हणू फारतर!!

अंगी कर्तृत्व असेल तर उर्मटपणादेखील शोभून दिसतो, हे सर व्हिवियन रिचर्ड्सकडे पाहील्यावर पटतंच!!

पुढल्या सहांच्या प्रतिक्षेत! पटापट येऊ द्या! :-)

--असुर

मेघवेडा's picture

15 Feb 2011 - 10:19 pm | मेघवेडा

अंगी कर्तृत्व असेल तर उर्मटपणादेखील शोभून दिसतो, हे सर व्हिवियन रिचर्ड्सकडे पाहील्यावर पटतंच!!

ऐसाहीच बोल्ताय. साला उर्मटपणाही कसला तर एकदम राजेशाही थाटात!! वीरेंदर सेहवागच्या "आम्हां काय त्याचे" शाळेचा हा गुणवत्ता यादीतील मानकरी.. नव्हे मुख्याध्यापकच कदाचित!!! त्याचे ते बेफिकिर चालणे, तीन बाद दहा असा धावफलक असतानाही बिनधास्त चौकाराने खाते उघडणे, "It's red, round and weighs about five ounces, in case you were wondering!" असं त्याला दोन-तीनदा बीट केल्यावर मोठ्या आवेशाने आणि मग्रुरीने सांगणार्‍या ग्रेग थॉमसला पुढच्याच चेंडूवर षटकार खेचून (चेंडू गेला मैदानाबाहेरील नदीत!!) "Greg, you know what it looks like. Now go and find it." असे तितक्याच, नव्हे थोड्या जास्तच आवेशाने आणि मग्रुरीने सांगणारा रिचर्डस म्हणजे कर्दनकाळच!

बाकी लेखमालेची कल्पना भन्नाट!! पुढल्या नावांची आतुरतेने वाट पाहतो.

पुढल्या नावाबद्दलचा माझा अंदाज - स्टीव्ह वॉ.

मृत्युन्जय's picture

15 Feb 2011 - 11:00 pm | मृत्युन्जय

पुढल्या नावाबद्दलचा माझा अंदाज - स्टीव्ह वॉ.

पुढची नावे आत्ताच डिस्क्लोज करत नाही, मजा जाइल. पण अंदाज बरोबर. अगदी पुढचे नाव हे नसले. तरीही हे पण एक नाव आहे. :)

सुंदर लिहीले आहे, यामुळे पुढील भागांची उत्सुकताही वाढली. पण एक दिवसांच्या मॅचेस बद्दल लिहीताना रिचर्ड्स ने सुरूवात करणे एकदम चपखल!

पण या खेळाडूंबद्दल उर्मट शब्द का वापरला जरा शंका आहे. माझ्या माहितीत तरी रिचर्ड्स उर्मट नव्हता - शब्दशः अर्थाने.

मला आठवते त्याप्रमाणे ९२ च्या वर्ल्ड कप ला तो जायला तयार होता, पण विंडीज बोर्डाने काहीतरी निर्णय घेउन त्याला घेतले नव्हते. अर्थात शेवटची ३-४ वर्षे त्याचा जोर ओसरला होता.

दुर्दैवाने रिचर्डच्या बर्‍याच इनिंग्स चे व्हिडीओ फारसे दिसत नाहीत. फक्त इंग्लंड मधले बघितले आहेत.

मृत्युन्जय's picture

15 Feb 2011 - 10:58 pm | मृत्युन्जय

नाही शब्दशः अर्थाने रिचर्डस उर्मट नक्की नव्हता. या लेखमालिकेकरता जी नावे माझ्या डोळ्यासमोर आहेत त्यातले अजुन ३-४ जण देखील शब्दशः तसे नव्हते. पण त्यांच्या खेळातुन ते जाणवायचे. समोरच्याला किरकोळीत काढण्याची त्यांची एक तर्‍हा होती. आहे. म्हणुन उर्मट, शेवटी उर्मटपणा नेहेमी शब्दांतुनच दिसतो असे थोडेच आहे.

पुढचे काही लेख वाचताना हा शब्द कदाचित प्रकर्षाने खटकेल. त्यामुळे क्रिकेटरसिकांची आधीच माफी मागतो. कोणाच्याही भावना दुखवायचा विचार नाही.

या यादीतील काही नावे अनपेक्षितही असतील. त्याची कारणीमीमांसाही देइन. थोडक्यात. पटेल असेलच नाही. पण प्रयत्न करेन. :)

आणि हो. अनेक महान खेळाडु इथे दिसणार नाहीत. कारण इतर कारकीर्द कितीही किर्तीमान असेल तरी कदाचित ते विश्वचषकात चमकले नाही आहेत किंवा "उर्मट' या उपाधीस पात्र होण्यासाठीचे बेसिक क्वालिफिकेशन त्यांच्याकडे नाही :)

तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियांसाठी "आगाउ" आभार. :)

फारएन्ड's picture

15 Feb 2011 - 11:15 pm | फारएन्ड

आता लक्षात आले. भावना वगैरे दुखवायचा प्रश्नच नाही. लेख आवडलाच आहे.

रमताराम's picture

16 Feb 2011 - 1:41 pm | रमताराम

फारेन्डा, उर्मट हे 'अरोगंट'चे भाषांतर म्हणून वापरले असावे. पण अरोगन्स हा कन्स्ट्रक्टिवदेखील असू शकते तर उर्मटपणाला नेहमीच नकारात्मक परिमाण असते. म

यशोधरा's picture

15 Feb 2011 - 10:54 pm | यशोधरा

मस्त लिहिले आहे, आवडले.

राजेश घासकडवी's picture

15 Feb 2011 - 11:42 pm | राजेश घासकडवी

लेखमालेची सुरूवात तर दणदणीत झालेली आहे. रिचर्ड्सला सलाम.

फारएन्ड प्रमाणे मलाही उर्मट हा शब्द थोडा खटकला. मला वाटतं तुम्हाला ते रिचर्ड्स या व्यक्तिपेक्षा त्याच्या बॅटिंगच्या शैलीविषयी म्हणायचं असावं. उत्कृष्ट बोलिंगलाही तुच्छ मानून तिच्या निर्विकारपणे चिंधड्या उडवण्याची पद्धत निश्चितच उर्मट म्हणता येईल.

अजून येऊ द्यात.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Feb 2011 - 3:50 am | निनाद मुक्काम प...

http://www.youtube.com/watch?v=TuHhB7eQGJk&feature=related
हाच तो अभूतपूर्व क्षण
रिचर्ड वर लेख मस्त झाला आहे
.पूर्वी म्हणजे ९० च्या दशकात महानगर दैनिकात रिचर्ड चे आत्मचरित्र चित्र स्वरुपात यायचे .
ते मी वाचायचो .( आता त्या आठवणीना उजाळा मिळाला )
बाकी त्याकाळी तो एकटाच त्याच्या आक्रमक पण शैलीदार ढंगात फलंदाजी करायचा
.ह्या दोन गुणाचा मिलाफ असणारी त्याची खेळी म्हणजे गोलंदाजांना आव्हान असायचे .( त्यावेळी क्रिकेट हा गोलंदाजांचा खेळ होता )
व त्यांना असे बेधडक उत्तर देणारा डॉन नंतर हाच
म्हणून उर्मट हा रूपकात्मक शब्द योग्य वाटतो .
भा पो झाल्याची मतलब
पुढे कोणता फलंदाज येतोय मिपाच्या खेळपट्टीवर ह्याची वाट पहात आहे
सचिन फिक्स
शोहेब ला खेचलेला षटकार डोळ्याचे पारणे फेडतो (हा फटका सचिन नेच मारावा

.
.

छोटा डॉन's picture

16 Feb 2011 - 9:13 am | छोटा डॉन

मस्त लेखमालिका, वाचतो आहे.

ह्या स्पर्धेच्या निमित्ताने लोक असे वेगवेगळ्या विषयावर लिहीत आहेत हे पाहुन आनंद झाला.
क्रिकेटच्या सर्व अंगाने स्पर्श करणारे हे लेखन असेच बहरत जावो हीच सदिच्छा :)

पुढच्या भागाची वाट पहात आहे हे वे.सांअ.ल.
( उगाच आमचा एक उर्मटपणा : ह्या लेखमालिकेत 'जावेद मियाँदाद' आणि 'मोहिंदर अमरनाथ' सारखे महारथीही येवो अशी मागणी )

- छोटा डॉन

गवि's picture

16 Feb 2011 - 11:03 am | गवि

एकदम व्यवस्थित पाहिले आहे व्हिव रिचर्ड्सला जोरदार फॉर्मात असताना.

माझ्या ब्याटीवर त्याचा फोटो चिकटवला होता. यात सर्व आले.

माझे एक ऑब्झर्वेशन (चूभूदेघे) की तो काहीवेळा बॅट जमिनीला टेकवण्याऐवजी हवेतच वर धरुन उभा रहायचा आणि बॉल आला की ताडकन सीमापार. इतका कॅज्युअल स्टान्स कधी पाहिला नव्हता. जणू भीती /फिकीरच नाही गोलंदाजाची.

बॅटिंगला असे उभे राहणे अलाउड असते का? कारण पाहिल्याचं तर आठवतंय नक्की. इतर कोणाला आठवतंय का?

नंतर कायमची स्मरणात राहिलेली "विमल" ची अ‍ॅड. त्यात वाईनग्लास घेऊन व्हिव विचित्र नाचायचा..

मग नीना गुप्ता वगैरे प्रकरणात क्रिकेटेतरही गाजला.

पण लक्षात राहिला आहे तो त्याचा बॅटिंगला उभा असतानाचा बेफिकीर स्टान्सच.

आठवण दिल्याबद्दल धन्यवाद..

फारएन्ड's picture

16 Feb 2011 - 11:42 am | फारएन्ड

त्याबद्दल असा काही नियम नाही. गूचही बॅट उचलूनच उभा राहायचा. अर्थात बहुतांश वेळा बॉल फक्त तटवायला :)

बॅटिंगला असे उभे राहणे अलाउड असते का?

असं काही नाहीये. नाहीतर ग्रॅहम गूच, आमिर सोहेल, इजाझ अहमद, मायकल वॉन इ. लोकांवर बंदीच आली असती! ;)

प्रमोद्_पुणे's picture

16 Feb 2011 - 11:07 am | प्रमोद्_पुणे

लिहिले आहेस रे एकदम..मस्त..

स्वाती दिनेश's picture

16 Feb 2011 - 12:57 pm | स्वाती दिनेश

उर्मटांच्या यादीतील पुढचे रत्न वाचायला उत्सुक!
स्वाती

पैसा's picture

16 Feb 2011 - 8:31 pm | पैसा

व्हिव रिचर्डस खराच "किंग"! एक नक्की, खेळाची एकदम मजा घेऊन खेळणारे, आणि लोकाना निखळ आनंद देणारे जास्त जुने वेस्ट इंडियन्सच सापडतील.

चतुरंग's picture

19 Feb 2011 - 5:29 am | चतुरंग

किंग रिचर्डसचा खेळ मी बघितलाय. तो भीषण होता! कोणत्याही लाईन लेंग्थचा चेंडू सीमापार भिरकावणे त्याची खासियत होती. मनगटातल्या जबर ताकदीने तो चेंडू असा काही मारायचा की त्याच्या अ‍ॅक्शनवरुन तो षटकार असेल असे कदापीही वाटत नसे. अशा ह्या रगेल (आणि तितकाच रंगेलही - आठवा नीना गुप्ताबरोबर त्याचे प्रकरण ;)) किंगच्या लेखाने पहिले पुष्प यावे हे अतिशय उचित आहे.

रिचर्डस पंखा रंगा

अत्रुप्त आत्मा's picture

19 Mar 2014 - 6:10 pm | अत्रुप्त आत्मा

तुफ्फान लिवलय हो! http://www.sherv.net/cm/emoticons/sport/cricket-hit-smiley-emoticon.gif
लेख वाचून (आणि लहानपणी,वाड्यात एकाच टि.व्ही.समोर ;) पंचवीस जणांनी बसून) पाहिलेल्या काहि म्याचेस नुसार---किंग रिचर्ड्स म्हणजे- बॉलला 'नारळ' समजून फोडणारा माणूस!