३१ डिसेंबर संपली आणि पहिल्या जानेवारीला डोळे उघडायच्या आधीपासुनच प्रत्येक सोलापुरकराला गड्ड्याचे वेध लागलेले असतात. सोलापुरचे ग्रामदॅवत श्री. सिद्धेरामेश्वरांची यात्रा मकर संक्रांतीला भरते. संक्रांतीच्या २-३ दिवसात देवळात व होम मॅदानावर बरेच कार्यक्रम असतात. संपुर्ण शहरातुन काठ्यांची मिरवणुक निघते. काठ्या या शब्दावर जाउ नका, या प्रत्यक्ष ३०-४० फुटि बांबु असतात, जे एक व्यक्ति आपल्या कमरेला बांधलेल्या विशिष्ट पट्ट्याच्या आधारे दोन्ही हातावर तोलुन धरत जवळ्पास संपुर्ण शहरातुन मिरवत आणतात. ही मिरवणुक ३ दिवस असते. सोलापुर शहरात एकुन ६८ ठिकाणी शिवलिंगांची स्थापना केलेली आहे, त्या सर्व ठिकाणी या काठ्या नेउन आणण्याची परंपरा आहे. संक्रांतीच्या दिवशी या काठ्यांचे व श्रीसिद्धेश्वराचे लग्न लावले जाते, त्याच दिवशी रात्री होम मॅदानावर दारुकाम म्हणजे फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम असतो. पुढील फोटो जालावरुन साभार.
ह्या वर्षी माझं या सगळ्या सोहळ्याला उपस्थित राहणं शक्य झालं नाही, पण नंतर सुट्टी मिळाल्यावर लगेच लेकाला घेउन मी सोलापुरला आलो. पहिल्यांदा श्रीसिद्धेश्वराच्या देवळात गेलो त्याची काही छायाचित्रे.
हे देउळ एका मानवनिर्मित तलावात आहे, त्याच्या मागे सोलापुरचा भुईकोट किल्ला दिसत आहे. हा तलाव किल्ल्याच्या एका बाजुला आहे.
येथे ही देवळात आत जाताना पाय धुण्याची छान सोय केलेली आहे. तसेच संपुर्ण देवळाच्या फरसबंदी आवारात पांढ-या रंगाचे पट्टे मारलेले आहेत, पायाला चटके बसु नयेत म्हणुन.
ही श्री. सिद्धरामेश्वरांची समाधी. वरच्या लाल रंगाच्या मंडपामुळे खालची संगमरवरी समाधी लाल दिसत आहे. या आवाराला तिनही बाजुला दगडी ओव-या आहेत व मध्ये काही जुनी झाडे पण आहेत.
श्री.सिद्धेश्वराच्या देवळातील ही मुर्ती / शिवलिंगावरचा मुखवटा, श्रावणांत याला विड्याच्या पानंची सजावट केली जाते, ती देखील अतिशय सुंदर असते.
हे मंदिरावरचे शिखर व या मंदिराला गाभा-याच्या दोन्ही बाजुला सभामंडपाला जोडुन दोन छोटी मंदिरे आहेत, असा प्रकार मी फक्त येथेच पाहिला आहे.
हे साधुबाबा खिळाच्या वर उभे राहुन सर्वांना आशिर्वाद देत होते, पण का माहित नाही फोटो काढताना ते लगेच खाली उतरले आणि थोडे रागावले.
मंदिराला तलावाच्या काठाला जोडणा-या छोट्या रस्ता वजा पुलावर या यात्रा काळात व श्रावणांत दुकाने लावलेली असतात.
या दुकानात नेहमीच्या गंडे, दोरे, फोटो, प्रसाद या धार्मिक वस्तुंबरोबरच भस्म / विभुती पण मिळते, हे गोल्,लंबगोल, कांडी ते बेसन लाडु यापॅकी ब-याच आकारात मिळते. सोलापुरातील लिंगायत समाजात रोज सकाळी छाती,कपाळ व खांद्यावर भस्माचे पट्टे ओढुनच घराबाहेर पडण्याची किंवा कामाधंद्याला लागण्याची परंपरा आहे.
दुपारी घरी आल्या बागेतल्या फुलांचे व झाडांचे काही फोटो काढले, मालकीण बाई - आमच्या मासाहेब ब-याच दिवसांनी भेटल्याने सगळ्यांना तरतरी आलेली होती.
आणि या आमच्या माहेरवाशिणी, यांनी दिवाळीत आकाशकंदिलाच्या वायर वरच आपला झुलता बंगला बांधला आहे.
ही दुस-या दिवशीची सुरुवातीची खादाडी -
आणि आता खाली गड्ड्यावरची विविध दुकाने-
माझ्या लहानपणी या हॉटेलमध्ये खाजा नावाचा मॅद्याचा केलेला आणि वरुन प्रचंड पिठिसाखर घातलेला गोड पदार्थ मिळायचा, त्याचं वर्णन मी माझ्या लेकाला पुणॅ ते सोलापुर ४ तास सांगत होतो, पण या वेळी हा खाजा कुठे दिसलाच नाही. आताशा ही हॉटॅल बदलत्या काळाप्रमाणे डोसा, इडली ते पावभाजी ते चायनिज पर्यंत आली आहेत.
पण लोकं गड्ड्यावर येतात ते या साठी, भाग्यश्री बटाटेवडा, पोलिसचॉकीच्या जवळ असणारा हा स्टॉल माझ्यासाठी गेल्या २० वर्षांचं आकर्षण आहे. दरवर्षी गड्डा फिरताना सुरुवातीला दोन , मध्ये दोन व शेवटी दोन असे वडे खाल्याशिवाय माझा गड्डा पुर्णच होत नाही, या वर्षी ही परंपरा पुढं माझ्या लेकाला देताना मला खुप छान वाटत होतं आणि तो पण पहिल्यांदाच इतक्या इंटरेस्ट्ने बटाटावडा खात होता.
माझे बाबा जसे मला खांद्यावर घेउन मला सगळा गड्डा फिरवत मी पण तसेच लेकाला घेउन फिरलो, त्याला खेळणी घेतली, वडे खाल्ले, उसाचा रस पिला, पापड खाल्ले, परत घरी येताना फुगा घेतला आणि मगच मला माझं बाबा होणं पुर्ण झाल्यासारखं वाटलं, लेक पण माझ्यासारखाच खांद्यावर झोपला होता, माझे केस घट्ट धरुन आणि पाय गळ्यात अडकवुन, माझा शर्ट पण तसाच मळला होता जसा बाबांचा मळायचा. फरक एवढाच होता की दुखणा-या खांद्याबद्द्ल मी दोन वेळा लेकाला सांगितलं आणि खाली उतरवलं होतं आणि बाबा कधी या बद्दल बोललेच नाहीत....
या फोटोपॅकी काही फोटो लेकानं खांद्यावर बसुन काढलेत.
भाग्यश्री वड्याएवढेच हे चिवडे पण गड्ड्याचा अविभाज्य भाग आहेत. ज्या मोठ्या पाळण्यांत बसायला मी अजुनही घाबरतो त्याचा लांबुनच काढलेला फोटो.
परंपरेनुसार गड्डा फिरण्याचा शेवट या स्थानी झाला, या दादांनी दिलेलं पुदिन्याचं पाणी संध्याकाळ भर पोटात भरलेलं व्यवस्थित पचवतं, हा १-२ नाही तर १५ वर्षांचा अनुभव आहे.
तर अशी झाली या वर्षीची गड्डा यात्रा, पुढच्या वर्षी लग्नासहित ३ दिवस जायचा विचार आहे, पाहु या कसं जमतंय ते.
हर्षद.
प्रतिक्रिया
25 Jan 2011 - 3:55 pm | स्पा
झाडून सगळे फोटो अप्रतिम :)
25 Jan 2011 - 4:03 pm | कच्ची कैरी
फोटोसहित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !तुमच्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडली .बाकी फोटो १ नंबर हं !
25 Jan 2011 - 4:11 pm | मुलूखावेगळी
मी पाळन्यात बसुन घाबरते ;)
बाकि २-३ लेख एकत्रच टाकलेत. असे वाटतेय कष्ट वाचवन्यासाठी
होलसेल सगळे फोटो १ नम्बर
मी अचानक न ठरवता गेलेली आहे सोलापुरच्या गड्ड्याला बर्याचदा
25 Jan 2011 - 4:23 pm | ५० फक्त
स्पा, कच्ची कॅरी व मुवे , प्रतिसादांसाठी अतिशय धन्यवाद.
@ मुवे - मी अचानक न ठरवता गेलेली आहे सोलापुरच्या गड्ड्याला बर्याचदा - हा हिशोब काही समजला नाही,
आणि २-३ लेख एकत्र नाहीत, एकच आहे आणि तो ही लेख नाही, फोटोच जास्त आहेत. पाळण्यांत एकदा बसले की भिती नाही वाटत, वाटते ती आधिच. (लग्नासारखं)
हर्षद.
25 Jan 2011 - 4:31 pm | मुलूखावेगळी
नाही मला असे म्ह्नानायचे होते कि
मी जेव्हाही सोलापुरला गेलेय तेव्हा गड्डा यात्रा होती तिथे
पन मी ठरवुन कधीच गेले नव्हते.
25 Jan 2011 - 6:58 pm | आत्मशून्य
तसे अधून मधून खाली उतरावेच लागते नाही तर पायात खीळे रूतायला सूरूवात होते. तसेच दोन खीळ्यांमधील अंतरही फार कमी असते ज्या मूळे जास्त खीळे वापरता येऊन शरीरचे वजन जास्तीजास्त खीळ्यात वीभागले गेल्याने खीळे टोचत (खोल वर रूतत )नाहीत. बाकी चांगले अॅक्यूप्रेशर होत असावे, तब्येत छान राहील त्यांची (योगसाधनेमूळे न्हवे). पण शक्य असेल तर पायखाली फक्त ५-६ खीळे ठेवून आशीर्वादाला ऊभे राहून दाखवा म्हणावे :)
एकूणच फोटो मस्त हे काय सांगयलाच हवे ....??
25 Jan 2011 - 7:10 pm | गणेशा
मस्त झाली म्हणायची ट्रीप .. सर्व वृत्तांत मस्त
मजा करत रहा.. आम्ही ही सामिल होउच ..
25 Jan 2011 - 7:20 pm | धमाल मुलगा
खूप वर्षांपुर्वी गड्ड्याच्या यात्रेला जायला मिळालं होतं. एकदम झकास असते बा ही यात्रा. :)
बाकी, मंदीर नव्यानेच सुशोभित केलं आहे का? माझ्या आठवणीतलं मंदीर बरंच जुनं आहे. :)
25 Jan 2011 - 7:44 pm | यकु
मस्त रिपोर्ताज..
मी सोलापूरात दोन वर्षे राहिलो आहे..
या यात्रेला "गड्डा" का म्हणायचं ते मला कुणीच सांगू शकलेलं नाही.. कदाचित कानडी शब्द असावा..
सोलापूरचे काही खास शब्द शेंगा चटणी, कंबर तलाव ( कानडी उच्चार खंबर ) .. शेंगदाणे म्हटलेलं त्यांना कळत नाही.. हसायला लागतात.. सोलापूर एक लै भारी शहरयं.. ऐतिहासिक आणि बिलकुल भपकेबाजी नसणारं..
25 Jan 2011 - 7:53 pm | गणपा
यात्रा-जत्रा-देउळ सगळच आवडल.
:)
वड्याचा फटु तर उगाच पाहिला अस झालं :(
25 Jan 2011 - 7:55 pm | मराठी_माणूस
एकदम ३०/३५ वर्ष मागे गेलो. ह्या यात्रेचा खुप आनंद घेतला आहे. परत सचित्र आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद
25 Jan 2011 - 8:40 pm | सखी
छानच फोटो, जत्रा, देऊळ, वृत्तांत - सगळचं आवडलं दुसरा फोटो विशेष आवडला. सोलापुरला काही वेळेस जाणं झालय तरी या यात्रेची कल्पना नव्हती. भाग्यश्री वड्याबद्दल बरच ऐकलं आहे, पण खायचा योग कधी येणार कोणास ठाऊक - त्यामुळे जास्तच जळजळ झाली.
दरवर्षी गड्डा फिरताना सुरुवातीला दोन , मध्ये दोन व शेवटी दोन असे वडे खाल्याशिवाय माझा गड्डा पुर्णच होत नाही
हे भारीच. पुलंच्या उपासची आठवण झाली. काहीस 'डाएटसाठी मधल्या वेळेचा भात सोडायचा ठरवलं, सुरवातीचा आणि शेवटचा घ्यायला हरकत नाही.'
आणि तुम्ही मुलाचे फिरवुन व नंतर झोपल्याचे वर्णन केले आहे, त्याने मला माझ्या बाबांची आठवण झाली. फक्त ते सायकलवर खूप लांब, लांब देवदर्शनाला घेऊन जायचे, दर आठवड्यातुन २-३ वेळेस तरी. मी पुढे बसलेली असायची व येताना त्यांच्या हातावर झोपायची आणि त्यांना तशीच सायकल चालवायला लागायची. परत माझा इतका करंटेपणा की आपण दमलोय हेच त्यांना सांगायची, त्यांनी ते कधीच सांगितले नाही :(
25 Jan 2011 - 8:49 pm | योगप्रभू
मला सोलापूर, तिथली माणसं आणि खादाडीच्या जागा खूप आवडल्या. त्यामुळे हे लेखन अर्थातच माझ्यासाठी मस्त ट्रीट.
25 Jan 2011 - 11:09 pm | मराठे
मस्त! सोलापूरच्या गड्ड्याची छान यात्रा घडवलीत. धन्यवाद!
26 Jan 2011 - 12:26 am | सद्दाम हुसैन
फोटो तर खुपच सुरेख .. धन्यवाद.
26 Jan 2011 - 3:16 am | शुचि
अप्रतिम :)
मजा आली.
26 Jan 2011 - 7:03 am | सहज
माझे बाबा जसे मला खांद्यावर घेउन मला सगळा गड्डा फिरवत मी पण तसेच लेकाला घेउन फिरलो
फार आवडले!!
26 Jan 2011 - 8:35 am | आमोद शिंदे
गड्ड्यामधे रमलेल्या लेकाचा फोटू टाकला असतात तर अजून मजा आली असती.
26 Jan 2011 - 9:10 am | ५० फक्त
आमोद प्रतिसादासाठी अतिशय धन्यवाद, अरे बरेचसे फोटो लेकानंच काढलेत आणि गर्दि एवढी असते की असे फोटो काढायला वे़ळच मि़ळाला नाही, एक -दोन विडिओ आहेत, ते टाकतो आहे युट्युबवर आणि लिंक देतो इथे.
हर्षद.
26 Jan 2011 - 8:24 am | स्पंदना
माझे बाबा जसे मला खांद्यावर घेउन मला सगळा गड्डा फिरवत मी पण तसेच लेकाला घेउन फिरलो, त्याला खेळणी घेतली, वडे खाल्ले, उसाचा रस पिला, पापड खाल्ले, परत घरी येताना फुगा घेतला आणि मगच मला माझं बाबा होणं पुर्ण झाल्यासारखं वाटलं, लेक पण माझ्यासारखाच खांद्यावर झोपला होता, माझे केस घट्ट धरुन आणि पाय गळ्यात अडकवुन, माझा शर्ट पण तसाच मळला होता जसा बाबांचा मळायचा. फरक एवढाच होता की दुखणा-या खांद्याबद्द्ल मी दोन वेळा लेकाला सांगितलं आणि खाली उतरवलं होतं आणि बाबा कधी या बद्दल बोललेच नाहीत....
बस बस हर्शद भाई !! सलाम तुम्हाला, या अश्या भावनेन तर पुढची पिढी तयार होते. तुमच्या बाबांच पितृत्व फळाला आल.
27 Jan 2011 - 6:17 pm | ५० फक्त
तुम्हाला सर्वांना अतिशय धन्यवाद, १-२ दिवसांत लेकाचा व्हिडिओ टाकतो आहे इथेच पाहुन मजा करा त्याच्यासारखीच.
हर्षद.
27 Jan 2011 - 10:45 pm | ५० फक्त
हा घ्या लेकाचा व्हिडिओ, निळ्या कपात पांढरा हाफ शर्ट घालुन बसलेला माझा लेक.
28 Jan 2011 - 12:26 am | यकु
बराच धीट आहे की तुमचा नान्या (?).. वाकडं लावतोय तोच ना ;-)
मला तर रहाटपाळणा पाहिला तरी चक्कर येते..!
1 Feb 2011 - 4:51 pm | डावखुरा
फोटो आणि वृत्तांत एक्दम भारी...
त्या काठ्या घेउन ते नाचतात काहो...आणि त्याला काठ्या-कवाड्या म्हणतात का?
3 Feb 2011 - 9:31 pm | क्रान्ति
हर्षू, खासच आहेत रे फोटो! अगदी दक्षिण कसब्यातून काठया पहातोय असं वाटलं!
गणपा, या एकूण सात काठ्या असतात. पहिली लिंगायत समाजाची हिरेहब्बू यांची मानाची काठी. मग सोनार, कुंभार अशा इतर सगळ्यांच्या मिळून एकूण सात.
श्री सिद्धरामेश्वर हे योगी, तपस्वी होते. ते अतिशय रूपवान, तेजस्वी दिसत. त्यांच्या एका कुंभार भक्ताची कन्या त्यांच्यावर भाळली आणि त्यांच्याशी विवाह करण्याची तिनं इच्छा व्यक्त केली. पण सिद्धरामेश्वरांनी आपण योगी असल्यानं गृहस्थाश्रम आपल्याला वर्ज्य आहे असं तिला समजावलं. पण तीही निश्चयाची पक्की होती, तिनं मनोमन सिद्धरामेश्वरांना आपला पती मानून इतर कुणाशीही विवाह करणार नाही, असं आपल्या पित्याला सांगितलं. यावर उपाय म्हणून सिद्धरामेश्वरांनी आपला नंदीध्वज तिला दिला व याच्याशी तू विवाह कर असं सांगितलं. तिनं त्याप्रमाणे सिद्धरामेश्वरांच्या नंदीध्वजाशी विवाह केला आणि त्यानंतर होमकुंडात स्वत:ची आहुती दिली. या विवाहाचं प्रतिक म्हणून आजही संक्रांतीच्या दिवशी सिद्धेश्वर मंदिरात या काठ्या आणि नंदीध्वज यांचा विवाह अगदी थाटामाटात, विधिपूर्वक संपन्न होतो आणि निम्म्याहून अधिक सोलापूरकर अगदी घरचं लग्न असल्यासारखे नटूनथटून या लग्नाला उपस्थित रहातात.
भोगीदिवशी ६८ ज्योतिर्लिंगांना तेल लावण्याचा कार्यक्रम होतो, संक्रांतीदिवशी लग्न आणि किंक्रांतीला होम. होमादिवशी साडीचोळी अर्पण केली जाते भक्तांकडून कुंभारकन्येला. काठ्या या त्या कन्येचं प्रतिक. त्यांचा विवाह नंदीध्वजाशी होतो.
या काठ्या इतक्या जड आणि उंच असतात, की त्या चालवायची प्रॆक्टीस केली जाते जवळजवळ महिनाभर आधीपासून, जशी गणपतीत लेझिमची करतो तशी. कारण ती काठी झुकून चालत नाही! उंची पण एवढी असते, की एक आठवडाभर रोडक्रॊस केबल काढून ठेवाव्या लागतात वीज आणि फोनवाल्यांना. त्यामुळे त्या मार्गावरचे फोन बंद रहातात, पण तेव्हा कुणी कुरकुर नाही करत! [अर्थात, आता तर मोबाइल आले, पण आम्ही जेव्हा तिथे होतो, तेव्हा एरवी फोन बंद झाला अर्ध्या तासासाठी, तरी ओरडणारे लोक तब्बल आठवडाभर काहीही तक्रार करायचे नाहीत!]
बरं, ती मिरवणूक काही तास-दोन तासांची नसते, जवळजवळ अर्धा दिवस जातो त्यात, कारण घरोघरी दारात थांबवून त्या काठ्यांची पूजा केली जाते, नवसाचे खोबरं-लिंबू यांचे हार घातले जातात. आणि विशेष म्हणजे सोलापुरातील सगळ्या जातिधर्माचे लोक या सोहळ्यात सामील असतात! पारंपारिक बाराबंदी, फेटे घालून अनवाणी पायांनी सगळ्या वयातली मुलं-माणसं लगबगीनं काठी धरण्यासाठी धावत असतात! तोही मोठा मान असतो! आणि मग या विवाहानिमित्त यात्रा भरते मस्तपैकी भली मोठी. माझ्या बंधुराजानं फोटो दिलेच आहेत दोन दुव्यांमधे. मी मला आठवली तेवढी माहिती दिली.
31 Mar 2017 - 2:56 pm | मनिमौ
पण लेख वाचून मजा आली.
31 Mar 2017 - 9:54 pm | राघवेंद्र
भाग्यश्री वडा...
कधी जायचे सोलापूरला
1 Apr 2017 - 11:08 am | सिरुसेरि
छान फोटो आणी लेखन . सोलापुरजवळ माचनूर हे गाव आहे . तिथलेही मंदिर खुप भव्य , सुरेख आहे .