नऊ स्वप्नं : अमृता प्रीतम

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
24 Nov 2010 - 3:14 pm

अद्भुतरस! नवल, आश्चर्य, अहोऽभाव, चमत्कृती, विस्मय यांच्या विलक्षण छटा दाखविणारा, गूढत्वाकडे प्रवास करणारा, कल्पनाशक्तीला अफाट वाव देणारा हा रस. भव्यदिव्यतेचे, आकलनाच्या पलीकडील जगताचे केवळ संकेत देऊन उर्वरित प्रतिमाचित्र पूर्ण करण्याचे काम आपल्या कल्पकतेवर सोडणारा, ज्ञातापासून अज्ञाताकडे जाताना उमटणार्‍या भावभावनांचा आस्वाद घेणारा हा रस.

अशीच एक अद्भुतरसाने भारलेली कविता वाचनात आली. कवितेची नायिका आहे माता तृप्ता. शीख संप्रदायाचे संस्थापक श्री गुरू नानक यांचे मातृत्व लाभलेली वत्सल स्त्री. तसे बघावयास गेले तर तृप्ता माता ही शीख संप्रदायाची आद्य जननीच! सध्या पाकिस्तानात असलेल्या तलवंडी गावात माता तृप्ता व पिता मेहता कालू यांच्या पोटी गुरू नानक यांचा इ. स. १४६९ मध्ये कार्तिक महिन्यात जन्म झाला. नुकताच गुरू नानक जयंती सोहळा व प्रकाश पर्वाचा उत्सव देशोदेशीच्या सर्व शीख बांधवांनी साजरा केला. इतिहासाने ज्या ज्या व्यक्तींची द्रष्टे, संतशिरोमणी किंवा ज्ञानी म्हणून नोंद घेतली त्यांमध्ये गुरू नानकांचे स्थान व कार्य वादातीत आहे. एका महान कर्तृत्वशाली, साक्षात्कारी संतमहात्म्याच्या जन्माच्या जशा कहाण्या असतात तशाच त्या गुरू नानकांच्या जन्माचे बाबतीतही आहेत. माता तृप्ताला नानकांचा गर्भ उदरी जोपासताना झालेले भास, तिला दिसलेली स्वप्ने, संकेत इत्यादींचे उल्लेख शीख वाङमयात येतात. तृप्ता मातेबद्दल तपशिलांत फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु ती स्वभावाने अतिशय सत्शील, कनवाळू व प्रेमळ असल्याचे उल्लेख आढळतात.

अमृता प्रीतमच्या प्रतिभाशाली लेखणीतून, कल्पनेच्या भरारीतून माता तृप्ताने गुरू नानकांच्या वेळी गर्भार अवस्थेत पाहिलेली स्वप्ने ''नौ सपने'' ह्या दीर्घ कवितेतून आपल्या भेटीला येतात. उदरीचा गर्भ तृप्ता मातेला विविध प्रकारे आपल्या अस्तित्वाचे, दिव्यत्वाचे संकेत देत राहतो. नऊ महिन्यांची ही नऊ स्वप्ने. उदरीचा गर्भ जसजसा आकार घेत जातो तसतसा स्वप्नांत आणि माता तृप्ताच्या मनोवस्थेत घडून येणारा बदल अमृताने मोठ्या नजाकतीने वर्णिला आहे. प्रत्येक स्वप्न तृप्ता मातेला पोटातील अंकुराविषयी काही ना काही दृष्टांत देत राहते. संकेत, भास-आभास, स्वप्न व संवाद यांचे हे तलम वस्त्र शब्दांमध्ये गुंफताना कवितेमधून ठायी ठायी अमृतामधील मातृत्वही डोकावताना दिसते. त्या काळातील स्त्रीच्या रोजच्या आयुष्यातील घटनांचा मोठ्या खुबीने वापर करून अमृता कवितेचे रंगही अधिक गडद-गूढ करत जाते. चंद्र-सूर्य-तारका, नदी-सरोवर, वृक्ष-वने आदींचे रूपक तिने रेखाटलेल्या शब्दचित्राचे सौंदर्य अजूनच खुलविते. तिने कवितेत योजलेले काही शब्द आणि त्यांचा प्रतीत होणारा अर्थ अधिक गहिराईचे संकेत देत मनात रुंजी घालत राहतात.

अमृताच्या आत्मचरित्रात हे काव्य तिला आपल्या आयुष्यातील एका प्रसंगावरुन स्फुरल्याचे ती सांगते. स्वतःचा दूरगावी गेलेला मुलगा जेव्हा आईशी संवाद साधतो तेव्हा त्या आईची होणारी अवस्था अमृतामधील माता आणि कवयित्री ज्या तरलतेने व ताकदीने अनुभवते तीच तरलता तिच्या ''नौ सपने'' कवितेतून रसिकांना खुणावत राहते. एका तेजस्वी गर्भाला उदरी पोसताना माता तृप्ताने नक्की काय अनुभवले असेल? काय स्वप्ने पाहिली असतील? येणार्‍या काळाच्या खुणा तिला जाणवल्या असतील का? त्या गर्भाने तिला काही संकेत दिले असतील का? या सार्‍या प्रश्नांचा वेध घेत अमृताची कविता एक वेगळाच अनुभव देऊन जाते.

माता तृप्ताचे माध्यमातून अमृता जणू गर्भार अवस्थेतून जाणार्‍या स्त्रीच्या मनीचे बोल बोलते. पोटात दिसामासाने वाढणारा जीव आपल्या हुंकारातून मातेला मूक साद घालत असतो. तिच्या स्वप्नांत, विचारांत, अस्तित्वात व्यापून राहिलेला असतो. ''नौ सपने'' कवितेत त्या स्त्रीची ही अवस्था अमृता सुंदर रीतीने वर्णन करते.

त्या कवितेचा भावानुवाद करण्याचा हा प्रयत्न :

नऊ स्वप्नं

भाग १

तृप्ता दचकून जागी झाली
ऊबदार दुलई हळूच सारखी केली
लाल लज्जेसमान पदर
सावरला तिने खांद्यावर

आपल्या धन्याकडे पाहिले
मग शुभ्र बिछान्यावरच्या
चुणीप्रमाणे हलकेच लाजली

आणि म्हणू लागली
आज माघाची रात्र
मी नदीत पाऊल ठेवले

गारठलेल्या थंड रात्री
कोमट पाणी नदीचे पात्री

अलौकिक काही झाले
पाण्याला अंगस्पर्श होताच
नदीचे दूध झाले!

त्या जादुई नदीत
मी दुधात न्हाले

या तलवंडी (गावा)त
ही कोणती नदी?
हे कसलं स्वप्नं?

आणि नदीत चंद्र तरंगत होता
मी चंद्राला ओंजळीत ठेवलं, घोट घेतला

आणि नदीचं पाणी
माझ्या रक्तात मिसळत गेलं
आणि तो प्रकाश
माझ्या उदरी तरंगत राहिला

-----------------------
भाग २

फाल्गुनाच्या कटोऱ्यात सात रंग मिसळले
पण मुखाने काही ना वदले

ह्या मातीच्या देहाचं सार्थक होतं
जेव्हा कोणी उदरी आश्रयाला येतं

हा कसला जप? हे कसलं तप?

की मातेला ईश्वराचा साक्षात्कार
गर्भाचे ठायी होतो....

---------------------------

भाग ३

कोवळ्या गर्भाची मळमळ
जीव घाबरा झाला केवळ

ताक घुसळायला बसले तर भासले जणू लोणी वर आले
मातीच्या घड्यात हात घातला
तर सूर्याचा वृक्ष निपजला

हा कसला भोग? कसला हा संयोग?

आणि चैत्राचे पुढे सरकणारे दिवस
हे असलं कसलं स्वप्नं?
-----------------------------

भाग ४

माझ्यात आणि गर्भात
हे स्वप्नांचं अंतर

जीव माझा फुलला आणि काळीज घाबरंघुबरं
वैशाखात कापलं जाणारं
हे कोणतं पीक होतं
सुपात पाखडायला घेतलं
तर सूप चांदण्यांनी भरून गेलं....

---------------------

भाग ५

आज रात्रीचा हा तरल समय
आणि ज्येष्ठाचा महिना
हा कोणता आवाज होता?

जळीस्थळी
जणू एक नाद उमटे
हे मोह-मायेचे गीत
की ईश्वराच्या कायेचे संगीत?

कोणता दैवी सुगंध होता?
की माझ्या नाभीचा गंध होता?
मी घाबरले
शंका घेत राहिले
आणि त्या आवाजाच्या रोखाने
वनांच्या वाटा धुंडाळत राहिले

हा कोणता आवाज
कोणतं हे स्वप्नं?
कितीसं परकं?
कितीसं आपलं?

मी एक हरिणी
जशी बावरी होत राहिले
आणि माझ्या गर्भाला
कान लावून ऐकत राहिले
--------------------------------

भाग ६

आषाढाचा महिना
तृप्ताला आपोपाप जाग आली
जसे उमलणारे फूल
जसा पुढे सरकणारा दिवस

''हे माझं जीवन
कोणत्या सरोवरांचं पाणी
मी आत्ताच इथे
एका हंसाला बसलेलं पाहिलं

हे कसलं स्वप्नं?
की जाग आल्यावरही वाटतंय
जणू माझ्या गर्भात
त्याचा पंख फडफडतोय..... ""
-------------------------------------

भाग ७

कोणता वृक्ष वा मनुष्य
नाही माझ्या जवळ
तरीही कोणी माझ्या झोळीत
घातला हा नारळ?

मी नारळ वाढविला
तर लोक मलई न्यायला आले
कोवळ्या नारळाचे पाणी
मी कटोऱ्यात ओतले

ना कोणा सांगितले ना कळवले
ना आप-परभाव केला
दाराशी असंख्य लोक आले
पण नारळाची मलई
तरीही संपली नाही

असा कसा हा नारळ?
असे कसे हे स्वप्नं?
आणि स्वप्नाचे धागे किती लांबच लांब?

छातीतला हा पाऊस,
मी छातीला हात लावला
तर ते नारळाचं पाणी
दुधासारखं ठिबकू लागलं

-------------------------------

भाग ८

हा कसला भाद्रपद?
ही कसली जादू?

सगळ्याच गोष्टी न्याऱ्या
ह्या गर्भीच्या बाळाचं अंगडं-टोपडं
शिवणार तरी कोण?

ही कसली सूत्रकाठी?
हे कसले माप?
जसे काही काल मी सारी रात्र
किरणांना विणत होते...

आश्विनाच्या महिन्यात
तृप्ता होती जागी आणि विरागी

''हे माझ्या जीवना!
तू कोणासाठी काततो आहेस हा मोहाचा धागा!

मोहाच्या तारेत आकाश गुंडाळता येत नाही
सूर्य बांधता येत नाही
सत्यासारखी एक जी गोष्ट
त्याचं अंगडं-टोपडं ना बेतता येतं ना शिवता येतं... ''

आणि तृप्ताने टेकविला माथा
आपल्या गर्भाचे ठायी
उमगले स्वप्नांचे मर्म मला
ना हा परका ना अपुला

कोणी मृत्युलोकीचा योगी
अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला
शेकत गर्भाची धुनी...

------------------------

भाग ९

माझ्या कार्तिक धर्मी,
माझं जीवन सुकर्मी
माझ्या गर्भाची धुनी
कातते पुढचा धागा जीवनी

देहाचा दीप उजळला
प्रकाशाचा किरण स्पर्शिला
धरतीच्या दाईला बोलावा
माझा प्रसवकाळ आला...

(पूर्ण)

**********************************************************************************************************************

मूळ काव्य येथे वाचा.

--- अरुंधती

(छायाचित्रे सिखविकीवरून साभार)

संस्कृतीकविताधर्मवाङ्मयइतिहाससाहित्यिकजीवनमानआस्वादभाषांतर

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

24 Nov 2010 - 3:31 pm | नगरीनिरंजन

कमाल! अप्रतिम काव्य आणि सुंदर भावानुवाद!
विशेषतः
"आणि तृप्ताने टेकविला माथा
आपल्या गर्भाचे ठायी
उमगले स्वप्नांचे मर्म मला
ना हा परका ना अपुला

कोणी मृत्युलोकीचा योगी
अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला
शेकत गर्भाची धुनी..."

या ओळी कंठ रुद्ध करून गेल्या.

ह्याच ओळी देणार होतो. भावानुवाद खुपच छान जमलाय. अमृता प्रीतमचे मुळ काव्य वाचायल वादेल, पण भाषा समजणार नाही ती.

मूकवाचक's picture

24 Nov 2010 - 7:47 pm | मूकवाचक

अप्रतिम भावानुवाद.

ढब्बू पैसा's picture

24 Nov 2010 - 3:54 pm | ढब्बू पैसा

>>>ही कसली सूत्रकाठी?
हे कसले माप?
जसे काही काल मी सारी रात्र
किरणांना विणत होते... <<

भावानुवादासाठी hats off!!
मूळ काव्य किती सुंदर असेल ह्याचा सारखा विचार येतोय मनात!

अतिशय छान काव्य आहेत सगळी ..
८ वे काव्य तर खुप जबरदस्त आहे ......

''हे माझं जीवन
कोणत्या सरोवरांचं पाणी
मी आत्ताच इथे
एका हंसाला बसलेलं पाहिलं

हे ही खुप आवडले

मुळातच, काव्य आणि त्याचे रसग्रहण वगेरे.. याबाबतीत आम्ही मुलखाचे मठ्ठ असल्याने इतके सुंदर काव्य (सगळेच म्हन्तायेत म्हणून आम्ही बी) डोक्यावरून गेले........

त्यामुळे एकही स्वप्न कळले नाही....

स्वाती२'s picture

24 Nov 2010 - 7:36 pm | स्वाती२

अप्रतिम!

अरुंधती खूप आभार इतकं सुंदर काव्य आमच्यापर्यंत पोहोचवलस त्याबद्दल. गुरु नानक यांचे जपजी साहिब, आनंद साहिब ऐकून इतकं शांत अणि फक्त प्रसन्न वाटतं ना.
त्यांच्या आईचे हे सुंदर स्वप्न, ९ मास .... अहाहा!!! अवर्णनिय. कसे तुझे आभार मानू कळत नाही.
परवाच गुरु नानक जयंती झाली. अगदी समयोचित लेख लिहीला आहेस. ब्लेस यु.

जयंत कुलकर्णी's picture

24 Nov 2010 - 8:44 pm | जयंत कुलकर्णी

सुंदर !

अरुंधती's picture

24 Nov 2010 - 9:38 pm | अरुंधती

नगरीनिरंजन, मूक वाचक, ढब्बू पैसा, गणेशा, स्पा, शुचि, स्वाती, जयंत, मनिष.... सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार. स्पा, जाऊ देत हो. तुम्ही तरीही वाचलात ना भावानुवाद! त्याबद्दल धन्यवाद. :-)

जयंत कुलकर्णी's picture

24 Nov 2010 - 9:42 pm | जयंत कुलकर्णी

मी माझ्या प्रतिक्रियेत आत्ताच टाकलेली कविता टाकली होती. पण आपल्या कवितेतील भाव बघून काढून टाकली आणि त्याचा वेगळा धागा केला. एवढ्या सुंदर आणि रम्य भावनांच्या जाणिवेत मला उद्वेगाचे बोल नाही टाकावेसे वाटले.

डावखुरा's picture

24 Nov 2010 - 10:57 pm | डावखुरा

अरुतै अतिउत्तम अनुवाद आणि परिचय...
बस जास्त नाही बोलत..एक चांगल्या कवयित्रीशी ओळख करुन दिल्याबद्दल आभार...
धन्यु..

अरुंधती's picture

25 Nov 2010 - 7:58 pm | अरुंधती

जयंत, ती सिगरेटवाली कविता ना? हो, ती कविता उद्वेगाचे बोल बोलते खरी! अमृताच्या ह्याच कौशल्याची मला दाद द्यावीशी वाटते. तिच्या रचना प्रामाणिक असतात. मनाला भिडणार्‍या, कधी अंगावर काटा आणणार्‍या तर कधी मुलायम अनुभूती देणार्‍या.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

लालसा.... जमलं तर अमृताच्या इतर रचनाही जरूर वाचा. प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-)

शुचि's picture

20 Mar 2013 - 7:00 am | शुचि

धागा वर आणते आहे.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

20 Mar 2013 - 7:54 am | मिसळलेला काव्यप्रेमी

शुचीतैला प्रचंड धन्यवाद...
अरुंधती __/\__!!

यशोधरा's picture

20 Mar 2013 - 8:50 am | यशोधरा

चांगलं लिहिलं आहे.
अमृता प्रीतम ह्यांच्या कवितांविषयी काय बोलावं! खामोशीकी इक नदी बहती है,ही अशीच एक नितांतसुंदर कविता आहे.

इनिगोय's picture

20 Mar 2013 - 9:19 am | इनिगोय

खोदकाम क्वीन शुचि, पुन्हा एकदा अ.आ. :)

अप्रतिम अनुवाद.. शेवटापर्यंत येता येता कविता इतकी उत्कट होत गेली आहे की क्या बात!

शुचि's picture

20 Mar 2013 - 6:19 pm | शुचि

हाहा खोदकाम क्वीन =))

अनन्न्या's picture

20 Mar 2013 - 6:59 pm | अनन्न्या

परत परत वाचावे असे काव्य! दोन तीन वेळा वाचले आणि लक्षात आले आपण प्रतिसाद दिलाच नाही. क्षमस्व! एवढ्या चांगल्या धाग्याला प्रतिसाद न दिल्याबद्दल!!

प्यारे१'s picture

20 Mar 2013 - 7:44 pm | प्यारे१

अप्रतिम....

बी कितीही चांगलं असलं तरी कसदार भूमीतूनच ते अधिक चांगल्या प्रकारे वाढू शकतं.
सत श्री अकाल!

कवितानागेश's picture

21 Mar 2013 - 12:56 am | कवितानागेश

गूढरम्य स्वप्न, उत्कट काव्य आणि अप्रतिम भावानुवाद.
धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद.
मन भरलं... :)

अरुंधतीताई: रत्न शोधून त्याला आणखी झळाळी आणलीत, बहोत खूब! (शुचीताई: उत्खननाबद्दल खास आभार!)

जगातल्या सर्वच महात्म्यांच्या/ महान स्त्रियांच्या माता-पित्यांना, आपल्या अद्वितीय मुलाला/मुलीला, for the greater good of humanity, असं आपल्यापासून सहज विलग करणं किती कठीण जात असेल? तरीही तसं करण्यात मनाचा किती मोठेपणा आणि किती मोठा त्याग असेल त्याची जाणीव झाली या खालच्या ओळी वाचल्यावरः

आणि तृप्ताने टेकविला माथा
आपल्या गर्भाचे ठायी
उमगले स्वप्नांचे मर्म मला
ना हा परका ना अपुला

कोणी मृत्युलोकीचा योगी
अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला
शेकत गर्भाची धुनी...

नि:संगपणा म्हणजे काय वेगळा असेल?