एक राजकारणी संत : समर्थ रामदास

पारा's picture
पारा in जनातलं, मनातलं
28 Oct 2010 - 4:23 pm

मी सध्याच काही आठवड्यांपूर्वी सज्जनगडावर गेलो होतो. तिथली एकूण शिस्त आणि व्यवस्था पाहून मी प्रभावित झालो. तिथल्या एका पुस्तकांच्या दुकानांतून मी हे पुस्तक निवडलं. 'एक राजकारणी संत : समर्थ रामदास'. हे पुस्तक म्हणजे एक व्याख्यानमाला आहे, रा. शं. वाळिंबे ह्याच्या ओघवत्या शैलीत. एकूण सात दिवस ही व्याख्यानमाला चालली, त्यात त्यांनी रामदासांच्या आयुष्यामधल्या अनेक पैलूंचं व्यवस्थित विवरण करून सांगितलं. हे पुस्तक वाचून मला ही पटलं की समर्थ रामदास खरोखर समर्थ का आहेत ते. आणि ते इतर संतमंडळींपासून कसे पूर्णतया वेगळे ठरतात.

वाळिंबे यांनी आपल्या रसपूर्ण भाषेत, रामदासांची इतर पंथांशी तुलना केली आहे, आणि तत्कालीन समाजाच्या मनाचा मागोवा घेताना इतर म्हणजेच, वारकरी, महानुभाव सारख्या पंथांवर आपली मतं पण दिलेली आहेत. तसे करताना त्यांनी कुठल्याही पंथाला कमीपणा येईल अशी किंवा कुठल्याही प्रकारची अपमानजनक भाषा वापरलेली नाही हे विशेष. त्यांनी अनेकविध अंगांनी रामदासी पंथ हा कसा वेगळा ह्याचे स्पष्टीकरण देताना, त्यांचे श्रेष्ठत्व अधोरेखित केलेले आहे.

एक महत्वाचे अवलोकन म्हणजे, तत्कालीन समाजात उदयाला आणि भरभराटीला आलेल्या पंथांनी माणसाला परमार्थाचे महत्व पटवून देताना थोड्या फार प्रमाणांत, प्रपंचाविषयी उदासीन केले. माणसाला सर्वसंग परित्याग करून मोक्षाच्या वाटेला लावले. ह्या उपदेशांची कारण मीमांसा लेखकांनी केली आहे. तत्कालीन समाज हा परवशतेच्या जोखडाखाली पिचत पडलेला होता, त्याचा आत्मविश्वास मोडला होता. अश्या प्रसंगी, कविमनाच्या संतांनी जो उपदेश केलं तो प्राप्त परिस्थितीस अनुकूल असाच होता, परंतु रामदासांनी मात्र ह्या दुर्दैवी घडीला न जुमानता, आपला पंथ सुरु केला. त्यांनी सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात प्रपंचाविषयी परत ओढ निर्माण केली, तसे करताना त्यांनी रामनामाची आणि हरीकथेच्या उदघोषाची गरजही विदित केली आहे.

लग्नाच्या बोहल्यावरून पळून गेलेली व्यक्ती सतत १२ वर्षे तपश्चर्या करते, जीवनाचा उद्देश समजून घेते, आणि परत प्रपंचात येऊन, सर्वसामान्यांसाठी महान असं साहित्य लिहून जाते, ही गोष्टच अपूर्व आहे. तपश्चर्या केल्यानंतरही रामदास कधीही आत्मकेंद्रित होत नाहीत, मोक्षाच्या मागे पळत नाहीत. किंबहुना आपल्या सामर्थ्याचा सदुपयोग ते समाजाच्या उत्थानासाठी करतात. ह्या त्यांच्या प्रयत्नांना लेखकाने आपल्याला लेखणीतून मानाचा मुजरा दिलेला आहे.

लेखकाने प्रस्तुत व्याख्यानमालेत, रामदासांच्या कार्याचे विभागवार वर्गीकरण करून, त्यांच्याच ओव्या आणि पदांच्या सहाय्याने त्यांच्या कार्याचे, उद्देशाचे स्पष्टीकरण दिलेले आहे. ही व्याख्यानमाला इसवी सन १९८२ मध्ये झाली. त्यामुळे त्या वेळच्या सौंदर्यपूर्ण मराठीचा अविष्कार त्यांच्या ओघवत्या वाणीत ठिकठिकाणी प्रतीत होतो. ही व्याख्यानमाला वाचून मला त्यांच्या कार्याविषयी अतोनात कुतूहल निर्माण झाले हे खरे, आता जसा वेळ मिळेल तसा त्यांच्या वर लिहिलेले साहित्य वाचून काढायचा माझा मानस आहे.

धर्मभाषावाङ्मयइतिहाससमाजजीवनमानतंत्रराजकारणलेखसल्लासमीक्षा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

28 Oct 2010 - 4:26 pm | यशोधरा

पुस्तकाच्या माहितीबद्दल धन्यवाद. मिळवायचा प्रयत्न करेन. इतरत्र दुकानांत मिळते का बघायला हवे.

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Oct 2010 - 4:28 pm | बिपिन कार्यकर्ते

उत्तम परिचय. सर्वसामान्यांना सहज जमेल अशी साधना सांगणार्‍या थोर सत्पुरूषाबद्दल लिहिलेल्या पुस्तकाचा परिचय आवडला.

विकास's picture

28 Oct 2010 - 4:35 pm | विकास

पुस्तक चांगलेच आहे. कधीकाळी वाचलेले देखील होते. आठवण करून दिलीत तसेच येथे परीचय दिल्याबद्दल धन्यवाद. :-)

पैसा's picture

28 Oct 2010 - 10:23 pm | पैसा

+१

स्वाती२'s picture

28 Oct 2010 - 7:37 pm | स्वाती२

छान परिचय!

पुस्तकाच्या माहितीबद्दल धन्यवाद. मिळवायचा प्रयत्न करेन. सज्जनगडावर जायला पाहिजे.

अर्धवटराव's picture

28 Oct 2010 - 9:26 pm | अर्धवटराव

पुस्तक परिचय तर छान करुन दिलात सर. आता रसग्रहण देखील होउन जाउ दे. इतक्यात तरी सज्जनगडावर जाण्याचा योग नाहि :(

(समर्थभक्त) अर्धवटराव

प्राजु's picture

28 Oct 2010 - 9:37 pm | प्राजु

उत्तम परिचय!! समर्थ रामदासांवरचे आपले लेखन अजूनही यावे . :)

पाषाणभेद's picture

28 Oct 2010 - 10:33 pm | पाषाणभेद

जय जय रघूवीर समर्थ!

अविनाशकुलकर्णी's picture

28 Oct 2010 - 10:59 pm | अविनाशकुलकर्णी

रामदास मुगलांचे हेर होते असे कोकाटे प्रभुतिंचे म्हणणे आहे

अपूर्व कात्रे's picture

28 Oct 2010 - 11:28 pm | अपूर्व कात्रे

वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे, उपलब्ध साहित्याची चिकित्सा करून आणि सारासार विवेक वापरून आपले मत बनवणारा माणूसच ज्ञानोपासक होऊ शकतो. सुज्ञास अधिक सांगणे न लगे.

विकास's picture

29 Oct 2010 - 1:24 am | विकास

उद्या कोकाटे हे पाकीस्तानचे हेर आहेत असे म्हणणारे निघतील, म्हणून काय आपण लगेच विश्वास ठेवायचा का? ;)

अपूर्व कात्रे's picture

28 Oct 2010 - 11:30 pm | अपूर्व कात्रे

समर्थांचा हा पैलू "चिंता करितो विश्वाची" याही पुस्तकामध्ये चर्चिला गेला आहे. आपण वाचलेल्या वरील पुस्तकातील विचार वाचण्यास उत्सुक आहे.

प्रशु's picture

29 Oct 2010 - 2:26 am | प्रशु

पुस्तकाचे माहित नाही, पण गेल्या वर्षी दिवाळीत सज्जनगडावर जाण्याचा उत्त्म योग आला. नेमकी वेळ संध्याकाळ्ची होती, आम्ही समर्थांचा समाधी समोर बसलो होतो आणि नेमका तिथली संध्याकाळ्ची करुणाष्टके सुरु झाली. खुप सुंदर आणी खुप विलक्षण वाटुन गेले त्या क्षणी...

प्रशु's picture

29 Oct 2010 - 2:26 am | प्रशु

पुस्तकाचे माहित नाही, पण गेल्या वर्षी दिवाळीत सज्जनगडावर जाण्याचा उत्त्म योग आला. नेमकी वेळ संध्याकाळ्ची होती, आम्ही समर्थांचा समाधी समोर बसलो होतो आणि नेमका तिथली संध्याकाळ्ची करुणाष्टके सुरु झाली. खुप सुंदर आणी खुप विलक्षण वाटुन गेले त्या क्षणी...

पुस्तकाची माहिती छान दिली आहेत. आता पुस्तक मिळवण्याचा प्रयत्न करतो.

पिंगू's picture

29 Oct 2010 - 10:48 am | पिंगू

एका उत्तम पुस्तकाचा परिचय करुन दिल्याबद्दल धन्यवाद... मी पण हे पुस्तक मिळवून वाचेन म्हणतो.
बाकी कोकाटे प्रभृती बरीच कोत्या प्रवृत्तीची आहे. हे त्यांचे इतर लिखाण वाचून कळून येते. पण असो तो भाग अलहीदा.

- पिंगू

विंजिनेर's picture

29 Oct 2010 - 12:20 pm | विंजिनेर

पण ते शिर्षकात "राजकारणी" असं का म्हटलंय?

पारा's picture

29 Oct 2010 - 1:00 pm | पारा

कारण त्या पुस्तकात, राजकारणाची तत्वे आणि राजकारणी व्यक्तीची मूल्ये विविध प्रकरणांमध्ये सांगितली आहेत.