’वि.वा.’ कुसुमाग्रज - एक अवलोकन

देवदत्त's picture
देवदत्त in जनातलं, मनातलं
19 May 2008 - 3:21 am

नाही, हे कुसुमाग्रजांच्या लिखाणाचे किंवा त्यांच्या कवितांचे अवलोकन नाही, तर त्यांच्या कवितांवर जो एक संच काढला आहे त्याचे अवलोकन आहे.

महाराष्ट्र टाईम्स व टाईम्स म्युझिक ह्यांनी सादर केलेला "’वि.वा’ कुसुमाग्रज" हा संच मी मागवला. विचार केला एरवी कविता वाचणे जास्त होत नाही. गाणी/कथा ऐकण्याची सवय आहे तर ह्याचा फायदा करून घ्यावा. नोंदणी करून ठेवली. ३० एप्रिलला मला दिल्लीहून फोन आला तुमची ऑर्डर नक्की करण्याकरीता हा फोन आहे. तुम्हाला २५०+२५ रू.द्यावे लागतील. जर कॅश ऑन डिलिवरी पाहिजे असेल आणखी २० रू. म्हणजे एकूण २९५ रू. मी विचारले 'असे तुम्ही जाहिरातीत का नाही लिहिले?' मला काही उत्तर नाही मिळाले. तिने पत्ता विचारला तेवढयात फोन बंद झाला. तरी दुसर्‍या दिवशी त्यांचा पुन्हा फोन आला तेव्हा मी ती नोंदणी नक्की केली.

आता मंगळवारी घरी तो संच पोहोचवण्यात आला. कार्यालयातून घरी आल्यावर पाहिले ते पाकिट. ह्या टाईम्स वाल्यांचे CD पाठवणे मला आवडते. चांगली बांधणी असते सामानाची. उघडून पाहिले तर दोन ऑडीयो सीडी व एक व्हिडीओ सीडी प्लॅस्टीक मध्ये घालून तीन कप्प्यात लावून दिल्या आहेत. ह्म्म.. थोडा हिरमोड झाला, कारण टाईम्स वरील विश्वास पूर्ण सार्थ नाही झाला. जाऊ द्या, आज काल पैसे वाचवण्याकरीता सर्वच कंपन्या काही ना काही करत आहेत.

तर काय काय आहे ह्या संचामध्ये?
सुरूवातीला कुसुमाग्रजांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्काराचे प्रमाणपत्र दिले आहे. पुढील पानावर कुसुमाग्रजांबद्दल गुलजार ह्यांचे शब्द, कुसुमाग्रजांना मिळालेले पद्मभूषण सम्मानपत्र आणि सर्वांत आत सीडी.

सीडी १
कुसुमाग्रजांच्या कविता त्यांच्याच आवाजात.
१. प्रस्तावना
२. मराठी माती
३. थेंब
४. पृथ्वीचे प्रेमगीत
५. पाऊल चिन्हे
६. जा जरा पूर्वेकडे
७. मार्ग
८. कोलंबसाचे गर्वगीत
९. नाते
१०. याचक
११. नाही (काही बोलायचे आहे..)
१२. तृणाचे पाते
१३. स्वप्नाची समाप्ती
१४. यौवन
१५. अहि-नकूल
१६. हा चंद्र
१७. म्हातारा म्हणतोय
१८. कोकिळा
१९. राजहंस माझा
२०. वार्ता
२१. काही छोट्या कविता
देणं
डाव
छंद
यमक दुष्काळी

सीडी २
कुसुमाग्रजांच्या कविता त्यांच्याच आवाजात.
१. मुलांसाठी कविता
श्रावण
आजोबांचे गाणे
ते म्हणतात (गवताचं पातं..)
२. क्रांतीचा जयजयकार
३. अखेर कमाई
४. प्रेमयोग श्रीकृष्णाचा
५. स्मृती
६. आगगाडी आणि जमीन
७. प्रेम म्हणजे
८. दिवे
९. प्रार्थना
१०. संत
११. येणं जाणं
१२. राजा आला
१३. शर्त
१४. झोपेन माताजी
१५. आनंदलोक
१६. गाभारा
१७. कणा

गुलजार ह्यांनी केलेला हिंदी अनुवाद त्यांच्याच आवाजात..
१८. रीढ (कणा)
१९. गर्भग्रह (गाभारा)
२०. रद्दी

शिरवाडकरांच्या कविता सर्वांनी वाचल्या असतील, त्यामुळे त्याबद्दल लिहिणे गरजेचे नाही असे वाटते.

व्हिडीओ सीडी मध्ये सोनाली कुलकर्णीने केलेले निवेदन आहे. शिरवाडकरांच्या साहित्याबद्दलची माहिती ह्यात सांगितली आहे. सोनाली कुलकर्णीच्या बोलण्याच्या शैलीत ते निवेदन फार चांगले वाटले.

पुढे आहे ’विश्वनाथ : एक शिंपी’ ह्या कुसुमाग्रजांच्या कथेचे लघुचित्रपटात केलेले रूपांतर. मुख्य कलाकार: निळू फुले, लीलाधर कांबळी व जनार्दन लवंगारे. निळू फुलेंनी आपल्या अभिनयाचा जोर दाखवलाच आहे. लीलाधर कांबळीचा सहअभिनय नेहमीप्रमाणेच प्रमाणशीर. जनार्दन लवंगारेंना मी फक्त नाटकांत व सह्याद्री दूरदर्शन वरील कार्यक्रमातच पाहिले होते. त्यांचा ह्या लघुपटातील प्रवेश छान आहे. एका गावातील शिंप्याच्या जीवनातील हे २२ मिनिटांचे चित्रीकरण त्याची परिस्थिती नेमके दाखवते व त्याची पुढील जिद्दही.

सर्वात शेवटी आहे, सचिन खेडेकरनी केलेले ’सतारीचे बोल’ ह्या कथेचे वाचन. आता ह्याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे वाचनच म्हणता येईल, कारण ते सादरीकरण मला तरी एवढे प्रभावी नाही वाटले. आता आपल्यासमोर पु.ल. देशपांडे, व. पु. काळे, द. मा. मिरासदार ह्यांचे कथाकथन समोर असल्याने सचिन खेडेकरचे ते कथाकथन कमी प्रतीचे वाटणे साहजिकच आहे, पण खरं तर सचिन खेडेकरचे पुस्तक पकडण्याची पद्धत, वाचताना समोर बघण्याची शैली आणि थोडा फार बोलण्याचा ढंग हे सर्व जरा खटकते. मध्ये तर एकदा पान उलटताना त्याने अशी नजर केली की लहान मुलांसमोर आपण जादूच्या पेटीतून काहीतरी खास वस्तू बाहेर काढतो आहे. अर्थात ’सतारीचे बोल’ ही कथा चांगली आहे. दिवसभरात वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे देत शेवटी दिवसाखेर सतारीचे बोल कानावर आल्यावर मास्तरांचे मनातील सारे दु:ख विरघळून जाते, हे ह्या कथेत सांगितले आहे.

ह्या संचाबद्दल महाराष्ट्र टाईम्स वर दिलेल्या जाहिरातीत त्यांनी लिहिले आहे की कुसुमाग्रजांच्या सगळ्या कविता त्यांच्याच आवाजात. हे थोडेसे दिशाभूल करणारे वाटते. कारण ह्यात एकूण ४३ कविता आहेत. 'कुसुमावली' ह्या संकेतस्थळावर त्यांच्या इतरही काही कविता आहेत. आता मी काही म्हणतोय कारण ह्या संचातील काही कविता तिथेही नाहीत. त्यामुळे कुसुमाग्रजांच्या एकूण कविता किती हे नक्की नाही, आणि ह्या संचात त्यांच्या सगळ्या कविता नाहीत.

असो, व्हिडीओ सीडी जरी नेहमी वापरात नाही आली तरी कुसुमाग्रजांच्या कविता त्यांच्याच आवाजात ऐकण्याकरीता ऑडीओ सीडी तर नेहमीच लावू शकतो. त्यामुळे एकंदरीत घरात ठेवायला पाहिजे असा संच आहे. आणि माझ्या मते थोड्या दिवसांत हा संच दुकानातही मिळू लागेलच.

(हाच लेख माझ्या अनुदिनीवरही वाचता येईल)

कलाकथाकवितावाङ्मयसाहित्यिकप्रकटनप्रतिसादआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

19 May 2008 - 8:04 am | विसोबा खेचर

दत्तरव,

कुसुमाग्रजांच्या ह्या संचाची अगदी उत्तम ओळख करून दिलीत. मलाही हा संच घ्यायचा आहे. आजच नोंदणी करतो...

धन्यवाद..

आपला,
(कुसुमाग्रजभक्त) तात्या.

प्राजु's picture

15 Jul 2008 - 1:56 am | प्राजु

खूप छान ओळख करून दिलीत. तात्या, माझ्यासाठीही ऑर्डर कराल का? मी तुम्हाला चेक पाठवण्याची व्यवस्था करते. तिकडे आले की घेईन तुमच्याकडून.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

15 Jul 2008 - 8:29 am | विसोबा खेचर

मी हा संच घेतला आहे, तुझ्याकरताही घेऊन ठेवीन. चेकची घाई नाही! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 May 2008 - 11:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवदत्ता,
अवलोकन आवडले !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वाती दिनेश's picture

19 May 2008 - 11:50 am | स्वाती दिनेश

ओळख आवडली,संचही आवडावा..घेईन म्हणते.
स्वाती

देवदत्त's picture

14 Jul 2008 - 10:58 pm | देवदत्त

:)
काल पुन्हा सतारीचे बोल फक्त ऐकले. तेव्हा नुसते ऐकण्यात जास्त चांगले वाटले.

आणि कोणी घेतला आहे का हा संच?

विकास's picture

15 Jul 2008 - 1:46 am | विकास

या माहीतीसाठी धन्यवाद. त्यांची स्वातंत्र्यदेवतेची विनवणी ही भारतीय स्वातंत्र्यास जेंव्हा ५० वर्षे झाली त्यावेळची संपूर्ण कविता जालावर उपलब्ध आहे का?

"पन्नाशीची उमर गाठीली, अभिवादन मज करू नका, मीच विनवते तुम्हा शेवटी वाट वाकडी धरू नका... " असे काहीसे त्याचे शब्द आहेत.