कर्तबगार स्त्री कलाकारांची ओळख करून देण्याचा हा आणखी एक प्रयत्न. मागच्या लेखात लुईज़ बूर्ज्वा या खट्याळ, बंडखोर स्त्रीविषयी सांगितलं होतं. यावेळी लुईजच्या अगदी उलट स्वभावाच्या, पण तितक्याच मनस्वी, धाडसी अशा एका स्त्रीची ओळख करून देत आहे.
पूर्व-पश्चिम जर्मनीच्या एकीकरणानंतर बर्लिनला कधी गेला असाल, आणि तिथल्या प्रेक्षणीय स्थळांचा फेरफटका केला असेल, तर कदाचित केट कोलविट्झशी आपली नकळत ओळख झालीही असेल. (Käthe Kollwitz - नीट जर्मन उच्चार माहीत नाही; चू.भू.द्या.घ्या.)
एकेकाळी पूर्व आणि पश्चिम बर्लिनला विभागणार्या ब्रँडेनबर्ग गेटकडे जाणार्या 'उंटर डेन लिंडेन' या हमरस्त्याच्या दोहो बाजूंना बर्लिनमधली अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत. 'न्यू गार्ड हाऊस' हे त्यांपैकीच एक. एकेकाळी जगाला प्रचंड विध्वंसाला सामोरं जायला भाग पाडणार्या जर्मनीनं युध्द आणि जुलमी सत्तेला बळी पडलेल्यांसाठी एक राष्ट्रीय स्मारक आता तिथं उभारलेलं आहे. एका अजस्र, पण रित्या खोलीमध्ये छपराला पाडलेल्या भल्यामोठ्या छिद्राखाली एक शिल्प फक्त ठेवलेलं आहे. आपल्या मृत मुलाला घट्ट कवटाळून बसलेली एक अभागी आई असं ते शिल्प आहे. एका असाहाय्य आईच्या वेदनेतून युध्दाकडे पाहायला लावणारं हे शिल्प त्या भल्यामोठ्या, भकास खोलीत अधिकच करुण, एकाकी दिसतं. कोणत्याही युध्दाला किंवा जुलमी सत्तेला जबाबदार असणार्या पुरुषी वर्चस्वाच्या कर्त्यांना आपण त्या क्षणापुरते विसरून जातो. त्यांच्या रेट्याखाली पिचणार्या अगणित स्त्रियांचे आक्रोश त्या भकास खोलीत घुमताहेत असं वाटतं. अशा वेळेला कोणालाही हेलावायला होणं अगदी साहजिक वाटतं. केट कोलविट्झ या शिल्पकर्तीशी पुष्कळ जणांची ही बहुधा पहिली ओळख असावी.
ज्यांना केटची खरी ओळख आहे, त्यांच्यासाठी मात्र हे शिल्प म्हणजे हिमनगाचा निव्वळ पृष्ठभाग आहे. हिमनगाशी ओळख करून घ्यायची असेल, तर थोडी वाट वाकडी करून बर्लिनमधल्याच केट कोलविट्झ संग्रहालयाला भेट द्यावी लागेल.
विविध काळात विविध दु:खं आणि संकटं सोसणार्या सर्वांना, म्हणजे अखिल मानवजातीलाच जिनं आपल्या करुणार्द्र मातृत्वाच्या अखंड झर्यातून जिवंत केलं अशी केट तिथं भेटते. शिल्पांखेरीज ड्रॉईंग, एचिंग, लिथोग्राफी, वूडकट अशा अनेक दृश्यमाध्यमांवरची तिची पकडही अचंबित करणारी आहे.
१८६७ साली केटचा जन्म झाला. ज्या काळात ती वाढली, त्या काळात स्त्रीनं 'करिअर' करणं हे समाजाच्या फारसं अंगवळणी पडलेलं नव्हतं. पण उदारमतवादी विचारांचे वडील आणि पती केटला लाभले. लहानपणी वडिलांनी तिच्यातली कला हेरून तिला कलाशिक्षण आणि प्रोत्साहन दिलं. लग्न करून देताना मात्र वडील म्हणाले, 'आता करिअर वगैरे विसरून जा. बायको आणि आई हेच आता तुझं आयुष्य.' केटचा नवरा डॉक्टर होता. बर्लिनच्या अत्यंत गरीब वस्तीत त्याचा दवाखाना आणि घर होतं. तिथल्या रुग्णांवर कमी खर्चात किंवा फुकटात वैद्यकीय उपचार करणं यातच त्याचा दिवस जाई. केटनंही त्या कामात त्याला मदत केली. त्यामुळेच समाजातल्या 'नाही रे' वर्गातली माणसं तिच्या संपर्कात आली आणि तिच्या कलेतही दिसू लागली. सर्वसामान्यांच्या आयुष्याकडे ती तिच्या नकळत खेचली गेली आणि मग सामान्य माणूस तिच्या कलेच्या केंद्रस्थानी आला.
१८४२ मधल्या विणकरांच्या अयशस्वी बंडावर आधारित एक नाटक केटनं पाहिलं. एमिल झोलाच्या 'जर्मिनाल' या सुप्रसिध्द कादंबरीतले खाण कामगारही तिला आधीपासून खुणावत होते. यातून निर्माण झालेली 'विणकर' ही एचिंग्ज आणि लिथोग्राफ्सची चित्रमालिका रसिकांचं लक्ष वेधून घेणारी ठरली.
विणकरांचा मोर्चा:
बंड अयशस्वी झाल्यानंतर आपल्या मृत सहकार्यांना वाहून नेणारे हे हताश विणकरः
ही मालिका नावाजली गेली. राष्ट्रीय कलाप्रदर्शनात सुवर्णपदकासाठी परीक्षकांनी तिची शिफारसही केली. पण कैसर विल्यमनं नापसंती दर्शवल्यानं केटला सुवर्णपदक मिळू शकलं नाही. एक स्त्री आणि त्यात पददलितांची तळी उचलणारी म्हणून नियतीनं तिच्या वाट्याला पुढे जे मांडून ठेवलं होतं त्याची ही चाहूल होती.
सोळाव्या शतकात घडलेल्या शेतकर्यांच्या बंडावरची तिची मालिकाही गाजली. नांगरणार्या शेतकर्याचं, त्याच्या कष्टांचं प्रभावी वर्णनः
याच मालिकेत 'बलात्कारिता' हे चित्र आहे:
बलात्कारितेचं शरीर धरतीमातेत मिसळून गेलेलं आहे. प्रत्यक्ष बलात्कारित स्त्रीचा दु:खी, पीडित चेहेरा दाखवण्याऐवजी माती, पालापाचोळा यांच्याशी एकजीव झालेल्या हताश शरीरातून केटनं बलात्काराच्या घणाघाताविषयी जे सूचित केलं आहे, ते विलक्षण ताकदीचं आहे.
आईच्या हृदयानं केटनं इतरांची हलाखी मांडली, पण तिचं आयुष्यही खडतरच जाणार होतं. तिचा मुलगा पहिल्या महायुध्दात मारला गेला. पुत्रवियोगातून केटचा पुढचा प्रवास युध्दविरोध आणि शांतताप्रेमी जगासाठी झटण्याकडे झाला. आपणच सुरू केलेल्या पहिल्या जागतिक महायुध्दात जर्मनी हरला होता. युध्दानंतर सर्वसामान्य जनतेची हलाखी आणखीच वाढली. तिचं प्रभावी चित्रण केटच्या पुढच्या कामात दिसलं. 'युध्द' आणि 'भूक' अशा तिच्या चित्रमालिका अतिशय गाजल्या. 'युध्द' मालिकेतलं हे एक चित्र - ‘युध्दाच्या विरोधात युध्द’:
'भूक' मालिकेतलं हे एक चित्रः
'अन्न!' (भित्तिचित्र):
'जर्मन मुलं भुकेली आहेत!' (भित्तिचित्र):
'युध्द पुन्हा कधीही नको' (भित्तिचित्र):
याच काळात युध्दाचं स्मारक म्हणून केटनं 'शोकमग्न पालक' ही शिल्पद्वयी साकारली:
हळूहळू केटला रसिकमान्यता मिळू लागली. १९१९ मध्ये प्रशिअन कला अकादमीची पहिली महिला सदस्य बनण्याचा बहुमान केटला मिळाला. प्रशिअन अकादमीच्या 'मास्टर स्टुडिओ'ची ती पुढे संचालक झाली.
हिटलर सत्तेवर आल्यावर मात्र हे सर्व संपलं. जर्मनांचा पाठिंबा मिळवण्यासाठी हिटलरनं त्याकाळच्या हलाखीच्या परिस्थितीचा फायदा घेतला; पण गरिबी, भूक यांचं चित्रण करणारी, युध्दाला विरोध करणारी केट हिटलरच्या पुढच्या आकांक्षांना सोयीची नव्हती. त्यानं अकादमीवरून तिची हकालपट्टी केली. त्यानंतर तिच्या कलाकृतींच्या जाहीर प्रदर्शनावर बंदी आली. हिटलरनं ज्यू, काळे, समलिंगी, अशा लोकांचा छळ केलाच, पण केटसारख्या जनतेच्या हितासाठी झटणार्या कलाकारांनाही छळलं. गोंडस, सोनेरी केसांची हसरी आर्यन मुलं, त्यांचे बलदंड बाप आणि कमनीय आया अशा 'शायनिंग जर्मनी'चं दर्शन घडवणारी कलाच फक्त हिटलरला मान्य होती.
उदाहरणादाखल 'युध्दावरून सुटीवर तात्पुरता घरी आलेला सैनिक' हे चित्र पाहा: जर्मन सैनिकांच्या वस्तुस्थितीची जाण असलेल्यांना हे पाहून मळमळायला होत असेल, असंच वाटतं!
त्याउलट सौम्य, शांतरसाचा वस्तुपाठ म्हणून दाखवता येईल असं केटनं साकारलेलं हे आई आणि मुलाचं चित्र पाहा:
किंवा हाताची घडी घालून बसलेली केटची ही गरोदर स्त्री पाहा:
साधेपणात जे सौंदर्य असतं त्याची केटच्या कलाकृतींत पदोपदी जाणीव होते.
एव्हाना केट ७० वर्षांची झाली होती. तिच्या सत्तरीच्या निमित्तानं तिच्या कलाकृतींचं प्रदर्शन घडवून आणण्याचे सर्व प्रयत्न नाझींनी अपयशी ठरवले. तरीही अखेरपर्यंत केट कार्यरत राहिली. नातू, नवरा, अनेक आप्तस्वकीय यांच्या मृत्यूचं दु:खही तिनं सोसलं. अखेर २२ एप्रिल १९४५ रोजी, म्हणजे दुसरं महायुध्द संपण्याच्या किंचित आधी केट मरण पावली.
अखिल मानवजातीविषयी वाटणारी कळकळ आणि व्यक्तिगत दु:खं सोसून आलेलं शहाणपण यांची सांगड घालून, उभा जन्म इतरांच्या हितासाठी लढण्यात खर्च केलेली ही स्त्री तिच्याच आत्मचित्रांतून इतकी साधी (आणि म्हणूनच) सुंदर दिसते की तिच्यापुढे कोणत्याही सुपरमॉडेलचा कचकड्याचा आव कोसळून पडेल!
केटचं आणखी काही काम “The Art that Hitler Hated" इथे पाहता येईल.
प्रतिक्रिया
16 Aug 2010 - 1:59 am | घाटावरचे भट
एका महान कलाकाराची सुंदर ओळख करून दिल्याबद्दल.
16 Aug 2010 - 3:01 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
17 Aug 2010 - 3:45 pm | केशवसुमार
(सहमत)केशवसुमार
16 Aug 2010 - 4:36 am | मुक्तसुनीत
एका महान कलाकाराची सुंदर ओळख करून दिल्याबद्दल आभार.
16 Aug 2010 - 3:11 pm | निखिल देशपांडे
असेच म्हणतो
16 Aug 2010 - 5:00 am | धनंजय
असेच म्हणतो. उत्तम कलाकाराची चांगली ओळख करून दिलेली आहे.
न्यू गार्ड हाऊस शिल्प मी बघितले, तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता. छतामधील भगदाडातून शिल्प भिजत होते. आई पावसापासून मुलाच्या शवाचे जमेल तितके रक्षण करत होती असे भासत होते. तिचे प्रयत्न व्यर्थ म्हटले तरी त्या माउलीची उदंड माया आणि कारुण्य जाणवत होते. त्या पावसात माय-लेक भिजत होते, पण आम्ही बघे मात्र कोरडे होतो, म्हणून अतिशय अपराधी भावना होत होती.
रात्र-संध्या-उन्ह अशा वेगवेगळ्या प्रसंगांत वेगवेगळ्या छटेच्या करुण भावना उद्भवतील, असा माझा कयास आहे. शिल्पाचा अभिभाज्य घटक या दृष्टीने आपण छतातल्या विवराकडे बघितले पाहिजे.
16 Aug 2010 - 3:21 pm | चिंतातुर जंतू
भावनिष्पत्तीत छतातल्या विवराच्या सक्रीय सहभागाविषयी आपण म्हणता ते योग्य आहे. पण तो केटच्या शिल्पाचा अविभाज्य घटक म्हणता येणार नाही, कारण केटनं शिल्प साकारताना वरच्या छताची (आणि विवराची) रचना केली नव्हती. केटच्या शिल्पाचा केंद्रस्थानी वापर करून उभारलेलं 'न्यू गार्ड हाऊस' हे एक मांडणीशिल्प (इन्स्टॉलेशन) आहे असं म्हणता येईल, पण त्याचा (कल्पक) निर्माता कुणीतरी वेगळा आहे; किंवा ही सहनिर्मिती आहे असंही म्हणता येईल. असो. मुसळधार पावसातला आपला अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद. असं होत असेल असं वाटत होतं, पण तसं प्रत्यक्ष म्हणणारं कुणी भेटलं नव्हतं. कलाकृतीच्या उत्कट परिणामासाठी अनेक बाह्य घटकही कसे उपयोगी पडतात, याचं 'न्यू गार्ड हाऊस' हे चांगलं उदाहरण ठरावं.
16 Aug 2010 - 7:04 am | सहज
समर्थ कलाकाराची सुंदर ओळख.
आपल्या मृत मुलाला कवटाळून आक्रोश करणार्या आईचे शिल्प आर्टजगतात बेस्ट असेलही. परंतु टिव्हीवर अफ्रीका, पॅलेस्टाईन येथील युद्ध, नरसंहारात बळी पडलेली काही खरी दृश्ये खरच कोरली गेली आहेत. उदाहरणार्थ
१) अल-दुर्रा येथे वडील व मुलगा. दोघे या गोळीबारात मृत्युमुखी पडले
२) हुदा घालीया तिचे सगळे कुटुंबीय बीचवर सहलीला आले असता स्फोटात बळी पडले

वरील दोन्ही प्रसंगाची प्रत्यक्ष चित्रफीत पाहीली असल्याने एका शिल्पापेक्षा ते जास्त प्रभावी वाटले आहे हेही खरेच. (अवांतर -एक म्हणजे इस्त्राईलने दोन्ही प्रसंगात आपण जबाबदार नसल्याचा दावा केला आहे. )
हाताची घडी घालून बसलेल्या गरोदर स्त्रीचे चित्र अतिशय जिवंत वाटले.
'शायनिंग जर्मनी' उपमा क्लासच!
१८६७ - १९४५ कालखंड म्हणावा तर अलिकडचा म्हणावा तर खूप जुना. ह्याच कालखंडात जगातील इतर देशात, भारतासकट कलेच्या क्षेत्रात जे विकास घडत गेले त्याचाही एक आढावा चिंतातूरजंतू यांनी घ्यावा अशी विनंती.
17 Aug 2010 - 12:00 am | चिंतातुर जंतू
खरं सांगायचं तर कलाक्षेत्रात एखादीच गोष्ट सर्वोत्तम असं काही नसतं. कुणीही तसं म्हणू लागलं (उदा. मोनालिसा हे जगातलं नं. १ चित्र वगैरे) तर खुशाल समजून चालावं की म्हणणार्याला फार काही कळत नाही. कारण ती काही १०० मीटर धावण्याची शर्यत नाही, की अगदी निमिषाच्या फरकांना मोजून आपण पहिलं कोण ते ठरवू शकू.
दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या काळात जगतो त्या काळातल्या गोष्टींचा आपल्यावर (सान्निध्यामुळे) अधिक उत्कट परिणाम होणं साहजिक आहे.
तिसरी (आणि आपल्या चर्चेच्या दृष्टीनं सर्वाधिक महत्त्वाची) गोष्ट म्हणजे आताच्या काळात माध्यमांनी आपल्या मनावर कळत-नकळत इतका कब्जा केलेला आहे की अनेक प्रतिमांमधल्या दृश्य घटकांकडे आपण विशुध्द मनानं पाहूच शकत नाही. आपण ज्यांची उदाहरणं दिली आहेत त्या प्रतिमा काहीशा तशा आहेत. इस्राएल-पॅलेस्टाईन संघर्षाच्या बाबतीत परदेशात असं अनेकदा जाणवतं की माध्यमांनी विशिष्ट प्रतिमांचा आणि कथनघटकांचा एकत्रित मारा करून वातावरणाचं इतकं ध्रुवीकरण केलेलं आहे की प्रत्यक्ष समस्येकडेही विशुध्द, तटस्थ नजरेनं पाहू शकणारे लोक फार थोडे आहेत.
असो. प्रतिमांकडे पाहताना त्यांच्या आजूबाजूच्या वास्तवाशी पूर्ण फारकत घेऊ नये; पण किंचित अंतर ठेवता आलं, तर प्रत्यक्ष प्रतिमेचं पृथक्करण आणि आस्वाद अधिक डोळसपणे घेता येईल, असं वाटतं.
17 Aug 2010 - 6:57 am | सहज
माझा मुद्दा त्या शिल्पाचे महत्व कमी न करता, मी वर उल्लेख केलेल्या दोन दृश्यांचे (माझ्या मनावर झालेले) तितकेच प्रभावी परीणाम सांगायचे होते. तुलना इ. अजिबात म्हणायचे नव्हते. अगदी चोख, मुद्देसुद शब्दात लिहणे ही एक कला आहे नक्की. वरचा चितांतूर जंतू यांचा प्रतिसाद हे त्याचे एक उत्तम उदाहरण
हे शिल्प ज्या मानवी भावनांचे दर्शन घडवते, युद्धाचा, सामान्यांवर विशेषता महीला, बालकांवर होणारा दुष्परिणाम, तो एका शिल्प, चित्र इ माध्यमातुन अनुभवायचा भाग वेगळा व प्रत्यक्ष तोच प्रसंग समोर घडायचा भाग वेगळा. माझा मुद्दा हाच की एका शिल्पातील सब्जेक्ट ए व बी (धातु, माती इ घटक नव्हे)बघुन जे वाटते त्यापेक्षा समोर त्या मुलाचा भेदरलेला व ओरडणारा चेहरा, एक हताश बाप दोघे प्रत्यक्ष व्यक्ती (धातु, मातीचे शिल्प नव्हे) समोर दिसतात तेव्हा निदान माझ्याकरता त्याहून जास्त प्रभावी कुठली कलाकृती नाही. आता इथे ती चित्रे देत नाही पण लहान मुलांचे हात कापलेले, कारण ती मोठी झाल्यावर हातात शस्त्रे घेउ नयेत, खेड्यातील सर्व आबालवृद्ध महीलांवर ..तसेच सर्व पुरुषांवर देखील.. शिवाय पाशवी हा शब्द देखील सामान्य वाटेल असे पुढे 'त्या अवयवांचे' विच्छेदन. आता माध्यमातुन हे सर्व खरेखुरे फोटो येत असल्याने, पुन्हा एका 'निर्जीव' शिल्पात हे सर्व पहायचे... माझा मुद्दा कळला असावा अशी अपेक्षा )

माध्यम, वाहीन्यांचा प्रभाव हेही खरेच. प्रत्यक्ष समस्येकडेही विशुध्द, तटस्थ नजरेनं पाहू शकणारे लोक फार थोडे आहेत. या विधानाशी सहमत आहे. मिपावर, उपक्रमावर काश्मिर संदर्भात चर्चा झाली त्यातील काही मुद्दे बर्याच जणांना एक वेगळी माहीती देउन गेले असे वाटते. आणि असे मुद्दे, असा दृष्टीकोन मांडणारे व लोकांना विचार करायला लावणारे लोक इथे आहेत म्हणुन कधीकधी इच्छा असुन मसंस्थळावरुन जावेसे वाटत नाही. :-)
प्रतिमांकडे पाहताना त्यांच्या आजूबाजूच्या वास्तवाशी पूर्ण फारकत घेऊ नये; पण किंचित अंतर ठेवता आलं, तर प्रत्यक्ष प्रतिमेचं पृथक्करण आणि आस्वाद अधिक डोळसपणे घेता येईल, असं वाटतं.
पुन्हा एकदा सहमत आहे.
असे लिहते रहा.
धन्यु.
(दुरुस्ती - अल दुर्रा येथील गोळीबारात अडकलेल्या बाप-लेकातील, फक्त मुलगा गेला. वडील वाचले असे एका दुव्यात दिसले. वरील प्रसंगातील या दृश्यांवर आधारीत दोन पोस्टल स्टँप्स टुनिशीया व जॉर्डन या दोन देशांनी बनवले.)
17 Aug 2010 - 3:26 pm | चिंतातुर जंतू
आपला मुद्दा कळला, पण त्यात एका सनातन मुद्द्याला स्पर्श झालेला आहे, त्यासाठी हा (प्रश्न उपस्थित करणारा) प्रतिसाद.
या मुद्द्याच्या गाभ्याशी जायचं झालं तर असा प्रश्न विचारावा लागेल की जेव्हा वास्तव माझ्या समोर आहे तेव्हा मी त्याची कल्पित प्रतिमा का पाहावी? त्याला खूप वेगवेगळे पैलू आहेत. जसे:
जर मला काश्मीरविषयी ताज्या बातम्या आणि काश्मीरच्या इतिहासाविषयी पुस्तकं उपलब्ध आहेत, तर मग मी सलमान रश्दीची 'शालिमार द क्लाऊन' ही कादंबरी का वाचावी?
ज्यानं युध्द प्रत्यक्ष अनुभवलं आहे अशा सैनिकाला युध्दावर आधारित कादंबर्या किंवा चित्रपट मिळमिळीत वाटतील का?
जर छायाचित्रं काढता येतात, तर मग चित्रं का काढायची/पाहायची? - या मुद्द्यात इंप्रेशनिझमचा उगम आहे. तोवर निर्माण होणार्या पाश्चिमात्य चित्रकलेत वास्तवाचं यथार्थ चित्रण करण्यावर भर होता. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस छायाचित्रणतंत्र उपलब्ध झाल्यावर असा प्रश्न उपस्थित झाला होता. इंप्रेशनिस्टांनी आपल्या चित्रांद्वारे त्याला उत्तर दिलं.
असे अनेक प्रश्न विचारता येतील. त्यांचा मूळ रोख हा 'कथनात्मक' वा 'काल्पनिक' कलाकृतींवर असेल. मग त्यात चित्रं, शिल्पं, नाटकं, कादंबर्या, चित्रपट यासारखे सर्व घटक बाद आहेत का असं विचारता येईल. या दिशेनं विचार केलात तर काय सापडतंय ते पाहा.
17 Aug 2010 - 4:28 pm | सहज
> या दिशेनं विचार केलात तर काय सापडतंय ते पाहा.
जग मिथ्या आहे ;-)
नाही तो सनातन प्रश्न इथे उपस्थित न व्हावा. कारण साहीत्य, कला इ माणसाचे जीवन समृद्ध करतात ह्यावर माझा विश्वास आहे. कोठल्याही कलाकृतीविषयी मत असु शकते, नावड असु शकते पण बंदी शक्यतो नसावी असेच माझे मत आहे. माझा मुद्दा फक्त तो फोटो/व्हिडीओ क्लीप समोर ठेवली व ते शिल्प तर माझ्यावर होणारा प्रभावी परिणाम कोणता ते सांगीतले. शिल्प नसावे असा मुद्दा मी मांडला नाही तसे वाटल्यास तो माझा लेखनदोष समजावा. व हा खुलासा ग्राह्य धरावा.
ज्यानं युध्द प्रत्यक्ष अनुभवलं आहे अशा सैनिकाला युध्दावर आधारित कादंबर्या किंवा चित्रपट मिळमिळीत वाटतील का?
अगदी हाच मुद्दा मला लिहायचा होता. खरच याचे उत्तर काय? युद्धातील वाईट प्रसंगांबद्दल सैनीकांची काय प्रतिक्रिया असते? किंवा महायुद्धात भाग घेतलेल्या सैनीकाला वरचे शिल्प पाहून नेमके काय वाटेल? एक अंदाज असा लावता येईल की त्यांचे मेंटल कंडीशनींग झाले असेल. गुन्हेगाराची केस लढून उपजीवीका करणार्या वकीलाला हा आपला पेशा आहे यात गैर काही नाही असेच वाटत असणार.
17 Aug 2010 - 11:38 pm | चिंतातुर जंतू
यात अनेक शक्यता आहेत:
या चारपैकी दोन शक्यतांमध्ये शिल्पामुळे काहीतरी परिणाम झाला असं म्हणता येईल.
16 Aug 2010 - 8:17 am | मदनबाण
जंतूराव या महान कलाकाराची इतकी सुंदर ओळख करुन दिल्या बद्धल आभारी आहे.
सर्वच चित्रे फार प्रभावी वाटली.
16 Aug 2010 - 10:30 am | ऋषिकेश
या उत्तम परिचयाबद्दल अनेक आभार!! सुटीवर आलेल्या सैनिकाचं चित्र हळवं करणारं आहे हे खरंच
16 Aug 2010 - 10:37 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
'न्यू गार्ड हाऊस' मधे मधल्या शिल्पाच्या डोक्यावर छपराला भोक आहे; ही अशी पेगन देवळांची पद्धत होती असं मी ऐकलं आहे. बर्लिनमधे जाऊनही 'न्यू गार्ड हाऊस' पाहिलं नाही ही माझी मोठी चूक होती असं वाटत आहे.
पुन्हा एकदा उत्तम परिचयाबद्दल आभार.
16 Aug 2010 - 11:05 am | राजेश घासकडवी
हा लेख तीन वर्षांपूर्वी वाचायला मिळाला असता तर बरं झालं असतं. 'उंटर डेन लिंडेन' वर मी दोनदा चाललो... पण या कलाकाराची ओळख व्हायची राहिलीच.
बलात्काराच्या चित्राने मला प्रचंड भारावून टाकलं. जमिनीवर उगवलेली पाऩं आणि फुलं (पायांच्या मधली कोमेजलेली) कोमल भावनांचं रूपक आहेत, तर भोवतालच्या भिंतीवरची राक्षसी, भीषण वाटतात.
भुकेकंगाल जर्मनीचं चित्रण मी कधीच बघितलं नव्हतं. पहिल्या महायुद्धानंतर अर्थातच सत्य परिस्थिती ती असणार - लहान मुलांच्या हातातल्या वाडग्यांइतक्याच पसरलेल्या त्यांच्या डोळ्यांतून ती प्रतीत होते. हिटलरने हे सत्य झाकून जे स्वप्न उभं केलं, त्यात ही वाडगी पसरणारेच कितीतरी त्याच्या साम्राज्यवादी वडवानलात जळून खाक झाले असतील हे अधिकच करुण.
विणकरांचा मोर्चा असफल झाल्यानंतर झुकलेले खांदे पराभवापलिकडचं काही सांगून जातात.
धन्यवाद.
16 Aug 2010 - 11:08 am | नंदन
ह्या सुरेख परिचयाबद्दल मनःपूर्वक आभार. 'न्यू गार्ड हाऊस'मधल्या शिल्पावरून मागे प्रदीप यांनी पाठवलेल्या बातमीतील चित्र आठवले (दुवा)
16 Aug 2010 - 3:16 pm | परिकथेतील राजकुमार
सुरेख परिचय.
मागच्या लेखाप्रमाणेच हा देखील अप्रतिम. धन्यवाद.
वाचनखुण कशी साठवायची कोणी सांगु शकेल काय ?
16 Aug 2010 - 6:24 pm | बिपिन कार्यकर्ते
श्री. जंतु, परत एकदा मनापासून आभार. माझे अनुभव विश्व इतके समृद्ध करता आहात तुम्ही. त्याबद्दल.
मला स्वतःला सगळ्यात जास्त परिणामकारक वाटले ते 'अन्न' ... आणि मुलाच्या प्रेताला कवटाळून एका प्रचंड रिकाम्या पोकळीत बसलेली आई. पटकन स्क्रोल डाऊन केला लेख त्या जागी.
16 Aug 2010 - 7:22 pm | सुनील
चांगली ओळख करून दिली आहे ह्या महान कलाकाराची.
सहजरावांनी दिलेली चित्रेही हृदयद्रावक.
17 Aug 2010 - 1:50 am | चतुरंग
ह्या महान कलाकाराचा परिचय करुन दिल्याबद्दल धन्यवाद!
चित्रे खरंच उच्च आहेत. त्यात एक प्रकारची वेदना ठासून भरलेली आहे.
सहकार्याचे प्रेत उचलून नेणारे विणकर ज्याप्रकारे दाखवले आहेत त्यातून हताशपणा, असहायता, हार हे सगळे ठिबकते आहे!
शेत नांगरणार्या कष्टकर्याचे शरीर जमिनीला ज्या कोनात दाखवले आहे त्यातून त्याची उरस्फोड दिसते, त्याच्या मानेचे ताणलेले स्नायू, डावा खांदा आणि दोन्ही पोटर्या ज्याप्रकारे हायलाईट झाल्या आहेत त्यावरुन त्यातला ताण नजरेला जाणवतो.
मुलांचे हाल मला बघवतच नाहीत, कधीच नाहीत त्यामुळे ती चित्रे पाहून ढवळले पोटात, भीषण वास्तव आहे! :(
फिकुटलेल्या चेहेर्याची गरोदर स्त्री ही येणार्या बाळाच्या चाहुलीने आनंदित होण्याऐवजी त्याचे संगोपन कसे करायचे आणि पुढे त्याचे कसे होणार ह्या चिंतेने ग्रासलेली बरोब्बर दिसते आहे.
केटमधल्या कलाकारावर कनवाळू मातेचे विचार जास्त प्रभाव टाकतात असे दिसते आणि तिचा मुलगा महायुद्धात मारला गेल्याची पार्श्वभूमी त्याचे कारण स्पष्ट करुन जाते.
चतुरंग