एक बागायतदार होता. एका वर्षी पावसाने झोडपून काढल्याने त्याच्या घरासामोरील एका बागेचे फार नुकसान झाले. त्यामुळे तो बागायतदार फार दु:खी झाला. अनेक वर्षे त्याने स्वतः नवनवीन रोपटी आणून, कलमं करून, खतपाणी घालून ती बाग फुलवली होती. आता आपण परत काही ती बाग फुलवायची नाही असे त्याने ठरवले. पुन्हा असा पाऊस झाला तर पुन्हा असे दु:ख आपल्याला सोसवेल की नाही अशी त्याला चिंता वाटत होती. वर्षभरात त्या बागेतल्या काही रोपट्यांनी आपोआप माना वर केल्या. तग धरून राहिलेली रोपटी पुन्हा तरतरून आली. पण त्या बागेत रान माजल्यासारखे दिसत होते. बागेची काळजी घ्यायला कोणी नव्हते. त्या झाडाझुडपांच्या गर्दीला बाग म्हणावे असे काही खास उरले नव्हते. एक दिवस बागायतदाराला त्या दाटीवाटीत एक लाजाळूचे रोप दिसले. त्याच्या मनाला एकदम उभारी आली. आपण ह्या जागेत पुन्हा बाग फुलवुया असे त्याला वाटू लागले. पण आता त्याच्या अंगात इतके बळ नव्हते. नशिबाने त्यांना एक माळी भेटला, जो आनंदाने ह्या कामासाठी तयार झाला. तो इतर बागेंत बागकाम करून आपली गुजराण करत असे. परंतु ह्या कामाच्या मोबदल्यात त्याने काही मागितले नाही. बागेतून फुले नेण्याकरता त्याला कोणी मनाई करणार नाही ही एकच अट माळ्याने घातली. बागायतदाराने ते मान्य केले आणि माळी त्याच्या कामाला लागला. त्याचसोबत बागायतदाराने त्याला दोन वेळचे जेवण लाऊन दिले.
माळ्याने बागेतील सारे तण आधी काढून टाकले. बागेतली वाळवी त्याने नष्ट केली. बागेत साफसफाई केली. जमीनीची मशागत केली. बागायतदाराकडून त्याने वेगवेगळी रोपटी, कलमे आणली. प्रत्येक झाडा-झुडपाला पुरेसा सूर्यप्रकाश, खत-पाणी मिळेल अश्याप्रकारे त्याने रोपांची बागेत लागवड केली. दररोज माळी बागेत खपू लागला. सहा-आठ महिन्यात बागेचे रूप पालटले. जुन्या खोडांना पालवी फुटून त्यातली काही झाडे पाना-फुलांनी सळसळू लागली. जांभळी, गुलाबी, लाल, पिवळी, पांढरी, चार पाकळ्यांची, पाच पाकळ्यांची, गोंडेदार, गुच्छाने येणारी, पानांच्या आडून येणारी, लांब देठांची, करंगळीच्या नखाएवढी ते ओंजळभर फुलणारी, विविधरंगी, वेगवेगळ्या गंधाची अशी अनेक फुले त्या बागेत फुलून आली. बागेत लहान मोठे पक्षी येऊ लागले. बागेच्या मधोमध माळ्याने लाजाळूचे झाड होते तसे वाढू दिले. फावल्या क्षणांत माळी कौतुकाने बागेकडे पाहत असे. दररोज तो एक फूल घेऊन जाई. त्याने कोणत्याही दिवशी कधीही एकापेक्षा जास्त फूल नेले नाही.
बागायतदारालाही पुन्हा बागेचा लळा लागला. त्याला माळी राबतो किंवा फूल नेतो या गोष्टींची फारशी किंमत नव्हती. बागेसाठी जे लागेल ते तो देत होता. बाग पुन्हा फुलली ह्यात त्याला आनंद होता. मोठ्या कौतुकाने तो आपली बाग इतरांना दाखवत असे. बागेला घुशी, जनावरे इ. चा उपद्रव होऊ नये म्हणून त्याने बागेभोवती तारेचे , काटेरी जाळीचे कुंपण घालून घेतले. बागेतील लाजाळूचे झाड त्याचे सर्वात आवडते होते. पावसाळा जवळ येऊ लागला तसा बागायतदार चिंतेत पडला. आपल्या बागेची ह्यावेळी आपण नीट काळजी घ्यायला हवी असे त्याने ठरवले. एक पाऊस पडून गेला आणि बागेतील लाजाळूला छानशी गुलाबी गोंडेदार फुले आली. बागायतदाराला ती फुले पाहून खूप आनंद झाला. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी तो आता बागेत फिरू लागला. तिथल्या फुलांना पाहत बसायचे, हिरवळीवरून फिरायचे हा त्याच्या दिनक्रमाचाच भाग होऊन बसला.
माळीदेखील बागेकडे पाहून मनोमन समाधानी झाला. तो आलटून पालटून एक दोन दिवसांआड लाजाळूचे फूल नेऊ लागला. लाजाळू आणखी फुलत गेले. काही दिवसांनी बागायतदाराच्या लक्षात आले की लाजाळूची फुले कोणीतरी खुडून नेत आहे. माळी फुले नेतो ह्याचा त्याला विसर पडला. कोणीतरी बागेतील फुले चोरतो असे बागायतदारास वाटले. आठवड्याभरात बागायतदाराने हे प्रकरण मनावर घेतले. त्याने लाजाळूभोवती तारांचे ऊंच कुंपण घातले. माळ्याला कुंपण दिसताच त्याने बागायतदाराला कुंपण काढण्याची विनंती केली. परंतु बागायतदार काहीही ऐकण्यास तयार नव्हता. माळ्याने बागायतदाराला कारण विचारले आणि आपण फुले नेतो त्या अटीची आठवणही करून दिली. परंतू बागायतदार आपल्या निर्णयावर ठाम होता. त्याने माळ्याला लाजाळूसोडून बाकी कोणतेही फूल घेऊन जा असे सांगितले. माळी खिन्न झाला. त्याने बागेची कामे चालू ठेवली. पण लाजाळूभोवतीचे कुंपण पाहून तो फार हळहळत असे. असे काही दिवस गेले.
अचानक एका सकाळी , बागेवरती झापांचे छत उभारलेले माळ्याने पाहिले. ते पाहताच त्याने बागायतदाराकडे धाव घेतली. जास्त पाऊस झाला तर बाग झोडपली जाऊ नये म्हणून बागायतदाराने आदल्या संध्याकाळी बांबूचे खांब वगैरे लाऊन घेऊन छत उभारल्याचे सांगितले. अश्याने झाडांना पुरेसे ऊन, वारा मिळणार नाही याची माळ्याने बागायतदाराला कल्पना दिली. परंतू बागायतदार आपल्या म्हणण्यावर ठाम होता. गेल्या पावसाळ्यात बागेला बसलेला तडाखा त्याच्या अजून लक्षात होता. बरीच चर्चा झाल्यावर अखेर माळ्याने न ऐकल्यास त्याला बागेत येण्यास मनाई करू असे बागायतदाराने सांगितले. माळी हतबल होऊन बागेत परतला. त्याचं बागकाम त्याने चालू ठेवलं. बागायतदार आता निश्चिंत झाला.
दिवसागणिक बागेतली फुलं कमी होऊ लागली. पक्षी येईनासे झाले. छतामुळे रोपांना पुरेसे ऊन मिळेनासे झाले. रोपे मलूल होऊ लागली. माळ्याने पुन्हा बागायतदाराला परिस्थितीची कल्पना दिली परंतु बागायतदाराने त्याचे म्हणणे ऐकले नाही. बागेला आलेली मरगळ पाहून माळी हताश झाला. तिकडे बागेची अवस्था पाहून बागायतदार चिंतेत पडला. माळी एकापेक्षा जास्ती फुले नेत असावा असे त्याला वाटू लागले. माळी बागेची काळजी नीट घेत नाही असे सांगून बागायतदाराने त्याचे एकवेळचे जेवण बंद केले. तरीही माळी आपले काम करत राहिला. लाजाळूचे रोपटे आता सुकू लागले होते. बागेच्या मध्यावर असल्याने आणि छतामुळे त्याला पुरेचा सूर्यप्रकाश मिळत नव्हता. त्यात कुंपणामुळे त्याची वाढ खुंटली होती. अखेर बागायतदाराने आपला राग माळ्यावर काढला. बागेतली फुले माळी चोरतो असा आरोप केला आणि त्याने माळ्याला कामावरून काढून टाकले. बागेत लाजाळूचे रोपटे नीट वाढत नाही हे पाहून बागायतदाराने ते मूळासाकट उपटून कुंडीत लावले आणि तो ते आपल्या घरी घेऊन आला.
माळी दु:खीकष्टी मनाने देवळात जाऊन बसला. तरीही नेहमीप्रमाणे त्याने देवापुढे सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली पण आज त्याच्याकडे देवाला वहायला फूल नव्हते.
प्रतिक्रिया
27 Jun 2009 - 4:53 pm | अनंता
पडतोय प्रकाश डोक्यात जरा जरा. वरकरणी माळ्याची भूमिका जरी तर्कसंगत वाटत असली , तरीही बागायतदाराने बागेसाठी तन, मन व धन खर्ची केले आहे हे विसरता कामा नये. विशेषत: पूर्वीचा कटू अनुभव गाठीला असताना, गतवर्षींच्या चुकांपासून धडा घेणे हे मालकाकडून अपेक्षितच होते.
एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)
27 Jun 2009 - 5:10 pm | वेताळ
प्रभु तुम्ही आमच्या मदतीला धावुन या.जरा हे क्रिप्टीक दिसतय.
वेताळ
27 Jun 2009 - 5:18 pm | दशानन
ह्र्च म्हणतो आहे....
थोडे थोडे समजले आहे.... थोडे समजले नाही पण जे समजले आहे ते बरोबर आहे की नाही हे समजत नाही आहे पण जे समजले ते तेच होते.. जे मी समजत आहे तेच बरोबर आहे हे मला समजले आहे पण क्रिप्टिक आहे त्यामुळे समजलेले सर्व काही असजंस आहे त्यामुळे काहीच समजत नाही आहे.... :D
थोडेसं नवीन !
27 Jun 2009 - 5:50 pm | लवंगी
तरीपण अनंताशी सहमत..
8| /:) :/ 8| :S 8| /:) :/ 8| :S 8| /:) :/ 8| :S 8| /:) :/ 8| :S 8| /:) :/ 8| :S
28 Jun 2009 - 2:22 am | टुकुल
भेळ आणि बागेचा काही संबध तर नाही ना?? :W
गोष्ट तर मस्त आहे,,,, :?
बागप्रेमी,
टुकुल.
27 Jun 2009 - 6:44 pm | अवलिया
सुरेख रुपक कथा !
ॐकारशेट ! जियो .... :)
--अवलिया
27 Jun 2009 - 6:49 pm | विनायक प्रभू
असेच म्हणतो.