वह्या पुस्तके

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
19 Jul 2022 - 5:37 pm

जून महिना चालू झाला की साधारणपणे मध्यमवर्गीयांच्या घरात शालेय वस्तू खरेदी करण्याची लगबग चालू होते. बहूतेक कुटूंबवत्सल पालक पगार झाला की शाळेसाठी लागणार्‍या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात निघतात. मान्सूनचा पाऊस जरी चालू असला तरी एखाद्या सुटीच्या दिवशी आपापली मुले, त्यांच्या आया यांची स्कुटरवर निघालेली गर्दी रस्त्यावर पहायला मिळते.

आजकाल सरकारी शाळातच सरकारी पुस्तके मिळत असतात. त्यामुळे शालेय सामाना मिळणार्‍या दुकानांत पुस्तकांची विक्री सोडून वह्या व इतर गोष्टी विकायला ठेवतात. नाही म्हटले तरी इंग्रजी शाळांतील मुलांना मात्र पुस्तके दुकानातूनच खरेदी करावी लागतात. काही शाळा रिझल्टच्याच दिवशी शाळेतच वह्या पुस्तके विकण्याचे स्टॉल्स लावतात. तेथली मुलांची, पालकांची लगबग, गर्दी पाहण्यालायक असते. पण तेथली खरेदी काही खरी खरेदी मानता येणार नाही. वह्या पुस्तकांची खरी खरेदी ही बाजारपेठेतील आपल्या ओळखीच्या दुकानातच होते.

लहाणपणी आम्ही वडीलांबरोबर अशाच त्यांच्या ओळखीच्या दुकानात जाऊन वह्या पुस्तके खरेदी करत असू. पुस्तकांच्या बाबतीत मी फार सुदैवी गणला जावा. ज्या दिवशी ज्या इयत्तेचा शेवटचा पेपर मी देऊन घरी येत असे त्या दिवशी किंवा फार तर त्याच्या दुसर्‍या दिवशी मी माझ्या वडीलांना बरोबर घेऊन ओळखीच्या नेहमीच्या दुकानात जात असू. दुकानदारही ओळखीचे तोंडभरून भरपूर स्वागत करत असे. त्यावेळी मी पुढल्या इयत्तेचे सगळी सरकारी शालेय पुस्तके विकत घेत असे. म्हणजे सुटीतच पुढल्या इयत्तेतले धडे, अभ्यासक्रम वाचून मी तयारीत असे. वह्यांची खरेदी मात्र शाळा चालू झाल्यानंतरच असे.

परीक्षा झाल्या की सर्वात प्रथम जुनी पुस्तके बाजूला काढणे होई. ती जुनी पुस्तके जुन्या नव्या पुस्तक विक्रेत्याकडे विकून जे पैसे हातात पडत त्याचा कोण आनंद होई. मग त्या पैशातून खाण्याच्या वस्तू घेतल्या जात. जुन्या वह्यांतली कोरी पाने काढणे हा एक मोठा उद्योग असे. त्या कोर्‍या पानांपासून मग वह्या तयार करायला घेतल्या जात. कोपर्‍यावरील एखाद्या चप्पल दुरूस्ती करणाराकडून ती पाने टाचून घेतली जात असत.

पुस्तके घेतल्यानंतर त्यांना कव्हर लावण्याचा स्वतंत्र गृहउद्योग समजला जावा असे मला सतत वाटत आले आहे. शाळा सुरू होण्याच्या एकदोन महिने आधी नंतर एखाद्याने केवळ वह्या पुस्तकांना कव्हरं लावायचा धंदा केला तर गिर्‍हाईकांची त्याचेकडे रांग लागेल. घरात जर दोन शाळेत जाणारे विद्यार्थी असतील तर त्यांच्या वह्या पुस्तकांना कव्हरं लावण्यासाठी त्यांच्या वडीलांना कमीतकमी चार दिवस लागावेत असे गुणोत्तर आपण मांडू शकतो. कव्हरं लावण्याचे काम बहूदा वडीलच करतात. त्या मुलांची आई मात्र शुज कसे घ्यावेत, शालेय गणवेश कुठे स्वस्त अन टिकाऊ मिळतो, ते गणवेश वाढत्या मापाचे कसे घ्यावेत या असल्या कामात एक्सपर्ट असते. "गणू, आण रे तुझ्या शाळेचे वह्या पुस्तके, आज मी कव्हर लावून देते", अशा अर्थाची वाक्य महिलावर्गाकडून कमीच ऐकू येतात. त्यापेक्षा, "अहो, नुसते टीव्ही काय बघत बसलात? त्यापेक्षा बघताबघता सोन्याच्या वह्यापुस्तकांना कव्हरं लावा एकदाची" अशा अर्थाने एखादी गृहीणी बोलली की ते गृहस्थ तिचे पुढचे बोलणे कव्हर करायला लागू नये म्हणून वह्या पुस्तकांसाठी कव्हर लावण्यासाठीचे कागद आणायला बाजारात लगबगीने निघतात. अशा कव्हर लावणार्‍या माणसांसाठी शाळापुस्तकांची खरेदी करतेवेळी एकतर कव्हर संपलेली असतात किंवा विकत घेण्यास विसरली तरी असतात. वह्यांच्या खरेदीबरोबर त्यावर नाव, शाळेचे नाव, इयत्ता, तुकडी असलेली कोरी लेबलंपण घेतली जायची. वह्या पुस्तकांना कव्हर लावल्यानंतर ही लेबल्स त्यावर चिकटवून त्यावर नाव, इयत्ता वगैरे लिहावे लागे.

कव्हर या इंग्रजी शब्दाला मराठीत मलपूष्ठ, आच्छादन, आवरण, एखादी जागा व्यापणे, झाकणे अशा अर्थाचे प्रतिशब्दही आहेत. पण कव्हर हा शब्द अतिशय मराठी होऊन गेला आहे. क्रिकेट या खेळातही सिली पॉईंटच्या पुढे कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर असल्या प्रकारचे चार चार कव्हर पोजिशन्स असतात. आपल्या राहूल द्रविडने कव्हर ड्राईव्ह शॉट मारून 613 धावा केल्यात व त्या क्रमवारीत त्याचा तिसरा क्रमांक आहे. पाऊस पडल्यावर क्रिकेटचे मैदान, घराचे छप्पर इत्यादीवर प्लास्टीक टाकून ते झाकले जातात. वर्तमानपत्रात बातम्या लिहीणारे पत्रकार एखादी बातमी कव्हर करायच्या कामगिरीवर बाहेर पडतात. एखादा मुलाखतकार बड्या नेता, अभिनेत्याची मुलाखत कव्हर करतात. गल्लीत, शाळेत मुलांमध्ये भांडण झाले तर दोन्ही गट एकमेकांची बाजू मांडून (भांडून?) एकमेकांना कव्हर करतात. सैन्यात पुढे लढणार्‍या तुकडीला एखादी तुकडी खास कव्हर करून कव्हर फायरींग करत कव्हर करत असते. बॉडीगार्ड आपल्या नेमून दिलेल्या नेत्याला कव्हर करत असतात.

एका अर्थाने कव्हर करणे, कव्हर लावणे हा आतील वस्तूचे संरक्षण करण्याचा उपाय असतो.

वर्तमानपत्रात कव्हर स्ट्रोरी, कव्हर पेज, कव्हर फोटो, कव्हर चित्रअसते. सायकल, मोटरसायकल तसेच कारमध्ये सिट कव्हर असते. सोफा, गादी, उशी, मोटरसायकल, कार यांना देखील कव्हर असतात. मोबाईलला कव्हर असते. खेळण्याच्या कॅरम बोर्डाला झाकण्याचे कव्हर बाजारात मिळतेच पण त्याच कॅरम बोर्डाच्या खेळात क्वीन असलेल्या सोंगटीला जिंकण्यासाठी कव्हर असलेली सोंगटीही पॉकेटमध्ये टाकावी लागते. ऑफीसात एखादे पत्र लिहीले असेल तर त्यात काय लिहीले आहे अशा अर्थाचे एखादे कव्हर लेटरही लिहील्या जाते. नोकरीसाठी अर्ज करतांना बायोडाटासोबत कव्हर लेटर लिहीण्याची प्रथा जवळपास संपत आली आहे. आताश: नोकरीसाठी उमेदवाराने केवळ बायोडाटा पाठवूनही काम भागते. एखादा विमा काढला तर त्यात जास्तीच्या आजारासाठी जास्त पैसे भरून अ‍ॅडीशनल कव्हर खरेदी करून तो आजार त्या पॉलीसीत कव्हर केला जातो.

कव्हरच्या पुढचा शब्द रिकव्हर असा आहे. त्याचा अर्थ प्राप्त करणे, आजारातून बरे होणे, वसूली तसेच आधीच असलेल्या कव्हरवर पुन्हा कव्हर लावणे (नवीन आच्छादन (मलपूष्ठ) चढवणे) करणे अशा अर्थाने आहे. अजून एक शब्द आहे - अनकव्हर. याचा अर्थ कव्हर काढणे, उघड करणे, एखादी खाजगी बातमी सर्वांना माहित पडू देणे असा होतो.

वह्या पुस्तकांना कव्हर वेगवेगळ्या प्रकारात लावता येतात. म्हणजे कव्हरचे साहित्य कोणते, ते कशा प्रकारे लावले जाते, चिकटवले जाते यावर त्याचे उपप्रकार पडतात. छापील पुस्तकांना पेपरबॅक, जाड तसेच पुठ्ठा बांधणीचे कव्हर घातले जाते. शाळेच्या पुस्तकांना घरी आणल्यानंतर खाकी रंगाचे किंवा पारदर्शक प्लास्टीकचे कव्हर लावले जाते.
कहर म्हणजे आजकाल इंग्रजी शाळा पाल्यांना एकाच रंगाचे कव्हर असणार्‍या वह्या देतात व त्यांना असणार्‍या जाड कागदाच्या कव्हरवर देखील लावायला निराळे प्लास्टीकचे कव्हर देतात. (अर्थात त्याचे पैसे वेगळे घेतात.) वह्यांना आधीच जाड कागदाचे वेष्टन असतांना त्यावर आणखी एखादे कव्हर लावणे म्हणजे पैशाची नासाडीच म्हणता येईल.

लिखाणकाम करण्यासाठी वह्यांचे असंख्य प्रकार आहेत. कोरी, कसल्याही ओळी नसलेल्या वह्या, एकेरी, दुरेघी, चार रेघी, चौकोन असलेल्या वह्या, एक पान कोरे व एक पान एकेरी ओळींच्या वह्या, आलेख वही, नकाशा वही, प्रयोगवह्या, रजिस्टरे, डायरी, चित्रे काढण्यासाठीच्या वह्या, लक्ष्मी पुजनासाठी वापरतो त्या वह्या, हिशेबाच्या चोपड्या हे झाले वापरण्याच्या पद्धतीवरून वह्यांचे प्रकार. आकारनुसार व कागद, कव्हर नुसार आणखी त्यात प्रकार पडतात. म्हणजे पुठ्ठा बांधणीच्या हार्डबाऊंड वह्या , थोडे जाड कागद कव्हरअसलेल्या सॉफ्टबाऊंड वह्या, स्टेपल पीन लावून बांधणी केलेल्या वह्या, दोर्‍याने शिवलेल्या वह्या, सुटे कोरे कागद टाचून केलेल्या वह्या, स्पायरल बाऊंड, खिशात ठेवता येणाच्या आकाराच्या वह्या, नेहमीच्या आकाराच्या रेग्यूलर वह्या, B6, B5, A6, A5 आकारातील वह्या असल्या आकार प्रकारातील वह्यांची यादी करायला एखादी वहीच लागेल की काय अशी शंका मनात येते. पूर्वी जाड पुठ्ठ्याच्या व कापडाने चिकटवलेल्या वह्या मिळत. तशा वह्या आता पहायला मिळत नाहीत. नाही म्हणायला १०० पानी वहीत केवळ ८४च पाने, २०० पानी वहीत केवळ १८०च पाने, कमी आकाराच्या वह्या असल्या दात कोरून पोट भरण्याच्या प्रकारांनी गिर्‍हाईके हैराण झाली आहेत. थोडक्यात कारखानदार वह्यांत कमी पाने लावून गिर्‍हाईकांच्या तोंडाला पाने पुसतात.

"अहो, ही वही आकाराने छोटी दिसते आहे.", ग्राहक.
"त्या कट साईजच्या वह्या आहेत. फुल साईज च्या वह्या महाग आहेत." - दुकानदार.
"ह्या वह्या बनवणार्‍या कारखानदारांनी कट साईजच्या वह्या बनवून आम्हाला फुल बनवले. कट प्रॅक्टीसचा कट केलेला आहे तुम्हां लोकांनी. वह्यांच्या धंद्यानी अगदी वाह्यात बनवले आहे तुम्हाला." - ग्राहक.

मी तर कॉलेजात एकच जाड वही सगळ्या विषयांना केली होती. कोपरे दुमडून प्रत्येक विषयाला पाने वाटून घेतली. खूप "अभ्यासू" असल्याने त्यातीलही बरीचशी पाने तिन वर्षांनंतरही कोरीच होती हा विषय वेगळा म्हणा. अर्थात जेथे योगमार्गातील अधिकारी पुरुष संत चांगदेव महाराज यांचेही ज्ञानेश्वरांना लिहीलेले पत्र कोरेच राहिले तेथे माझ्यासारख्याची वहीच्या वही कोरी असली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.

शाळेकडून विद्यार्थ्यांना ज्या वह्या मिळतात (खरेदी कराव्या लागतात) त्यांचे कव्हर एकाच रंगात, एकाच प्रकारचे किंवा कसलेही चित्र नसतांना केवळ शाळेचा लोगो असलेले असतात. वह्या पुस्तकांवर वेगवेगळे चित्र असतील तर कोणती वही कोणत्या विषयाला आहे हे समजणे विद्यार्थ्याला सोपे पडते. ते चित्र पाहून त्याच्यातील कलाकार जागृत होतो. पुस्तकांना कव्हर लावायला सांगणार्‍या व त्यातही खाकी कव्हर लावायला सांगणारर्‍या शाळा (पक्षी शिक्षक) अगदीच अरसीक समजावे. लहान लहान मुलांना कसलेही चित्र नसलेल्या अनेक वह्या बाळगाव्या लागतात. त्यापेक्षा पूर्वी झाडे, पाने , पक्षी, नक्षी, (हिरो हिरविणी) इत्यादींचे फोटो कव्हरवर असणार्या वह्या लगेच ओळखू यायच्या. मध्यंतरीच्या काळात काही संधीसाधू लोकांनी एका साधूचे फोटो वह्यांवर छापले व त्या वह्या विकून पैसे छापले व त्या साधूंच्या प्रसिद्धीच्या वलयाची संधीसाधून घेतली. शाळेतील दप्तरात एका वहीवर कत्रीना कैफचा फोटो व त्याच ठिकाणी दुसर्‍या वहीवर ह्या साधूंचे चित्र असलेला फोटो कसा असू शकेल याचा विचार मनात येतो. नाही म्हणायला लोकजागृती झाल्याने वह्यांवर नट नट्यांचे फोटो आजकाल पहायला मिळत नाहीत. त्या ऐवजी राष्ट्रीय पुरूष, निसर्गातील दृष्ये, देशातील स्मारके, सैनीक इत्यादींची चित्रे पहायला मिळतात ही निश्चित चांगली बाब आहे. आजकालच्या वह्यांच्या शेवटच्या पानावर काही मनोरंजक किंवा माहितीपूर्ण माहीती छापली जाते.

माझ्या मते पुस्तकांना कव्हर लावूच नये. अगदीच लावायची ठरली तर मुखपृष्ठ व मलपृष्ठ इत्यादीवर जे चित्र असलेले पान असते ते कापून आपण लावलेल्या कव्हरवर पुन्हा चिकटवावी. अर्थात इतके कोणी करत नाही. वास्तविक पाहता, शालेय पुस्तकांच्या (त्यातही स्टेट बोर्डाची, बालभारतीची पुस्तके) कव्हरवर कितीतरी अर्थपूर्ण, सयुक्तीक व मनोरंजक चित्र असतात. लहान मुले गवतावर खेळत आहेत. एखाद्या इयत्तेच्या पुस्तकावरच्या चित्रात पक्षी, बदक आजूबाजूला आहेत. कौलारू घर किंवा शाळा मागे आहे. कुणा एका मुलाच्या हातात त्याच इयत्तेचे पुस्तक आहे ज्यावर तसलेच चित्र आहे. असल्या प्रकारची बालभारती, कुमारभारती, युवकभारतीची पुस्तके असतात. त्यात गणिताची पुस्तके असतील तर चित्रातील मुलांचा धिंगणा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादी चिन्हांसोबत चाललेला असतो. आपल्या शि द फडणीस यांनीदेखील बालभारतीतील पुस्तकांत चित्रं रेखाटली आहेत.

सदर लेख हा देखील अशाच वह्यांची कोरी पाने फाडून शिवलेल्या पानांवर लिहून पाडलेला आहे हा खुलासा जाता जाता करतो अन आपली रजा घेतो.

- पाषाणभेद
१२/०७/२०२२

भाषासमाजजीवनमानशिक्षणप्रकटनविचारआस्वादलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

19 Jul 2022 - 6:22 pm | टर्मीनेटर

मस्त लेख! बऱ्याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

मी तर कॉलेजात एकच जाड वही सगळ्या विषयांना केली होती. कोपरे दुमडून प्रत्येक विषयाला पाने वाटून घेतली. खूप "अभ्यासू" असल्याने त्यातीलही बरीचशी पाने तिन वर्षांनंतरही कोरीच होती हा विषय वेगळा म्हणा.

अगदी अगदी 😀

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Jul 2022 - 7:24 pm | अमरेंद्र बाहुबली

मी २००८ साली १० वीला असताना आसाराम बापूंच्या वह्या आल्या होत्या मार्केटला. स्वस्त नी क्वालीटी पण होती. हल्ली दिसत नाहीत त्या वह्या. त्याच गुरूवचन वगैरे बरंच लिहीलेलं असायचं. अर्ध्या वर्गाच्या तरी त्याच वह्या असायच्या. वरिगात एक मारवाडी मुलगा होता. फक्त त्याच्याच कडे क्लासमेटच्या महागड्या वह्या असायच्या. क्लासमेटच्या वहीत ईंग्रजीत देशाची किंवा प्राण्याची माहीती असायची.

वा. पाभे भाऊ जुन्या फॉर्‍मात परत आलात .
बरे वाटले.
फर्मास झालाय लेख

सुजित जाधव's picture

8 Aug 2022 - 8:12 am | सुजित जाधव
सुजित जाधव's picture

8 Aug 2022 - 8:12 am | सुजित जाधव
सुजित जाधव's picture

8 Aug 2022 - 8:13 am | सुजित जाधव
ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Aug 2022 - 8:31 am | ज्ञानोबाचे पैजार

दरवर्षी साधारण जून महिन्यात या सगळ्याचा प्रत्यय येतो

पैजारबुवा,

मुक्त विहारि's picture

8 Aug 2022 - 8:53 am | मुक्त विहारि

जुन्या आठवणी जाग्या झाल्या ....

मी खूप प्रयोग केलेत कवर घालण्यावर, बाइंडिंग करण्यावर.
दप्तराचं वजन कमी करण्याचं कुणी पाहात नाही. उलट वाढवतच आहेत. वर्कबुकं शाळेने ठरवलेलीच घ्यायची. वही+पाठ्यपुस्तक+वर्कबुक (गुणिले पाच विषय.)
मोबाईलचं वजन १५० ग्रामपेक्षा वाढलं की कोकलतात पण दप्तरांचं कमी करा ना.
कॉलेजला गेलो आणि सर्व शालेय जाचक नियमांच्या तावडीतून सुटलो. फक्त एक फाईल ( फोल्डर) आणि त्यात दहा कागद ठेवले की काम होऊ लागले. फक्त जादा म्हणजे सायन्सचे प्रयोग जर्नल असे.

चौथा कोनाडा's picture

8 Aug 2022 - 6:21 pm | चौथा कोनाडा

पुस्तकांना कव्हर हा विषय मस्त, खुसखुषीत पणे कव्हर केला !
आमचे आणि अर्थात् आमच्या चिरंजीवाचे ही हे शालेय दिवस आठवले !
झकास लेखन, पाभे !


माझ्या मते पुस्तकांना कव्हर लावूच नये. अगदीच लावायची ठरली तर मुखपृष्ठ व मलपृष्ठ इत्यादीवर जे चित्र असलेले पान असते ते कापून आपण लावलेल्या कव्हरवर पुन्हा चिकटवावी. अर्थात इतके कोणी करत नाही. वास्तविक पाहता, शालेय पुस्तकांच्या (त्यातही स्टेट बोर्डाची, बालभारतीची पुस्तके) कव्हरवर कितीतरी अर्थपूर्ण, सयुक्तीक व मनोरंजक चित्र असतात. लहान मुले गवतावर खेळत आहेत. एखाद्या इयत्तेच्या पुस्तकावरच्या चित्रात पक्षी, बदक आजूबाजूला आहेत. कौलारू घर किंवा शाळा मागे आहे. कुणा एका मुलाच्या हातात त्याच इयत्तेचे पुस्तक आहे ज्यावर तसलेच चित्र आहे. असल्या प्रकारची बालभारती, कुमारभारती, युवकभारतीची पुस्तके असतात. त्यात गणिताची पुस्तके असतील तर चित्रातील मुलांचा धिंगणा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादी चिन्हांसोबत चाललेला असतो. आपल्या शि द फडणीस यांनीदेखील बालभारतीतील पुस्तकांत चित्रं रेखाटली आहेत.

एकदम सही !
पाभे +१ लेख !