पुस्तक परिचयः कालगणना, लेखकः मोहन आपटे, राजहंस प्रकाशन, आवृत्ती पहिलीः जुलै २००८, किंमतः रू.२००/- फक्त.
पंचांग आणि खगोलशास्त्र यांचा अतिशय घनिष्ट संबंध आहे. सूर्यनिर्मित ऋतुचक्र किंवा चंद्राचे कलाचक्र यांच्या संयोगानेच पंचांगांची रचना केली जाते. भारतीय पंचांगाचे नाते, आकाशाशी निरंतर जडलेले आहे. म्हणूनच त्यासारखे माहितीदायक पंचांग दुसरे नाही. विविध संस्कृतींनी निर्माण केलेल्या पंचांगांचा इतिहासही मनोरंजक आहे.
पाश्चात्य कालगणना, भारतीय पंचांग, पंचांग विज्ञान आणि अत्यंत उपयुक्त परिशिष्टे यांनी परिपूर्ण असे अद्ययावत पुस्तक सिद्ध करून मोहन आपटेंनी एक महत्त्वपूर्ण भर अर्वाचीन मराठी पुस्तकांत घातलेली आहे.
भारतीय पंचांगातील तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण यांच्या सुटसुटीत व्याख्या; सायन-निरयन पद्धतींची सोपी उकल; अमावस्यांत आणि पौर्णिमान्त महिन्यांची रचना; तिथीच्या क्षय-वृद्धीच्या संकल्पना; अधिक व क्षय मासांच्या संकल्पना; आपापल्या स्थानांचे अक्षांश प्रत्यक्षात सूर्याच्या प्रकाशात पडलेल्या सावलीच्या साहाय्याने कसे काढायचे ही माहिती; तसेच अगदी आण्विक कालमापनापर्यंत कालगणनेचे सर्वच पैलू उत्तमरीत्या, तपशीलवार हाताळलेले असल्याने हे एक संदर्भ पुस्तक झालेले आहे.
यात एक सिर्कार्डियन (लॅटीन भाषेत सिर्का=विषयी, डिएम=दिवस) घड्याळ दिलेले आहे. आपल्या शारीरिक 'दिवसाविषयी' माहिती त्यात दिलेली आहे. कुठलाही संदर्भ न देता ते म्हणतात की शास्त्रज्ञांच्या मतानुसार 'दिवसविषयक घड्याळ' खालीलप्रमाणे असते.
रात्रौ ९:००: मेलॅटोनिन उत्प्रेरकाचाचे स्त्रवणे सुरू
रात्रौ १०:३०: मलमूत्र-विसर्जनाच्या अवयवांचे कार्य स्थगित
रात्रौ १२:००: मध्यरात्र
रात्रौ २:००: अतिगाढ झोप
पहाटे ४:३०: शरीराचे तापमान न्यूनतम
पहाटे ६:००: प्रातःकाल
सकाळी ६:४५: रक्तदाबात अचानक वाढ
सकाळी ७:३०: मेलॅटोनिन उत्प्रेरकाचाचे स्त्रवणे बंद
सकाळी ८:३०: मलमूत्र-विसर्जनाच्या अवयवांचे कार्य पुन्हा सुरू
सकाळी १०:००: उच्चतम सावधानता
दुपारी १२:००: मध्यान्ह
दुपारी २:३०: उच्चतम शारीरिक सहकार्य
दुपारी ३:३०: जलद क्रियाशीलता
दुपारी ५:००: रक्ताभिसरणक्रिया कार्यक्षम, स्नायूंची ताकद उच्चतम
सायं ६:००: सायंकाळ
सायं ६:३०: उच्चतम रक्तदाब
सायं ७:००: शारीरिक तापमान उच्चतम
रात्रौ ९:००: मेलॅटोनिन उत्प्रेरकाचाचे स्त्रवणे पुन्हा सुरू
मला ही माहिती फारच सुरस वाटली. डॉक्टरकडे सकाळी जातो की संध्याकाळी यावरही रक्तदाबाचे प्रमाण बदलते या अनुभवावर याने शिक्कामोर्तबच होते.
पुस्तक मनोरंजक तसेच माहितीपूर्ण आहे. अवश्य वाचावे. कालगणनेत रुची असणार्यांनी संग्रही बाळगावे इतके ते चांगले आहे.
प्रतिक्रिया
11 Apr 2009 - 10:52 pm | भडकमकर मास्तर
रात्रौ १२:००: मध्यरात्र
पहाटे ६:००: प्रातःकाल
दुपारी १२:००: मध्यान्ह
सायं ६:००: सायंकाळ
१७ मुद्द्यांपैकी वरील चार मुद्दे अंमळ इंट्रेष्टिंग वाटले,
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
12 Apr 2009 - 10:06 am | नरेंद्र गोळे
आपल्या स्वारस्याबाबत कल्पना आली!
12 Apr 2009 - 12:34 pm | मिसळभोक्ता
रात्रौ १०:३०: मलमूत्र-विसर्जनाच्या अवयवांचे कार्य स्थगित
सकाळी ८:३०: मलमूत्र-विसर्जनाच्या अवयवांचे कार्य पुन्हा सुरू
स्वानुभवाने सांगतो. हे चूक आहे. सार्वजनिक शौचालये २४ तास सुरू असतात !
-- मिसळभोक्ता
12 Apr 2009 - 2:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडला ! :)
मलमूत्र-विसर्जनाचे कार्य रात्रौ १०:३० नंतर स्थगीत (झोपल्यामुळे स्थगीत) होते हे पटत नाही, तरी पुस्तक परिचय करुन दिल्याबद्दल आभारी !
-दिलीप बिरुटे
(वाचक)
12 Apr 2009 - 2:53 pm | मिसळभोक्ता
मलमूत्र-विसर्जनाचे कार्य रात्रौ १०:३० नंतर स्थगीत (झोपल्यामुळे स्थगीत) होते हे पटत नाही
झोपल्यामुळे नॉर्मली हे कार्य स्थगित व्हायला हवे. कार्याची गरज भासल्यास झोपेतून जाग येते, असा स्वानुभव आहे. असे घडत नसल्यास जवळचा डॉक्टर गाठावा. त्यासाठी आजकाल औषधे उपलब्ध आहेत.
(अवांतरः कार्य म्हटले, की श्रीकृपेकरून हे समोर यायलाच हवे. म्हणजे आम्चे येथे श्रीकृपेकरून मलमूत्र-विसर्जनाचे कार्य योजले आहे, वगैरे.)
-- मिसळभोक्ता
12 Apr 2009 - 2:31 pm | नरेंद्र गोळे
प्रत्येकच 'मिसळभोक्त्या'स स्वानुभवकथनाचा अधिकार आहे! चालू द्या!!