साकिया या सदराला आपण आज पासून सुरुवात करणार आहोत. मागल्या वेळेला झालेल्या कट्ट्याच्या वॄत्तांतात मी हा बेत जाहीर केला होता. कॉकटेल्स बद्दल लिहीण्यापुर्वी आपण कॉकटेल्स म्हणजे काय? सजावट कशी करावी, कुठल्या प्रकारचे साहित्य लागते इ. इ. इ. ही पार्श्वभुमी समजवून घेतली पाहीजे.
कॉकटेल्स म्हणजे काय?
कॉकटेल्स म्हणजे वेगवेगळ्या मदिरा आणि फळांचे ज्युसेस ( यात दुध, अंड्याचा पांढरा बलक, क्रिम, चहा, कॉफी हे पण येतात) हे वापरून केलेले पेय. हा प्रकार १६व्या शतकात सर्व प्रथम केला त्यात टोमॅटॉ ज्युस किंवा मोसंबीचा रस याचाच मुख्यत्वे करून वापर असायचा. काही दिवसांनंतर हे फॅड मागे पडले. पण आज आपण ज्याचा कॉकटेल्स म्हणून उल्लेख करतो त्याची सुरुवात मात्र १९२० च्या दरम्यान अमेरिकेत झाली. याचे कारण म्हणजे १६ जानेवारी १९२० रोजी अमेरिकेत दारू पिण्यावर/विकण्यावर बंदी घातली गेली. परंतू कॅनडा आणि मेक्सीकोमधून दारू अवैध मार्गाने येतच होती तसेच सरकारने घरात काही प्रमाणात दारू (वाइन आणि बिअर वगैरे) बनवायला परवानगी दिली होती. ही घरगुती किंवा अवैध मार्गाने आणलेली दारू चवीला फारशी चांगली नसायची म्हणून मग ह्याचे चव सुधारण्याचे/बदलण्याचे वेगवेगळे प्रयोग सुरू झाले आणि त्यातुनच जन्म झाला कॉकटेल्सचा.
ही बंदी काही प्रमाणात उठवल्यानंतर (१९३३ साली, १९६६ साली ही बंदी पुर्णपणे उठवण्यात आली) कॉकटेल्स बनवण्याची काही खास गरज उरली नाही त्यामुळे कॉकटेल्स हळूहळू मागे पडलेत परंतू पुन्हा गेले २०-२५ वर्षांपासून कॉकटेल्स पुन्हा लोकप्रिय व्हायला सुरुवात झाली आणि आता तर समाजामध्ये कॉकटेल्सने स्वत:चे असे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
कॉकटेल्स साधारणतः तिन प्रकारच्या असतातः
१. ज्याचा मुख्य अंश कुठल्यातरी प्रकारची मदिरा असते आणि त्यात एक-दोन वेगळ्याप्रकारच्या मदिरा वापरून त्याचा स्वाद वाढवलेला किंवा थोडासा वेगळा केलेला असतो.
२. परत कुठल्या तरी प्रकारची मदिरा आणि त्यात फळांचे रस किंवा इतर काही पदार्थ घालून (उदा. आले, जायफळ इ.) त्याला वेगळा स्वाद दिला असतो.
३. मदिरे मध्ये फळांचा रस, रंग वापरून त्याच्या रंगसंगतीला, सुवासाला किंवा चवीला उठाव दिलेला असतो.
आणि अर्थातच नॉन-अल्कॉहोलिक मध्ये फक्त फळांचा/चे रस आणि इतर पदार्थ वापरून थोडासा वेगळा स्वाद आणलेला असतो.
सजावट
जवळजवळ सगळ्याच प्रकारचे कॉकटेल्स सर्व करताना त्यावर सजावट केलेली असते. सजावटीसाठी साखरेच्या पाकात घोळवलेली किंवा विविध रंगात उपलब्ध असलेली चेरी, संत्र्याची/लिंबाची साल/फोड, फळांचे काप, पुदिन्याचे पान, छोट्या आकरातल्या छत्र्या, वेगवेगळ्या आकाराचे/रंगांचे स्ट्रॉ इ. प्रकार वापरले जातात. बर्याचदा लाकडी किंवा प्लॅस्टीकचे टूथ-पिक्स पण फळांना टोचून वापरलेले असतात. छत्र्या/स्ट्रॉ/टुथ-पिक्स वापरताना त्या स्वच्छ करून घेणे फार गरजेचे असते.
आणखी एक विशीष्ट प्रकारची सजावट म्हणजे फ्रॉस्टींग. यात ग्लासच्या कडेला लिंबू किंवा साखरेचा पाक / कॅरेमल सिरप असे काही तरी लावून ग्लास उपडा करून मिठ्/साखर्/कोको पावडर लावलेली असते. काही प्रकारच्या कॉकटेल्सना (उदा. मार्गारिटा) फ्रॉस्टींग असतेच असते.
काही सुचना
१. जेव्हा १ भाग मदिरा असे लिहीले असेल त्याचा अर्थ १/२ औंस.
२. मोठ्या उभ्या ग्लासमध्ये मदिरा सर्व करतान साधारणतः २/३ ग्लास भरून बर्फ टाका, हेच प्रमाण छोट्या उभ्या ग्लास साठी १/२ ग्लासवर आणा.
३. जेव्हा फळांचा रस, मदिरा आणि ताजे फळ यांचे कॉकटेल बनवायचे असेल तेव्हा १/२ मिक्सर भरून बर्फ टाका.
४. शक्यतो ताजी फळे वापरा, गोठवलेली किंवा जुनी (बरीच पिकलेली) फळे वापरू नका.
५. फळांचे रस शक्यतो ताजे करून वापरा, जर शक्य नसेल तर फळांचे रस आणि इतर साहित्य फ्रिजमध्येच ठेवा.
इतर साहित्य
तुमचा कॉकटेल बार सजवताना तुम्हाला इतरही बरेच साहित्य लागेल. त्याची यादी पुढील प्रमाणे:
१. Bottle opener
२. Corkscrew
३. Can opener
४. Measuring cups and spoon set
५. Bar spoon with long handle and muddler on the end
६. Juice squeezer
७. Electric blender
८. Cutting board and a sharp knife
९. Ice bucket with an ice tong
१०. Shaker and strainer
११. Towels
१२. Vegetable peeler or a twist cutter for fruit peels
१३. Grater
१४. Glassware (खाली पहा)
तसेच सजावटी साठी छत्र्या, स्ट्रॉ, टुथ-पिक्स वेळोवेळी आणावे लागेल.
कॉकटेल शेकर
पुलंनी त्यांच्या "माझे खाद्यजीवन" या लेखात म्हटल्याप्रमाणे खाण्याचा आसनाप्रमाणे बासनाशी संबंध आहे. कुठल्या प्रकारची मदिरा कुठल्या प्रकारच्या ग्लासात सर्व करावी याचेही काही नियम आहेत. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ग्लासेस लागतील, अर्थात सगळे ग्लासेस एकदमच विकत घेतले पाहीजेत असे नाही. बजेट आणि आवडी प्रमाणे तुम्ही याचा संग्रह करू शकता. सर्व साधारण पणे लागणारे ग्लासेस पुढील प्रमाणे:
१. Beer mug
२. Beer pilsner
३. Brandy snifter
४. Champagne flute
५. Cocktail glass
६. Coffee mug
७. Collins glass
८. Cordial glass
९. Highball glass
१०. Hurricane glass
११. Irish coffee cup
१२. Margarita/Coupette glass
१३. Old-fashioned glass
१४. Pousse cafe glass
१५. Red wine glass
१६. Sherry glass
१७. Shot glass
१८. Whiskey sour glass
१९. White wine glass
काचेचे ग्लास वापरताना घ्यायची काळजी
काचेच्या ग्लासेस मुळे अपघात होऊ शकतात आणि जर असा अपघात झाला तर पार्टी मध्ये रंगाचा बेरंग होऊ शकतो. तेव्हा ग्लासेस हाताळताना थोडी सावधानता बाळगा.
१. बर्फ घेण्यासाठी चिमटा किंवा मोठा स्कूप वापरा. ग्लासने बर्फ उचलू नका.
२. जर बर्फाच्या साठ्याजवळ किंवा त्याच्या अगदी वरतीच ग्लास फुटला तर बर्फ फेकून द्या. बर्फ आणि काच एकमेकांत मिसळून जातात आणि त्यामुळे बर्फाबरोबर काचेचा तुकडा जाऊन अनर्थ होऊ शकतो.
३. थंड ग्लासमध्ये गरम पेय किंवा गरम ग्लास मध्ये बर्फाचे तुकडे टाकू नका.
४. बर्याच प्रकारचे ग्लासेस अतिशय पातळ काच वापरून तयार केलेले असतात. त्यामुळे ते एकमेकांच्या फार जवळ ठेवू नका, आपटून ग्लासला तडा जाण्याची शक्यता असते. तसेच "चिअर्स" म्हणून ग्लास भिडवताना ते एकमेकांना जेमतेम टेकतील आणि छान मंजूळ नाद उत्पन्न होइल इतकेच जवळ न्या. उत्साहाच्या भरात जोरात आपटू नका.
५. ड्रिंक्स सर्व करताना ट्रे मध्ये दोन ग्लास मध्ये आपला हात सहज जाऊ शकेल एव्हढी जागा ठेवा. दाटीवाटीने जास्त ग्लासेस बसवण्याचा अट्टाहास करू नका. आणखी एक फेरी ही ग्लास फुटून होणार्या अपघातापेक्षा नक्कीच स्वस्त पडेल.
६. ग्लास सर्व करताना त्याच्या तळाशी धरा जेणे करून तुमच्या हातांचे डाग/ठसे त्यावर पडणार नाहीत.
डिस्क्लेमरः
१. सूरापानासाठी किमान २१ (की १८?) वर्षे वय असणे गरजेचे आहे अथवा हे कायदे प्रत्येक देश/राज्यावर अवलंबून आहेत.
२. अल्कोहोलचे सेवन आपापल्या जबाबदारीवर करावे.
(सर्व चित्रे आंतरजालावरून साभार)
धन्यवाद...
- नाटक्या
प्रतिक्रिया
21 Mar 2009 - 12:29 am | विसोबा खेचर
नाटक्या, अरे तुझं कौतुक किती अन् कुठल्या शब्दात करू रे? किती सुरेख आणि आत्मियतेने लिहिलं आहेस! मनापासून सांगतो, डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले!
निरनिराळ्या चषकांची चित्रे तर केवळ देखणी!
जियो मेरे लाल! पूर्वरंग तर सुरेखच भरला आहेस. तानपुरे जुळले आहेत, तबल्याची आस सुरेल लागली आहे. आता विलम्बित ख्यालाची वाट पाहतो आहे!
आपला,
(बाई आणि बाटली या विषयांवर मनापासून प्रेम करणारा!) तात्या.
21 Mar 2009 - 12:34 am | चकली
पुढील भागांच्या प्रतिक्षेत . सुरूवात छान झाली आहे.
काही ग्लासांची चित्रे नाहियेत..ती पण टाका.
चकली
http://chakali.blogspot.com
21 Mar 2009 - 1:38 am | एक
आता करा सुरू ... =P~
येवू द्या...एकेक.
कुठल्या प्रसंगाला - खाण्याला कुठलं कॉकटेल किंवा तसच कुठल्या कॉकटेल ने सुरूवात करावी आणि कशाने संपवावं ते पण लिहा.
नाहीतर आम्ही घरी पंजाबी जेवणाबरोबर मार्गारिटा पिणारे. कळतं की "जोडी कुछ जमी नही" पण घरात त्यावेळी एकच टकिलाची बाटली असते. :(
21 Mar 2009 - 1:55 am | नंदन
सचित्र आणि माहितीपूर्ण लेख. प्रथमोध्याय सुरेख झाला आहे, आता अथाऽतो मद्यजिज्ञासा म्हणून पुढच्या भागांची वाट बघतो.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
21 Mar 2009 - 2:06 am | बेसनलाडू
वाचत आहोत.
(वाचनोत्सुक)बेसनलाडू
21 Mar 2009 - 2:08 am | बिपिन कार्यकर्ते
"समथिंग यू ऑलवेज वॉन्टेड टू नो, बट डिडन्ट नो हूम टू आस्क" असला प्रकार होता माझा 'मद्यजिज्ञासेबद्दल'. आता कळेल हळूहळू. मस्त लेखमाला.
अवांतर: "अथाऽतो मद्यजिज्ञासा"........... नंदनशेठ, भारी शब्द!!! :)
बिपिन कार्यकर्ते
21 Mar 2009 - 2:38 am | भडकमकर मास्तर
अहाहा.. उत्तम सुरुवात...
येउद्यात..
काचेच्या ग्लासच्या काळजीबद्दलच्या सूचनाही खासच आहेत.
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
21 Mar 2009 - 2:46 am | धनंजय
असेच म्हणतो.
(काचेच्या ग्लासांचा धोका : माझ्या हातून कांडीवर तोललेले चषक नेहमीच कलंडतात आणि फुटतात. मी लाल किंवा सफेत द्राक्षासव गेली काही वर्षे बसक्या चषकात घेऊन पीतो. मग लोक काहीही म्हणोत!)
21 Mar 2009 - 9:15 am | बबलु
नाटक्याशेठ.....
मस्त लेख. पुढील भागांची अतुरतेनं वाट पाहतोय. चित्रं पण जबराट.
....बबलु
21 Mar 2009 - 9:22 am | दशानन
लै भारी... मागच्या आठवड्यापर्यंत आमचा मदिरा हा जिव्हाळाचा विषय होता... पण आता नाही... :(
पुढील भाग लवकर लिहा..
सात्विक राजे :D
21 Mar 2009 - 9:35 am | चतुरंग
अगदी नीरगाठ उकलीच्या तंत्राने सुरु झाले की मदिरापुराण!
हे बघ नाटक्या, मी बरेच वर्षांपूर्वी बियर घेत असे. आता सोडूनही बरीच वर्षे झालीत.
तुझे हे मदिरापुराण इतके तन्मयतेने सुरु झालेले आहे की ह्याचा शेवटचा भाग होईपर्यंत जर मी पुन्हा प्यायला सुरुवात केली तर सर्वस्वी तुला जबाबदार धरेन! ;)आवडीच्या विषयाचा किती आनंदाने आणि बारकाईने अभ्यास तू केलेला आहेस, धन्य!
अथ मदिरापुराणे प्रथमोध्याया समाप्त!
चतुरंग
21 Mar 2009 - 10:50 am | पिवळा डांबिस
नमन मस्त जमलंय.....
आता मुख्य आख्यान येऊ द्यात....
वाट पहातो...
-पिडां
मार्टिनीदेवींचा, विजय असो.....
21 Mar 2009 - 12:17 pm | परिकथेतील राजकुमार
गुरुदेव ___/\___
प्रवचन लवकर सुरु करा...
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
21 Mar 2009 - 12:34 pm | अनिल हटेला
६. ग्लास सर्व करताना त्याच्या तळाशी धरा जेणे करून तुमच्या हातांचे डाग/ठसे त्यावर पडणार नाहीत. :-?
>>> हे का ते नाय समजला ...असां...
मदिरापुराणाचा पहिला अध्याय आवडला....;-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
21 Mar 2009 - 6:11 pm | श्रावण मोडक
अवघड आहे. ही लेखमाला माझ्यापुरती ब्लॉक करण्यासाठी काय करावे रे नीलकांत?
21 Mar 2009 - 6:13 pm | दशानन
=))
हाच प्रश्न मला पण पडला आहे....
डॉक्टर ने वाट लावली आहे... फोटो बघून समाधान होणार नाही :(
सहा महिन्यानंतर लेखमाला वाचेन ;)
22 Mar 2009 - 3:41 pm | खादाड
वाचुन तहान लागली ! ;)
29 Mar 2009 - 9:45 pm | नीधप
काही काही ग्लासेस आणि गॉब्लेटस ना छान नावं आहेत काव्यात्मक ती पण द्या.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
29 Mar 2009 - 10:01 pm | ऋषिकेश
नंदन, बिपिनदा वर म्हणतो त्याप्रमाणे प्रश्न होतेच पण विचारायचे कोणाला हा प्रश्नहि होताच.. त्यातून "हा पित तर नाहि आणि प्रश्न हजार विचारतो!" असा भावहि लोकांच्या चेहेर्यावर वाचता यायचा..
त्यामुळे हि लेखमाला सु'रस' संपुर्ण होवो ही सदिच्छा!
-(अपेय-जिज्ञासु) ऋषिकेश
29 Mar 2009 - 10:46 pm | संदीप चित्रे
उत्तमोत्तम कॉकटेल्सच्या रेसिपीची वाट बघतोय :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
16 Apr 2009 - 1:08 pm | काजुकतली
मस्त माहिती....