मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते....
माझे खळाळणारे हसू
अनुभवांच्या भोवऱ्यांतून तरून
सुशांत जलाशयातल्या
शांत स्मितासारखे
तुझ्या ओठांशी येऊन थांबेल......
मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते......
तुझ्या एवढी होईन तेव्हा
शब्दांची झोळी बाहेर खुंटीला टांगेन
अर्थाच्यामागे धावणे थांबेल आणि,
उंच झाडांच्या गहन जंगलातून
निवांत चालत तुझ्या डोळ्यांच्या
वाटेशी थांबेन .......
मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते.....
माझे निर्झर गहिवर ओले
राग लोभ वा हसू रडूही
तुझ्या ओंजळीत हरवून जातील,
नखाइतकीच कोरीव आठवण
तुझ्या उरात जीव जागवेल
शांत रात्रीच्या निश्चिंत प्रहरी,
माझे वय तुझ्या वयाला
ओलांडून जाईल......
मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते....
Shivkanya
प्रतिक्रिया
14 Jun 2019 - 11:05 am | यशोधरा
वा!
14 Jun 2019 - 11:57 am | प्रसाद_१९८२
छान !