उदासगाणी
चार महिने या खोलीत मी राहतो आहे, तितक्या रात्री मी इथे जागवल्या आहेत. आज उद्याची शेवटची रात्र असणार आहे. काहीही धड हाती न लागता इथून मी निघणार आहे, तरी पण, हा ‘पण’ जमा केलेल्या इथल्या आठवणींना माझ्या मनात उभा करतो आहे. मला माझं गवसण्याच्या अडनिड्या प्रयत्नात ही खोली आता एक भाग झाली आहे. कित्येक गाणी इथे मी ऐकली असतील, ठराविक गाण्यांच्या रिंगणात रात्री गेल्या खऱ्या, त्यातून मला उदास गाण्यांचेच वेड लागले आणि मग त्या जोडीला पैसे कमवायला काही कामे मिळवता येतात का, त्यासाठी कित्येक गोष्टींना नेटवर जोखून पाहिले असेल. सप्टेंबरच्या परीक्षेचा पास निकाल इथेच पाहिला.