निरूत्तर
मिर्झा बर्जिसचा आणि माझा कित्येक तपांचा पक्का दोस्ताना होता. आमच्या वृत्तीत, स्वभावात आणि कौटुंबीक पार्श्वभूमीत जमीन अस्मानाचा फरक असूनही तो टिकून होता. मिर्झा एका ख्यातनाम नबाबी खानदानातला होता. तो परिस्थितीने पुरता गांजून गेलेला होता. तरीही रक्तात मुरलेली घमेंड, मिजास अजूनही तशीच होती. 'उपरसे शेरवानी और अंदरसे परेशानी' अशा आपल्या केविलवाण्या अवस्थेची जाणीव त्याला वारंवार व्हायची, पण तो पुरता असहाय होता. परिस्थितीवर मात करण्यासाठी काही प्रयत्न करेल तर तो मिर्झा बर्जिस कसला? 'ठेविले अनंते' तैसेची राहून आर्थिक परेशानी लपवून ठेवत आपल्या शेरवानीला मात्र तो प्राणपणाने जपत होता.