(अमेरिकेतल्या भारतीय वकिलातीत एका उच्चपदस्थ अधिकार्यासमवेत उ. अमजद अली आणि परिवार)
सरोद हे हिंदुस्थानी अभिजात संगीताची परंपरा लक्षात घेता तुलनेने एक नवं वाद्य आहे. मध्य अशियातल्या गुराख्यांकडून 'स्थलांतरित' होत होत हे वाद्य अमजद अलींच्या 'बंगश' घराण्यातल्या पूर्वजांकडून भारतात आलं. (जंजीर मधल्या प्राणनी आपल्या अदाकारीने अजरामर केलेल्या 'यारी है इमान मेरा' गाण्यात पार्श्वसंगीतात वापरले आहे ते 'रबाब' हे अफगाणी वाद्य आणि सरोदची जातकुळी एकच आहे). काळाच्या ओघात बरेच रचनात्मक बदल होत सरोदनी आजचं स्वरूप घेतलं आहे.
अत्यंत प्रभावशाली, पुरूषी, खर्जातला आवाज ही या वाद्याची खासियत. या वाद्याला 'पडदे' नाहीत. वादकाचे कान विलक्षण 'तयार' नसतील आणि तो स्वराला पक्का नसेल तर सरोद त्याला क्षणार्धात 'बेपरदा' करते असे अमजद अली नेहेमी म्हणतात. वाद्याच्या ध्वनीची गुणवत्ता मु़ळातच इतकी अप्रतिम आहे, की फारशी धडपड न करताही दोन चार स्वरावली वाजवताच नाणावलेल्या सरोद वादकाला मैफिल ताब्यात घेता येते. आपल्या मनात उमटेल त्या प्रमाणे वाद्य 'गायला' लागावं यासाठी स्वतः अमजद अलींनीही या वाद्यात बरेच तांत्रिक बदल केलेले आहेत.
वडिलांकडून मिळालेल्या पक्क्या तालिमीला डोळस रियाझाची जोड दिल्यानेच आत्ममग्न, स्वतःशीच संवाद साधणारं असं अमजद अलींचं आगळंवेगळं सांगीतिक व्यक्तिमत्व घडत गेलं आहे. सरोद वादनातल्या तांत्रिक गोष्टींबरोबर आपल्या वडिलांकडूनच कलेतली 'अंतर्मुखता' त्यांना परंपरेनेच मिळालेली आहे. सरोद हातात घेतल्यावर ते फार कमी वेळा आपल्या श्रोतृवर्गाकडे आवर्जुन लक्ष देताना दिसतात. आपल्या वादनात ते इतके तल्लीन होउन जातात, की एकदा डोळे मिटून घेतल्यावर भर मैफिलीत सभागृहाच्या आत-बाहेर करणार्या 'असुरांची' चाहूलही त्यांना सहजी अस्वस्थ करू शकत नाही. श्रोत्यांकडे वारंवार बघून मैफिल रंगते आहे की नाही अशी 'चाचपणी' करतानाही ते फारसे दिसत नाहीत. एखाद्या सृजनशील व्यक्तीला आपल्याच कलाकृतीकडे तिची निर्मीती सुरू असताना तटस्थपणे पाहता येण्यासाठी लागतो तो 'स्थितप्रज्ञ' भाव त्यांच्याकडे सहजच आला आहे हे लक्षात येते.
अमजद अलींच्या पत्नी सौ. शुभलक्ष्मी यांचे साहचर्य लाभणे ही त्यांच्या सांगितीक जीवनातली एक खूप मोठी जमेची बाजू आहे. उस्तादजींचे ते एक सुप्त बलस्थानच आहे. सौ. शुभलक्ष्मी या मूळच्या आसामच्या, पण वृत्तीने मात्र पूर्णपणे दक्षिण भारतीय! कै. रूक्मिणीदेवींच्या ऐन उमेदीच्या काळात चेन्नईच्या विख्यात 'कलाक्षेत्रात' तब्बल दहा वर्षे शुभलक्ष्मींना भरतनाट्यमचं शिक्षण त्यांच्याकडून मिळालं. दाक्षिणात्य संस्कृतीतही त्या पूर्णपणे रममाण झाल्या. त्यांचं तमिळ भाषेवर असाधारण प्रभुत्व आहे. अमजद अलींच्या घरातच हिंदुस्थानी आणि कर्नाटकी संगीताचा असा सुरेख मिलाफ झालेला आहे. एक कलाकार या दृष्टीने पाहता शुभलक्ष्मी याच अमजद अलींच्या आद्य समीक्षकाचे काम चोखपणे करतात, त्यांना मोलाच्या सूचनाही देतात.
आपल्या दोन मुलांचं यथास्थित संगोपन करण्यासाठी शुभलक्ष्मीजींनी आपल्या यशस्वी कारकिर्दीवर भर उमेदीच्या काळात पाणी सोडलं. आज ही दोन्ही मुलं यशस्वीरीत्या आपली उज्वल परंपरा पुढे नेताना दिसतात. अमान अली आणि अयान अली 'बंगश' जगभर आपल्या वडिलांच्या जोडीने तसेच आपसातल्या जुगलबंदीच्या सरोद वादनाच्या मैफिली अक्षरशः गाजवतात. या त्रयीने सरोदच्या तारा छेडताच त्या वाद्यातून उमटणारा वेगळाच गाज, सुरांचे माधुर्य आणि 'बंगश' घराण्याची राजमुद्रा भाळी घेउन आलेला शैलीदार नाद चटकन ओळखता येतो. श्रोत्यांच्या मनावर तो कायमची छापही सोडून जातो. या मुलांच्या वादनातून हे सहज सिद्ध होतं की उ. हफीज अलींचं घराणं काळाच्या कसोटीवर निर्विवादपणे उतरलेलं आहे.
सच्चं, सुरेल आणि पराकोटीचं सृजनशील जीवन जगण्यासाठी लागणारी आई सरस्वतीच्या कृपेची शिदोरी अमजद अलींनी आपल्या मुलांना दिलेली आहे. हाडाचे कलावंत असलेले वडिल आपल्या मुलांना यापेक्षा वेगळे आणखी काय देउ शकतात? आपली विद्या अमान आणि अयानच्या हाती सुपूर्त करून, घराण्याची परंपरा अखंड ठेउन अमजद अलींनी आपलं गीत, संगीत 'अमर' केलेलं आहे. सरोद वादनाच्या क्षेत्रात आणि एकंदरच हिंदुस्थानी अभिजात संगीतातल्या वाद्यसंगीताच्या महान परंपरेत त्यांचं स्वत:चं अढळ असं ध्रुवपदच त्यामुळे निर्माण झालं आहे.
[श्री. राघव मेनन यांच्या 'द साँग ऑफ अमजद अली खाँ' या लेखावर आधारित]
प्रतिक्रिया
23 Jan 2013 - 10:53 pm | स्वाती दिनेश
दोन्ही भाग आत्ताच वाचले, अर्थातच आवडले.
स्वाती
23 Jan 2013 - 11:36 pm | कवितानागेश
chhaan. :)
24 Jan 2013 - 8:49 am | स्पंदना
एकुण वर्णन आवडल. चांगल लिहिल आहे.
24 Jan 2013 - 9:04 am | इनिगोय
छान झाला आहे हाही भाग :)
24 Jan 2013 - 7:40 pm | शुचि
असेच म्हणते. मूकवाचकजी अजून येऊ द्यात.
24 Jan 2013 - 9:17 am | चौकटराजा
खरे तर सतार बासरी व संतुर यांचे एकत्र कार्यक्रम व तबकड्या यामुळे सरोद कडे लोकांचा कल कमी आहे पण पडदी नसलेले हे वाद्य फारच अचूक वाजवावे लागते.अर्थात फार कमालीची मींड यात निघू शकते. अमजद अली यांच्या परिचयपर एक माहितीपट पाहिला आहे.त्यांचे वादन " सवाई" त ऐकलेय ! त्यांच्या " यमन" चे श्रवण नुकतेच करून ट़ंकायला बसलो. मला त्यांचे वादन तर आवडतेच पण मी जर स्त्री असतो तर त्यांच्या व्यक्तिमत्वावर आशक झालो असतो इतके ते देखणे, सुसंस्कृत व आटोपशीर आहेत. आपला लेख उत्तम - दोन्ही भाग !
24 Jan 2013 - 9:21 am | पैसा
हाही भाग छान झालाय.
अवांतरः चौ रां नी लिहिलेल्या अमजद अलींच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वावर अभिनेत्री रेखा आशक झाली होती पण त्यांनी तिकडे दुर्लक्ष केले अशा स्वरूपाच्या बातम्या काही वर्षांपूर्वी वाचलेल्या आठवत आहेत.
24 Jan 2013 - 9:31 am | अक्षया
हा ही भाग छानच..:)
24 Jan 2013 - 10:04 am | मोदक
लेखमाला आवडली.
आणखी येवूद्यात....
25 Jan 2013 - 12:06 pm | क्रान्ति
दोन्ही लेख आवडले.
25 Jan 2013 - 2:46 pm | तर्री
२/२ सोडुन
लेखन आवडले . सरोद हया वाद्याची आणि खां साहेबांच्या कुटुंबाची ओळख झाली . आता त्यांच्या कलेची ओळख ३/३ मध्ये करा ही अपेक्षा .25 Jan 2013 - 2:52 pm | बॅटमॅन
तूनळीवर सहज फिरत असताना हे मजेशीर प्रकरण गावलं.
अमजद अली खानसाहेब चक्क जिंगल बेल वाजवायलेत!!