...... प्रकाशाची एक तिरीप थेट त्या गेले सात दिवस माझं लक्ष्य बनलेल्या, मला बेचैन करणार्या, गिधाडासारख्या, निळ्या डोळ्यावर पडली!
आता तुमच्यासमोर मान्य करायला हरकत नाही.. जेव्हा तो अभद्र डोळा माझ्या नजरेला पडला, तेव्हा त्या मरणभीतीचा कणभर स्पर्श मलाही झाला! मणक्यातून एक थंडगार प्रवाह सरकत गेला! त्या खोलीतल्या साचलेल्या काळोखात एकूणएक गोष्ट बुडून गेली होती. तो पलंग, तो म्हातारा, त्याचा चेहरा.. सगळंच. उरला होता तो प्रकाशकिरण आणि तो निळा डोळा..!
मी तुम्हाला आधीही म्हटलं, जेव्हा संवेदना अत्यंत तीक्ष्ण होतात, तेव्हा ते वेडेपणाचं लक्षण ठरवणं हे नेहमीचंच आहे. झालं असं, की मी तो डोळा निरखत असताना अचानकच एक आवाज ऐकू येऊ लागला. दबका, पण तीव्र, अविलंब.. कुठेतरी कापडाच्या गाठोड्यात दडपलेल्या घड्याळाचे ठोके पडत राहावे तसा. मला स्पष्ट ऐकू येत होतं. हा आवाजही मी ओळखला. धडधड.. धडधड... त्या म्हातार्याच्या भीतीचा आवाज होता तो! भीतीने गोठत चाललेल्या त्याच्या हृदयाचा! त्या ठोक्यांच्या आवाजाने मला अधिकच आवेश चढला. जसा ड्रमच्या तालावर एखाद्या सैनिकाला चढतो. अगदी तसाच.
पण तरीही मी किंचितही हालचाल केली नाही. माझ्या हातातला दिवाही तसाच होता. स्थिर. त्या डोळ्यावरून तो प्रकाश किरण हटून कसं चाललं असतं? पण त्याच्या भीतीने त्याचा पूर्णपणे ताबा घेतला होता हे नि:संशय! कारण तो हृदयाच्या धडधडीचा आवाज वाढतच चालला. जलद, अतिजलद. अगदी कोलाहलच होऊ लागलं ते धडधडणं. तुमच्या लक्षात येतंय का? त्या अपरात्री, त्या बंदिस्त खोलीतल्या विकट काळोख्या शांततेत.. मी आणि क्षणाक्षणाला वाढणारा, माझ्या कानांवर आदळणारा तो कोलाहल. धडधड.... धडधड.. धडधड धडधडधडधडधडधड...!!
मला धोका निर्माण झाला होता! त्या भयव्याकूळ हृदयाचा हा आकांत, ही धडधड कोणा शेजार्याने ऐकली असती म्हणजे?? बास!! त्या म्हातार्याचा काळ आला होता!! दातओठ खात, पूर्ण शक्तीनिशी मी उसळी घेतली, माझा दिवा खोलीच्या कोपर्यात भिरकावला, त्या म्हातार्याला आडवं पाडलं आणि.. आणि सगळी ताकद एकवटून त्याचा गळा..!!
........!
आह! किती सहज.. किती सहज माझ्या मनाची शांतता मला परत मिळाली होती. निर्जीव होत जाणार्या त्या निळ्या डोळ्याने अखेरच्या क्षणी माझ्याकडे भयचकित अविश्वासाने पाहिलं होतं. त्या म्हातार्यानेही अखेरच्या क्षणी प्राण वाचवण्याची धडपड केलीच असेल कदाचित.. मला वाटतं एक अस्फूट किंकाळीही फुटली त्याच्या तोंडून. पण मी माझ्या लक्ष्यावरून अजिबात विचलीत झाले नाही. मला बेचैन करत राहणार्या त्या डोळ्याला अखेर मी संपवलंच.
त्या हृदयाचे मंद मंद होत जाणारे ठोके अजूनही ऐकू येत होते. पण त्यांची फारशी फिकीर नव्हती मला. आता ते भिंतीपलीकडे नक्कीच ऐकू गेले नसते. काही क्षणांतच ते थांबले. मी त्या म्हातार्याचं नीट निरीक्षण केलं. त्याच्या हृदयावर हात ठेवून चाहूल घेतली.. शांत झालं होतं आता ते. निष्प्राण झाला होता तो म्हातारा. त्या निळ्या डोळ्याने चालवलेला माझा छळ संपवण्याची मोहीम फत्ते झाली होती!
आता सांगा.. इतक्या काळजीपूर्वक आपलं काम पार पाडणारी व्यक्ती भ्रमिष्ट असेल का? त्या निष्प्राण देहाची व्यवस्था लावताना मी किती सावधगिरी बाळगली हे ऐकलंत की मग तर खात्रीच पटेल तुमची, की तसं अजिबात नाही.
रात्र सरत चालली होती, आणि मला घाई करणं भाग होतं. पण कोणालाही चाहूल लागू न देता. माझं लक्ष त्या लाकडी जमिनीवरच्या फळ्यांकडे गेलं...
...माझं काम पूर्ण होईतो पहाटेचे चार वाजले होते. तिथे काही वावगं आहे हे आता कोणालाही समजलं नसतं. त्या खोलीत कुठेही रक्ताचा ठिपका, एखादा डाग किंवा झटापटीचं चिन्हही नव्हतं, मी तशी काळजी घेतलीच होती. त्यामुळे मी निश्चिंत मनाने श्वास घेतला! वरच्या मजल्यावरच्या माझ्या खोलीत जायला आता हरकत नव्हती.
बाहेर अजूनही अंधारच होता. मी घड्याळाचे टोले ऐकत असताना..
नेमकं त्याच वेळी त्या एकमजली घराच्या दारावर ठकठक झाली. मी त्या खोलीतून बाहेर पडून दार उघडलं, अगदी निश्चिंत मनाने! मला भ्यायचं कारणच कुठे उरलं होतं आता.. दाराबाहेर गणवेशातली तीन माणसं होती. पोलिस खात्यातली. त्यांनी अदबीने मला आपला परिचय दिला आणि सांगितलं की कुणा शेजार्याला काही वेळापूर्वी इथून एक किंकाळी फुटल्याचा आवाज आला, त्याबाबत चौकशी करायला ते आले आहेत.
मी हसून त्यांचं स्वागत केलं.. अर्थातच! त्यांना मी सांगितलं, की कोणतंसं भयप्रद स्वप्न पडल्यामुळे ती किंकाळी माझ्याच तोंडून फुटली असावी. त्यांना मी हेही म्हटलं, की इथे या खोलीत काही दिवसांपूर्वीच राहायला आलेल्या म्हातार्या माणसाला मी फारसं ओळखत नाही, पण तो सध्या कुठेसा बाहेर गेला आहे. अरे हो, मी त्यांना त्याच खोलीत नेलं होतं तपासाची सुरूवात करण्यासाठी..
त्यांनी सगळी खोली नीट पाहिली. माझं अर्थातच त्यांना पूर्ण सहकार्य होतं. त्याच्या सर्व वस्तू जागच्या जागी आहेत हे पाहिल्यामुळे, आणि मुख्य म्हणजे ती किंकाळी कोणाची हे कळल्यामुळे त्यांचं समाधान झालेलं दिसलं. अशा अवेळी तपास करण्यासाठी बाहेर पडावं लागत असण्याबद्दल मी सहानुभूती व्यक्त केली आणि त्यांनी काही वेळ इथे या खोलीत बसून विश्रांती घ्यावी असं सुचवलं. बोलता बोलता मी चार खुर्च्याही मांडल्या. अगदी त्याच तीन फळ्यांच्या वर.
आता सांगा.. माझ्या वागण्यामुळे ते अगदी नि:शंक होणं स्वाभाविक नव्हतं का? त्यांच्या सर्व प्रश्नांना मी सुसंगत उत्तरं दिली होती. त्यांचा तपास सहज पूर्ण होऊ शकला होता. हळूहळू त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. पण मला मात्र आता दमल्यासारखं वाटत होतं. आता ते तिघं गेले तर बरं असं माझ्या मनात येऊ लागलं. माझं डोकं दुखू लागलं, कानात ठोके पडताहेतसं वाटू लागलं. त्या ठोक्यांकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून मी त्यांच्याशी बोलणं सुरूच ठेवलं. पण ते थांबेनात. वाढतच राहिले. अधिकाधिक स्पष्ट होत राहिले. त्यांचा आवाज.. दबका, पण तीव्र, अविलंब.. कुठेतरी कापडाच्या गाठोड्यात दडपलेल्या घड्याळाचे ठोके पडत राहावे तसा. मला घुसमटल्यासारखं होऊ लागलं. एकाएकी माझ्या लक्षात आलं! ते ठो़के माझ्या कानात पडतच नव्हते...! ....?
... निळ्या डोळ्याचा तो म्हातारा!
माझी अस्वस्थता पराकोटीची वाढली. मला धोका निर्माण झाला होता! त्या हृदयाची ही धडधड पोलिसांनी ऐकली असती म्हणजे..? निघून का जात नाहीत ते? मी माझं बोलणं सुरूच ठेवलं - अधिक मोठ्या आवाजात. पण ते ठोके त्यावरही मात करून माझ्या कानांवर आदळत राहिले.
ठोके.. माझी बडबड.. ते ठोके.. आणि माझी बडबड..! त्या पोलिसांना मात्र काहीही ऐकू येत नव्हतं.. ते गप्पा मारत होते. ते हसत होते. ते माझी अस्वस्थता, ती धडधड कशाकडेही लक्ष देत नव्हते. मी त्या खोलीत येरझार्या घालायला सुरूवात केली. त्या पोलिसांचं त्या धडधडीकडे का लक्ष जात नव्हतं हे मला कळत नव्हतं! त्यांना खरंच ऐकू येत नव्हतं? का ते फक्त तसं दाखवत होते? काय करावं मला कळेना. एकीकडे माझ्या कानात ऐकू येणारे ते ठोके आणि त्याचवेळी त्या पोलिसांची सुरू असलेली बातचीत. हास्यविनोद. ही काय तर्हा झाली?
एकाएकी माझ्या लक्षात आलं! त्यांना संशय आला होता! नक्कीच त्यांना कळलं होतं! ते माझ्यावरच हसत होते! होय. खात्रीच झाली माझी. मला वेड्यात काढणार्या त्या हसण्याहून मला दुसरं काहीही चाललं असतं. माझ्या या उपहासापेक्षा दुसरं काहीही सहन झालं असतं. ते ढोंगी हसणं मला अधिक सहन होईना! जोरात किंचाळावं अन्यथा माझा जीवच जाईल असं मला वाटत होतं.
आणि अखेर मी किंचाळलेच!
'बास!! पुरे झालं ढोंग! त्या फळ्या काढा.. त्याच. त्या तीन. नीट बघा तिथे. मीच त्या म्हातार्याचा गळा दाबला. त्याच्या देहाचे लहानलहान तुकडे केले. ते पहा त्या फळ्यांखाली आहेत ते.. आणि तिथेच आहे तेही अजून. त्या म्हातार्याचं ते धडधडत असलेलं अभद्र हृदय! भ्रमिष्ट म्हणे..!!'
(संपूर्ण)
------------------------------------------------------------------
एडगर अॅलन पो या १९व्या शतकातल्या लेखकाची "The Tell-Tale Heart" ही मूळ कथा. क्लासिक्स मध्ये गणल्या जाणार्या या कथेचं एक
आगळं वैशिष्ट्य असं की खून करणारी व्यक्ती पुरुष आहे की स्त्री हे यात कुठेही स्पष्ट होत नाही.
(शेवटात मूळ कथेनुरूप आता बदल केला आहे.)
प्रतिक्रिया
20 Feb 2013 - 12:12 am | श्रीरंग_जोशी
शेवटाला पोचेपर्यंच मलाही धडधडू लागलं होतं.
लेखणीत ताकद आहे तुमच्या!!
20 Feb 2013 - 12:42 am | अग्निकोल्हा
यातुन कोणाचीच सुटका नाही न तुमची ना माझि ना इतर कोणाची :) By all mean ;)
20 Feb 2013 - 1:34 am | अपूर्व कात्रे
गोष्ट आवडली.
मुळच्या इंग्रजी कथेत खुनी स्त्री आहे कि पुरुष हे कळत नसले तरी "पण मी माझ्या लक्ष्यावरून अजिबात विचलीत झाले नाही." या ओळीमुळे इथे ती खुनी व्यक्ती स्त्री असल्याचे लक्षात येते.
20 Feb 2013 - 7:31 am | ५० फक्त
अनुवाद आवडलं, आपला शब्दसंग्रह उत्तम आहे,
20 Feb 2013 - 9:18 am | प्रचेतस
एका सुरेख गूढकथेचा तितकाच समर्थ अनुवाद.
20 Feb 2013 - 9:24 am | पैसा
भावानुवाद पण एकदम मस्त झालाय!
20 Feb 2013 - 9:31 am | अक्षया
भयकथा आवडली. लिखाण शैली प्रभावी. :)
20 Feb 2013 - 9:45 am | तिमा
कथा खिळवून टाकणारी. अनुवाद संपन्न भाषेत.
मिपावरच्या दमदार लेखकांत तुमचं नांव घेतलं जाईल यापुढे.
20 Feb 2013 - 12:36 pm | मूकवाचक
पुलेशु आणि पुलेप्र
Roald Dahl यांच्या एखाद्या लघुकथेचा असा शैलीदार अनुवाद मिपावर कराल?
(दुवा: http://en.wikipedia.org/wiki/List_of_Roald_Dahl_short_stories)
20 Feb 2013 - 1:31 pm | इनिगोय
जरूर, शक्य झालं तर नक्की करेन एखादा अनुवाद. :)
20 Feb 2013 - 4:00 pm | अभ्या..
जरुर कर इन्नातै. हे पण सुरेख जमलेय अगदी. त्या सल्ल्याबद्दल मुवाचे पण आभार.
येऊ देत असे सुरेख अनुवाद.
20 Feb 2013 - 9:47 am | ऐक शुन्य शुन्य
शेवटपर्यंत खिळवुन ठेवले...
20 Feb 2013 - 9:54 am | किसन शिंदे
जबरदस्त झालाय अनुवाद! शेवटचं वाक्य एकदम अनपेक्षित होतं.
20 Feb 2013 - 10:33 am | गवि
उत्तम आहे अनुवाद. सात रात्री त्या दिव्याची ति रीप डोळ्यात का टाकली? की मला काहीही कळलं नाही?
21 Feb 2013 - 3:17 am | रेवती
सहमत, मलाही नाही कळली कथा.
21 Feb 2013 - 3:21 am | शुचि
अगं सिव्हीअर मनोरुग्णाच्या दृष्टीकोनातून लिहीली आहे कथा.
21 Feb 2013 - 9:04 pm | इनिगोय
तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलंय खाली..
20 Feb 2013 - 12:08 pm | सस्नेह
उत्तम अनुवाद व शैलीदार ल्र्खन.
और आने दो..
20 Feb 2013 - 12:08 pm | सस्नेह
शैलीदार लेखन..असे वाचावे
20 Feb 2013 - 12:12 pm | परिकथेतील राजकुमार
ह्या वाक्यानी स्त्री असावी असे वाटते. ;)
20 Feb 2013 - 12:32 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
ओ इनितै घबारलो ना.... :(
20 Feb 2013 - 12:39 pm | बॅटमॅन
मूळ कथेचं माहिती नाही, पण भाषांतरच आहे का? असे वाटण्याइतपत वरिजिनॅलिटी जाणवतेय. शैली तर एक नंबर थरारक आहेच!!
20 Feb 2013 - 1:24 pm | आदिजोशी
अनुवाद आहे सांगितलं नसतं तर कळलंही नसतं.
20 Feb 2013 - 1:26 pm | इनिगोय
कथा भाषांतरित करताना काही तपशील वगळले होते. मात्र त्यामुळे परिणामकारकता कमी होत आहे, असं काहींनी सुचवलं.
त्यानुसार आता कथा काहीशी बदलली आहे. रुचते का पहा.. :)
20 Feb 2013 - 1:29 pm | किसन शिंदे
सहमत.
कथेचा शेवट पुर्वीपेक्षा जास्त भयावह वाटतो.
20 Feb 2013 - 3:00 pm | नानबा
कमाल... प्रचंड खिळवून ठेवतं तुमचं लिखाण... सॉलिड आवडलं...
पुभाप्र.
20 Feb 2013 - 3:14 pm | स्मिता.
आधीच्याच भागावर लिहिलं होतं की हे भाषांतर अजिबात वाटत नाहीये इतकं छान जमलंय. शेवटपर्यंत थरार कायम होता.
लेख काल रात्री मोबाईलवर हा धागा वाचला होता. आधीच्यापेक्षा आताचा शेवट जास्त परिणामकारक आणि स्पष्ट वाटतोय.
20 Feb 2013 - 3:56 pm | प्रसाद१९७१
अखेर मी किंचाळलेच!>> स्री असावी. का तुम्ही अनुवाद करताना केले आहे चुकुन. तुमच्या मनातले बाहेर आले.
21 Feb 2013 - 8:15 pm | इनिगोय
प्रसाद, अनुवाद करताना तो बदल मी जाणीवपूर्वक केला.
एडगरची मूळ इंग्रजी कथा वाचताना हे पहिल्या वाचनात लक्षात येत नाही. तीच कथा मराठीत सांगताना क्रियापदांच्या वापरातून ते स्पष्ट करणं सोपं गेलं असतं. पण तरीही संपूर्ण अनुवादात फक्त दोनच ठिकाणी खुनी एक स्त्री आहे हे सुचवलंय. कारण मिपाच्या वाचकांसाठी अर्धी कथा झाल्यानंतर ती व्यक्ती स्त्री आहे, हे कळणं जास्त धक्कादायक ठरेल, असं वाटलं.
20 Feb 2013 - 5:13 pm | सानिकास्वप्निल
दी हार्ट स्टील टेल्स दी टेल :)
मस्तचं लिहिले आहेस :)
20 Feb 2013 - 9:06 pm | कानडाऊ योगेशु
च्या ऐवजी
"अखेर माझ्या तोंडुन किंकाळी बाहेर पडलीच!" असे केले तर?
20 Feb 2013 - 9:24 pm | तुमचा अभिषेक
एकच काय तो प्रसंग, पण कमालीचा वेगवान.. अजूनही धडधडतेय हृदय..
21 Feb 2013 - 2:15 am | कवितानागेश
अरे बापरे!
21 Feb 2013 - 2:18 am | शुचि
एडगर्ड अॅलन पो ची असावी अशी शंका आलीच होते.
अशाच धाटणीची गाय द मोपासा ची कथा परवा वाचली.
____________________
थरारक आहे कथा. उत्तम अनुवाद.
21 Feb 2013 - 9:01 pm | इनिगोय
कथेच्या अनुवादाचा हा माझा पहिलाच प्रयत्न!. त्याला इतका उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं छान वाटतंय :) सगळ्या वाचकांचे आभार..
एडगरच्या मूळ कथेत सगळा भर त्या व्यक्तीच्या विक्षिप्तपणावर आहे. ती व्यक्ती 'मी विक्षिप्त नाही' हे सिद्ध करण्यासाठी जे जे करते, त्यातूनच तिच्या हातून गुन्हाही घडतो, त्याच भरात ती त्याची कबुलीही देते, आणि स्वतःचा वेडसरपणाही सिद्ध करते. संपूर्ण कथेत अगदी म्हणजे अगदी इतकंच ठसवलं आहे.
या विक्षिप्त व्यक्तीसाठी केवळ तीनच गोष्टी खर्या आहेत - तो एकच निळा डोळा, आठव्या रात्री ऐकू आलेली धडधड आणि स्वतः भ्रमिष्ट नसल्याचं सिद्ध करणं. किंबहुना या व्यक्तीच्या लेखी त्या निळ्या डोळ्याचं त्या म्हातार्यापासून पूर्ण स्वतंत्र असं अस्तित्त्व आहे.. मरत असताना त्या म्हातार्याने नेमकं काय केलं हेही लक्षात राहू नये, इतका तो म्हातारा तिच्यासाठी बिनमहत्त्वाचा आहे. त्यासाठीच सात रात्री - तो डोळा उघडा दिसला तर नष्ट करावा या हेतूने - ती व्यक्ती त्या खोलीत जाते. तो दिसत नाही, म्हणून मग म्हातार्याला मारणं अपरिहार्य होतं. त्यातच आठव्या रात्री घडलेल्या प्रसंगांमुळे तो नाईलाज अगदीच ठळक होतो, आणि खून होतो.
अतिसंवेदनशीलता, बोलण्यातली विसंगती, तर्कहीन विचार, भ्रम, ही आणि अशी पॅरानॉइयाच्या रुग्णाची लक्षणं एडगरने या व्यक्तीमध्ये दाखवली आहेत. सुरूवातीला त्या डोळ्याला म्हातार्यापासून वेगळं समजणारी ही व्यक्ती अखेरीस त्याच्या सगळ्या अवयवांनाच कल्पनेतलं स्वतंत्र अस्तित्त्व बहाल करते. आणि त्यामुळेच ते मृत्यूनंतरही धडधडत असलेलं हृदयही त्याला खरंच वाटतं.
या कथेबाबत जालावर उपल्ब्ध असलेलं विश्लेषण आणि तिचे लावले गेलेले विविध अन्वय हेही तितकेच रोचक आहेत.
22 Feb 2013 - 6:56 pm | प्यारे१
समर्थ कथा नि तितकाच समर्थसुंदर अनुवाद....!