चित्रपट्टीसाठी अभ्याचे आभार!
~~~~
विजयगढमधल्या आपल्या महाली क्रूरसिंह नाजिम आणि अहमद या आपल्या ऐयारांबरोबर बोलत होता.
"नाजिम, या हरामखोर जयसिंह महाराजांनी आमची कोंडी केली आहे. त्यांना आपल्या मंत्र्याच्या मुलाशी सोयरीक करायची इच्छा नाही. बरं चंद्रकांताही त्या मूर्ख वीरेंद्रसिंहावर भाळली आहे. चंद्रकांताला पळवून कुठे नेलं तर बाबांचे हाल या जयसिंगाच्या राज्यात कुत्रा खाणार नाही. काय करावं सांग!"
"सरकार, आम्हाला ऐयारीच्या संथेत गुरुंनी शिकवलं होतं - जेव्हा एकाच वेळी अनेक शत्रू चालून येतात, तेव्हा सगळ्यांशी एकत्र लढायला जायचं नाही. प्रत्येक शत्रूशी स्वतंत्र लढायचं." नाजिम कावेबाजपणे म्हणाला.
क्रूरसिंहने वैतागून हात आपटले. "अरे बोलायला ठीक असतं रे सगळं. पण करणार कसं?"
अहमद पुढे सरसावला, "सरकार, आमच्याकडे एक योजना आहे. प्रथम आपण वीरेंद्रसिंह आणि त्याचा तो ऐयार साथीदार तेजसिंह यांचा खातमा करू. मग मोका मिळेल तसं राजा जयसिंहाला कारावासात टाकू. मग गादी तुमचीच, आणि चंद्रकांतासुद्धा!"
क्रूरसिंह अविश्वासाने त्या दोन कपटी ऐयारांकडे पहात राहिला. तो त्यांना चांगलंच ओळखून होता. या योजनेत काहीतरी मेख असणार याची त्याला खात्री होती. त्याने शंका काढली, "पण राज्यातले नागरिक मला राजा म्हणून स्वीकारतील का?"
"ते तुम्ही आमच्यावर सोडा, सरकार" नाजिम म्हणाला. "आपल्या राज्यात मुसलमान जास्त आहेत. त्यांना मी तुम्हाला राजेपद देण्याची शपथ देऊ शकतो. पण…"
"पण तुम्हाला राजेपद मिळवण्यासाठी मुस्लिम धर्म स्वीकारावा लागेल." अहमदने फासा टाकला. "तसं वचनपत्र दिलंत तरच लोकांचा विश्वास बसेल."
क्रूरसिंहाचे डोळे लकाकले. "हात्तिच्या, एवढंच ना? हे दिलं मी वचनपत्र!" असं म्हणत क्रूरसिंहाने लागलीच वचनपत्र खरडून ते नाजिमच्या हवाली केलं. "अजून काही?"
"तुम्हाला राज्य मिळाल्यावर तुम्ही आम्हां दोघांना वजिरी द्याल, असंही एक वचनपत्र द्यावं सरकार!" अहमद म्हणाला.
"अरे, एकदा राज्यपद मिळाल्यावर तुमच्यासारखे कर्तबगार लोक हवेच आहेत आम्हाला! हे घे वचनपत्र…" क्रूरसिंहाने दुसऱ्या वचनपत्राचा खलिता त्यांच्या हवाली केला. "पण तेवढं ते चंद्रकांताचं…"
"काळजी नको सरकार!" नाजिम आणि अहमद उभे रहात म्हणाले. "आम्ही आता जातो. संध्याकाळची वेळ आहे - राजकुमारी चंद्रकांता आणि तिची ती सखी चपला राजवाड्याबाहेरच्या वाटिकेत आल्या असतील. वीरेंद्राचा ठावठिकाणा त्यांना माहीत असेल तर त्याबद्दल त्या बोलतीलच. आम्ही आहोत त्यांच्या पाळतीवर. आज्ञा असावी!"
लहान होत जाणाऱ्या त्यांच्या आकृत्यांकडे पहात क्रूरसिंह तुच्छतेने थुंकला. वचननाम्यांना त्याच्यालेखी कवडीची किंमत नव्हती. स्वार्थापुढे सगळं क्षुद्र होतं त्याला.
(क्रमशः)
प्रताधिकाराविषयक खुलासा:
सदर लेखन हा श्री. देवकीनंदन खत्री यांच्या "चंद्रकांता" कादंबरीचा स्वैर अनुवाद आहे. मिसळपाव डॉट कॉमच्या वाचकांना या कलाकृतीचा आनंद घेता यावा या हेतूने हा अनुवाद करीत आहे. यात कोणाचाही कोणताही व्यावसायिक हेतू नाही.
प्रतिक्रिया
19 Apr 2013 - 12:38 pm | मुक्त विहारि
जमेल तसे लिहा..
19 Apr 2013 - 2:44 pm | अभ्या..
बाळासाहेब भारी जमत्तेय.
तुम्ही आधीच दिलेय कारण पण भाग थोडे मोठ्ठे घ्या ना प्लीज. दोनतरी प्रसंग घ्या एका भागात.
शुभेच्छा.
19 Apr 2013 - 3:28 pm | आदूबाळ
अभ्या यापुढचे भाग मोठे आहेत. आय प्रॉमिस!
19 Apr 2013 - 3:57 pm | पैसा
माझी आवडती सीरीयल होती. कथेला न्याय असो नसो, ते मूर्ख ऐय्यार वगैरे भारीच होते!
भाग मोठा पाहिजे याबद्दल सहमत!
अभ्या, चित्रपट्टी एकदम सुंदर झालीय!
19 Apr 2013 - 10:35 pm | श्रीरंग_जोशी
वर्णन आवडले. अन अभ्याच्या चित्राने चार चंद्र लावले आहेत.
'चपला' हे नाव फारच विचित्र वाटते. मराठीकरण करताना चपळा जरा अधिक शोभून दिसले असते.
त्या मालिकेत सब्या असे काहीसे नाव होते राजकुमारी चंद्रकांताच्या सखीचे.
19 Apr 2013 - 11:56 pm | प्यारे१
चपला म्हणजे 'वीज' (आकाशात चमकते ती)
मराठीत हा शब्द आहे.
मोठे भाग टाका बाळासो!
20 Apr 2013 - 12:05 am | लाल टोपी
मालिकेत हळू हळू रंग भरत आहेत.
20 Apr 2013 - 2:04 am | निनाद मुक्काम प...
मोठे मोठे भाग टाका की राव
20 Apr 2013 - 2:00 pm | सस्नेह
कथानक आकार घेत आहे..
अभ्याचे चित्र आवडले. पण जरा मोठे हवे.