चंद्रकांता - १.३ - बगिचातला दगाफटका

आदूबाळ's picture
आदूबाळ in जनातलं, मनातलं
24 Apr 2013 - 9:54 pm

Chandrakanta
(चित्रपट्टीसाठी अभ्याचे आभार!)

यापूर्वी:
चंद्रकांता - १.१ - नजरकैदेतली राजकन्या
चंद्रकांता - १.२ - मदांध आणि सत्तांध
~~~~~

त्याच संध्याकाळची गोष्ट. चंद्रकांता, चपला आणि चंपा उद्यानात विहार करत होत्या. मावळतीच्या बाजूच्या घनदाट अरण्यात सूर्य बुडत चालला होता. पश्चिमवाऱ्याच्या झुळुका फुलांच्या ताटव्यांना हळुवार गोंजारत होत्या. मंदसा सुगंध चित्तवृत्ती उल्हसित करत होता. चातुर्यमाधुरी चपला आपल्या सखीच्या, चंद्रकांताच्या हातात विविध गंधांची फुलं देत होती, पण चंद्रकांताच्या सुकुमार चेहेऱ्यावर म्लानी पसरली होती. वीरेंद्रसिंहाच्या विरहाने तिचं चित्त कशातच लागत नव्हतं. तिच्या मरगळलेल्या मनाला उभारी यावी म्हणून तिच्या सख्या तिला बळेच वाटिकेत घेऊन आल्या होत्या. शेवटी चपलाने चंपाला विविध फुलांचा गुच्छ बनवण्यासाठी धाडलं, आणि स्वतः चंद्रकांताबरोबर वाटिकेतल्या कारंज्याच्या कठड्यावर जाऊन बसली.

थुईथुई नाचणारे कारंज्याचे तुषारही आज चंद्रकांताच्या मनावर काहीच परिणाम करत नव्हते. तुषारांमुळे निर्माण झालेल्या पाण्याच्या प्रभावळीत तिला कधी वीरेंद्राचे पिळदार बाहू दिसत तर कधी त्याचा उमदा चेहेरा दिसे. क्षणात कारंजे रूप पालटे आणि तिला आपल्या भासाचे क्षणैकत्व जाणवून येई. दोन घटिका अशाच गेल्या.

"चंपा कशी परतली नाही अजून?" चपलाने इकडेतिकडे पहात पृच्छा केली.
"असेल कुठे इकडेतिकडे. येईलच एवढ्यात. ती पहा येते आहे." चंद्रकांताने चंपाला हात केला.
चंपाच्या चालीतला सूक्ष्म फरक चपलाच्या तरबेज ऐयारी डोळ्यांमधून निसटला नाही.

चंपाने हातातला गुच्छ चंद्रकांताच्या हातात दिला आणि म्हणाली,
"राजकुमारी, कित्ती सुंदराय नै हा गुच्छ! आत्ता इकडे वीरेंद्रसिंह असते, तर त्यांनी माझं कौतुक करून वर काही इनाम दिलं असतं मला!"

इतका वेळ चंद्रकांताने रोखून ठेवलेला आसवांचा बांध प्रियकराच्या उल्लेखाने फुटला. तिचे डोळे भरून आले आणि दोन चुकार अश्रू गालांवर सांडले.
"काय लिहिलंय माझ्या नशिबांत कुणास ठाऊक! कोणत्या जन्माची पापं भोगते आहे मी? वीरेंद्राचं नाव ऐकताच बाबा खवळून उठतात. त्या मेल्या कुपथसिंह मंत्र्याने त्यांचे कान भरले आहेत. त्याचा तो दिवटा क्रूरसिंह! डामरट मेला, सारखा मागेमागे करतो. मी एकदा वीरें…"

एकाएकी चपलाने चंद्रकांताचा हात दाबला. चंद्रकांताला इशारा समजला आणि ती गप्प झाली.

"चंपा, त्या तिथे माझा रुमाल पडला आहे बहुतेक, घेऊन येतेस?" दूर झाडाकडे हात करत चपला गोड स्वरांत म्हणाली. चंपा रुमाल शोधायला गेली.

ती ऐकण्याच्या टप्प्याबाहेर जातांच चपला चंद्रकांताला दबक्या आवाजात म्हणाली,
"राजकुमारी, ही चंपा नव्हे. तुम्ही काही बोलू नका, आणि मला अडवू नका."
आपल्या ऐयारी बटव्यांतून एक पूड काढून चपलाने आपल्या कानांत घातली. इतक्यांत चंपा परतली.

"चपला, तिथे तर रुमाल…"
"अगं ते सोड. रडवलंस ना आपल्या कोमल राजकन्येला! बरं ऐक. राजकुमारीसाठी 'ते' आणलंस का?"
"ते?" चंपा कोड्यात पडली.
"ते गं", चपला डोळ्यांची खुबीदार हालचाल करत म्हणाली, "आपलं कालच बोलणं झालं होतं ना रात्री… विसरलीस ना?"
"अं… नाही नाही…" चंपा सटपटली "विसरेन कशी? चांगलं ध्यानांत आहे माझ्या…"
"सांग पाहू मला. अंहं … मोठ्याने नाही, कानांत सांग!" असं म्हणून चपलाने आपला कान पुढे केला.

आपले मुख चपलाच्या कानाशी नेतांच चंपा बेशुद्ध पडली! त्या चलाख ऐयाराने आपला कान बेशुद्धीकरणाच्या भुकटीने भरला होता!

"अगं ही खरंच चंपा तर…"
"काळजी करू नका राजकुमारी!" चपला आत्मविश्वासाने म्हणाली आणि बेशुद्ध चंपाचं तोंड तिने कारंज्यात बुडवून खसाखसा पुसलं.

आणि काय आश्चर्य! त्याजागी नाजिमचा चेहेरा साकार होऊ लागला!

"याचं हे साहस?!" चंद्रकांता आश्चर्याने म्हणाली.
"साहस नाही, राजकुमारी, दुःसाहस म्हणा. असा धडा शिकवते मुडद्याला की आयुष्यभर लक्षात ठेवेल!"
चपलाने सात्विक संतापाच्या भरात केलेल्या उक्तीतल्या विरोधाभासाने चंद्रकांताच्या चेहेऱ्यावर प्रथमच हसू उमललं. परंतु ते पहायला चपला जागेवर नव्हती. बेशुद्ध नाजिमच्या केसांना धरून तिने त्याला फरपटत एका बुरुजाकडे नेलं आणि तिथल्या एका गुप्त बळदाचं दार उघडलं.

मुसक्या आवळलेल्या नाजिमला चाबकाच्या फटक्यांखाली बोलतं करायला चपलाला वेळ लागला नाही. त्याने खऱ्या चंपाला बेशुद्धीकरणाची भुकटी हुंगवून तिची वस्त्रं धारण केली होती. वीरेंद्रसिंहाचा भेद काढण्यासाठी क्रूरसिंहाच्या सांगण्यावरून तो आला होता हे त्याने कबूल केलं. चाबकाच्या धाकामुळे घाबरून त्याने क्रूरसिंहाला चार शेलक्या शिव्याही घातल्या!

चपला त्वरेने जाऊन खऱ्या चंपाला उठवून घेऊन आली. कपटी नाजिमला रज्जुबंध अवस्थेत तसंच बळदांत सोडून तिघीही राजमहालाकडे वळल्या. राजमहालाच्या सुरक्षा यंत्रणेवरचा चपलाचा विश्वास उडाला होता.

प्रताधिकाराविषयक खुलासा:
सदर लेखन हा श्री. देवकीनंदन खत्री यांच्या "चंद्रकांता" कादंबरीचा स्वैर अनुवाद आहे. मिसळपाव डॉट कॉमच्या वाचकांना या कलाकृतीचा आनंद घेता यावा या हेतूने हा अनुवाद करीत आहे. यात कोणाचाही कोणताही व्यावसायिक हेतू नाही.

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

पैसा's picture

24 Apr 2013 - 10:39 pm | पैसा

हा पण भाग छान झालाय! पु.भा.प्र.

श्रीरंग_जोशी's picture

24 Apr 2013 - 10:41 pm | श्रीरंग_जोशी

हेच म्हणतो.

लेखनशैलीमुळे अन ती मालिका पाहिल्यामुळे डोळयासमोर अगदी स्पष्ट चित्र उभे राहत आहे.

जुइ's picture

25 Apr 2013 - 2:56 am | जुइ

वाचत आहे.

कोमल's picture

25 Apr 2013 - 10:17 am | कोमल

पू.भा.प्र.
लवकर येउद्या...

सस्नेह's picture

25 Apr 2013 - 3:12 pm | सस्नेह

पुढचे भाग वाचण्याची उत्सुकता बळावली आहे..

अग्निकोल्हा's picture

26 Apr 2013 - 12:37 am | अग्निकोल्हा

नाव फारच छान आहे.

श्रीरंग_जोशी's picture

26 Apr 2013 - 12:40 am | श्रीरंग_जोशी
गणामास्तर's picture

26 Apr 2013 - 11:43 am | गणामास्तर

मस्त चाललायं अनुवाद एकदम. मजा येतेय वाचायला.

येउद्या पटापट..

अभ्या..'s picture

27 Apr 2013 - 5:05 pm | अभ्या..

बेस्ट बेस्ट बाळासाहेब. आत्ता लागला बघा सूर मस्तपैकी.
येउंद्या बिगिबिगि.