प्रमादाच्या पथावर
वर्तमानाला फक्त प्रयासांच्या परिभाषा अवगत असतात. प्रयत्नांच्या वाटेवर पडलेल्या पावलांच्या पदरवास तो प्रतिसाद देतो. असं असलं तरी सगळ्यांनाच त्याला साद घालणे जमते असे नाही. काळाचे हात धरून चालणे जमले, तरी जुळवून घेणे जमेलच याची शाश्वती नसते. कळत-नकळत काहीतरी घडतं-बिघडतं अन् मांडलेला खेळ मोडतो. उन्हाच्या झळांनी माळाचं हिरवंपण हरवून जावं अन् बहरलेलं झाड डोळ्यादेखत वठून जावं, तसं सगळं शुष्क होत जातं. दिसामासांनी काया करपून जाताना विसकटत जातात डवरलेल्या झाडाचे सगळे संभार. एकेक करून पानं डहाळीवरून निरोप घेतात अन् भरकटत राहतात दिशाहीन. वारा नेईल तिकडे. मागे उरतात श्रीमंती हरवलेल्या डहाळ्या.