स्मरण चांदणे ४
गाव कधी वसले याची निश्चित माहिती नाही.
कुठुनतरी स्थलांतरीत झालेल्या ब्राम्हण कुटुंबांनी इथे स्थायिक झाली असावीत.आमच्या पुर्वजांना देशमुखी कुणी दिली ,केव्हा मिळाली माहिती नाही. माझ्या आठवणीत आडगावशिवाय इतर काही गावात पण शेती होती. काहीही असो या ठिकाणी वस्ती करण्यात देशमुख मंडळीनेच पुढाकार घेतला असावा असे मानावयास जागा आहे.कारण गावाचे केंद्रस्थानी,मध्यभागी चौकोनात देशमुखांची घरे आहेत.ही देशमुख गल्ली.
सुरुवातीस साधी घरेअसावित.कालांतराने त्यातील सधन लोकांनी चिरेबंदी वाडे बांधले .अजूनही ब-यापैकी मजबूत असलेला आमचा वाडा शंभरवर्षापूर्वी बांधला होता म्हणे.देशमुख गल्लीचे मधोमध मोठे पटागंण आहे .तेथे दगडी बांधकाम असलेला पाण्याचा आड.
पूर्वी याचे चारी बाजूला रहाट होते. दिवसभर कुणी ना कुणी पाणी शेंदत असे. उन्हाळ्यात तर रात्री बेरात्री पण आडावर गर्दीअसे.पाणी तळाशी गेलेले.खरडून खरडून पाणी काढायची कसरत असे.
देशमुख गल्लीच्या आजूबाजूला हळूहळू इतर लोकांची घरे झाली असावीत.लगतचे परीघात मराठी ,माळी, मारवाडी ,सोनार ,शिंपी, कासार ,सुतार आदी आणि त्या पलीकडे,बाहेरच्या बाजूला, गावाचे टोकाला चारी बाजूनी चांभार,वडार,कैकाडी,न्हावी इ.चीघरे.
वेगवेगळ्या वस्त्या,गल्ल्या.ही पूर्वीची व्यवस्था. काळासोबत त्यात बदल होऊन गावाची वाढ होताना हे स्तर नाहीसे झाले.पण मुळ ढाचा कायम आहे. तीन चार हजार लोकसंख्येचे गाव.भिन्न जाती,भिन्न संस्कार,आणि स्वभावाचे,त-हेत-हेचे लोक.कुठेही आढळतात तशा कुरबुरी,वाद,भांडणे,याला गाव अपवाद नाहीच.
कुचाळक्या करणारे कालगती लाऊन मजा पाहणारे,
किरकोळ कारणावरून हातघाईवर येणारे,वर्षानुवर्षे कोर्टकचे-यात घालवणारे अनेक होते.तरीही गावात टोकाचा विसंवाद नव्हता.कारण बहुतांशी लोक सोशीक ,आणि 'ठेविले आनंते तैसैचि राहावे' वृत्तीचे.
पंढरी,आळंदीचीची वारी नेमाने करणारेअनेक.माळकरी.
कित्येक वर्षांपासून गावात दिवाळीचे आधी नामसंकिर्तन सप्ताह उत्साहात होत असे. त्याचे नियोजनासाठी एक समिती ठरलेली.ते गावातून वर्गणी गोळा करत. बाहेरून किर्तनकारांना निमंत्रण दिले जाई. मृदंगवाजवणारे वीणेकरी टाळकरी पण येत. त्यांच्या निवासा सोबतच, सकाळचा फराळ,दुपारचे रात्रीचे जेवणाच्या पंगती, चहापाणी इ.चे चोख नियोजन असे.गावातील लोक स्वखुषीने ही सेवा देउन पंगतीचा भार उचलत सात दिवस गावात कार्यक्रमांची रेलचेल असे. अनेक वर्षे ,समाप्तीला काल्याचे किर्तन पुरुषोत्तमपुरीचे वै.लक्ष्मण बुवांचे असे.शेवटी भंडारा होई.वरणभात आणि नुक्ती हा बेत ठरलेला असे.
नुक्तीसाठी किती पोते साखर गाळली,यावर कार्यक्रमाचे यशापयश ठरे.अजूनही गावात सप्ताहाची परंपरा सुरू आहे. कालानुरूप बरेच बदल झाले आहेत.काही चांगले, आणि काही नकोसे पण!उत्साह वाढलाय, स्वरूप
भव्य झाले आहे. पण गटबाजी अन राजकारण पण शिरलंय. कीर्तनकार कोण बोलवायचे यावर वाद होतात.भक्तिरसात पेक्षा हास्य रसाची फोडणी देणारे किर्तन कार लोकप्रिय ठरू लागले आहेत. अर्थात ख-या भाविकांना त्याच्याशी घेणेदेणे नाही. 'ज्ञानोबामाऊली ,
तुकाराम'च्या गजरात त्यांना परमसुख मिळत असते.
चातुर्मासात व उन्हाळ्यात रात्री वेगवेगळ्या मंदिरात ज्ञानेश्वरी,हरीविजय,पांडव प्रताप,नवनाथ,इ.पोथ्या सुरू असत.एक जण पोथी वाचणारा व दुसराअर्थ सांगणारा अशी जोडी असे.श्रोतावर्गात मुख्यत्वे बायाबापड्या.
सगळेच परमार्थाच्या हेतूने येत असे नाही प्रत्येकाचे आपापले उद्देश!श्रवणभक्ती सोबतच कामाच्या रगाड्यातून फुरसतीचे क्षण मिळत हे महत्वाचे.
गप्पा,गावगप्पा,घरच्यांचे, शेजा-याचे गा-हाणे,
चुगल्या,अशा खाजगी गप्पा आणि कानगोष्टी साठी यापेक्षा उपयुक्त जागा आणि वेळ कुठे मिळणार?आणि हो ,कापसाच्या वाती ही वळून व्हायच्या.
रामायणाची पोथी सुरू असताना कांही लोक चवदा दिवस गाव सोडून बाहेर गावी भटकायचे.रामाच्या वनवासाचा किंचित अनुभव घेण्याचा प्रयत्न!अर्थात
त्याचेही नियम असत.या काळात नेहमीचे कपडे न वापरता,गोणपाटाचे कपडे घालायचे,कुणाच्या घरीथांबायचे,झोपायचे नाही,शक्यतो रानात,फारतर देवळात झोपायचे,मिळेल ते खायचे,धुम्रपान,मद्यपान करायचे नाही,हे मुख्य. अजुन ही काही असतील. त्यातले किती पाळले जात असतील ते त्या 'वनवासींना'व प्रभुरामालाच ठाऊक!अनेकदा या मंडळीला चोर दरोडेखोर समजून गावकऱ्यांनी प्रसाद दिल्याच्या घटनाही कानावर येत.एक॔दरीत वनवास सुखाचा नसे.
रामायणात लक्ष्मण शक्तीचे कथानक महत्वाचे.कारण ती,मुख्यत्वे महाबली हनुमानाच्या पराक्रमाची कथा आहे.हनुमान तर सर्वांचे आवडते,लाडके! मुलांचे जास्त.
आणि एके दिवशी,हातातली गदा उगारून,गालफुगवत,
दात विचकावत,वाटारलेल्या डोळ्यांनी चहुकडे पाहात,
शेपटी फिरवत,आणि डोक्यावरचा मुकुट सांभाळत,
गावात हनुमान अवतरला.लहान मुलेच नाही तर मोठी माणसे पण त्याच्या मागे.ही गर्दी.क्षणभर विश्वास बसेना.पाठोपाठ एक भोंगावाला आला आणि सगळे स्पष्ट झाले.गावात रामलीला आली होती.हनुमानाचा पार्टी जाहिरातीसाठी गावात फिरत होता.हनुमानाचे सोंग हुबेहूब वठवले होते.कार्यक्रमासाठी कुणाचेतरी बंदिस्त पटांगण मिळवले होते.गावकऱ्यांसाठी रामलीला नवीनच.
त्यामुळे लोक खूप उत्साहात होते.चार आणे(पंचवीस पैसे ) किंवा आठ आणे (पन्नास पैसे)तिकीट असावे.गर्दी ब-यापैकी होती.सगळेच तिकीट काढून आलेले नव्हते.
सरपंच ,उपसरपंच,पोलीस पाटील अशा प्रमुख लोकांना तर मंडळीनेच आमंत्रण आणि पुढील जागा दिलेल्या.
विनातिकीटाचा मान मिळवणारे इतरही बरेच होते.
पहिल्या दिवशी,म्हणजे रात्री गॅसबत्तीचे उजेडात,सीता स्वयंवराचा प्रसंग रंगला होता.या 'पणात'रावण पण सहभागी होता .धनुष्याला दोरी लावण्याचे प्रयत्नात तो चक्क उताणा पडला.त्याची फजिती पाहून लोकांनी टाळ्या वाजवल्या.रामाने धनुष्य तोडले तेव्हा जोरात टाळ्याचा कडकडाट झाला.सीतेने रामाला वरमाला घातली.'सीयावर रामचंद्र की जय'चा जयजयकाराने गाव दणाणून गेले. लोकांचा प्रतिसाद उदंड होता .पण गतो कोरडाच असावा.त्यातून फारसा 'अर्थ' रामलीला
मंडळीला मिळाला नसावा.अशा निरर्थक सेवेत काही राम नाही असे वाटल्याने, दोनचार दिवसातच रामकथा आटोपून, रामराज्य स्थापून ,गावाला रामराम करून रामलीला मंडळी निघून गेली.कुठे ते राम जाणे.पण रामलीलेतील प्रसंगांची आणि रामलीला मंडळीची चर्चा अनेक दिवस होत राहिली.
गावात असताना रामलीला मंडळीचे बि-हाड देवीच्या मंदिरातील ओव-यात होते.सगळे पुरुष.स्वयंपाकासहित सगळी कामे आपसात वाटून करत.एकाच कुटुंबातील असावेत.रावणाचे काम करणारा सर्वात मोठा,कुटुंबकर्ता व रामलीला मंडळीचा प्रमुख होता.राम,हनुमानासकट सगळेच त्याच्याशी आदराने वागत.राम, लक्ष्मण ,आणि सीतेचे काम करणारे ,दिसायला चांगले होते.हिंदी भाषिक.सगळ्यांचे केस वाढलेले. त्यांच्यापैकी काही जण खरेदीसाठी वगैरे गावात येत,मुले मागे मागे फिरत.लोक कुतूहलाने पाहात,त्यांच्याशी बोलायचा
प्रयत्न करत.त्यानांही याची सवय असावी.गोड हसून, बोलून निघून जात.
फिरस्ती मंडळीचे गावात येणे नेहमीचेच.त्याचें काफिले आले की वेगवेगळ्या कंड्या पिकत.ते चोर, दरोडेखोर आहेत इथपासून,ते खोप्या पोलीस (खुफीया)म्हणजे गुप्तपोलीसआहेत इथपर्यंत.पोलीसपाटील,कोतवाल यांनी खातरजमा केल्यावर त्यांना तात्पुरता थारा मिळे.
कसरतीचे खेळ करणारे डोंबारी,कोल्हाटी वगैरे येत.पण सर्कस दुर्मीळ होती.एके दिवशी अचानक मालमोटारीतून सर्कसचे सामान आले.त्याची कुणकुण लागताच ही गर्दी जमली.आपोआपच गावभर जाहीरात झाली.चर्चा सुरु झाल्या.गावाबाहेर बाजाराच्या जागेवर सर्कसचा तंबू लागला.रीकामी माणसे,ती मुबलक होतीच,आपण होऊन परोपकारी वृत्तीने,खरे तर 'सर्कस सुंदरींचे आकर्षणामुळे,सर्कसवाल्यांना मदत करण्यासाठी पुढे झाली.त्या निमित्ते ओळख झाली तर पाहावे ,फुकटचा पास मिळाला तर बरे ,हा हेतू. शिवाय त्यामुळे गावात 'वट' वाढणार .तो किती साध्य झाला ते त्यांनाच माहीत.सर्कशीत प्राणी फारसे नव्हते.एक हत्ती,एक घोडा,एक बोकड ,दोन माकडे आणि एक पोपट .उंट होता पण तो गावात जाहिरात करण्यापुरताच.हत्ती,उंट तंबू बाहेर बांधलेले असत.असे प्राणी प्रत्यक्ष आणि जवळून पाहाण्याची दुर्मीळ संधी मिळाल्याने ,गावातील छोटे मोठे अनेक जण दिवसातला बहुतेक वेळ प्राण्यांच्या
हालचालीचे निरिक्षण करण्यात घालवत. सर्कस चे जाहीरातीसाठी ,ऊंटावरून वाजत गाजत मिरवणूक निघे. जोकर सोबत असत.आसपासच्या गावात पण ही मिरवणूक जात असावी.कारण खेळ पाहाण्यासाठी, बैलगाड्यातून लोक येत.नाव जरी 'ग्रेट अमुक अमुक सर्कस'असे भारदस्त होते तरी शेवटी खेड्यात आलेली सर्कस ती. शंभर दिडशे माणसे मावतील एवढा तंबू.
दोन तीन पुरुष आणि दोन मुली,दोन प्रौढ स्त्रीया एवढे कसरतपटू. दोन वामनमुर्ती जोकर.बस्स.एवढी मंडळी दुपारी अन संध्याकाळी खेळ संपन्न करीत.
घोड्याच्या पाठीवर ,एकचाकी सायकलवर, झोपाळ्या वरच्या कसरती,बोकडाचे तारेवरील चालणे, पोपटाची छोट्या सायकल वर रपेट, माकडाची सायकलसवारी,
हत्तीचा फुटबॉल, जोकरची फजिती आणि इतर गमती जमती.बॅडचे पार्श्वसंगीताने त्यात वेगळाच रंग भरलाजाई.ते दोन अडीच तास वेगळ्या विश्वात भटकंती होई.सात आठ दिवसाचे मुक्कामानंतर, सर्कसवाल्यांनी आवराआवर सुरू केली.तंबू उखडला गेला.एके दिवशी सामान मोटारीत भरून तो फिरस्ता परिवार गाव सोडून गेला.रिकाम्या जागेवर अस्तित्वाच्या खूणा मागे सोडून.मुलेबाळे प्राण्यांच्या आठवणीत आणि काही तरणेताठे सर्कस सुंदरींच्या आठवणीत उदास झाली .
काही दिवसांनी,सर्कस विस्मृतीत गेली.हळूहळू सगळे सामान्य झाले.
माणसाला स्मरण ही जशी देणगी आहे ,तशी विस्मरण ही पण देणगीच आहे.सगळ्याच गतकालीन घटना आठवणीत साठल्या असत्या अन कुठल्याच विस्मरणाने डिलीट झाल्या नसत्या तर वेडच लागले असते.चांगल्या सुखद घटनांच्या आठवणी शीतल वाटतात,पण नकोशा वाईट घटनांचे स्मरण त्रासदायक असते.असो.
रस्त्यावर आरडाओरड ऐकू आला वा जोरात बोलण्याचा आवाज आला म्हणजे कुणाचेतरी भांडण सुरू असणार किंवा काहीतरी वेगळा प्रसंग घडत असणार हे नक्की. दोन्ही मधे घटकाभर करमणुकीची हमी होती.अशावेळी आपापल्या घरातून लगबगीने बाहेर येऊन काय चाललंय हे पाहण्याची सर्वाना उत्सुकता.
एकदा असाच गलबला ऐकून धावत दाराबाहेर गेलो. भांडण वगैरे काही नव्हते.पण गर्दी बरीच होती कमरेला
चिरगूट गुंङाळलेला,एक उघडाबंब इसम विजयी वीरासारखा रस्त्याने चालत होता. त्याच्या पोटात तलवार आरपार घुसलेली.पोटावर रक्तासारखा लाल चिकट द्रव ओघळत होता.घरासमोर उभे राहून काही अविर्भाव करत होता .ते पाहून भितीने भोवळ आल्या सारखे वाटले अन डोळे गच्च झाकून घेतले.तेवढ्यात कुणीतरी तो बहुरुपी असल्याचा खुलासा केला.मग जीवात जीव आला.वडीलांनी काही पैसे दिले.ते घेऊन स्वारी पुढे निघाली.मग काही हुशार मंडळी आपापली बुध्दी वापरून त्याने पोटात तलवार कशी घुसवली असावी याची चर्चा करू लागली.दुसरे दिवशी तोच बहुरुपी वेगळ्याच अवतारात आला. त्याने अशी काही करामत केलीहोती की तो कुणाच्या तरी पाठकुळीवर बसला आहे असे वाटत होते.दोन वेगळ्या व्यक्तीचा भास निर्माण करणारी त्याची ती युगत पाहून सगळेच आश्चर्य चकीत झाले होते.भिती मात्र वाटली नाही. दोन दिवसात थोडीफार कमाई करून अचानक आला तसा अचानक निघूनही गेला.
नीलकंठ देशमुख
प्रतिक्रिया
4 Sep 2021 - 11:04 am | कंजूस
छान आहे.
कमाई नसली की खेळवाले येत नाहीत.
4 Sep 2021 - 12:44 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद
5 Sep 2021 - 11:13 am | खेडूत
आवडलं. जणू माझ्याच गावातल्या या गोष्टी आहेत असं वाटतं.
अर्थात हा नव्वद सालां आधीचा काळ.
आता सगळंच कसं बदलून गेलं आहे. शहर आणि ग्रामीण हा भेद कमी होत गेला आहे.
5 Sep 2021 - 2:07 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद. माझ्या लेखातला काय सत्तर च्या आणिसाठच्या दशकातला आहे.
पण नंतरही काही वर्षे अगदी ऐंशी च्या दशकात ण फारसा बदल नव्हता.
नंतरमात्र बरेच काही बदलले
5 Sep 2021 - 4:06 pm | मराठी_माणूस
नेहमीप्रमाणे वाचनीय.
5 Sep 2021 - 7:07 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद
5 Sep 2021 - 6:45 pm | Rajesh188
पाहिले मोठमोठे वाडे असतं आमचा पण होता ६४ खणा चा आमचा पण होता.
मला पूर्ण इमारत नाही बघाया मिळाली पण पडव्या,मधला चोक अस्तित्वात होता.
घरच्या पाठीमागे वडील सांगायचे विटांची भट्टी होती.
घर बांधण्यासाठी लागणारे सर्व साहित्य अगदी , विटा,कौल,लाकड ही घरचीच असतं ,आणि त्या काळी कुटुंब मोठी असल्या मुळे घरा चे बांधकाम जास्त करून घरगुती च केले जाई.
अशी शक्यता आहे.
5 Sep 2021 - 7:12 pm | नीलकंठ देशमुख
चुन्याचा घाणा पण असे. शक्यतो गावाचे बाहेरून फारसे साहित्य आणावे लागत नसे.
आमचा वाडा अजून बराच शाबूत आहे. पण गेल्या तीस बत्तीस वर्षात तसेबंदच असतो.डागडुजी ची आवश्यकता आहे.पण ते आवाक्याबाहेर आहे. शिवाय त्याचा उपयोग ही नाही.म्हणून जे जे होईल ते ते पाहावे अशी वृत्ती बाळगली आहे
5 Sep 2021 - 10:08 pm | Bhakti
.म्हणून जे जे होईल ते ते पाहावे अशी वृत्ती बाळगली आहे...
आमच्या वाड्याची गम्मत आहे पुढची फक्त भिन्त आणि मोठे दार त्याला हे पुरातन कुलुप आणि मागे सगळ्या चारही बाजुने भिन्ती पड्लेल्या...
7 Sep 2021 - 12:00 am | नीलकंठ देशमुख
कालाय:तस्मये नम:
5 Sep 2021 - 7:13 pm | Bhakti
छान आठवणी,
त्या काळात आडनाव उपाधी म्हणून मिळत असे..छान आहेत वेगवेगळ्या घटना!
7 Sep 2021 - 12:00 am | नीलकंठ देशमुख
धन्यवाद
5 Sep 2021 - 7:24 pm | अनिंद्य
स्मरणरंजन आवडले !
7 Sep 2021 - 12:01 am | नीलकंठ देशमुख
धन्यवाद
5 Sep 2021 - 9:25 pm | गॉडजिला
.
7 Sep 2021 - 12:01 am | नीलकंठ देशमुख
धन्यवाद प्रतिसादाबद्दल
6 Sep 2021 - 6:20 pm | सौंदाळा
मस्त, वाचतोय
7 Sep 2021 - 12:01 am | नीलकंठ देशमुख
धन्यवाद प्रतिसादाबद्दल
20 Sep 2021 - 10:33 pm | सिरुसेरि
सुरेख आठवणी . द. मा. मिरासदार , व्यंकटेश माडगुळकर यांच्या लेखनाची आठवण झाली .
21 Sep 2021 - 11:29 am | नीलकंठ देशमुख
धन्यवाद. पण त्या महान लेखकांचे वाचून वाचूनच मोठा झालो.त्यांचा
प्रभाव आहेच माझ्यावर...
त्यांच्या लिखाणाची आठवण झाली हा फार मोठा बहुमान.