"ती मला नाही म्हणाल्यामुळं माझ्या आयुष्यात एक
जबरदस्त पोकळी निर्माण झालेली आहे..आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी, तू आम्हाला आणखी एक ओल्ड मंकचा खंबा ताबडतोब आणून दे..!''
अशा विव्हळ स्वरात रात्री-बेरात्री कुणीतरी फोन करायचं..
होस्टेलच्या टेरेसवर आम्हा लोकांचं प्यायला बसणं, हे नेहमीचंच.. पिताना आयुष्यातल्या सगळ्या खऱ्या-खोट्या समस्यांवर रिकामटेकड्या चर्चा करणं, हेही काही विशेष नाही..
पण कधीतरी मैफिलीत नव्या-जुन्या असफल प्रेमप्रकरणांचा दुखरा विषय निघाला की मग बैठक आवरणं फार फार मुश्कील व्हायचं..!
आणि मग प्रॉब्लेम हा व्हायचा की ते विशिष्ट प्रेम किती विशुद्ध होतं, हे सिद्ध करण्याच्या नादात खंबे कमी पडायचे.. मग कुणातरी स्वयंसेवकाला जाऊन सगळं घेऊन यावं लागायचं आणि मग सप्लाय-लाईन पहाटेपर्यंत सुरळीत व्हायची..
तर एकूणच त्यावेळी आमच्या त्या कॉलेजात मुलींच्या बाबतीत एकूणच रखरखीत आणि जीवघेणा दुष्काळ..!
त्यामुळं त्याबाबतीत आम्ही सगळेच बऱ्यापैकी अभावग्रस्त आणि कुपोषित.. त्यामुळं तडफड अतोनात..!
म्हणजे असं बघा की समजा तुमचा रूममेट रोज रात्री फोनमध्ये घुसून, कुठल्यातरी 'बाबू' 'शोन्या' किंवा 'पिल्ला'बरोबर वगैरे सुखाने कानांना गुदगुल्या करून घेत असेल..
किंवा होस्टेलच्या शांत कॉरीडॉर्समधून फोनवर रात्रभर बॅटिंग करणारे काही मजनू दिसत असतील..
आणि तुम्हाला मात्र भकासपणे जुनाट सिलींग फॅनची खरखर ऐकत झोपावं लागत असेल, तर तुम्हाला तीव्र ॲसिडिटी होणं अगदीच स्वाभाविक म्हणावं लागेल..
मग अशाच एखाद्या कातरवेळी 'आता कुणीतरी पाहिजेच राव' असा दृढ निश्चय व्यक्त केला जायचा.
अर्थातच ते दृढ निश्चय कृतीत उतरवण्याचे प्लॅन्स एवढे
फुसके असायचे, की सध्याचा एखादा नवखा शाळकरी पोरगाही ते करण्याच्या भानगडीत पडणार नाही...!
म्हणजे उगीचच तिच्या रोजच्या शेड्यूलचा अभ्यास करून ठराविक जागांवर घिरट्या घालत जीव झुरणीला लावणं.. किंवा तिचा फोन नंबर मिळवण्यासाठी दहा ठिकाणी तोंड वेंगाडणं... किंवा ऑर्कुटवर एखादीतरी नौका आपल्या वैराण वाळवंटी किनाऱ्याला लागतेय का, ह्याविषयी स्वप्नरंजन करत बसणं...
कधी संधी मिळालीच तर तिला कुठंतरी
गाठून 'फ्रेंडशिप देतेस का?' असा तद्दन मूर्ख प्रश्न विचारणं...!
आणि परिणामी जबरदस्त अपमान आणि धमक्या घेऊन होस्टेलवर परत येणं...
आणि शेवटी अतिफ अस्लमची व्याकुळ गाणी फुल व्हॉल्युमवर सोडून उसासे टाकत बसणं, हे तसं कॉमनच..!
अर्थात असले असंख्य अपमान स्वत:पुरतेच गुप्त ठेवून नवनवीन ठिकाणी टप्पे टाकत राहणारे काही निबर पंटरही सगळीकडे असतातच. तिथंही होते. पण त्यांच्याबद्दल नंतर जरा डिटेलमध्ये सांगावं लागेल..
तर मूळ विषय असा होता की अशाच एका मध्यरात्रीनंतर टेरेसवर रंगलेल्या आमच्या मैफीलीत श्री. रेक्टर महोदय यांनी दोन शिपाई यांचेसह दबक्या पावलांनी धाड टाकली..!
अधूनमधून अशा अकस्मात शिकारीवर निघणं, हा श्री. रेक्टर यांच्या सेवा-शर्तींचाच भाग..!
वाघाची नुसती चाहूल लागली की हरणं जशी वाऱ्यावर स्वार होतात, तसंच श्री. रेक्टर महोदय दिसले की फारसा विचार न करता, ताबडतोब पळ काढणं, ही आमची पहिली आणि तातडीची प्रतिक्रिया असायची..!
याचं मुख्य कारण म्हणजे आम्हापैकी काही जण 'पॅरासाईट' ह्या निर्वासित प्रवर्गात मोडणारे..! म्हणजे एकदा अशाच रेक्टर महोदयांच्या झडतीच्या वेळी, फक्त अंतर्वस्त्रे परीधान केलेल्या अवस्थेत, आम्ही दोन किलोमीटर धावत जाऊन सुरक्षित आश्रय शोधला होता, ह्याची साक्ष त्या पुरातन होस्टेलच्या दगडी भिंती अजूनसुद्धा देतील..!
पण ह्यावेळी पळण्यास स्कोप नव्हता कारण आम्ही फारच तरल अवस्थेमध्ये पोहचलो होतो.. दुष्मनाने अगदीच गाफील क्षणी दावा साधला होता..!
तो सगळा साग्रसंगीत माहौल पाहून श्री. रेक्टर यांनी 'अरेरेss तुमचे वय काय आणि तुम्ही हे करताय काय..! आणि तुम्हाला ह्याची थोडीशी तरी शरम वाटते काय ?' वगैरे शब्दांत चौकशीस सुरूवात केली.
बचाव व्यर्थ होता..!
त्यामुळं प्रत्येक प्रश्नाला दयेची भीक मागत राहणं, हाच एक पर्याय शिल्लक होता. आम्ही तो निवडला.
पण शेवटी शेवटी आमची कॅसेट 'सॉरी सरss असं पुन्हा नाय होणार सरss' ह्या एकाच वाक्यापाशी अडकून पडायला लागली..!
खरं तर ते वाक्य आम्हाला एवढं आवडलं होतं की
आळीपाळीने आम्ही ते पुन्हा पुन्हा उच्चारत राहिलो,
असं म्हणणं जास्त योग्य ठरेल..!
तर सदर घटनेचे काही ठळक परिणाम:
१. उर्वरित मुद्देमाल श्री. शिपाई यांच्या ताब्यात गेला आणि त्यांस लॉटरी लागल्यासारखा आनंदी आनंद जाहला.
२. आमच्याशी संवाद साधण्यात अडचण येऊ लागल्याने, सदर गुन्ह्याची पुढील सुनावणी, दुसरे दिवशी श्री. विभागप्रमुख यांचे केबीनमध्ये करण्याचा निर्णय श्री. रेक्टर ह्यांनी घेतला.
३. हा सगळा दोष आमच्या जन्मदात्यांचा आहे, असं अंतिम आणि मूलभूत विवेचन, श्री. विभागप्रमुख यांनी मांडलं आणि लगेच आमच्या जन्मदात्यांना बोलावण्याबाबत आदेश सोडला.
३. जन्मदाते म्हणून आम्ही ताबडतोब आमच्या परिचयातील आणि अंगभूत अभिनयाबाबत ख्याती असलेल्या श्री. रिक्षावाले, श्री. किराणावाले, श्री. गॅरेजवाले, श्री. हॉटेलवाले, सौ. मेसवाल्या काकू ह्यांस श्री. विभागप्रमुख ह्यांचे चरणी, उर्वरित शिव्या खाण्यासाठी, सादर केले..!
४. आणि महत्त्वाचं म्हणजे, ह्यापुढे अधिक खबरदारी घेण्याची तसेच एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर तयार करण्याची, नितांत गरज आम्ही आपापसांत व्यक्त केली.
प्रतिक्रिया
16 Aug 2021 - 11:16 pm | गॉडजिला
फाई पॉइंट्स समवन...
17 Aug 2021 - 12:51 am | टवाळ कार्टा
नक्की काय सुरु होते =))
17 Aug 2021 - 8:23 am | कंजूस
नक्की काय चालतं समजण्यासाठी हॉस्टेलचा अनुभव लागतो.
19 Aug 2021 - 9:09 am | सुजित जाधव
ह्याचा पहिला भाग कुठे आहे...
19 Aug 2021 - 9:11 am | पाटिल
भाग-१
https://www.misalpav.com/node/47095
19 Aug 2021 - 11:08 am | गुल्लू दादा
येऊद्या...वाचतोय.
19 Aug 2021 - 9:39 pm | संजय पाटिल
धमाल आहे......