"कुलूप किल्ली" ....

kvponkshe's picture
kvponkshe in जनातलं, मनातलं
25 Aug 2021 - 8:42 am

श्रीपाद रात्री धावतच माझ्या कडे आला. "ती आता बोलते आहे, "आई आलीये, मला बोलावते आहे" असं म्हणत हसते आहे." असं तो धापा टाकत सांगत होता. मी थोडा हादरलोच.

माझ्या डोळ्यासमोर जवळपास ३७ वर्षांपूर्वीचा प्रसंग आला.....

यातील, ती म्हणजे सुलेखा, जन्माला आली तेव्हा तरी नॉर्मलच वाटत होती . ती पुढे "अशी" होईल अशी कोणालाच कल्पना आली नाही. अशी म्हणजे मतिमंद, किंवा हल्लीच्या सोफिस्टिकेटेड भाषेत विशेष मूल!

वनमालाबाई आणि गोपाळराव (यांचे आडनाव मी मुद्दाम सांगणार नाहीये) याना लग्नानंतर झालेली पहिलीच मुलगी ! वनमालाबाई, गोपाळराव आणि सुलेखा ! नावं किती छान वाटत असली तरी सुलेखाचं "विशेष" पण लक्षात आलं आणि त्यांचा संसार म्हणजे एक प्रत्येक क्षणाची परीक्षा इतकाच होऊन बसला.

सुरुवातीस न्यूरॉलॉजिस्ट झाले, मग आयुर्वेद वैद्य झाले, मग होमिओपॅथ तज्ज्ञ झाले... मग गाडी मानसोपचार तज्ज्ञ यांच्या कडे वळली.

सुलेखाला चालायला लागायला ६ वे वर्ष उजाडले. इतक्या वर्षात तिला फक्त दोनच शब्द बोलता येऊ लागले होते. ते शब्द म्हणजे "आई" आणि "बाबा" नाहीत, तर "कुलूप किल्ली" !
तिला काहीही विचारा , तिचे उत्तर एकच.... "कुलूप किल्ली" !

डॉक्टरी इलाज चालेना म्हणून मग गंडे दोरे, अंगारे धुपारे चालू झाले. वनमालाबाई, गोपाळराव यांच्या कमाईतील बराच भाग सुलेखाच्या औषोधोपचारावर खर्च होत असे. अशातच कोणीतरी त्यांना भगतांचे नाव सुचवले. भगत तेव्हा फार केसेस घेत नव्हते. वयानुसार त्यांना होतही नव्हते. काहीशा चीडचिडीतच त्याने या केस मध्ये लक्ष घातले. मी नुकतीच भगतांच्या कडे दीक्षा घेतली होती. आणि माझ्या समोर आलेली ही जवळपास दुसरी किंवा तिसरी केस असेल.
जवळपास ३७ वर्षांपूर्वी वनमालाबाई आणि गोपाळराव भगतांकडे सुलेखाला घेऊन आले. नुकतीच ती चालायला लागली होती. शून्यात ती बघत होती पण तिच्या डोळ्यात एक अनामिक भीती दिसत होती. तिला शून्यात कोण दिसत असेल ? जे कोणी तिला दिसत असेल त्याचे रूप काय असेल? किती भयानक असेल? ती अनामिक भीती माझ्या नजरेतून सुटली नाही तर भगतांच्या नरेतून कशी सुटेल?

भगतांनी प्रथम टाळाटाळ केली पण सुलेखाच्या डोळ्यातील भीती पाहून ते जरा गंभीर झालेले दिसले. वनमालाबाई आणि गोपाळराव यांची थोडी माहिती घेतली. विशेषतः गोपाळरावांच्या मागील पिढ्यांची. गोपाळरावांचे मूळ गाव हे कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील पेढांबे का कोणतेतरी खेडे. गोपाळरावांना त्यांच्या पूर्वजांविषयी फार काही माहिती नसावी. फक्त पेढांबेत त्यांची एक चुलत काकू (जी साधारण ७०री पार केलेली असेल) राहते इतकेच त्यांना ठाऊक होते. भगतांनी जरा घाईघाईतच काही फोन केले आणि दोन दिवसांनंतर पेढांबेत जाण्यासाठी एक जीप बुक केली. गोपाळरावांनी आधीच फोनाफोनी करून त्या कोण काकू होत्या त्यांची माहिती काढून ठेवली होती.
प्रवासाच्या दिवशी आम्ही म्हणजे मी, भगत, गोपाळराव आणि ड्रायवर असे आम्ही सकाळी पुण्याहून निघून संध्याकाळी पेढांबेत पोहोचलो. टिपिकल कोकणी कौलारू घर होते. काकूंना एक मुलगा होता तोही ५०शीत होता आणि अविवाहित होता. (कदाचित मुद्दामूनच ?). भगतांनी जेवण झाल्यावर पडवीत चार उदबत्या लावल्या (या उदबत्या भगत काही विशेष प्रसंगी वापरत) आणि काकूंकडे मूळ विषय काढला. सुलेखा अशी मतिमंद आहे याचे भगतांना विशेष काही वाटले नव्हते, पण तिच्या डोळ्यातील ती अनामिक भीती .... ती काय होती ? तिला कोण दिसत होते ? आणि कुलूप किल्ली या शब्दांचा अर्थ काय ? या प्रश्नाची बहुदा त्यांना उत्तरे हवी असावीत.

काकू सुरुवातीस जरा बोलायला नाखूष होत्या. पण उदबत्त्यांचा परिणाम झाल्यावर बोलू लागल्या. माझ्याही डोळ्यासमोर काकूंच्या मुखातून वदली जाणारी गोष्ट उभी राहत होती...

यांच्या तीन चार पिढ्या आधीची गोष्ट आहे. यांच्या पिढीत वंशपरंपरागत खोतकी होती. या पिढीच्या वंशवृक्षात कोणी त्रिंबक म्हणून व्यक्ती होता. काहीसा विकृतच! याला सारख्या बाया लागत. याची स्वतःची बायको होती, पण "घरचं अन्न" या त्रंबकला आवडत नसे. शिवाय नुसत्या संभोगातुन याचे समाधान होत नसे. दुसऱ्या स्त्रीच्या वेदना बघूनच याला जास्त आनंद मिळत असे. याच्या कडे जाऊन आलेली बाई तिच्या नाजूक भागांवर डागण्या /जखमा घेऊनच बाहेर पडायची. या त्रंबकचा सावकारीचा धंदा होता. त्याच्या कर्जाखाली डुबलेले अनेक जण होते. कर्ज माफी करून देण्यासाठी त्रंबक त्यांच्या बायकांची मागणी करीत असे. या त्रंबक ची बायको शेवटी याला सोडून पळून गेली. म्हणजे अचानक गायब झाली. पुन्हा कधीच दिसली नाही. पण या त्रंबक खोतांस विचारणार कोण?

एक अशीच हिवाळी रात्र ... हा त्रंबक घरात एकटाच होता (आणि बऱ्याच दिवसांचा "भुकेला" ही ... )... गडी माणसे आपापल्या घरी गेलेली होती. बाहेर कडाक्याची थंडी होती. दोन बाटल्या जिरवल्यावर झिंगलेल्या त्रंबक ची नजर सहज खिडकीबाहेर पडली. एक बाई ओसरीवर कुडकुडत बसली होती. झालं ! शिकार आयतीच समोर आली होती. त्रिंबक ने तिला आत घेतलं आतून दाराला कुलूप घातलं पण झिंगलेल्या अवस्थेत किल्ली तशीच त्या कुलुपाला ठेवली... तिला काही विचारलं तर ती बोलतच नव्हती. बहुदा खुळी आणि मुकी पण असावी ... (कोकणातील टीपीकल भाषेत "सरबरीत")... वा ! मग काय त्रंबकचे खेळ सुरु झाले. त्या बिचारीला काही कळेनाच !

********
खुळीच ती .... संभोग ...समागम .. त्यातील आनंद तिला माहित होता का ? कदाचित नसेलच ... पण हे काही वेगळ आहे ... हे तिला नक्कीच कळले असणार ! समोरचा तो नग्न माणूस तिला दिसत असणार .... त्याची ती भुकेली आणि विखारी नजर तिला दिसत असणार ... त्याचा हातात उदबत्ती का आहे ?... तो नंगा माणूस नग्न आपले हात, पाय का बांधतोय ? ते ही करकचून.... आई गं ... नाही नाही... इथून पळून गेलं पाहिजे.. समोर दार आहे ...कुलूप आहे आणि किल्ली त्यालाच लावलेली आहे ... फक्त जोर करून उठायचे किल्ल्ली फिरवायची अन पळत सुटायचे ... पण हे काय ? दोन मांड्यांमध्ये काहीतरी गरम सुटी टोचल्यासारखं झालं ... पुन्हा एकदा .... आता त्या भागात तो चिमटे का काढतोय? .....

वेदना ....
असह्य वेदना .....

पळून जायचंय पण हात पाय बांधलेत .... आणि समोर दिसतंय ती दाराला लावलेली कुलूप किल्ली ....

पुन्हा वेदना .... मरणांतिक वेदना ..जेवढ्या वेदना जास्त होतायत तितका तो सैतान आनंदित होतोय .. कानावर त्या माणसाचे विकृत हास्य येतंय ... त्याच्या चेहऱ्याकडे बघवत नाहीये ... समोर दिसतीये ती दाराच्या कडीस लटकलेली कुलूप किल्ली .... सुटकेचा एकमेव मार्ग ...

. .
.
.

आता वेदना संवेदना नाहीशा होतायत....

आता समोरची कुलूप किल्ली अंधुक होतीये .... अजून अंधुक... अजून अंधुक ....

**************

शेवटी त्या रात्री कधीतरी ते अस्फुट विव्हळणे विरले ...कण्हणे विरले ...

दुसऱ्या दिवशी दुपारी माखजन पंचक्रोशितीतलं पोलीस पाटील गावात एका बाईची चौकशी करत आले. कालच्या रात्री गावातील एक दोघांनी एका स्त्रीला विमनस्क अवस्थेत गावात फिरताना आणि खोताच्या घराकडे जाताना पहिले होते. आता रात्री खोताच्या घरी अशा बाई जाताना दिसणे गावाला काही नवीन नव्हते. पोलीस पाटीलानी त्रिंबककडे चौकशी केली, पण त्रिंबक ने थांग पत्ता लागू दिला नाही. पोलीस पाटील मग निघून गेले पण गावात मात्र चर्चा रंगली. खोताच्या घरी गायब झालेली ही दुसरी स्त्री होती. (पहिली खोताची बायको आणि आता ही !).

(गाववाल्यानी जरा हिम्मत करून मागच्या ओसरीचा उंबरा खणला असता तर त्यांना दोन प्रेते मिळाली असती ..पण असो .... )

काकूंनी आता दीर्घ सुस्कारा सोडला. उदबत्या आता जवळपास संपल्या होत्या. पण त्यांची आता गरज नव्हती. काकू पुढे सांगू लागल्या, त्यानंतर यांच्या प्रत्येक पिढीत कोणी ना कोणी असं मतिमंद, अपंग जन्मास येते. (कदाचित म्हणूनच काकूंनी आपल्या मुलाला अविवाहित ठेवले असावे ?). या पिढीचे बळी गोपाळराव आणि वनमाला बाई होत्या. गोपाळराव रडू लागले. त्या कोणा नीच त्रंबकची पापं फेडण्यासाठी मीच का असे विचारू लागले. हा शाप होता, आणि यावर उतारा नव्हता. असता तर भगतांनी नक्कीच सांगितला असता. पण ते गप्प होते. नंतर मी भगतांना हळूच विचारले की त्यांनी काही दशकांपूर्वी तिनवाडीतील विमान अपघाताच्या वेळी झालेल्या प्रकारात जसे त्यांच्या आधीच्या भगतांना आवाहन केले होते तसे या वेळी करूया का ? तर भगतांनी तिरसट पणे मला नकार दिला. त्यांचेही बरोबर होते म्हणा. एखादे शस्त्र सारखे वापरले की बोथट होते. हा शाप होता आणि तो या गोपाळरावांच्या घराण्यातील प्रत्येक पिढित कोणाला ना कोणाला भोवणार होताच ! यावेळी दुर्दैवी गोपाळरावांची निवड झाली होती. आम्ही हताश पणे पुण्यास परत आलो.

गोपाळराव आणि वनमाला बाईंनी वास्तव स्वीकारले आणि सुलेखाचे सगळे त्या करू लागल्या. सुलेखा निसर्ग नियमानुसार मोठी होत होती, आणि तिचे शरीर सुद्धा निसर्गानुसार वागत होते. वनमाला बाई तिचे सर्व करत होत्या. गोपाळ राव आणि त्यांचे भगतांकडे नंतर येणे जाणे सुरु राहिले. सुलेखा नंतर ११ वर्षांनी त्यांना श्रीपाद झाला. खरं तर भगत आणि मला ही मोठीच रिस्क वाटत होती. पण सुदैवाने श्रीपाद नॉर्मल होता.

या घटनेस आज ३७ वर्षे झाली. दरम्यान भगतांनी सुद्धा आपली वेळ ओळखून प्रयाण केले. गोपाळ रावही १५ वर्षांपूर्वी निवर्तले. त्यानंतर इन्कम बंद झाल्याने वनमाला बाईंना नोकरी शोधणे भाग पडले. श्रीपाद चे शिक्षण सुरु होते. त्या नोकरीस गेल्यावर मग सुलेखाचे कोण करणार ? त्यांनी पुण्यातील एका मतिमंद मुलांच्या संस्थेत सुलेखास घातले आणि तिथेच ताई म्हणून काम करू लागल्या. तेथील मुलांचे सर्वकाही करणे यातच त्यांनी स्वतःला वाहून घेतले. तिथली मुले पाहून आपली सुलेखा खूप बरी असे त्यांना वाटले. वर्षामागून वर्षे उलटत होती. आता श्रीपाद लग्नाचा झाला होता. पण तो शाप ? कदाचित श्रीपाद ला सुद्धा तो शाप भोवला आणि त्याची मुले सुलेखासारखी निघाली तर?
सुमारे वर्षांपूर्वी श्रीपाद मला येऊन भेटला. लग्न करू का नको विचारत होता (शेवटी त्यालाही सर्व संवेदना होत्या, त्या त्या वयातील सर्व भुका होत्य). आता मीच भगत होतो. पण भगतांची परिपक्वता अजून माझ्यात नव्हती. आणि श्रीपादच्या प्रश्नाचे उत्तर ही माझ्याकडे नव्हते. भगतांकडे नव्हते तर माझ्याकडे कोठून असणार ? आधीच्या भगतांना आवाहन करून काही उत्तर शोधावे असे मला वाटले पण मी तो विचार काढून टाकला. अगदी काही दिवसांपूर्वी एका पोंक्षे नावाच्या माणसाच्या जु जु चेटूकाच्या केस मध्ये मी असेच आधीच्या भगतांना आवाहन करून बोलावले होते तर मला साफ नकार मिळाला होता. (या मूर्ख पोंक्षेने आफ्रिकेत एक कुत्रा अतिशय भीषण तर्हेने मारला होता,कारण काय तर तो कुत्रा त्याला चावला म्हणून. मग त्या कुत्र्याच्या मालकाने या पोंक्षेवर जु जु केलं होतं. या पोंक्षेचा अतिशय करूण अंत झाला शेवटी ! पण ती कथा पुन्हा कधीतरी).

श्रीपाद माझ्याकडून कोणत्याही सल्ल्याविना परतला. काही महिन्यांपूर्वी पुन्हा श्रीपाद माझ्याकडे आला. वनमालाबाईंना कर्करोग डिटेक्ट झाला होता. अगदी अंथरून पकडेपर्यंत त्यानं संस्थेतील मतिमंद मुलांची सेवा करीत राहिल्या होत्या. मागच्या आठवड्यात त्यांची प्राणज्योत मालवली. वनमालाबाईंचे दिवस होईपर्यंत श्रीपाद ने सुलेखास घरी आणले. तिचे सगळेच त्याला करावे लागत होते. पहिल्या दोन दिवसातच सुलेखास तो वैतागला. कधी एकदा १० दिवस पूर्ण करून ही सुलेखा नावाची पीडा संस्थेत जाईल असे त्याला झाले.

आणि आज रात्री तो धावतच माझ्या कडे आला. "ती आता बोलते आहे, "आई आलीये, मला बोलावते आहे" असं म्हणत हसते आहे." असं तो धापा टाकत सांगत होता. सुलेखा बोलायला लागली म्हटल्यावर माझी उत्सुकता जागी झाली. सुलेखा हा जर त्यांच्या घराण्याचा शाप होता तर त्या शापाचे परिमार्जन कदाचित तिच्याकडून मिळेल अशी आशा मला वाटू लागली. मी त्या विशेष उददबत्या घेतल्या आणि श्रीपाद धावतच त्याच्या घरी पोहोचलो.

सुलेखा एकटक समोरच्या खाटेकडे पाहत होती. त्याच खाटेवर ९ दिवसांपूर्वी वनमालाबाई निवर्तल्या होत्या. ती हसत होती .... आई आलीये, मला बोलावते आहे म्हणत होती. मी लगेच त्या उदबत्या लावल्या ... त्यांचा मंद सुवास आमच्या नाकात शिरला ... आजूबाजूचे जग धूसर झाले ... फक्त समोर सुलेखा , श्रीपाद, ती खाट ... आणि त्यावर बसलेल्या वनमाला बाई दिसू लागल्या... त्यांची नजर कठोर होती. त्याच नजरेनं त्यांनी श्रीपाद कडे पहिलं आणि म्हणाल्या "मी तिचे इतकी वर्षे केलं, तिचंच काय पण तिच्या सारख्या अनेकांचं केलं ... अगदी मरेपर्यंत ... आणि आज तुला १० - १५ दिवस तीच करायला जड होतंय का ? दोष तुझा नाही ... कारण आई जितके करते तितकं कोणीच दुसरं करत नाही .... अगदी सक्खा भाऊसुद्धा नाही."

मग त्या सुलेखाकडे पाहून म्हणाल्या "मी आयुष्यभर तुझे सर्व काही केलं, जगले असते तर यापुढेही केलं असतं, पण तू आता माझ्याबरोबर चल, कारण इथे आता तुझे करणारे कोणी नाही. आणि आता तुझा सूड पुरा झाला असेल तर आमच्या घराण्याचा पिच्छा सोड, त्या त्रंबक रावाचा सूड आता पुढील निष्पाप पिढ्यानकडून घेत बसू नकोस...चल आता .... "

मी सुलेखाकडे पाहू लागलो ..तिच्या डोळ्यातील "ती" भीती नाहीशी झाली होती आणि त्याची जागा समाधानानं घेतली होती... समाधान ... लहान मुलाला आईच्या कुशीत शिरल्यावर मिळते तेच समाधान सुलेखाच्या नजरेत मला दिसले ... आणि काही क्षणात तिचा निष्प्राण देह खाली पडला ..

मी उदबत्या विझवल्या ...आता त्यांची गरजच नव्हती ..

श्रीपाद च्या लग्न करू का नको या प्रश्नाचे उत्तर आता माझ्याकडे होते .... एक कुलूप किल्लीने उघडले होते ....

-भगत

कथालेख

प्रतिक्रिया

छान कथा. थोडी भयकथा, थोडी भूतकथा, मस्तच!!

सरिता बांदेकर's picture

25 Aug 2021 - 11:55 am | सरिता बांदेकर

छान.उत्कंठा वाढवणारी.
पुढील भागाची वाट बघत आहे.

सोत्रि's picture

25 Aug 2021 - 12:46 pm | सोत्रि

'येतोस का डबा खायला...' ही कथा वाचल्यावर तुमच्याकडे ह्या शैलीतील कथांचा खजिना असायला हवा असे वाटले होते.

सोत्रि's picture

25 Aug 2021 - 12:48 pm | सोत्रि

'येतोस का डबा खायला...' ही कथा वाचल्यावर तुमच्याकडे ह्या शैलीतील कथांचा खजिना असायला हवा असे वाटले होते.

ही कथा वाचून ती अपेक्षा पूर्ण झाली, और भी आन्देव...

- (ह्या शैलीतील पुढील कथेच्या प्रतिक्षेत असलेला) सोकाजी

king_of_net's picture

25 Aug 2021 - 2:57 pm | king_of_net

छान !!!

Nitin Palkar's picture

25 Aug 2021 - 8:22 pm | Nitin Palkar

सुंदर कथा, सुरेख लेखन शैली.

गॉडजिला's picture

25 Aug 2021 - 8:35 pm | गॉडजिला

जनाब सारेच विचित्र... मोठी तोहमत दूर झाली.

सुखी's picture

25 Aug 2021 - 11:16 pm | सुखी

झकास... लिहिते व्हा

सिरुसेरि's picture

25 Aug 2021 - 11:28 pm | सिरुसेरि

जबरदस्त हॉरर कथा . पुढील जु जु हुडु भयकथेसाठी शुभेच्छा .

कासव's picture

26 Aug 2021 - 12:43 am | कासव

आपल्याकडे युद्ध स्य: कथा: रम्या: असे म्हणतात पण मला वाटते युद्ध पेक्षा भुतांच्य कथा अधिक छान असतात

तर्कवादी's picture

3 Sep 2021 - 7:19 pm | तर्कवादी

लेखनशैली आवडली.

कपिलमुनी's picture

3 Sep 2021 - 10:15 pm | कपिलमुनी

छान वर्णन ! ओघवती शैली.

कपिलमुनी's picture

3 Sep 2021 - 10:15 pm | कपिलमुनी

छान वर्णन ! ओघवती शैली.