कोरडा स्वर
व्यर्थ धावाधाव झाली, पण खरोखर
जीवना नाराज मी नाही तुझ्यावर
मी किती कोठे दडू पाहुन तुम्हाला
आठवांनो घाव घाला.. या..! मनावर
फेरफटका मारण्याचे टाळते मी
आठवांची वाट झाली खूप खडतर
तू नको घालूस फुंकर , ऐक वाऱ्या
या निखाऱ्याला पुन्हा येईल गहिवर
आपले नाते सुगंधी राहिले ना
पण तरी सजवू फुलांनी आपुले घर
मन पुन्हा गर्भार झालेले व्यथेने
वेदना पुरवेल डोहाळे परस्पर
फक्त डोळ्यांनीच केले बोलणे अन्
मौन समजावून गेले कोरडा स्वर
