गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४७

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
9 Jun 2015 - 9:11 pm

मागिल भाग..
त्या माऊलीला तर अगदी अत्यंतिक आनंद झाला. आणि चहा झाल्यावर मला निघताना.. तिनी, "तिकडे गेलात की फोन करा हो न विसरता. मला माझ्या मुलिशी बोलायचय..!" असं अतिशय जिव्हाळ्यानी म्हणाली. मी मनातून प्रथम ह्या दोघिंच्या नात्याला नमस्कार केला. आणि त्यांनाही नमस्कार करून..
गावाची वाट धरली..........
पुढे चालू...
=======================

शेवटी एकदाचा स्वारगेटाहून सकाळी नवाला सुटलेल्या त्या रणरणंत्या एस्टीनी..निघता जाहलो.आणि तिकडे स्टँडवर उतरल्यानंतर डायरेक हिच्या घरी जाऊन थडकलो. स्टँडवरुन सोडायला आलेला रिक्षावालाही मेला त्याच गावचा की काय कोण जाणे? मला अगदी ओळखिचा असल्यासारख्या गप्पा मारुन आणि माझा बराचसा भांबावलेला (वैजूच्या मार्‍याचा विचार करत असलेला! :-/ ) चेहेरा पाहुन..शंभरच्या वरचे पैसे सोडलेन आणि उघडपणे अभिनंदन (मनातून..मर आता!) असं काहिश्या खौट्पणे म्हणाला. मी ही धन्यवाद म्हणून त्याला "हे घ्या वरचे बावीस रुपये..कै फुकट नकोय तुमच्याकडून!" असं म्हणून दिले तर मला म्हणे.. "आमाला कल्ला हो ..ती आलीजुली पोरं झाली ते कल्ला..तुमीच काय त्ये,नशिबवान आहात बाकी! म्हनुन म्हन्ला आपल्याकडून भेट हो ही. ..[वरच्ये पैशे सोडले(ली!) ]" असं कौतुक अधिक टोमणा हाणून्,."बारश्याला बोलवाल ना!?" असा परत त्या बा-विसाचा उलट आ'हेर रिक्षासह वळता करुन गेला मेला हलकट!

मी आपला समस्त प्रथमसापत्यप्रीयादर्शनोत्सुक नवर्‍यां प्रमाणे रामाचा आणि हनुमानाचा(ही) जप करत मम सासुर वाडीत प्रवेश करता झालो. दुरुनच मला पाहता पाहता हीच्या धाकट्या बहिणी सारख्या दिसणार्‍या शेजारच्या आलेल्या कुण्या बालिकेनी आत वर्दी दिली... "आले गं...आले!" माझी मेली अज्जुन तंतरली. मनात म्हटलं आमची महिषासुरमर्दिनी शस्त्र उश्याशी घेऊनच निजलेली आहे की काय? पण प्रथम तश्यातला काही प्रकार नाही घडला. नेहमी सारखी खास आमच्या कोकणी श्टाइलनी आंगण्यात खुर्ची टाकुन "या..बसा" "दमला असाल नै?(का?)" "चहा लगेच करु ?की नंतर?" (माझ्या मनात नंतर,म्हणजे थोडं विसावल्यावर्?की हिच्याशी भांडल्यावर? हा सहेतुक भाबडा प्रश्न! ) अशी सुरवात होऊन. काही क्षण गेले. मग रीतसर प्रवासी थकव्यावरचा उतारा ,म्हणून घरामागल्या विहिरीवर (स्वतःच पाणी उपसून.. :-/ ) भरपूर अंघोळ झाली. नाष्टा झाला.... चहा झाला.

आणी............................! त्या प्र'संगास मी एकदाचा सामोरा गेलो. ह्यांच्या घरातली जवळ जवळ निम्मी पडवी आमच्या बाईसाहेबांसाठी आणि ह्या दोन नवरत्नांसाठी त्यांनी वेगळीच केलेली होती. मग मात्र मला त्या विहिरीवरच्या स्नानामुळे की काय ते कळे ना,पण एकदम मनाला उत्साह प्राप्त झाला..आणि मी ओटीवरून कुणाशीही आणखि गप्पा वगैरे न मारता माजघरातून पडवीकडे चाल करून गेलो. कोकणातल्या सुपरिचीत ओव्याच्या शेगडीचा वास येत होताच. एकंदर मनात वातावरण निर्मीती बरी झाली ...आणि मी आत गेल्यावर पाहिलं..तर माझी चाहुल लागून बाईसाहेब एकदम तोंड फिरवून खाटेवर भिंतीच्या दिशेलाच सरकल्या. मी आपलं कडेच्या बाजुला त्या दोन समसमान चेहेर्‍यांचं ओझरतं दर्शन घेतलं,आणि मनात सगळ्या बापंभावना एकदम दाटून आल्या. आधी विचार केला की आमच्या या रुसलेल्या मैनेसमोर सरळ शरणागती द्यावी..पण तेव्हढ्यात काकाचे शब्द आठवले. आणि मी खेळी एकदम पालटवली. "कीत्ती सुंदर दिसतायत गं दोघेही!" आता हे वाक्य माझ्या मनातून वगैरे अज्जीब्बात आलेलं नव्हतं. मी आपला परराष्ट्राशी तहाची बोलणी सुरु करायला गेलेल्या मंत्र्यासारखा बातचीत सुरु होण्यासाठी काही जुजबी वाक्यरचना फेकायच्या बेतानीच ते वाक्य बोललो होतो. मला वाटलं ,पलिकडून फक्त "ह्हूं!" वगैरे हुंदकेयुक्त आवाज येतील. पण माझ्या या सहज टाकलेल्या सर्व्हिस-चेंडूला हीनी "मग बघत बस आता!" असं छताबाहेर (आता पडवी हेच श्टेडीयम ना! ;) ) भिरकावलं. आणि खाटेवरचे पाय भसकन सरळ केलेन. तेव्हढ्या धक्क्यानीही रणमैदान हदरलं. मी हिला.. "अगं मुलं दचकून जागी होतील.." अशी सारवा सारव करायला गेलो..पण नेमका हाच पवित्रा चुकला..आणि हिनी माझ्यावर लहान मुलं अबादुबी खेळताना फडक्याचा चेंडू मारतात ...तशी कुणी तरी तिथे आणून दिलेल्या मोसंब्याच्या ४/५ फोडी ,प्रश्नांसह मारायला सुरवात केली... सामन्यतः दर दोन प्रश्नागणिक १ फोड.., असा रणं-रेट होता. आणि मी खाटेच्या या अंगानी हात ,कोपर,बाही.. अश्या स्वसंपादित साधनांनी उत्तरांसह त्या फोडी (तोंडात नव्हे..,आजुबाजुला!) उडवत होतो.

१) आधी सांग..आला का नैस वेळेवर? वैट्ट माणूस कुठचा!

२) फोन काय दरवेळी मला दिला जातो का अश्या अवस्थेत?

३) आधी कबुल का केलस दोन दिवस अलिकडे येइन म्हणून?

४) येश्टी चुकली तर प्रायव्हेट गाडी करायला काय होतं? (अश्या वेळी तरी!?)

५) आणि नेमक्या असल्या अचानक अडलेल्या कामांना "तुलाच कसा निवडतात" तुझे ते अमकेतमके गुरुजी?

६) दुसर्‍या कुणाला डोक्यावर नै टाकता* येत वाट्टं त्यांना? (ही शब्दसंहती हीनी वापरणं,म्हणजे पुण्याचं पाणी लागल्याची पहिली खूण!)

पुढे पुढे फोडी संपल्या ,आणि नुसतीच मारामारीची आणि चुकवा चुकवीची अ‍ॅक्शन आमच्यात होऊ लागली. सदर रणमैदानावरची धुसफुस शांततामय आवाजात चाललेली असली ,तरी हिचा भांडणाचा स्त्रीसुलभ जोश यत्किंचीतंही कमी नव्हता...शेवटी मी "जयंती मंङगला काली भद्रकाली कपालिनी...दुर्गा क्षमा शिवा धात्री: स्वाहा स्वधा नमोस्तुते" ह्या (होय..होय..सप्तशतीतल्याच! ;) ) श्लोकाचा खरच मनात जप चालू केला. पण शेवटी हिचा राग शांत होऊन त्याची जागा शांततामय तडजोडीवर आलेल्या आवाजानी घेतली ,आणि मग रणात आग ओकलेल्या तोफेतून नुसताच धूर यावा तसं मैदान एकदम शांत झालं. मग मला... "आता मी सांगेपर्यंत मुळ्ळीच परत जायचं नै!" अश्या तहाच्या अनिवार्य आणि एकतर्फी करारावर सही करायला लाऊन तो मजवरी बेतलेला स-मरं प्रसंग हिच्याकडून मिटला. मग मात्र मी सर्वप्रथम खास हिच्या आवडीच्या रंगाच्या गर्दहिरव्या शालीची आणलेली भेट तिला दिली..(काकानी कित्तीही पेढे/बर्फीचा पारंपारिक नैवेद्य सांगितला असला,तरी मला आमची देवी कश्यानी खुश होते ते काय कळत नव्हत..व्हय!? :D ) आणि मग आमच्या या पोरांचे "प्रथम मुखावलोकन" असे शास्त्रात म्हणातात...ते नीट केले. त्यातली आमची पोरगी 'हळूच ते कापसा सारखे डोळे किलकिले करून' आपल्या (भवानी)मातेचा बापावर चाललेला हल्लाही बघत असावी..कारण तिनी मजकडे ज्या दयार्द नजरेनी पाहिलं,त्यातून मला तरी तेच जाणवलं. पोरगं मात्र आयशीचा कोणत्याही परिस्थितीत डाराडूर झोपण्याचा गुणधर्म उराशी बाळगून छान झोपलेलं होतं. शेवटी मी काही क्षण त्या आमच्या बछड्यां जवळ घालवले. आणि बाईसाहेबांना 'आता मुलीस झोपवा" असे फर्मान (दिलेल्या शालीच्या भेटबळावर..) सोडून...हळूच त्या पडवीतून पुन्हा बाहेर आलो.

बाहेर येऊन बघतो,तर मी आल्याची वर्दी आमच्या इकडच्या लोकांनी काकाला दिलेली प्रत्यक्ष दिसलीच. माजघरातूनच मला बाहेर आंगण्यात.., काकाचे आणि तिथल्या बाजुच्या आलेल्या कोणातरी बुजुर्ग व्यक्तिचे हास्यविनोदी संवादाचे आवाज ऐकू येऊ लागले. माझा काका त्याच्या खास डायनेमो दिवा लावलेल्या सायकलीला खुर्ची टेकवूनच बसलेला होता. मधे एका श्टुलावर चहाचा ट्रे ,बाजुला एका तबकात खास कोकणी श्टाइलचा पान चुना तंबाखु सुपारीचा सरंजाम लागलेला..आणि पलिकडे ती व्यक्ति. मी प्रथम बाहेर आल्या आल्या काकाला नमस्कार केला... आणि त्यांच्या चाललेल्या संवादात आपण मधे नको..म्हणून त्यांच्या अंगणातून बाहेर सांजेच्या हळूहळू चांदण्या जमणार्‍या मोकळ्या आभाळाला भेटायला गेलो. ही माझी लहानपणा पासुनची अगदी जुनी सवय. जर मनातलं बोलायला कुणी भेटलं नाही,तर मी देवापेक्षा नेहमी आभाळालाच जवळ करत आलेलो आहे. आभाळाच्या या नित्य सहवासानी असं वाटत आलेलं आहे,की मित्र असावा तर या आभाळासारखाच..मोकळं होऊ देणारा,कवेत घेणारा..कित्तीही मोठ्ठा आनंद असो,अथवा दु:ख्ख..त्याच्या नुसत्या निळ्याजर्द विशालतेत आपण चटकन सामावून जातो.. काहि क्षण त्या लुकलुकणार्‍या चांदण्यांशी आणि आजुबाजुनी येणार्‍या रात्रपक्षांच्या आवाजांशी संवाद साधण्यात गेले. आणि मागुन काकानी खांद्यावर हळुच थाप टाकली.

काका:-"आहो आत्ममग्न..आत्मारामपंत.!"

मी:-"क्काय!?"

काका:-" आता दुनिया न्याहाळण्याची वेळ आली,आभाळ काय न्याहाळताय? बाप झालात ना आपण?"

मी:-" हो रे. पण मला अजुनंही आभाळाशी बोलायला खूप खूप आवडतं."

काका:-" ह्हा..ह्हा..ह्हा.. आणि माणसांशी कधी बोलणार मग???"

मी:-" आता बोलतोय ना तुझ्याशी?"

काका:- " अरे आत्मू...अशी प्रसंगोपात्त उत्तरं देऊन खरं काय ते कधी कळणार रे तुला?"

मी:-"म्हणजे?"

काका:-"अरे मुला,जगात माणसाची दोन नाती असतात. एक त्याचं स्वतःशी असलेलं आणि दुसरं समाजाशी असलेलं"

मी:-"ते कळलय की मला मग"

काका:- "हो ..कळलय.पण वळलेलं नाही अजुन नीट. तू अजुनही स्वतःशीच जास्त बोलतोस"

मी:-"स्वतःशी कुठे? मी तर आभाळाशी बोलत होतो ना?"

काका:-" अरे आभाळ हे माध्यम झालं.तुझं तू निवडलेलं..आणि ठरवलेलंही! तिथे दुसर्‍या व्यक्तिचा आणि विचाराचा संबंध कुठे आला?"

मी:-" काका...मी अत्ता हे गहन ऐकायच्या मूडमधे नाहिये रे..आणि मला ते कळणारंही नाही कदाचीत आज"

काका:-" ह्हा ह्हा ह्हा...अरे पण परिक्षेच्याच काळात विशेष गृहपाठ उपयोगी पडतात ना!? म्हणून ऐकवतोय तुला."

मी:-"सांग मग एकदाचं!"

काका:-"हे बघ नाराज होऊ नकोस..पण लक्षात घे,की आपल्या मनातली दु:ख्ख आनंद हा जो काही असेल..तो एकटेपणाच्या वाटेवर असताना माणूस असा आभाळ आणि देवाशी बोलला ना नेहमी..तर कदाचीत ते समजून घेण्यासारखं असतं. अता तू नुसता विवाहीत नाहीस.संसारीही झालायस...दोन पोरे एकदम होऊन!"

मी:- "आं.......काका तूही मला चिडवतोयस?"

काका:-" अरे भानावर येण्यासाठी मज्जा केली तुझी जरा.पण आता हे आभाळाशी बोलणं थोडं कमी कर.आणि तुझ्या त्या सहचारीणीशी हे सगळे संवाद बोलत जा. मेल्या प्रेमविवाह केलास ना तू? मग तर जमायला काही हरकत नाही..आणि तिच्याशी नाही,तर दुसर्‍या कुणाशी तरी..पण बोललं पाहिजे ते एखाद्या जीवंत माणसाशीच!....कसे?"

मी:- " हो ..पण मला भिती वाटते"

काका:-"कसली?"

मी:-"तीच कळत नाही,कसली ती?"

काका:-"अरे..,त्याला तुमच्या त्या हल्लीच्या मानसशास्त्रात अनामिक भय म्हणातात ना??? ते आहे हे. अनामिक भय!..जे आपणाला ओळखू येत नाही ,आणि म्हणून त्याला नाव देता येत नाही ते!"

मी:-"अगदी बरोब्बर! पण मग जे ओळखताच आलेलं नाही,त्याच्याशी भिडायचं कसं?"

काका:-" तसच!"

मी:-"म्हणजे???"

काका:-"अरे...त्याचा अनोळखीपणा,हीच त्याची आपल्याशी झालेली पहिली ओळख.असं समजून भिडायचं.त्याशिवाय त्याची खरी ओळख कशी होणार?"

मी:-"हां...बरोब्बर अगदी! असच केलं पाहिजे"

काका:-"केलं पाहिजे नाही...कर!"

मी:- "ठिक आहे"

काका:-"आता जास्त डोकं पिकवत नाही मी तुझं आज.पण हे लक्षात ठेव की जीवनाची कोडी आभाळात पाहुन उलगडत असतील ना..तर उलगडोत बापडी.पण ती सोडवायचा मार्ग माणसांशी ती कोडी बोलणे..हा आणि हाच्च!"

.........................................
काकाशी अचानक झालेला हा काहिसा दिर्घ संवाद मला चांगलच जागं करुन गेला. आंम्ही दोघेही त्या आंगणाबाहेरच्या रस्त्यावरून परत आत आलो..तर इकडे आंगणात या आनंदाप्रीत्यर्थ तात्काळ जंगी भोजनाचा बेत लागत आलेला दिसला. आमच्या दोघांची वाटच पहात होते सर्व जणं. भरपूर पडलेल्या चांदण्यामधे मस्त चटया ,ताटं लागलेली .तांदुळाच्या भाकर्‍या,आमटीभात,लोणचं,पोह्याचे पापड, बटाट्याची भजी, एका भल्या मोठ्ठ्या पातेल्यात आमरस...घोसाळ्याची भाजी..अशी जय्यत तयारी लागलेली होती. मग हिच्या आईनी प्रथम काकाला आणि मला बसवलं.मग बाकीची मंडळी बसली. आणि मला, ही आज त्या धूरखोलीतून बाहेर यावी असं जे वाटत होतं,ते ही झालं. फक्त कोकणातल्या त्या कडक उकाड्यात अंगावर आणि विशेषतः डोक्यापासून कानापर्यंत बरेच काही लपेटून हीला मी बाहेर आलेलं बघितलं. आणि आश्चर्य चकित झालो. त्यावर काकानी हळूच मला.."ते तुला बाई झालास,कीच कळेल" असा चेंडू मारून गप करून ते आश्चर्य विझवलं. मग मला अगदी "अहो आता कुठे सकाळी उठून कामाला जायचय..खा की जरा!" असा सासूबाईंनी कडंकडीतं आग्रह करकरून भरपूर जेवायला लावलं. (शेवटी हिचीच आई ती! आग्रह असाच करणार! :-/ ) काकाही मधून मधून "ह्याला आता आमरस सुद्धा एकाचवेळी दोन वाट्या वाढा हां!" असं म्हणून चिडवायचा बेत पुरा करून घेत होता. वैजू पलिकडून दुष्ट्पणानी हसत होती. ( :-/ ) शेवटी मी "अता आणखि वाढलत तर इथेच ओकेन (हो!) " असं थोड्याश्या रागानीच म्हणालो..त्यावर काकानी दुष्ट्पणे..."त्याला आंगणातच झोपेन (हो!), असं म्हणायचं होतं"...असं बोलून माझी बाजू परत पाडली. मग मात्र सासूबाईंनाच माझी दया आली. आणि त्यांनी मला शेवटच्या भातावर आणून सोडलं एकदाचं . भरपूर खाणे आणि हास्यविनोदासह ते जंगी भोजन संपलं. आणि काका सह त्या मस्त चांदण्याच्या गार वार्‍याच्या आंगणात मी बाजेवरती पहुडलो.

मग झोपता झोपता काकानी विषय काढलाच..

काका:- "आत्मू..."

मी:- "काय?"

काका:-" नावं काय रे ठेवायची?"

मी:-"अत्ताच कशाला चर्चा?..आणि तो बायकांचा प्रांत आहे. आपण कशाला त्यात?"

काका:- " ह्या ह्या ह्या ह्या!!! असं अंगं काढून घ्यायचं नाही हां! मला म्हायत्ये तुझ्या मनात असणारच कै तरी! त्याशिवाय का मी फोनवर गणपती आणी सरस्वती म्हणाल्यावर हसालास त्या दिवशी!"

मी:- " ............... ह्हू ह्हू ह्हू ..... "

काका:- " ह्हां... कैसे पैचान्या हमने? सांग सांग ना ?"

मी :- "....................................................."

काका:- " मोकळ्या जागा भरतोयस काय? ह्या ह्या ह्या ह्या!"

मी:- "आं..............दुष्ष्ष्ष्ट! "

काका:- "व्वा! छान आहेत ही पण दोन!"

मी:-" मी नै सांगण्णार ज्जा!"

काका:- " बरं..नको सांगूस!"

मी:- "ऐक आता"

काका:-" आता का ? आता का? "

मी:- "तूच म्हणलास ना मगाशी मनाशीच बोलू नये म्हणून..!"

काका:- "अस्सं होय!"

मी:-" म्हणूनच वाटतोय ना मनातली भावना तुझ्या बरोबर..तर आता ऐकत नाहीस तूच"

काका:- "बरं बाबा...सांग!"

मी:- " सदाशिव आणि स्वानंदी"

काका:- " ................................ "

मी:- "काका...काय झालं?"

काका:-" आत्मू....बंडुच्या मुलांची नावं ना रे ही?"

मी:-" हो!"

काका:-" हीच का निवडलीस मग?"

मी:-" माझ्या काकूला आनंद होइल म्हणून!"

काका:-" अगदी आईपेक्षा आई आहे रे तुझी काकू तुला"

मी:-" ............... "

काका:-" आज खरे आनंदाश्रू डोळ्यात आले रे मुला. माझ्यापाठी त्यांची काळजी करणारं कोणीतरी आहे या जगात.हे पाहुन!"

मी:-" काका.., स्वानंदी या जगात जवळपास आलीच नव्हती,आणि सदाशिव दादा आला आला असं वाटेपर्यंत भलताच दूर निघून गेला... मग त्यांना (गुरुजी आणि काकू.) मनातून तरी तसं, पुन्हा कोणी का भेटवून देऊ नये आपण?"

काका:-" अगदी अगदी बरोब्बर आहे तुझी भावना. मला गाढ्वाला इथे त्यांच्या आसपास असून हे असं काहिही सुचत नाही..तुझी आज्जी म्हणते तसा दगड्या काळजाचा माणूस आहे मी. माझ्या जगात तू आणि माझी संघटना सोडून दुसरं काहिही नाही . पण आज मी या बाबतीत सुखावलो. धन्यवाद तुझे पोरा. अशीच मनातून त्यांच्यावर माया करत रहा...अगदी अशीच माया करत रहा... जन्मभर!..."

असं म्हणून काका त्या आनंदाश्रूंसह बाजेवरून उठून माझ्यापाशी आला... आणि माझ्या पाठीवर थोपटत लहान मुलासारखं मला झोपवून..,शांत मनानी स्वतःही निद्रीस्त झाला.
...........................................................
क्रमशः
मागिल सर्व भाग:- १.. २.. ३.. ४.. ५.. ६.. ७.. ८.. ९.. १०.. ११.. १२.. १३.. १४.. १५.. १६.. १७..(मंगलाष्टक स्पेशल)१८.. १९.. २०.. २१.. २२.. २३.. २४.. २५.. २६.. २७(यज्ञयाग विशेष!) २८.. २९.. ३०.. ३१.. ३२.. ३३.. ३४(विवाह विशेष-१) ३५(विवाह विशेष-२) ३६ (विवाह विशेष-३) ३७.. ३८.. ३९.. ४०.. ४१ .. (खेडेगावातील नाटक..) ४२.. ४३.. ४४.. ४५.. ४६..

समाजविरंगुळा

प्रतिक्रिया

जेपी's picture

9 Jun 2015 - 9:28 pm | जेपी

हसुन मरतय आज..
कथानायका बद्दल ठौक नाय पण गुरुजी.....

=)=)=)=)=)

म्हया बिलंदर's picture

9 Jun 2015 - 9:30 pm | म्हया बिलंदर

आता वाचतो

टवाळ कार्टा's picture

9 Jun 2015 - 9:34 pm | टवाळ कार्टा

भारी :)

यसवायजी's picture

9 Jun 2015 - 10:03 pm | यसवायजी

गोग्गोड गोग्गोड. :D

टवाळ कार्टा's picture

9 Jun 2015 - 10:10 pm | टवाळ कार्टा

गोग्गोड असणारच....पेढे आणि बर्फी एकत्र आहे ना ;)

आभाळाशी आणि काकाशी मुक्तसंवाद आवडला. तुम्ही कथानायक, काका, वेदपाठशाळेतील गुरूजी आणि हे आभाळ या पात्रांच्या माध्यमातून स्वतःच्या विचारसरणीची जडणघडणच जणू उलगडून दाखवताहात हे जाणवतं. या कथामालिकेच्या निमित्ताने एकूणच जगाशी तुम्ही जो संवाद साधण्याचा प्रयत्न करता आहात, जे विचार जनाच्या गळ्यात उतरवू पाहता आहात त्यातील समजूतदार उदारमतवाद मला फार आवडला. रूढार्थाने ही कथा असली तरी मूळचा हा स्व-संवाद आहे. माझ्या अतिशय आवडत्या मिपासाहित्यापैकी एक.

पुभाप्र.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jun 2015 - 10:55 pm | अत्रुप्त आत्मा

मन:पूर्वक धन्यवाद हो! :)

किसन शिंदे's picture

10 Jun 2015 - 8:04 am | किसन शिंदे

अगदी हेच्च आणि असेच म्हणतो.!

प्रचेतस's picture

9 Jun 2015 - 11:03 pm | प्रचेतस

:) :) :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Jun 2015 - 11:03 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

खुप छान.

(अज्याबात चिडवलेलं नाही)

अत्रन्गि पाउस's picture

9 Jun 2015 - 11:13 pm | अत्रन्गि पाउस

प्रेमात आहे ह्या लिखाणाच्या ...
साधे सुधे गोड घरगुती .. सात्विक ...वा बुवा !!!

पॉइंट ब्लँक's picture

11 Jun 2015 - 1:44 pm | पॉइंट ब्लँक

+१

सूड's picture

9 Jun 2015 - 11:13 pm | सूड

ह्म्म!!

रेवती's picture

10 Jun 2015 - 1:28 am | रेवती

वाचतिये.

काकांसोबत झालेला संवाद आवडला!!

यशोधरा's picture

10 Jun 2015 - 5:24 am | यशोधरा

आवडला हा भाग.

नाखु's picture

10 Jun 2015 - 9:45 am | नाखु

+१

खटपट्या's picture

10 Jun 2015 - 7:33 am | खटपट्या

जबरदस्त!!!

पैसा's picture

10 Jun 2015 - 8:33 am | पैसा

बुवा, मस्त लिहिताय! याच वेगात आणि असंच रंगून लिहा. तुमच्या भरडवहीत आम्ही भाग 547 लिहा असं सांगितलं तरी ती सगळी निव्वळ गंमत जंमत असते. मालिका मिपावरच्या काही उत्कृष्ट मालिकांपैकी एक झाली आहे. एका वेगळ्या जगाच्या ओळखीसाठी धन्यवाद!

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2015 - 9:34 am | अत्रुप्त आत्मा

थँक्यु. :)

प्रमोद देर्देकर's picture

10 Jun 2015 - 8:47 am | प्रमोद देर्देकर

शेवट आवडला.

जगप्रवासी's picture

10 Jun 2015 - 12:10 pm | जगप्रवासी

काका काकूंसाठी स्वतःच्या मुलांची नावे ठेवणे ……… आवडल एकदम

तुमचे लेख वाचता वाचता अचानक डोळे पाणावतात

नीलमोहर's picture

10 Jun 2015 - 12:24 pm | नीलमोहर

नेह्मीप्रमाणे छानच..

बॅटमॅन's picture

10 Jun 2015 - 12:26 pm | बॅटमॅन

क्या बात है. सहीच!

स्पा's picture

10 Jun 2015 - 4:49 pm | स्पा

वाह, मस्तच अत्मुस

सिरुसेरि's picture

10 Jun 2015 - 5:13 pm | सिरुसेरि

छान लेख .तुमच्या लेखांतुन ,नात्यांमधील संवादांतुन जाणवते की - पुण्यामधल्या व्यावहारीक जगात येउन आता त्यांत चांगलाच स्थिर झालेला एक माणुस मनाने कुठेतरी अजुनही आपले कोकणातील साधे सरळ प्रेमळ जीवन आठवतो आहे .

कोकणातल्या एका घरात आतबाहेर करतोय असं मला वाटायला लागलं. मग उकाडा फारच जाणवायला लागला आणि जरा आंगण्यात येऊन झावळ्यांतून कातरलेलं पांढुरकं आकाश पाहात बसलो. किती वेळ गेला कळलं नाही पण ओसरीतून "येताय ना जेवायला?" ऐकून भानावर आलो.अरेच्या किती भूक लागलीय विसरलोच होतो इथे मालगु्ंडात आलोय ते.

जमलं जमलं गुर्जी जमलं!!!

छान भाग हाहि.आधिचेहि वाचलेत.आवडले.