गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४४

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
4 May 2015 - 5:41 pm

मागिल भाग..
मग देवळातून बाहेर आल्यावर बाकिच्या पुरोहितां बरोबर 'एकंदर दिवस कसा-गेला?' याची एक लहानशी ठरलेली चर्चा झडते..आणि घोड्याला टाच मारल्यासारखी गाड्यांना किका मारून..आमचं हे काहिसं आनंदी झालेलं देहाचं गाठोडं घराची वाट धरतं! ........
पुढे चालू...
=============================

मग येतो श्रावणामधला ठरला मंगळवार ..
हल्ली हे शिवंमंगलागौरी व्रत ,व्रत म्हणून कोणी करत असलं नसलं..तरी त्यात मिळणारी एंजॉयमेंट राहिलेली आणि काळानुसार अगदी वाढलेली सुद्धा असल्यानी, कमी अधिक प्रमाणात का होइ ना? या मंगळागौरी असतातच. मग त्या घरात केलेल्या असोत अथवा कार्यालयं कींवा हॉल घेऊन. जशी आपली तिथे एंट्री होते..तशी प्रथम अंगावर फौज येते ती तिथे भरपूर लाऊन ठेवलेल्या साहित्याची.. म्हणजे पूजेला जेव्हढ्या मुली (पारंपारिक शब्द वशर्‍या/वशेर्‍या/वसोळ्या..इत्यादी.) असतील.. तेव्हढी पळीभांडी ताम्हने..ती नसतील तर भातुकलीच्या तयारीसारखी चमचा भांडी ताटल्या..पंचामृताच्या जादा वाट्या.. कापसाच्या वस्त्रांचे सेट..किंवा एकची भल्लीमोठ्ठी गुंडाळी! तिनचार चौरंग आणि ,पाचदहा नारळ,पाचपंचवीस फळं,आणि एकाबाजुला पत्री म्हणून तोड-केलेली ढीगभर पानं...आणि मिळतील ती सिझनल फुलं!

मला तर ही तयारी पाहुन आपण कोच आहोत..आणि क्रीकेट मैदानाच्या ड्रेसिंग रूम मधे आपण प्रवेश केलेला आहे अशीच भावना मनी येते. हो! क्रीकेटमधलीच उपमा योग्य. कारण, कमीतकमी पाच ते जास्तीत जास्त पंचवीस मुलींकडून ही पूजा-करून घेणे,म्हणजे एखादी म्याच खेळवून घेण्यापेक्षा काही कमी नाही, हे नक्की! बघा ना तुम्ही- प्रथम ते तीनचार चौरंग श्टेडियमची दिशा पाहून-लाऊन घ्या. त्याच्या भोवतीनी तिथे असलेलं सगळं साहित्य जुळवा. प्रत्येक ३ प्लेअर्सच्या..आपलं ते हे..मुलिंच्या मुलिंच्या..,बसायच्या आसनांमधे गॅप सोडा,त्यात फुलं,गंध अक्षता इत्यादींच्या ताटांची योजना-करा. मुलींचे धक्के लागणार नाहीत्,अश्या तर्‍हेनी लाइट्सची म्हणजे समया निरांजनांची सोय पहा. त्यातच व्रताच्या पाचव्या वर्षात आलेल्या काहि मुलिंची बालके..,मंगळागौरीला मांडलेली फळं दिसल्यामुळे अचानक.. "आई..मल्लापण पेलू..." करत मधे येणार असतील..तर त्यांची कोंडी कशी होइल..(श्टेडियमवर न घुसण्यासाठी!)याचीही योजना करा. चौरंगाखाली प्रत्येकीनी घरनं आणलेली एक्सट्रॉची तयारी लावायला जागा ठेवा. आणि या सगळ्या म्यानेज-मेंट नंतर पीचला फक्की मारतात ..तशी कडेनी रांगोळी काढा. (हुश्श्श्श्श!!!!! लिहिताना पण दम लागतोय! :-/ ) ..हे सगळं आहे की नै म्याचच्या पूर्वतयारी सारखच? हां..पण एकदा हे एव्हढं दिव्य पार पडलं की मग सुरवात करायला खरी मज्जा येते. त्यातंही ठरल्यावेळेच्या आधी/नंतर पूजेला येऊन बसणार्‍या मुलिंना चालू पूजेच्या श्टेज'ला-आणणे.., हे दिव्यंही अनेकदा नशिबी येतच. शहरातून हे सगळं नोकरीच्या वेळापत्रकात बसवणं त्यांनाही अवघड. त्यातच अनेकींना घरच्यांच्या इच्छेसाठीही पूजेला-बसावं लागतं. (सत्यनारायणाला-बसणार्‍या शाळकरी मुलांसारखं!) त्यामुळे त्यांचाही नाइलाज!

मग हळूहळू करता करता साधारण निम्याच्या वर गणसंख्या भरली,की यजमानाकडून "गुरुजी करा चालू तुम्ही..मागनं येणार्‍यांचे संकल्प घ्या नंतर नुस्ते!" अशी तोड येते. आणि मग रणमैदानावरच्या तलवारी,भाले,बरच्यांचे परस्परांना भिडणारे अवाज यावे तसे सगळ्या मुलिंच्या आचमनाच्या चमचा/पळी भांड्यांचा किणकिणाट सुरु होतो. ओम केशवाय नमः..,ओम नारायणाय नमः..., ओम माधवाय नमः..,ओम गोविंदाय नमः .. मग सगळ्या जणींकडून पूजेचा संकल्प (एकत्र..) म्हणवून घेण्याचं दिव्य पार पडतं. कारण सगळ्यांना आपण संकल्प सांगताना केलेले स्पष्टोच्चार, पूजेची जागा आणि कोलाहलाच्या हिशेबात ऐकू-जातीलच अशी परिस्थिती नसते. मग तिथे आपल्याजवळ माइक असो,अथवा नसो. कारण संकल्पातले बरेचसे शब्द आजच्या काळात अजिबात ओळखिचे नसलेले..त्यामुळे बर्‍याच मुलिंची शिवमंगलागौरी या शब्दानंतर येणार्‍या 'व्रतांगत्वेनं' या शब्दाची केलेली 'व्रत' 'अंगत्वेन' - ही फोड सुद्धा पकडीतून निसटते..आणि मग कधी कधी व्रतं च्या जागी व्रटं!. अंगत्वेनं च्या जागी अंगत् अंगत् ..अशी गाडी रांगत रांगत अडखळून..एकदाची 'वेन' वर येते..आणि भरपूर हसाहशी होत होत..तो एकदाचा संकल्प पार-पडतो! मग सगळ्यांच्यात मिळून ठेवलेल्या चारपाच चौरंगाच्या मध्यभागी असलेल्या चौरंगावर आंम्ही एका मोठ्या ताटलीत भरपूर तांदूळ घालून सुपारीचा गणपति मांडलेला असतो,त्याची पूजा सुरु होते. यात विशेष काहीहि नाही. पण इथे जर का पूजेला आलेला गुरुजी तयारीचा झालेला नसला,तर त्याची वाट लागते. कारण त्यानी जर का सवईप्रमाणे बारक्याश्या वाटीत तो सुपारीचा गंपतीबाप्पा मांडला..तर त्याच्यावर प्रत्येक मुलीनी वाहिलेल्या एकेक जरी म्हटलं,तरी सुमारे पंधरा वीस फुलं आणि साधारण त्याच्या दसपटीत दूर्वांचा भार पडतो.. आणि मग ते दृश्य लांबुन पाहणार्‍याला ती वाटीही दिसत नाही,आणि सुपारीचा तो गंपतीही. दोन्हीही बिचारे त्या लिफ्टखाली अडकलेल्या दुरुस्ती कामगारासारखे गायब होतात. प्रथम प्रथम मी ही तयारीचा-झालेला नव्हतो तेंव्हा हे दिव्य कसं मार्गी आणावं हे कळ्ळं नव्हतं. पण एकदा पूजा सांगुन घरी गेल्यावर दुपारचा आडवा पडला असताना तो सुपारीच्या गंपतीबाप्पा माझ्या कानात "दूर व्हा दूर व्हा" असे ओ-रडू लागला. आणि मला कळे ना की मी याला इतका कधी जवळ केलाय तो..नीट स्वप्नात डोकावून पाहिल्यावर कळलं की सकाळी पुरंदर्‍यांच्या घरी आपण वाटीत टाकलेला तो हाच! तोच तो गुदमरल्यामुळे त्या दूर्वांना सोंडेनी वर उडवत "दूर व्हा दूर व्हा" करत होता! खरच! कुठल्या वस्तूचं नाव कश्यावरून काय पडेल हे सांगता येत नाही...

तर सांगण्याचा मतीत अर्थ आंम्ही चांगल्या मोठ्ठ्या ताटलीत तो सुपारीचा गणपती मांडतो. आणि मग सगळ्या मुलिंची वाहिलेली कार्पासवस्त्र,जास्वंदीची फुलं ,दूर्वांच्या गड्ड्या, कडेनी वर्तुळाकार जमलेली गुळखोबरी ,असं सगळं लेऊन तो ह्याप्पीबड्डे झालेल्या लहान मुलासारखा हसरा चेहेरा करून स्वतःची प्रार्थना करवून घ्यायला सिद्ध होतो. आणि मग आंम्ही, "कर्‍हेच्या तिरी एक असे मोरगावं,जिथे नांदतो मोरया देवराव।चला जाऊ यात्रे महापुण्य आहे,मनी इच्छिले मोरया देत आहे॥" असा ऑफ बीट श्लोक-टाकुन वातावरणात शांतता आणि उर्जा आणतो. गरजेचीच असते ती..नायतर ह्या पहिल्या पंधरा ओव्हर नंतर खेळ रटाळ होण्याचं भय असतं. कारणंही तसच आहे हो त्याला. एकतर दहा पंधरा मुलिंच्या मिळून्,आणल्या न आणलेल्या सर्व मंगळागौरिंची/अन्नपूर्णांची संख्या होते पाच ते दहा! तेंव्हा जिची मुख्य मंगळागौर असते..तिला पूर्ण वाव देत देत ह्या बाकिच्याही सगळ्या गौर्‍यांना ( हे मी मूर्तींबद्दलच म्हणत आहे.., बरं का! असो!) एका लायनीत चालवत नेणे शक्य करावयाचे असेल..,तर वातावरण सहज आनंदी आणि उर्जावानच असावं लागतं. नाहितर मग, "गुर्जी थांबा हो..माझं पंचामृत विसरलय..!" असं आपल्याला मोठ्ठ्यांदा ऐकवून त्यायोगे शेजारची कडून ते प्राप्त करवून घेणे,किंवा "प्ल...........! फुलच संपली" , "नक्की कुठल्या पत्री?कुठे?" अश्या तक्रारिंना मार्गस्थ करविणे यातच आपला सगळा वेळ वाया जाऊ शकतो. तश्यात गंपतीबाप्पासाठी जशी मोठ्ठी ताटली योजलेली असते,तशी या सगळ्या मंगळागौरींच्या मूर्त्यांना अभिषेकासाठी एकच मोठ्ठी परात योजावी लागते. ते न करता तिघीत एकच ताम्हन आणि प्रत्येकीची मूर्ती त्यात,असा वेडगळपणा आपल्या हातून घडला तर सारखी ती ताम्हनं भरायला येऊन्,पाऊस आल्यानी म्याच श्टॉप करण्याचा प्रसंग तिथे ओढवतो. कारण अभिषेकाची स्तोत्र किंवा सूक्त म्हणेपर्यंत प्रत्येकीचं चांगलं अर्ध-फुलपात्र पाणी तरी देवीवर पडतं! त्यापेक्षा परात बरी. फारतर त्यात एखादिची हौसेनी केलेली चांदिची वजनाला हलकी मंगळागौर पाण्याची लेव्हल वाढली तर अचानक पोहाणी करायला लागते. आणि त्याचा दोष काहि आपल्यावर येत नाही.. त्यामुळे , 'ताम्हनापरास परात बरी!' * (*सदर म्हण..ही आमच्या[च] "पुरोहितांच्या म्हणी,जणू नागाची फणी!" या आगामी म्हणी सं'ग्रहातून साभार!)

मग सगळ्या देव्यांचा एकत्र अभिषेक होतो. प्रत्येकिनी आणलेल्या अत्तराचे गरम पाण्यातले मिश्रीत वास चहुकडे दरवळतात.. त्या पाण्यानी मंगळागौरींना मंगलस्नान होतं. आणि पुढे येतो तो कणकेचे दागिने घालुन इतर वस्तूंवर देवीला स्थानापन्न करण्याचा प्रसंग . शहाण्या गुरुजीनी यात पूजेला बसलेल्या महिला वर्गास काहिही विशेष सूचना द्यायला जाऊ नये. एकतर ते कणकेचे केलेले अलंकार ओळखणं हा आपला प्रांतच नाही. आणि ओळखू येत असले,तरी तिथे 'आपलं' काही चालेल ..असा संभव नाही. त्यामुळे साखळीच्या दोर्‍यासारखी बारीक विणलेली ती- वेणी की गळेसरी?. ह्या प्रश्नाला आपण "ते बघा.. तुम्हीच ओळखून वहा..आंम्हाला त्यातलं काय समजणार?" असं प्रश्नार्थक उत्तर देऊन वेळ मारुन न्यावी. फारतर कणकेचा केलेला जाड चौरंग आपण देवीसाठी लावलेल्या तांदुळाच्या ताम्हनात "इथे ठेवा" इतकीच सूचना तसं होत नसेल तर करावी. नाहितर एखादीला तो चौरंग डोक्यावरील छत्र आहे(..अर्थातच देवीच्या!),असा साक्षात्कार होऊ शकतो. आणि तो साक्षात्कार प्रत्ययाला आला..तर त्यातल्याच एखाद्या मूर्तीला तो डोइच्या केसांवर लावलेल्या (हल्लीच्या..) औषधी केशकल्प लेपनासारखा जाऊन बसायची शक्यता! त्यामुळे आपण कडेनी फक्त व्यवहारावर लक्ष ठेवावं,तात्विक सूचना करायला मुळीच जाऊ नये. पुढे मग "ही गळेसरी का ?" "असेल असेल!" "घाल की तशीच वेणी म्हणून,देवी काय स्वप्नात येणारे का (आपली!*)केस-धरायला...खि..खि..खि..खि..!" (* हा शब्द ,देवी आणि केस अश्या दोन्ही साठी आलटून पालटून वाचावा.) अशी चर्चा होत होत मंगळागौरी कणिकसंपन्न होतात. मग अथांगपूजेनंतरच्या देवीला वहायच्या पत्री आणि फुलांना मात्र बागेत खेळायला सोडलेल्या मुलां इतकाच वाव द्यावा. कारण पत्री जर का देवीवर बसायच्या असतील..तर त्यांना सरळ वहा,वर वहा,बाजुनी वहा..असल्या शिस्तीत आणून चालत नाही. कारण मग त्या देवीच्या चौरंगावर हव्या तश्या सेट होत नाहीत.. आणि त्यानी मग नंतरचा 'शो' बिघडतो. आणि मग ते कर्म बर्‍याचदा आपल्यावरच अगदी निघता निघता "लाऊन द्या ना तुम्हीच!" असं अंगावर पडतं. त्यापेक्षा त्यावेळी , "काहिवेळा बेशिस्तीतच शिस्तीचं सारं दडलेलं असतं!" अश्या ओळी आपण मनात म्हणाव्या.कारण एकदा का नामपूजेत त्या पत्री आणि फुलांचा डोलारा देवीवर लागला..,कि शेवटच्या पाच ओव्हर एकदम इझी होऊन जातात.

मग आंम्ही तिथून पुढे नैवेद्यापासूनचे राहिलेले सगळे उपचार करून घेतो. शेवटी देवीला तीनदा अर्घ्यप्रदान करवून घेणेचे होते. आणि मग सर्वात जड शेवटची ओव्हर येते ती आरतीची! आता तुम्ही म्हणाल , "आहो आत्मूंभट,आरतीत कसलं काय आलय जड? हे तर तुमच्या रोजच्या सवयीचच की!" . पण लोकहो, ह्या एका पूजेपुरत हे इतकं जड आहे..की प्रॅक्टीस केली तरी हे सवईचं होऊ शकत नाही. कारण प्रॅक्टीसच संभवत नाही असं हे प्रकरण आहे. म्हणजे पहिल्या गणपती ,देवी आणि शंकराच्या आरतीचा प्रश्न नाही. हा त्या मंगळागौरीच्या पारंपारिक वृत्तहीन आरतीचा प्रश्न आहे. ज्यानी कुणी ही आरती रचली..त्याला बिचार्‍याला डोक्यावर बंदुक ठेऊन ठेऊन " लिहि..लिहि..नाहितर तुला ढिश्श्क्यँव!" अशी धमकी देऊन लिहवली असावी,अशी माझ्या मनाची ठाम खात्री आहे. आहो कसली आरती ती? काव्यातंही वाचता येत नाही..गद्यातंही नाही,आणि पद्यातंही नाही. (हे पहा ,'जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियाताटीं।।
रत्नांचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती।।धृ।।
मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया।।
तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया ।।१।।') मग घडतं असं,की कुणीतरी ती आरती कशीबशी गाववून संपवतं. आणि अवघड पेपर टाकल्यानंतर मिळणारा सुटकेचा निश्वास आंम्हाला सोडायला मिळतो. शेवटी आरती असो वा श्लोक,स्तोत्र असो वा प्रार्थना. त्याला थोडीसुद्धा गेय्यता नसेल,तर त्या शिवमंगलागौरीतलं शिवंही सापडायचं नाही आणि मंगलंही!

असो! इथे आमचा पार्ट संपतो. आणि यजमानांकडला आजच्या काळात निरनिराळ्या पद्धतीनी साजरा होणारा मंगळागौर जागविणे हा पार्ट सुरु होतो. पूजा संपते आणि कहाणी वगैरे वाचून या सगळ्या मुलि ,पुन्हा तेथून आपापल्या नोकरी व्यवसायांना पळतात,आणि आंम्ही पुढच्या यजमानदारी मार्गस्थ होतो.
======================================
क्रमशः
मागिल सर्व भाग:- १.. २.. ३.. ४.. ५.. ६.. ७.. ८.. ९.. १०.. ११.. १२.. १३.. १४.. १५.. १६.. १७..(मंगलाष्टक स्पेशल)१८.. १९.. २०.. २१.. २२.. २३.. २४.. २५.. २६.. २७(यज्ञयाग विशेष!) २८.. २९.. ३०.. ३१.. ३२.. ३३.. ३४(विवाह विशेष-१) ३५(विवाह विशेष-२) ३६ (विवाह विशेष-३) ३७.. ३८.. ३९.. ४०.. ४१ .. (खेडेगावातील नाटक..) ४२.. ४३..

संस्कृतीविरंगुळा

प्रतिक्रिया

जेपी's picture

4 May 2015 - 5:52 pm | जेपी

आवडल..

टवाळ कार्टा's picture

4 May 2015 - 7:44 pm | टवाळ कार्टा

आवडले :)

सौंदाळा's picture

5 May 2015 - 1:56 pm | सौंदाळा

वाचतोय गुरुजी
क्रमशः आहे की नाही ते आधी बघतो आणि नंतर वाचायला सुरुवात करतो

नाखु's picture

6 May 2015 - 2:34 pm | नाखु

एकडाव इकडे पण सारखेच.

प्रचेतस's picture

5 May 2015 - 2:23 pm | प्रचेतस

हाही भाग अतिशय रोचक.

पॉइंट ब्लँक's picture

5 May 2015 - 5:05 pm | पॉइंट ब्लँक

खतरनाक लिहिलय. एकदम मजेशीर.

विवेकपटाईत's picture

6 May 2015 - 7:44 pm | विवेकपटाईत

पूर्ण IPLचा मेच पाहिल्यासारखे वाटले.