माझा मिपाविश्व प्रवेश
साधारण ७-८ वर्ष झाली असतील, ऑफिसमध्ये काम करीत होतो. कंटाळा आला म्हणून शेजारी बसलेल्या सहकाऱ्याशी गप्पा माराव्या म्हणून त्याच्या डेस्क जवळ गेलो. तो हि बहुतेक कंटाळला असावा कारण त्याच्या संगणक पडद्यावर तो एक pdf उघडून कुठली तरी कथा वाचत बसला होता. “ काय रे, हे काय?”, मी विचारले. “अरे छान कथा आहे, अगदी उत्कंठावर्धक. तुला पाठवतो वाचून सांग कशी आहे ते”. त्याने उत्तर दिले. ठीक आहे म्हणून त्याने पाठविलेल्या कथा वाचनात मी गुंग झालो. खरोखरच उत्तम अशी ती कथा होती. “कुठून मिळाली रे कथा, खरेच छान आहे की”. दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये मी त्याला विचारले.