मन

पावसाचं वय....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
16 Aug 2023 - 8:38 pm

मऊ मऊ दुपटं,ऊबदार कुशीत
तोंडात अंगठा,गाल लुसलुशीत
तड तड ताशा,मोत्याच्या माळा
सांगतो का रे पावसा वय माझ्या बाळा?

भिरभीर डोळे, संतत धार
रस्त्यातले डबके,आईचा मार
भिजलेलं डोकं,कागदी होड्या
सांग ना रे पावसा वय तुझं गड्या?

मनात चुळबुळ,बाहेर भुरभुर
मातीला गंध,हिरवळ दूरदूर
छत्रीतलं भिजणं,भेटीची सय
सांग ना रे पावसा काय तुझं वय?

उरात उर्मी,अंगात गर्मी
सह्याद्रीची साथ,मित्रांचा हाथ
रानं आबादानी,नभात 'मल्हार' लय
सांग ना रे पावसा तुझं काय वयं?

जीवनमनकवितामुक्तक

मातीचे पाय

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
27 Jun 2023 - 4:11 pm

पायांना स्पर्शून आले
ते हात मळाले होते
लख्ख उमगले तेव्हा
ते पाय मातीचे होते

मी केवळ पाहत होतो
पायांच्या खालची धूळ
ती ललाटास लावावी
हे एकच माथी खूळ

मी इथवर पाहून आलो
पाऊलखुणा विरणाऱ्या
आधी खुणावत, मागून
कपटी विकट हसणाऱ्या

आता, पुन्हा चालावे
पुढे, की परत फिरावे?
सोस ना-लायक पायांचे
पुसून अवघे टाकावे?

प्रेमळ शब्दांची ओल
मनात झिरपत नाही
व्हावे नतमस्तक ऐसे
पायही दिसत नाही

ते सारेच निघून गेले
जे पाय धरावे सुचले
मातीचे पाय मातकट
मागे माझ्यासह उरले

कविता माझीदृष्टीकोनमनकलाकवितासाहित्यिक

मावळतीची दिशा....

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
12 Jan 2023 - 11:36 am

कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे
निसटल्या क्षणांना पुन्हा धरावे
पारंब्या वरती झुलता झुलता
पदराखाली पुन्हा लपावे

कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे
भोगल्या क्षणांना पुन्हा जगावे

आठवणीतले विस्मृत चेहरे पुन्हा एकदा तरी दिसावे
डोळ्या मधले दवबिंदू अन् चेहर्‍यावरले धुके पुसावे

हुरहुरत्या कातरवेळी कधी कुणाची वाट बघावी
दुरून बघता ओंजळीतली फुले दिसावी
किती मिळाली किती गळाली,खंत नसावी
कधी वाटते मावळतीची दिशा पूर्व असावी

कधी वाटते पुन्हा एकदा मागे जावे
भोगल्या क्षणांना पुन्हा जगावे

आयुष्याच्या वाटेवरमनकविता

आज्जी गेलीय सोडून

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
14 Jun 2022 - 9:54 pm

उशीराने आले ध्यानी
एकटे गर्दीत बसून
मला अनोळख्या देशी
आज्जी गेलीय सोडून

घरातून निघताना
का बोलली ती नाही?
तुला लेकरा घरात
जागा उरलीच नाही

आई बाबा गेल्यावर
आज्जी तूच उरलेली
कुणाकुणा पोसशील
तूही आता थकलेली

माझ्या इवल्या बहिणी
आणि भाऊ लहानगे
तुला आज्जी, म्हणतील
कुठे दादा आमुचा गे?

काय सांगशील त्यांना
मला सांगशील का ग?
आज्जी एवढ्याचसाठी
पुन्हा भेटशील का ग?

- संदीप चांदणे

जाणिवजीवनमनकरुणकविता

नव्हतं ठाऊक

सरीवर सरी's picture
सरीवर सरी in जे न देखे रवी...
13 Apr 2021 - 11:06 pm

आता मनाच पाखरू
घर कुठे बांधणार?

नव्हतं ठाऊक
आठवणींच झाड
तू कधी तोडणार|

भाळला होतास
अखंड चिवचिवाटावर,

नव्हतं ठाऊक
ध्वनीसाज बोलीचा
तू निष्पर्ण करणार|

निराळा पसारा
जाणूनही.. आवरणार,

नव्हतं ठाऊक
झाले​ पसा~याचे जाळं
तू शिकारी कोळी असणार|

मनमाझी कवितामुक्तक

फुलपाखरू

मन्या ऽ's picture
मन्या ऽ in जे न देखे रवी...
9 Jun 2020 - 9:22 am

फुलपाखरू

एक होते रंगेबेरंगी
फुलपाखरू ..
त्याचे 'मन'
ऐसे नाव..
ईवलेसे नाजुक
पंख तयाचे
त्यावर सुंदर नक्षी
संस्कारांची.

फुलपाखराच्या
पंखावरचे काही रंग
लाल-गुलाबी
स्वप्नांचे
बालपणीच्या आठवणींचे
उमलणार्या फुलांचे
चांदण्या रातींचे
तर
काही रंग आहेत.,मात्र
निळे-काळे
नको त्या
कटु आठवणींचे
भळभळत्या जखमांचे
चुलीतल्या विस्तवाचे..

प्रेरणात्मकमुक्त कवितामुक्तकफुलपाखरूमनरंग