गांधीवाद आणि मराठी साहित्य !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
18 Dec 2008 - 7:23 am

मिसळपाववर सध्या वेगवेगळे 'वाद' गाजत आहेत. दहशतवाद, गांधीवाद, अवांतरवाद इत्यादी इत्यादी. सध्या या विचारांनी मिसळपाववरील जनजीवन ढवळून निघाले आहे आणि त्याचा परिणाम मिपावर वावरणार्‍या मंडळींवर होतो, या सर्व विचारांचा परिणाम येथे वावरणार्‍यावर झाला नाही तर नवल वाटावे. आम्हालाही साहित्यातील गांधीविचारांनी शीळ घातली.

गांधीविचारांच्या चर्चेवरुन असे दिसते की भारतीय समाजमनावर म. गांधीच्या विचारांचा परिणाम झालेला आहे आणि ती एक मोठी घटना मानलीच पाहिजे. भारतीय स्वातंत्र्याला नवचैतन्य देण्याचे श्रेय म. गांधीजींनीचा द्यावे लागेल. म. गांधींनी आपली नीतिमुल्य निश्चित केली होती. त्यांचे तत्वज्नान सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह,ब्रम्हाचर्य, शरीरश्रम, स्वदेशी, जीभेवरील नियंत्रण, सर्वधर्म समभाव, अस्पुश्यता न मानने ही त्यांची मुल्य होती. या नितीमुल्यांनाच गांधीवाद असे म्हटल्या जात असावे. गांधीविचारांचा प्रभाव येथील समाजमनावर पडला होता त्यांच्या विचाराने भारल्यामुळे अनेक तरुण गांधीजींच्या लढ्यात उतरले आणि साहित्य हा समाजाचा आरसा असतो असे म्हटल्या जाते, त्यामुळे या सर्व परिस्थितीचे चित्रण मराठी साहित्याने टीपले आहे.

१९२० ते ११९५० हा कालखंड गांधीयुग म्हणून ओळखला जातो. १९३० ला गांधीजींनी खेड्याकडे चला ही हाक दिली आणि त्याच काळात मराठी कवींनी त्याकाळात मोठ्या प्रमाणात जानपद गीतांची रचना करुन गांधीजींच्या हाकेला ओ दिली होती.

गांधीवादाचा फार मोठा प्रभाव वा. म. जोशींवर होता. ते स्वत: गांधीजींच्या राजकीय चळवळीत उतरले होते. त्याकरिता त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. ' सुशिलेचा देव' या कादंबरीत विश्वकुटुंबवादाबरोबर समाजवादाचाही पुरस्कार केलेला आहे. त्याचबरोबर दोन्ही वाद व्यक्तिविकासाला घातक आहेत अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. 'इंदू काळे व सरला भोळे' या त्यांच्या कादंबरीत त्यांनी गांधीवादाचा बुद्धीप्रामाण्यवादी परामर्श घेतलेला आहे. यातील नायक विनायकराव, गांधी यांच्या प्रभावाखाली असून ते गांधी यांच्या चळवळीत भाग घेतात, तुरुंगात जातात. तरीही ते पूर्ण गांधीवादी नाहीत. गांधीवादी लोक कसे दुराग्रही असतात हेही त्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या कादंबरीत गांधीवाद व्यावहारिक वाटत नाही, असा विचार मांडलेला दिसतो.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स. खांडेकर यांच्या 'कांचनमृग' पासून ते 'ययाती' पर्यंत गांधीवादाचा प्रभाव जाणवतो म्हणतात. साने गुरुजींनी 'शामची आई, धडपडणारी मुले या आणि अशा अनेक कादंब-या लिहून आपली गांधीविचारावरील निष्ठाच प्रकट केली. स्वातंत्र्याची चळवळ, स्वार्थत्याग,बंधुभाव, समत्व, करुणा, इत्यादींचे चित्रण साने गुरुजींनी आपल्या हळुवार शैलीने केले आहे. 'शामची आई' या त्यांच्या एकाच कादंबरीने अमाप लोकप्रियता मिळवली. संस्कारहीन अशा नव्या समाजरचनेत सुसंस्काराचे हे उदात्त व करुण चित्र वाचकांना आवडले. त्यांच्या कादंबर्‍यांनी ध्येयवादाची जोपासना केली. त्यांचे भाबडे मन त्यांचा आशावाद त्यांची कमालीची हळुवार वृत्ती यांचे दर्शन त्यांच्या लेखनातून घडते. असे असले तरी त्यांच्याबद्दल असे म्हटल्या जात होते की, त्यांचा स्वप्नाळू ध्येयवाद वास्तवाचे रुप लपवितो.

ना. सी. फडके यांनी आपल्या काही कादंब-यामधुन गांधीजींनी उभारलेल्या चळवळीचा उल्लेख केला ज्यात प्रवासी, उन्माद, समरभूमी, यांचा उल्लेख करता येईल. पण त्यांनी गांधीवादाचा पुरस्कार केला नाही. उलट गांधीविचारांवर टीकाच केली. असे समीक्षकांचे म्हणने आहे.

मराठी कादंबरीत गांधीवाद न रुजण्याचे एक कारण सांगितल्या जाते की, मराठीमधे लिहिणारे जे लेखक होते ते सर्व एका विशिष्ट वर्गाचे होते आणि त्या वर्गाचा ओढा गांधीवादाकडे नव्हता. विनोबा भावे आणि दादा धर्माधिकारी यांनी मात्र गांधीवादाचा पुरस्कार करुन आपले जीवनच त्यासाठी वेचले.

कवितेमधे भा. रा. तांबे यांनी गांधीविचाराने प्रभावित होऊन काही कविता लिहिल्या जशा की 'रुद्रास आवाहान' ही त्यांची जलियनवाला बाग हत्याकांडाची धिक्कार करणारी कविता. तर 'गाडी बदलली' या कवितेतुन अहिंसा तत्त्वज्ञानाचा पुरस्कारच केला आहे. ' कोण रोधील' या कवितेतून तांबे यांनी गांधीजींना आणि त्यांच्या अनुयायांना राष्ट्रनिर्माते म्हटलेले आहे.

कुंजबिहारी यांची -

'भेटेन नऊ महिन्यांनी'
मनी धीर धरी शोक आवरी जननी भेटेन नऊ महिन्यांनी
या न्यायाची रीत मानवी नसते
खरी ठरते केव्हा चुकते...

ही कविता खूपच गाजली होती. माधव ज्युलीयन, यशवंत यांच्याही कवितेतून राष्ट्रीय वृत्ती आणि अहिंसेचा पुरस्कारच त्यांच्या विचारातूनच येतांना दिसतो. विठ्ठलराव घाटॆंची ''तो पाहा महात्मा आला'' गांधीजींच्या दांडीयात्रेवरही काही कविता लिहिल्या गेल्या त्यात आनंदराव टेकाडे यांची 'रणसंग्राम' विशेष मानली जाते. माधव ज्युलीयन यांनी 'महात्मा गांधी आणि टागोर' 'महात्मा काय करील एकटा' अशा मोजक्याच पण सुंदर कविता लिहिल्या. कुसुमाग्रजांच्या, एक मागणे, खादी गीता, धृतराष्ट्र, या गांधीविचारावरील कविता समजल्या जातात. बा.भ. बोरकरांचे 'महात्मायन' असे प्रदीर्घ महाकाव्य लिहिण्याचा संकल्प पूर्ण झाला नाही.

डॉ. वि.भि. कोलते, राजा मंगळवेढेकर, सोपानदेव चौधरी, ग.ह. पाटील, ग.दि.माडगूळकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, सेनापती बापट, इत्यादीनी गांधीजी व गांधिवादावर अनेक कविता लिहिल्या. आजही कवितेतून बर्‍याचदा गांधीजींवर कविता लिहिणारी कवी मंडळी दिसते...पण लिहिते ते उपाहासातून...टीका करण्याच्या उद्देशातून किंवा खरेच बापू तुमच्या विचारांची गरज आहे असाही एक विचार कवितेत दिसतो ' बापु तुमच्या देशात, बापू, महात्मा, अशा शिर्षकाच्या अनेक कविता दिसतात कधी त्यांच्यावर टीका तर कधी त्यांच्या विचारांचे मोठेपण दाखविल्या जाते.

नामदेव ढसाळ ' मुर्ख म्हातार्‍याने' या कवितेत म्हणतात...

''अहिंसावादी शासन झाले आहे हिंसेची देवता
गावांची बनवली जातायत मैदाने
आयाबहिणींच्या इंद्रियांचे तोडले जातायत लचके
उपटले जातायत अंकुर अदिवाशांच्या
देवदत्त शेतातून
दमन यंत्रणेच्या जात्याखाली भरडले जाताहेत जनतेचे सैनिक''

१९३० ते १९४० याकाळात गांधी यांची थोरवी व स्वातंत्र्य आंदोलनाची माहिती गाणारे अनेक कवी निर्माण झाले, मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यांच्या काव्यकृतीही नष्ट झाल्या. कारण त्यांच्या काव्यात मूलभूत काव्यगुणच नव्हते असे म्हटल्या जाते त्याच बरोबर अनेक कवी, लेखकांना त्यांचे तत्वज्ञान मान्य नव्हते पण त्यांचा मोठेपण मान्य . स्वातंत्र्य लढ्याचे एक निर्भीड सेनानी म्हणून त्यांच्याविषयीचा तो आदर होता, तोच आदर कविता, कादंबर्‍यातून व्यक्त झाला आहे.

सारांश, मराठी कादंबरी आणि मराठी कविता यावर गांधीवादाचा फार थोडा प्रभाव दिसतो. नाट्यक्षेत्रात तो प्रभाव नगण्यच असावा. (मिपावरील नाट्यसमीक्षक भर घालतीलच) एकुण काय मराठी साहित्याने गांधीवादाचा पुरस्कार जरा हात राखुन केलेला दिसतो असे म्हणन्यास हरकत नसावी.

टीप : अनेक लेखक कवी, यांच्या लेखनातून गांधीवाद व्यक्त झाला आहे, त्यांची नोंद घेणे राहून गेले आहे. अजूनही नव्याने साहित्यातून व्यक्त होणार्‍या गांधीविचारांवर नव्याने भर घालणार्‍या मतांचे स्वागत आहे.

साहित्यिकसमाजतंत्रविचारलेखबातमीचौकशीमाहितीआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

18 Dec 2008 - 8:39 am | विसोबा खेचर

सर,

गांधीवादात भर घालणार्‍या साहित्यिकात आपण कलंत्रीसाहेबांचं नांव घ्यायचं विसरलेला दिसताहात!

असो...

तूर्तास, पिसाळलेला कुत्रा कुणाला चावू नये म्हणून त्याला अहिंसावाद कसा शिकवावा यावर विचार करतो आहे!

आपला,
तात्या गोडसे.

कोलबेर's picture

18 Dec 2008 - 9:00 am | कोलबेर

अरे हो की! आणि आपल्या पैकी बर्‍याच जणांचे दैवत असणार्‍या भाईकाकांचे गांधीजींविषयी विचार? ते देखिल राहिलेच की. बाकी लेख मात्र प्राध्यापकी थाटात विद्वत्तापुर्ण उतरला आहे.

असो..

पिसाळलेल्या कुत्र्यावर गांधीवादाने काही उपाय होइल असे वाटत नाही, त्याला आता अर्धी चड्डी घालुन संचलनाला नेतो आणि बौद्धीकाला बसवतो. चावायचा थांबतो का ते बघुया.

आपला,
कोलबेर गुरुजी

विसोबा खेचर's picture

18 Dec 2008 - 9:10 am | विसोबा खेचर

पिसाळलेल्या कुत्र्यावर गांधीवादाने काही उपाय होइल असे वाटत नाही,

देअर यू आर! धन्यवाद.. :)

अरे हो की! आणि आपल्या पैकी बर्‍याच जणांचे दैवत असणार्‍या भाईकाकांचे गांधीजींविषयी विचार? ते देखिल राहिलेच की..

खरेच की. गांधीजींविषयीचे भाईकाकांचे विचार तात्याकडून ऐकायला आवडतील.

बाकी लेख मात्र प्राध्यापकी थाटात विद्वत्तापुर्ण उतरला आहे.

हं. लेखातून प्राध्यापकांचे शुद्धलेखनविषक विचार मात्र अगदी स्पष्ट झाले आहेत.

पिसाळलेल्या कुत्र्यावर गांधीवादाने काही उपाय होइल असे वाटत नाही, त्याला आता अर्धी चड्डी घालुन संचलनाला नेतो आणि बौद्धीकाला बसवतो. चावायचा थांबतो का ते बघुया.

चांगला उपाय आहे. करून बघायला हवा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

विकास's picture

18 Dec 2008 - 9:02 am | विकास

विषय शिर्षक वाचून मला एकदम का कोणास ठाऊक पण "जितना ही जाऊ मै दूर तुझसे, उतनी ही तू पास आए" या अचानक ओळी आठवल्या :-)

बाकी माहीतीपूर्ण लेख. यातील काही मला अनोळखी साहीत्य होते त्या मुळे माहीतीबद्दल धन्यवाद.

यातील नायक विनायकराव गांधी यांच्या प्रभावाखाली असून ते गांधी यांच्या चळवळीत भाग घेतात, तुरुंगात जातात. तरीही ते पूर्ण गांधीवादी नाहीत.

कसे असणार पूर्ण गांधीवादी? नाव "विनायक" आडनाव "गांधी" :-)

गांधीवादी लोक कसे दुराग्रही असतात हेही त्यांनी दाखवून दिले आहे.
दुराग्रहाची मक्तेदारी काही केवळ गांधीवादींकडेच असते असे मानू नका! जसे एकट्या गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले नाही तसेच एकट्या गांधीवादाने दुराग्रही होता येते असे नाही. "ऑल रोड्स लीड टू रोम" - अर्थात जेंव्हा स्वतःचा अभ्यास, चिंतन, मनन,स्वाध्याय आणि सिंहावलोकन थांबून केवळ कुठल्यातरी विचाराने भारावण्यापेक्षा भारून जाणे होते तेंव्हा दुराग्रहीपणा आपसूक येतो.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स. खांडेकर यांच्या 'कांचनमृग' पासून ते 'ययाती' पर्यंत गांधीवादाचा प्रभाव जाणवतो म्हणतात.

खांडेकरांनी "सोनेरी स्वप्ने भंगलेली" म्हणून (मला तरी वाटते) एक डिप्रेसिंग कादंबरी लिहीली होती ज्यात गांधीवाद्याची स्वप्ने सत्ताधार्‍यांनी गांधींचे नाव घेत कशी उध्वस्त केली हे स्वातंत्र्यसैनिकाच्या संदर्भातील कथानक होते.

बाकी आपण बरेच सांगितले तरी एक नाव राहीले असे वाटले ज्यांनी गांधीवादी साहीत्य लिहीले असावे (कथाकादंबर्‍यांच्या रुपात नाही) ते म्हणजे विनोबा भावे.

तसेच गांधींवर लिहीणार्‍यांसंदर्भात पण अजून लिहीता येईल. मधे गांधीवादी असलेल्या अंबरीश मिश्रा यांचे "गंगे मध्ये गगन वितळले" का असेच काही शिर्षक असलेले माहीतीपूर्ण पुस्तक वाचनात आले होते. त्यात म्हणल्याप्रमाणे गांधींकडे सुरवातीस काँग्रेसने दुर्लक्ष केले तेंव्हा गांधीजींनी स्वतःची चळवळ चालू केली. त्याला मिळणारी प्रसिद्धी पाहून आपोआप काँग्रेस मागे आली...

असो, लेख आवडला.

नंदन's picture

18 Dec 2008 - 9:27 am | नंदन

लेख, मराठी साहित्यातील गांधीवादाचा घेतलेला मागोवा आवडला. विकास म्हणतात तसे, या विषयावर सरांनी अधिक विस्ताराने लिहिल्यास वाचायला आवडेल.

>>> आम्हालाही साहित्यातील गांधीविचारांनी शीळ घातली.
- :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज's picture

18 Dec 2008 - 10:12 am | सहज

गांधीवाद व साहीत्य यावर अजुन लिहा.

आम्हालाही साहित्यातील गांधीविचारांनी शीळ घातली.

:-)

वेताळ's picture

18 Dec 2008 - 10:02 am | वेताळ

गांधीवाद हा एका कालावधी मध्येच समाजात रुजला,वाढला व संपला.
कारण तुम्ही वर दिलेच आहे.
त्यांचा स्वप्नाळू ध्येयवाद वास्तवाचे रुप लपवितो.
हे जसे सानेगुरुजीच्या बाबतीत सत्य होते तसे गांधीवादा बद्दलही म्हणता येईल.
अजुन एक मला प्रश्न पडला आहे जर आत्महत्या हे पाप असेल तर गांधीवादा मध्ये आमरण उपोषन करणे ही देखिल एकप्रकारे आत्महत्याच नव्हे का?तसेच यंत्राचा वापर ह्या विषयी गांधीजीचे विचार आजच्या काळात मान्य होणे शक्य नाही.
मराठीसाहित्यात गांधीजीचा प्रभाव तितकासा पडला नाही हे खरे आहे.पण मिपासाहित्यात गांधीजीचा खुपच प्रभाव पडला आहे , हे मान्य करावेच लागेल.
वेताळ

अवलिया's picture

18 Dec 2008 - 12:59 pm | अवलिया

अजूनही नव्याने साहित्यातून व्यक्त होणार्‍या गांधीविचारांवर नव्याने भर घालणार्‍या मतांचे स्वागत आहे.

बाप रे!!

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

सखाराम_गटणे™'s picture

18 Dec 2008 - 4:34 pm | सखाराम_गटणे™

वाह वाह, छानच आहे,
आवडले

पुले शु

----
सखाराम गटणे

लिखाळ's picture

18 Dec 2008 - 4:47 pm | लिखाळ

सर,
आढावा चांगला घेतला आहे.

यातील नायक विनायकराव गांधी यांच्या प्रभावाखाली असून ते गांधी यांच्या चळवळीत भाग घेतात, तुरुंगात जातात. तरीही ते पूर्ण गांधीवादी नाहीत.

हे वाक्य ''यातील नायक विनायकराव, गांधी यांच्या प्रभावाखाली असून ... '' असे वाचावे काय?

'भेटेन नऊ महिन्यांनी' ही कविता फाशी जाणारा क्रांतिकारक म्हणत आहे वाटते.
-- लिखाळ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Dec 2008 - 4:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे वाक्य ''यातील नायक विनायकराव, गांधी यांच्या प्रभावाखाली असून ... '' असे वाचावे काय?

हो, असेच वाचायला हवे. दुरुस्ती केली आहे. धन्यवाद !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कलंत्री's picture

18 Dec 2008 - 8:29 pm | कलंत्री

प्रा. डॉ. बिरुटे साहेबांचे धन्यवाद कसे मानावे हे मला समजत नाही. मिपाच्या लोकांना आवडो अथवा न आवडो मी गांधीवादाचे डोस पाजले आहेच. त्याला चौकट देण्याचा सुजाण मान मात्र प्राध्यापक साहेबांना द्यायलाच हवा.

१. गांधीवादी विचाराच्या प्रचाराबरोबर त्यांच्या विरोधकाचेही साहित्याचा अभ्यास व्हायला हवा. उदा. सावरकरांचे साहित्य, गोपाल गोडसे यांचे गांधीहत्या आणि मी इत्यादी पुस्तके.
२. अनेक भाषेत पुस्तके मराठीत अनुवादीत होत असतात. प्यारेलाल यांचे गांधी एक महामानव हे पुस्तक प्रत्येकानेच वाचले पाहिजे.
३. गांधीवादी विचारावर अनेकांनी डॉक्टरेट केलेल्या आहेत. उदा. भटकळ यांनी गांधीचे समकालिन विरोधक यावर प्रबंध सादर केलेला आहे.
४. वर्तमानपत्रात, पुस्तकात प्रत्येक वर्षी गांधीवादाचा अन्वय नव्या पद्धतीने लावला जातो.

एकंदरीतच गांधीविचारावरचे साहित्य हे अफाट या पद्धतीनेच वर्णन करावे लागेल.

लिखाळ's picture

18 Dec 2008 - 8:41 pm | लिखाळ

दा न शिखरे यांनी लिहिलेले गांधीचरित्र कधी वाचायला घेतले होते.
पण पूर्ण वाचून झाले नाही. आता संधी मिळाली तर पाहिन.
-- लिखाळ.

मुक्तसुनीत's picture

18 Dec 2008 - 8:43 pm | मुक्तसुनीत

दा. न. शिखरे का द. न. शिखरे ? (माझी आठवण थोडी दगा देते आहे !)

लिखाळ's picture

18 Dec 2008 - 8:49 pm | लिखाळ

अम्म ! माझ्या दा न शिखरे असे लक्षात आहे. ते गांधीम्चे जवळचे शिष्य होते (बहुधा).
कुणी खुलासा केला तर बरे.
-- लिखाळ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Dec 2008 - 9:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गांधी विचारांचे जे एकनिष्ठ पुरस्कर्ते त्यापैकी 'दा.न. शिखरे, यांनी गांधीचरित्रे लिहिले !

मुक्तसुनीत's picture

18 Dec 2008 - 9:13 pm | मुक्तसुनीत

माझा दा. न. शिखरे आणि द. न. गोखले यांच्याबद्दल गोंधळ झाला होता. द. न. गोखले यांचेही गांधींवरचे पुस्तक आहे. ("शोध महामानवाचा").
झालेल्या गोंधळाबद्दल क्षमा.